पथनाट्य : निसर्ग आणि माणुस

का्ही काळापूर्वी माझ्या एका पुतणीला तिच्या शाळेत सादर करण्यासाठी म्हणून एक पथनाट्य लिहून दिले होते.

स्टेजवर पथ्यनाट्यातील सर्व सदस्य एकत्र असतील. प्रेक्षकांकडे पाहून, हातात हात धरून सुरुवात होते…

वसुंधरा पुकारते, स्वरात आर्त सांगते…
मानवाSSSS ऐक रे……, क्षण एक तू SSSSS थांब रे…..
नि:शब्द.., स्तब्ध…वायुच्या सवे जरासा थांब रे
वेदनाSSS माझ्या मनीची तुही जाण रे…!
……………………………….. मानवा थांब रे…., क्षण एक तू SSSSS थांब रे….. १

स्टेजवर तीन्-चार व्यक्ती. एकाच्या हातात डफ (डफ नसेल तर ताट आणि चमचाही चालतो), एक जमिनीवर उकिडवा बसलेला, बाकीचे प्रेक्षक…

पहिला : मेहरबान, कदरदान, पानदान, पिकदान, थुकदान, रोशनदान और जिनकी लुट चुकी है इज्जत वो सारे बचे खुचे खानदान. कबुल करा या गुलामाचा सलाम. जमुरे….. सलाम कर !

जमुरा : केला उस्ताद !

पहिला : कधी केला?

जमुरा : मनातल्या मनात…..!

पहिला : (कपाळावर हात मारतो) जमुरे खेळ दाखवणार काय?

जमुरा : दाखवणार उस्ताद !

पहिला : जमुरे, पब्लिकला शिकवणार काय?

जमुरा : शिकवणार उस्ताद !

पहिला : तू किती शिकला?

जमुरा : नॉनमॅट्रिक पास उस्ताद…….

पहिला : (डोक्यावर हात मारत) मग तू काय कपाळ शिकवणार पब्लिकला….

जमुरा : कपाळ नाय शिकवणार उस्ताद….

पहिला : अरे तेच विचारतोय, शिकवणार काय? काय शिकवणार….?

जमुरा : ‘आदर्श’ बांधकामाचा फंडा शिकवणार, पर्यावरणवाल्यांना चुना लावुन वृक्षतोड कशी करायची ते शिकवणार, खाडीतून रेतीचा बेकायदेशीर उपसा शिकवणार, मिठीचा गोडवा कमी करायला शिकवणार.

पहिला : अबे मार खायला लावतो काय पब्लिकचा. पब्लिक हुश्शार आहे…

जमुरा : त्याला काय कळणार आहे…..

पहिला : अरे बाबा, मायबाप आहेत ते आपले. त्यांना सगळं कळतं…

जमुरा : पण वळत नाही ना…..!

पहिला : (पब्लिककडे बघत हात जोडतो) बच्चा है हुजुर माफ कर दो ! तर जमुरे, आज काय शिकवणार….

जमुरा : नाय, नाय… आज रिक्वेस्ट करणार…

पहिला : कसली रिक्वेस्ट आणि कुणाला करणार?

जमुरा : पब्लिकला करणार, जिला माय म्हणतो त्या मातीचा, या धरतीचा र्‍हास थांबवण्याची विनंती करणार…….

इथे तिघेही जवळ येवुन गोल करतात , एकमेकाचे हात हातात घेवुन वर्तुळ करुन उभे राहतात. पार्श्वभूमीवर गाणे…..

संतप्त.., क्षुब्ध मी जरी, तरी तुझीच माय रे…
तुझ्या हिताशिवाय अन्य काळजी ती काय रे…
तू असा SSSS मानवा…, मलाच का विसरशी…?
तुझ्या शिवाय पाडसा.., अस्तित्व माझे काय रे…?
……………………………….. मानवा थांब रे…., क्षण एक तू SSSSS थांब रे….. २

*********************************************************************************

स्टेजवर दोन माणसे वर्तमानपत्र वाचत बसलेली आहेत.., पात्रे तीच आता भुमिका मात्र बदललेल्या….

पहिला : (हातातला पेपर दाखवत)मित्रा, अरे आजचा पेपर वाचलास का? ही बातमी बघितलीस….?

दुसरा : (हातातील मासिकातला फोटो न्याहाळत) बघ ना रे, असं व्हायला नको होतं यार…? खुप वाईट झालं?

पहिला : नाहीतर काय? पण खरं सांगु याला बर्‍याच अंशी आपण पण जबाबदार आहोत….

दुसरा : खरय तुझं , सालं आपण येड्यासारके त्यांचे पिक्चर बगायला, जातो. घरातून त्यांचे फोटो लावतो. आता त्या जॉनला मत्सर वाटणारच की. पण म्हणुन काय लगेच ब्रेक अप. शोभतं का हे जॉनला. बिचारी बिपाशा? तुला सांगतो…..

(दुसर्‍याचं पहिल्याकडे लक्ष जातं, पहिला त्याच्याकडे खाऊ की गिळु या नजरेने पाहात असतो. दुसर्‍याच्या लक्षात येतं आपण काहीतरी लोचा केलाय. तो ओशाळुन गप्प होतो)

पहिला : नाही…बोल तू, होवू दे तुझं.

दुसरा : नाय रे, म्हणजे तू बोल ना. आता नाय आवडत एखाद्याला बिपाशा. सगळ्यांना आवडायलाच पाहीजे असं थोडीच आहे. आता मला माहितीये तुला करीना आवडते. बादवे करीनाचा आणि सैफचा पण वाजला काय?

(पहिला डोक्यावर हात मारुन घेतो)

पहिला : तू सुधरणार नाहीस. जरा बाहेर पड त्या बॉलीवुडमधून. जगात आपल्या आजुबाजुला काय चाललेय याचा काही पत्ता आहे का तुला. आता ही बातमीच बघ…

बातमी मोठ्याने वाचुन दाखवतो

“चेन्नईजवळील जुना पल्लवराम भागातील एका तलावात सोमवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे आढळले. प्राथमिक तपासानंतर तलावातील पाण्यात ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तलावातील मासे मेल्याचे उघडकीस आले आहे. मात्र अनेकांनी पाण्याच्या प्रदूषणामुळे हा प्रकार घडला असावा, अशी शंका व्यक्त केली आहे. ”

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7011815.cms

दुसरा : धत तेरी…, मला वाटलं काहीतरी सनसनाटी बातमी असेल. यात काय नवीन आहे. सालं सगळ्या जगातच प्रदुषण आहे, प्रदुषणामुळे माणसेही कसले कसले रोग होवुन मरताहेत. त्यात चेन्नईतले काही मासे मेले तर त्यात काय विशेष. येडा आहेस यार तू? कशाला नाही त्या गोष्टीत डोके खुपसुन डोक्याला त्रास करुन घेतोस. अरे प्रदुषणाची समस्या आपल्याला नवीन आहे का? चालायचेच रे….., अशा छोट्या, छोट्या गोष्टी मनाला लावुन घ्यायच्या नसतात.

गायक वृंद पुन्हा पुढचे कडवे घेइल….

विकास पाहूनी तूझा, जाहले मी तृप्त रे…
परि कृतघ्न तू, तुला तुझाच स्वार्थ प्रिय रे…
वृक्ष तूSSS…च तोडीशी, न लाविशी कधी पून्हा…,
तुझे तुलाच ना कळे, हार ही तुझीच रे ….
……………………………….. मानवा थांब रे…., क्षण एक तू SSSSS थांब रे….. ३

(स्टेजवर एक स्त्री प्रवेश करते. तशी तरुण वाटतेय पण कंबरेतून वाकलेली, सारखी खोकतेय. तिला बघुन पहिला आपल्या खुर्चीवरुन उठतो आणि तिला बसायला आपली जागा देतो)

पहिला : बसा मावशी, थकलेल्या दिसताय. आजारी पण वाटताय. पाणी हवेय का तुम्हाला?

दुसरा, लगेच आपल्या हातातल्या मासिकाने तिला वारा घालायला लागतो.

स्त्री : हो रे बाबा, खुप थकलेय. आता सगळेच सहनशक्तीच्या पलिकडे चाललेय बघ. पाणी कुठुन देणार तू मला. मला हवे तितके पाणी शिल्लक तरी ठेवलेय का तूम्ही लोकांनी. जिथे बघावे तिथे समुद्रालासुद्धा मागे सरकवून सिमेंट काँक्रीटच्या इमारती उभारताय. पाणी राहीलेय कुठे?

दोघेही चमकुन तिच्याकडे बघायला लागतात. आत्ता कुठे त्यांच्या लक्षात येतं की ही स्त्री सर्वसामान्य स्त्रीयांपेक्षा थोडी वेगळीच दिसतेय. अंगावर जिकडे, तिकडे फुले, पाने खोचलेली. अंगावरची साडी बर्‍यापैकी मळलेली.

पहिला : मावशी, कोण आहात तुम्ही? आणि असं कितीसं पाणी लागणार आहे तुम्हाला आपली तहान भागवायला.

मावशी : अरे मी कोण म्हणुन काय विचारता? आईला पण विसरलात?

दुसरा : मावशी, खरंच आम्ही नाही ओळखलं तुम्हाला. बाय द वे तुम्ही त्या ‘खुन का बदला पानी’ मध्ये होता का? बिपाशाच्या आईचं काम केलेल्या तुम्हीच का?

पहिला परत एकदा रागाने दुसर्‍याकडे बघतो.

पहिला : तू जरा गप्प बसणार आहेस का? माफ करा मावशी, पण खरेच तुम्हाला ओळखले नाही. आईसारख्याच आहात तुम्ही, पण ओळख देणार का?

मावशी : (थकलेल्या आवाजात) खरय रे बाबा. आजकाल जिथे परमेश्वरासुद्धा आपली ओळख द्यावी लागती तिथे मी कोण? तर मी वसुधा…

वसुधा, वसुंधरा, धरा, पृथा, पृथ्वी, धरती, धरित्री, धरणी… कुठल्याही नावाने हाक मारा…

(दोघेही चमकुन उभे राहतात.)

गायक इथे पुढचे (४ थे कडवे) घेतील..

सोसले किती आघात, भोगली रे वेदना…
भुकंपात मानवा सर्वस्व तू गमावले…
मानवाSSSS…, असा कसा? चुकशी तू पुन्हा पुन्हा…..?
करशी का निसर्गाशी, तू पुन्हा प्रतारणा….?
……………………………….. मानवा थांब रे…., क्षण एक तू SSSSS थांब रे….. ४

दोघेही एकदम : काहीतरीच काय बोलताय मावशी?

वसुधा : हो तीच मी ! तुमची धरणीमाय, पृथा. माझीच लेकरं आज माझ्या जिवावर उठली आहेत. म्हणुन दाद मागायला , जाब विचारायला यावं लागलं.

पहिला : काय चुकलं आमचं माते?

वसुधा : काय नाही चुकलं ? प्रत्येक ठिकाणी माणुस चुका करतोय? त्या परमेश्वराची सर्वोच्च निर्मीती, माझं सगळ्यात लाडकं अपत्य….., तो माणुसच माझ्या मुळावर उठलाय. आता परवाचीच गोष्ट घ्या. कुठल्याशा जवळच्याच गावात १५-२० जणांनी मिळून गावात शिरलेल्या एका वन्य प्राण्यास एकत्रीत्पणे गराडा घालुन मारले आणि वर स्वतःचीच वीर म्हणुन पाठ थोपटुन घेतली.

पहिला : अगं ती इथली नाशकातली घटना माते. तो वाघ जंगल सोडुन मनुष्यवस्तीत शिरला होता, त्याने माणसांना इजा करु नये म्हणुन तर सगळ्यांनी मिळुन धाडसाने त्याला पकडुन मारलं ना. त्यात माणसाचा काय दोष?

वसुधा : अरे पण तो जंगल सोडून मनुष्यवस्तीत का शिरला याचा विचार केलात का तुम्ही? आपलं राहतं घर, विधात्याने दिलेला अमर्याद अन्नसाठा सोडुन त्याला मानवी वसाहतीत अन्न शोधायला का यावे लागले? तुम्ही मानवांनी त्याच्या घरावर, जंगलावर अतिक्रमण केलेत म्हणुनच ना! अरे त्याच्या हक्काच्या गोष्टींवरही जर तुम्ही हक्क सांगायला लागलात तर उदरभरणासाठी त्याला दुसरी सोय बघावी लागणारच ना? मग तो अन्नाच्या शोधात जर तुमच्या वस्तीत शिरला तर तो त्याचा दोष कसा काय ठरतो? अरे एक प्राणी असुनही गरज पडल्याशिवाय दुसयाच्या हद्दीत अतिक्रमण करु नये हे त्याला कळते, पण तुम्ही माणसे… परमेश्वराची सर्वात बुद्धीवान निर्मीती तुम्हाला आपल्या गरजा कळु नयेत?

पहिला : पृथ्वीमाते, अगं माणुस सदैव प्रगतीच्या संधी शोधत असतो. विकासाचे रस्ते शोधत असतो.

वसुधा : पण त्यासाठी निसर्गाचा, या सृष्टीचा तोलच बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मला सांगा, ते पुण्याजवळ, लवासा की काय नावाचे मोठे नगर उभे करताय तुम्ही, किती मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालीय तिथे माहीत आहे का तुला? तो अधिकार कोणी दिला तुम्हाला. मुंबई नामक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणावर समुद्राच्या पाण्यावर भराव टाकुन मोठमोठ्या इमारती बांधल्या जाताहेत. तिथे तुम्ही निसर्गाच्या अधिकारात ढवळाढवळ करत नाही आहात का? आधी कायम हिरवेगार असणारे डोंगर आता तिथला दगड मिळवण्यासाठी अक्षरश: बोडके करुन टाकले आहेत तुम्ही. मला किती यातना होतात त्यामुळे याचा विचार कधी केला आहात का तुम्ही?

दुसरा : माते, पण याला काही अंशी तो देवपण जबाबदार नाही का?

वसुधा : कसा काय?

दुसरा : आता असं बघ, त्याने हे जग निर्माण केलं, वनस्पती निर्माण केल्या, प्राणी निर्माण केले मग माणुसही जन्माला घातला. पण हे सगळं करताना त्या देवानेच एक लोचा करुन ठेवलाय त्याचं काय?

(पहिला आणि वसुधा दोघेही त्याच्याकडे पाहायला लागतात.)

दुसरा : (मिस्किलपणे हसत) अगं त्याने या सर्व प्राण्यांबरोबर मानवालाही आपल्यासारखा दुसरा जिव निर्माण करण्याची क्षमता, प्रजनन क्षमता दिली. तिथेच तर गडबड झाली ना! दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतेच आहे. मृत्युदरापेक्षा जननदर जास्त आहे. माणसे वाढली की त्यांना राहण्यासाठी घरे पाहीजेत, घरे बांधायची म्हणले की दगड, माती, लाकुड इ. गोष्टी लागणारच. त्यासाठी मग डोंगर फोडणे, समुद्राचा उपसा करुन रेती मिळवणे, लाकडासाठी झाडे तोडणे असे उपद्व्याप सुरू झाले. आता मला सांग ही प्रजननशक्तीच जर देवाने माणसाला दिली नसती तर हे सगळे झाले असते का?

(यावर पहिला आणि वसुधा दोघेही हसु लागतात.)

वसुधा : बरोबर आहे तुझं म्हणणं. देवाने आपली सर्वोत्कृष्ट निर्मीती म्हणुन मानव बनवला. वर त्याने मानवाला कल्पनाशक्तीचीही देणगी दिली. पण मानवप्राणी त्या देणगीचा गैरफायदा घेवु लागलाय. अरे अंथरुण पाहून पाय पसरायला कधी शिकणार तुम्ही. तुमच्या खर्‍या गरजा ओळखायला कधी शिकणार तुम्ही. देवाने प्रजननशक्तीबरोबर विचार करण्याची शक्तीही दिलीय ना तुम्हाला. मग कुठे थांबायचे याचा विचार पण देवानेच करायचा का? तुम्हाला बुद्धीचे वरदान देण्याचा फायदा काय मग?

पहिला : माते तुझं म्हणणं पटतय गं. पण या सर्व गोष्टी परस्परांशी संबंधीत अशाच आहेत ना. अगं प्राणीदेखील जगण्यासाठी धडपड करतातच ना? मग माणसाने ही केली तर बिघडले कुठे?

वसुधा : जगण्यासाठी धडपड करण्याला ना नाहीये रे राजा. पण स्वत: जगताना “जगा व जगु द्या ” हा मुलमंत्रच मानवप्राणी विसरतोय त्याचं काय? आज तुम्ही जंगलं तोडताय, समुद्राला मागे हटवताय. डोंगरच्या डोंगर पोखरुन तिथे आपली घरे बांधताय. विकासाच्या नावाखाली नवी-नवी वाहने बनवुन वातावरण प्रदुषीत करताय. त्याचा त्रास फ़क्त मलाच होतोय का? माझे पुत्र या नात्याने त्याची फ़ळे ही तुम्हालाच भोगावी लागणार आहेत ना.

पहिला : खर आहे माते

वसुधा : मला एक सांग आज मानवाची सरासरी वयोमर्यादा किती कमी झालीय. पुर्वी किमान ८०-९० असणारी सरासरी आज ५०% वर उतरलीय. कशामुळे? आज जगात वाढलेल्या प्रदुषणामुळेच ना ! तुमच्या अशा वागण्यामुळे नुकसान तुमचेच होतेय मुलांनो. आणि ते तुम्हाला समजत नाहीये. त्यामुळेच तर जास्त त्रास होतोय मला. तुम्ही झाडे तोडलीत, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. वातावरणातील प्राणवायुचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होतेय. या सगळ्यामुळे अंती नुकसान तुमचेच होणार आहे.

पहिला व दुसरा : मग यावर उपाय काय माते? मानवाने परत पहिल्यासारखे गुहेत राहायला जायचे का? आधुनिक वाहने सोडून पुन्हा बैलगाडीचा वापर सुरु करायचा का?

वसुधा : असे नाही ये रे मुलांनो. प्रगती, विकास हा प्रत्येकाचा अधिकारच आहे. फ़क्त आपला विकास साधताना निसर्गाचा तोल बिघडू नये याचे भान बाळगले म्हणजे झाले.

पहिला : म्हणजे कसं?

वसुधा : म्हणजे बघ…. आज तुला घर बांधायसाठी लाकुड हवं म्हणुन तू एक झाड तोडायचं ठरवलंस, तर ते एक झाड तोडायच्या आधी किमान दहा नवीन झाडे लावायची. आपल्याकडे खुप जमीन उपलब्ध आहे, मग त्या सागराच्या जागेवर तुमचा डोळा का? प्रदुषण निर्माण करणारी वाहने, त्यांचा वापर शक्य तेवढा कमी, गरजेपुरताच करायचा. अलिकडे खुपशा देशातून सायकलींचा वापर वाढलाय तो यामुळेच. लोकांना पर्यावरणाचे महत्व पटतेय. ते जास्तीत जास्त लोकांना पटवुन द्यायचा प्रयत्न करा. स्वत:ही त्याप्रमाणे वागा. बघा, जमतं का ते….. ! येते मी. माझे भोग आहेत, ते मला भोगलेच पाहीजेत.

(जायला निघते)

पहिला व दुसरा : थांब धरणीमाते, थांब जराशी. आज आमचे डोळे उघडलेस तू. आता आम्ही तुला वचन देतो…..

(तिघेही एकत्र येवुन प्रेक्षकांकडे तोंड करुन उभे राहतात. उजवा हात छातीशी घेवुन शांत स्वरात शपथ घेतात…..!)

आज आम्ही सर्व मानवप्राणी शपथ घेतो की आई धरित्रीच्या कल्याणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु. स्वत:च्या गरजा जाणुन घेवुन त्यानुसारच वागु. आवश्यकतेपेक्षा जास्तीची हाव धरुन धरतीला, पर्यायाने निसर्गाला धोका पोहोचेल असे कधीही वागणार नाही. वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्ष लावणॆ तसेच त्यांचे संवर्धन करणे यावर जोर देवु. वातावरणातील प्रदुषण कमीत कमी करता येइल असेच प्रयत्न करु. आपली धरा पुन्हा पहिल्याप्रमाणे सुजलाम सुफ़लाम करु.

सगळे मिळुन एकत्र येवुन आई धरित्रीचे पांग फ़ेडु. एकमेकांच्या साहाय्याने हि पृथ्वी समृद्ध करु. चला मित्रहो, आता कंबर कसुया, सगळे मिळुन आपल्या पृथ्वीचे, निसर्गाचे रक्षणासाठी एकत्र येवु या.

सगळे मिळून गातात….

चला, चला… सवे पुन्हा निसर्ग राग आळवू
धरुनी कास वसुधेची, समृद्ध जीवना करू….
मानवाSSSS… चल सख्या….., सुरुवात रे नवी करू…
चला पुन्हा मिळूनी कास प्रगतीची धरू
त्याजूनी चुका जुन्या वसुंधरेस सावरू….
……………………………….. मानवा ऐक रे…., क्षण एक तू SSSSS थांब रे….. ५

समाप्त

7 thoughts on “पथनाट्य : निसर्ग आणि माणुस”

  1. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
    आपला मराठी ब्लॉग … http://www.marathiblogs.in/ वर जोडा
    आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
    जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

    Like

  2. मराठी ब्लोगर्स साठी सुवर्ण संधी..
    आपला मराठी ब्लॉग … http://www.marathiblogs.in/ वर जोडा
    आणि 4 जीबी चा पेनड्राइव जिंकण्याची संधी मिळवा.
    जगातील सर्वात मोठ्या मराठी ब्लॉग्स च्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हा..

    Like

यावर आपले मत नोंदवा