३३ वर्षांनी त्यांनी आणि आपणही अनुभवलेला एक उत्कट आनंद सोहळा…

काल श्रीलंकेत टी२० च्या अंतीम सामन्यानंतर जे पाहायला मिळालं, मला वाटतं आजवर पाहिलेल्या ‘आपला आनंद व्यक्त करण्याच्या’ पद्धतींपैकी ती एक अतिशय उत्कट आणि सुंदर अशी पद्धत होती. मुळात ‘ख्रिस गेल’ हे व्यक्तिमत्वच मला कायम उत्साहाचं मुर्तीमंत प्रतिक वाटत आलेलं आहे. मैदानातील त्याचा झंझावात पाहणं म्हणजे रस्त्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टीला झोडपत सुटलेल्या एखाद्या बेदरकार वादळाचा साक्षीदार असण्यासारखं आहे. गंमत म्हणजे गेलच्या खेळात विव्ह रिचर्डसचा बेफाम झंझावात आणि सोबर्सची पद्धतशीर संयमी पण शत्रुपक्षाला पुर्णतः नामोहरम करणारी फटकेबाजी या दोहोचा संगम आहे. त्यामुळे गेलला मैदानावर, विशेषतः २०-२० च्या मैदानावर फटक्यांची बहारदार नक्षी रेखताना बघणं ही जणु काही मेजवानीच असते. पण काल त्या झंझावाताचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. भलेही शेवटच्या मॅचमध्ये गेल फलंदाजीत अयशस्वी ठरला असेल पण एकंदरीत स्पर्धेतला त्याचा खेळ खासच होता. पण मला पुर्ण स्पर्धेत गेल आवडला तो अंतीम विजयानंतर बेभान होवून आनंद व्यक्त करताना.

सर्वसाधारणपणे माणुस अतिशय आनंद झाला की मनमुराद हसतो किंवा रडतो, गातो किंवा जे गेल आणि त्याच्या सहकार्‍यांनी केलं ते करतो, म्हणजेच बेभान होवून नाचतो. आपण नाही का “धत्तड तत्तड धत्तड तत्तड” करत बेभान होवून नाचत आपला आनंद व्यक्त करतो त्याचप्रमाणे कालच्या विजयानंतर कॅरेबियन्सनी देखील आपला आनंद व्यक्त केला. आधी थोडा वेळ त्या ’CHAMPIONS’ च्या बोर्डच्या मागे उभा राहून मजा घेत असलेल्या गेलने अचानक एक भन्नाट झेप घेत स्वत:ला मैदानात झोकून दिले आणि मग सुरु झाला एक अफ़लातुन आनंद सोहळा. ‘गन्गनम डान्स’ की काय त्या डान्सच्या स्टेप्सवर ‘गेल’ थिरकायला लागला. सुरुवातीला आपल्या रामा डान्सप्रमाणे वाटलेल्या गेलच्या त्या स्टेप्स नंतर त्या नृत्यामागची कारणे, त्या नृत्यामागची धुंदी, तो उन्माद लक्षात आला तसा विलक्षण देखण्या वाटायला लागल्या. गंमत म्हणजे सुरुवातीला मुग्ध होवून गेलच्या नृत्याची मजा घेणारे विंडीजचे इतर खेळाडू सुद्धा नंतर त्या स्टेप्सवर थिरकायला लागले आणि जणुकाही एक सोहळाच सुरू झाला.

प्रसंगच तसा होता. तब्बल ३३ वर्षांनी विंडीजच्या वाटयाला हा आनंद हे समाधान आलेलं आहे. एकेकाळी क्रिकेटच्या खेळावर निर्विवाद राज्य केलेला, सम्राटपद उपभोगलेला विंडीजच्या या योद्ध्यांचा हा संघ गेल्या कित्येक वर्षात ढेपाळल्यासारख्या वाटत होता. कुठेतरी अधोगतीला सुरुवात झाली होती. ‘तोफखाना’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विंडीजच्या गोलंदाजीची धार हळु हळु बोथट व्हायला लागली होती. एकेकाळी समोरचा संघ जर विंडीजचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाचा जोर सामना जिंकण्यापेक्षा ड्रॉ करण्यावरच जास्त असायचा. पण गेल्या कित्येक वर्षात विंडीजची ती दहशत, ती जरब नाहीशी झालेली होती. वर्ल्ड कप जिंकणे तर सोडाच पण उपांत्य सामन्यापर्यंत पोचण्याची सुद्धा क्षमता त्यांच्यात राहीली नव्हती. त्यात गेल्या काही दिवसात संघ अंतर्गत कलहाने आणि राजकारणाने पोखरला गेलेला होता. अशा परिस्थितीत डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली विंडीजच्या पोखरलेल्या, गलितगात्र व्हायला लागलेल्या टीमने पुन्हा आपली अंतर्गत भांडणे, कलह बाजुला ठेवून आपली समग्र ताकद एकवटली आणि जगाला पुन्हा एकदा आपल्या संघटीत सामर्थ्याचा साक्षात्कार घडवून आणला. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, न्युझीलंड, भारत, पाकिस्तान अशा बलाढ्य संघांना नामोहरम करत या टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि मग सुरू जाहला एक जल्ल्लोष….

काय नव्हतं त्या नृत्यात? आनंद, धुंदी, आपल्या सामर्थ्याबद्दलचा आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटबद्दलचं अफाट आणि उत्कट प्रेम !

भलेही नृत्याच्या त्या मुद्रा, त्या स्टेप्स एखाद्या व्यावसायिक, प्रशिक्षीत नर्तकाच्या नसतील, भलेही त्या नृत्यात ते कौशल्य नसेल. पण त्यात होती सहजता, त्यात होतं लालित्य, त्यात होतं आपल्या देशावरचं उत्कट प्रेम. इतक्या वर्षांनी आपल्या देशाला हा गौरव मिळवून दिल्याचा आनंद काल विंडीजच्या संपूर्ण संघाने मनसोक्त अनुभवला. त्यांच्याबरोबर माझ्यासारख्या विंडीजच्या चाहत्यांनी सुद्धा…….! अत्यानंदाच्या त्या उत्तुंग क्षणी ती सगळीच एरव्ही रासवट, रानगट वाटणारी विंडीजची सेना विलक्षण देखणी दिसत होती. त्या क्षणी आनंद विभोर झालेलं त्यांचं ते देखणं दर्शन कुठल्याही रुपगर्वितेलाही मान खाली घालायला भाग पाडणारं होतं.

विंडीजच्या या विजेत्या संघाचं मनःपूर्वक अभिनंदन !
विंडीजच्या संघाच्या या यशाबरोबरच आता हे यश असंच टिकून राहो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना !!

5 thoughts on “३३ वर्षांनी त्यांनी आणि आपणही अनुभवलेला एक उत्कट आनंद सोहळा…”

  1. क्रिकेटपेक्षाही त्या नृत्यात दिसली तो आयुष्य मनमुरादपणे उपभोगण्याची वृत्ती. आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर श्रीलंकेविरूद्ध वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गंगम नृत्यातून पूरेपूर मजा आणली. त्यांच्या या नैसर्गिक निरागसतेमुळेच त्यांनी जिंकावे असे वाटत होते आणि त्यांच्या फलंदाजीच्या वेळेस सामना त्यांच्या हातातून गेला की काय, अशी भीतीही. काहीही असले तरी ३३ वर्षांनंतर विंडीजच्या संघाने घेतलेल्या या फिनिक्स भरारीमुळे मर्दाना क्रिकेटच्या चाहत्यांना आनंदच होईल.

    Like

    1. येस्स.. देविदासजी ! मलाही माझ्या लेखात तेच अपेक्षीत आहे. क्रिकेटशी संबंधीत असला तरी माझ्या लेखाचा विषय त्यांचा आनंद, तो साजरा करण्याची त्याची अनोखी पद्धत हाच आहे. धन्यवाद.

      Like

  2. क्रिकेट बद्दल आपण जरा जास्तच वावहत जाताना दिसतो. बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसे मनमौजी को मुश्किल है समझाना है ना ..शादी किसी की हो ( अपना दिल गाता है )…..अशी आपल्या देशाची दुरावस्था झाली आहे….कांही वर्षाने परत पैशाच्या लालसेपोटी मैच फिक्स च्या बातम्या झळकतील ….पण आपण शहाणे होणार नाही….सहा आंतरराष्ट्रीय पंच ट्वेन्टी-२० विश्वचषक तसेच श्रीलंका प्रीमिअर लीग स्पर्धेतील सामने निश्चिती करण्यासाठी तयार असल्याचे एका खाजगी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गंभीर दखल घेतली आहे?????????. आयसीसी या प्रकरणाची चौकशी करणार असून या संदर्भातील माहिती पुरवण्याचे आदेश या वाहिनीला देण्यात आले आहेत?????? आता पर्यंत खेळाडू मैच फिक्स करत होते आता तर पंच सुद्धा यात सामील होताना दिसतात…..IPL 20 -20 चे तर आयोजकच या फिक्सिंग मध्ये सामील असतात ……भारत हरला तर पाक मध्ये उन्माद होतो तर पाक हरला तर इंडिया मध्ये उन्माद होतो…..आम्ही जिंकलो नाही तरी हरकत नाही पण दुसरा जिंकला नाही पाहिजे ही जर खेळ भावना देशभक्ती ची मापे
    असतील तर या खेळास खेळ म्हणानाऱ्याची कीव करावी वाटते.आता तर खेळा पेक्षा चियर गर्ल्स नाचणे गाणे यालाच जास्त महत्व आले आहे… ये ट्वेंटी ट्वेंटी मैच है यार ना ये तमीज से खेला जाता है …ना तमीज से देखा जाता है बॉस !! यातच या खेळाची मानसिकता दीसते.

    असतील तर या खेळास खेळ म्हणानाऱ्याची कीव करावी वाटते.आता तर खेळा पेक्षा चियर गर्ल्स नाचणे गाणे यालाच जास्त महत्व आले आहे… ये ट्वेंटी ट्वेंटी मैच है यार ना ये तमीज से खेला जाता है …ना तमीज से देखा जाता है बॉस !! यातच या खेळाची मानसिकता दीसते.

    Like

    1. पुर्णपणे सहमत !
      पण ३३ वर्षांनंतर मिळालेल्या या विजयाचे महत्व विंडीजसाठी खासच असणार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या लेखाचा विषयाशी क्रिकेटचा संबंध असला तरी लेख क्रिकेटवर नाहीये. तर त्या आनंदसोहळ्यावर आहे. माझ्या साठी महत्वाचा आहे तो त्यांचा आनंद !
      किण जिंकलं , कोण हरलं याहीपेक्षा ज्या पद्धतीने बेभान होवून त्यांनी आपला आनंद साजरा केला ते माझ्यासाठी महत्वाचे आहे.

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s