“खोल दो” : सआदत हसन मंटो : मराठी अनुवाद

५० च्या दशकात आपल्या लघु कथांच्या माध्यमातुन फ़ाळणीचे विखारी सत्य सांगुन गेलेल्या ’सआदत हसन मंटो’ला आपण सगळेच विसरुनही गेलोय. आजच्या पिढीला तर ’सआदत हसन मंटो’ हे नावही माहीत नसेल. ’मंटो’ च्या फ़ाळणीमुळे उदभवलेल्या परिस्थीतीवर भाष्य करणार्या कथा असोत किंवा एकंदरीतच दारिद्र्य, हिंसा, कारुण्य यांनी ओतप्रोत भरलेल्या , कधीकधी, कधी-कधी का? नेहमीच अंगावर येणार्‍या, वाचता वाचताच सुन्न करुन टाकंणार्‍या कथा कधीही विसरता न येण्यासारख्याच आहेत. मंटोच्या अनुभवसमृद्ध लेखणीची सर माझ्या बोटांना नाही. शेवटी मी फ़क्त एक पोष्टमनच !

पण मला जमले तसे, जमेल तसे मंटोच्या उपलब्ध कथांचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच शृंखलेतील ही पहिली कथा!

“खोल दो” (मंटोची मुळ हिंदी कथा इथे वाचता येइल.)

अनुवादाचा पहिलाच प्रयत्न आहे. कथेच शिर्षक तेच ठेवतोय कारण ’खोल दो’ इतके दुसरे समर्पक शिर्षक मला तरी सुचले नाही. काही चुकले असल्यास नि:संकोचपणे सांगा. मला पुढील कथेच्या अनुवादाच्या वेळी त्याचा उपयोग होइल. धन्यवाद.

सस्नेह

विशाल कुलकर्णी

*****************************************************************************************************************************

“खोल दो”

खोल दो
सआदत हसन मन्टो

प्रवाश्यांनी खचाखच भरलेली ती ट्रेन अमृतसरहुन बरोब्बर दुपारी दोन वाजता निघाली आणि आठ तासानंतर मुघलपुर्‍याला पोहोचली. आठ तासाच्या त्या रस्त्यात, त्या जणु काही कधी न संपणार्‍या प्रवासात किती निष्पाप जीव मारले गेले. कितीतरी जखमी झाले आणि कित्येक परागंदा झाले याची काही गणतीच नव्हती.

सकाळी साधारण दहा वाजायच्या सुमारास छावणीतल्या त्या थंडगार जमीनीवर जेव्हा सिराजुद्दीनने आपले डोळे उघडले, तेव्हा आजुबाजुला ओसंडून वाहणारा तो स्त्री, पुरूष आणि मुला-बाळांचा अवाढव्य समुद्र त्याच्या दृष्टीस पडला. आपली विचार करण्याची, काही समजुन घेण्याची क्षमता अजुनच वृद्ध, क्षीण होत असल्याची ती पहिली जाणीव त्याला झाली. कितीतरी वेळ तो शुन्य नजरेने गढूळलेल्या, जणु काही मळभ दाटलं असावं असे वाटणार्‍या त्या अथांग आकाशाकडे पाहातच राहीला. खरेतर छावणीत प्रचंड हल्लकल्लोळ माजलेला होता, सगळीकडे रडारड, आपल्या हरवलेल्या, ताटातुट झालेल्या माणसांना शोधण्याची गडबड चालु होती. प्रचंड गोंधळ माजला होता, पण म्हातार्‍या सिराजुद्दीनच्या जशी काही कानठळीच बसली असावे तसे झाले होते. त्याला काहीच ऐकु येत नव्हते. कुणी त्याला तशा अवस्थेत पाहीले असते तर छातीठोकपणे सांगितले असते की तो शांतपणे झोपला आहे, पण तसं नव्हतं. जणु काही तो आपलं चैतन्य आपली शुद्धच हरवून बसला होता. जणु काही त्याचं सारं अस्तित्वच कुठेतरी शुन्यात अधांतरी लटकलं असावं तसं…..

अगदी निरुद्देश्य वृत्तीने त्या गढुळलेल्या आकाशाकडे बघता बघता अचानक सिराजुद्दीनचे डोळे त्या उदास सुर्यावर स्थीरावले, ते तेजस्वी, अंग्-अंग जाळणारे सुर्यकिरण त्याच्या अस्तित्वात, त्याच्या गात्रा – गात्रात भिनायला लागले आणि…

सिराजुद्दीनला जाग आली….

त्या जागृतावस्थेत गेल्या काही तासांमधल्या घटना, ती चित्रे एखाद्या चित्रमालिकेसारखी एका क्षणात त्याच्या निर्जीव नजरेसमोर सरकत गेली. लुटालुट, आगीचे कल्लोळ, प्रचंड पळापळ, ते रक्तरंजीत, भयव्याकुळ माणसांच्या गर्दीने भरलेले रेल्वे स्टेशन, बंदुकीच्या गोळ्या… ती काळरात्र आणि सकीना ! सकीना… सिराजुद्दीनची चेतना जणु परत आली, जिवांच्या आकांताने तो ताडदिशी उठून उभा राहीला आणि दुसर्‍याच क्षणी आपल्या चहुबाजुला पसरलेल्या त्या माणसांच्या अवाढव्य महासागरात त्याने स्वतःला झोकून दिले. सकीनाला शोधण्यासाठी….

जवळ्-जवळ तीन तास, तीन तास तो निर्वासीत छावणीच्या कानाकोपर्‍यात सकीना-सकीना असा आक्रोष करत आपल्या एकुलत्या एक , तरुण लेकीला शोधत होता, पण सकीनाचा काहीही पत्ता लागला नाही. छावणीत सगळीकडेच आकांत माजलेला, प्रचंड गोंधळ उडालेला होता. कुणी आपल्या मुलाला-मुलीला शोधत होते, कोणी आई, कोणी आपली पत्नी शोधत होते. शेवटी थकला भागला सिराजुद्दीन एका कोपर्‍यात टेकला आणि मेंदुवर जोर देवून आठवण्याचा प्रयत्न करु लागला. नक्की कुठे आणि केव्हा सकीना त्याच्यापासून वेगळी झाली असावी, कुठल्या क्षणी त्याची तिच्यापासुन ताटातुट झाली असावी? पण सकीनाचा विचार करायला लागला की त्याच्या स्मृतींचा शोध सकीनाच्या आईच्या त्या विच्छिन्न प्रेतावर येवुन स्थिरावायचा, संगीनीच्या आघाताने जिची सगळी आतडी बाहेर आलेली होती. त्याच्यापुढे जावून काही विचार करणे सिराजुद्दीनला शक्य होइना. सकीनाची आई कधीच अल्लाला प्यारी झाली होती त्या दंगलीत. सिराजुद्दीनच्या असहाय्य डोळ्यांदेखतच तीने तडफडत आपले प्राण सोडले होते. पण सकीना? सकीना कुठे होती? जिच्याबद्दल मरताना तिच्या आईने सिराजुद्दीन्ला कळवळून सांगितले होते , ” मला सोडा आणि सकीनाला लवकरात लवकर येथुन दुर कुठेतरी घेवुन जा.”

सकीना त्याच्यासोबतच होती. दोघेही हातात हात धरुन , अनवाणी पायाने जिवाच्या आकांताने अज्ञाताच्या दिशेने धावत होते. मध्येच सकीनाची ओढणी गळुन पडली, ती उचलण्यासाठी तो थांबायला गेला तेव्हा सकीनाने ओरडून सांगितले, ” जाऊदे अब्बाजी, सोडून द्या ती ओढणी” पण सिराजुद्दीनने ओढणी उचलून घेतली होती. हा विचार करतानाच नकळत त्याने आपल्या कोटाच्या फुगलेल्या खिश्याकडे पाहीले आणि खिश्यात हात घालून त्याने, त्यातुन एक कापड बाहेर काढले….

सकीनाची तीच ओढणी होती, पण सकीना…सकीना कुठे होती?

आपल्या शिणावलेल्या मेंदुवर सिराजुद्दीनने खुप जोर देवून पाहीला, पण तो कुठल्याच निर्णयाप्रत येवु शकला नाही. त्याला आठवेना, तो सकीनाला नक्की आपल्याबरोबर स्टेशनपर्यंत घेवुन आला होता का? ती त्याच्याबरोबर गाडीत चढली होती का? काहीच आठवत नव्हते. मध्येच रस्त्यात जेव्हा गाडी जबरदस्तीने थांबवली गेली आणि काही हल्लेखोर जबरदस्तीने गाडीने शिरले तेव्हा तो बेशुद्ध झाला होता का की ज्यामुळे त्याच्या बेशुद्धीत ते सकीनाला पळवून घेवुन गेले? सिराजुद्दीनच्या मेंदुत विचारांचा हलकल्लोळ माजला होता. प्रश, प्रश्न शेकडो प्रश्न मेंदुत उठत होते, त्याला कुणाच्या तरी सहानुभुतीची गरज होती पण दुर्दैवाने आजुबाजुला इतके दुर्दैवी जीव अडकले होते, त्या प्रत्येकालाचा सहानुभुतीची गरज होती. अश्रुनीही त्याची साथ सोडली होती. सिराजुद्दीनने रडण्याचा खुप प्रयत्न केला पण डोळ्यातली आसवे जणू त्या काळरात्रीत कुठल्यातरी क्षणी सुकून गेली होती, हरवली होती.

आठवड्याभराने जेव्हा मनाची अवस्था जरा ताळ्यावर आली तेव्हा सिराजुद्दीन निर्वासितांच्या मदतीचे काम करणा-या काही लोकांना भेटला. ते आठ तरुण होते, ज्यांच्या जवळ लाठ्या-काठ्या आणि बंदुकी होत्या. सिराजुद्दीनने त्यांचे लाख लाख आभार मानले आणि त्यांना सकीनाचे वर्णन सांगितले.

“दुधासारखा गोरा रंग आहे माझ्या छोकरीचा आणि ती खुप सुंदर आहे. आपल्या आईवर गेली होती. जवळ जवळ १७ वर्षाची गोड मुलगी. मोठे मोठे टपोरे डोळे, काळे लांब केस, उजव्या गालावर एक मोठा तिळ… माझी एकुलती एक पोर आहे हो ती. माझ्यावर दया करा, तिला शोधून आणा, अल्ला तुम्हाला भरभराट देइल, तुमच्या आयुष्याचे भले करेल.”

त्या रजाकार तरुणांनी अगदी मनापासून म्हातार्‍या सिराजुद्दीनला विश्वास देण्याचा प्रयत्न केला की जर त्याची मुलगी जिवंत असेल तर ती थोड्याच दिवसात परत त्याच्यासोबत असेल, ती जबाबदारी आमची…

त्या आठ तरुणांनी मनापासून प्रयत्न केले. अगदी आपल्या प्राणाचा धोका पत्करुन ते अमृतसरला गेले. कित्येक स्त्री-पुरूष आणि मुला-बाळांना त्यांनी प्राण वाचवून सुरक्षीत स्थानावर पोहचवले. एक दिवस हेच काम करत असताना ते एका ट्रकमधून अमृतसरला जात होते. मध्ये ‘छहररा’ गावापाशी लांबवर पसरलेल्या भकास रस्त्यावर त्यांना एक तरुण मुलगी आढळली. ट्रकचा आवाज ऐकुन दचकलेली ती तरुण मुलगी घाबरुन पळायला लागली. रजाकारांनी गाडी थांबवली आणि ते सगळेच्या सगळे तिच्यामागे धावले. एका शेतात त्यांनी तिला पकडलेच. तिला पकडल्यावर त्यांच्या लक्षात आले ती अतिशय सुंदर होती, उजव्या गालावर एक मोठा तिळ होता. त्यांच्यापैकी एका तरुणाने तिला विश्वास देत विचारले “घाबरु नकोस, तुझे नाव सकीना आहे का?”

मुलगी भीतीने अजुनच लाल झाली, भीतीने तिच्या चेहर्‍याचा रंग अजुनच पिवळा पडला, काही बोलेचना बिचारी. सुन्नपणे खाली मान घालुन बघत बसली. पण जेव्हा सर्वांनी मिळुन तिला धीर दिला, तेव्हा ती थोडी आश्वस्त झाली. मनातली भीती दुर झाल्यावर तीने मान्य केले की ती सिराजुद्दीनची मुलगी सकीनाच आहे. आठही रजाकार तरुंणांनी हर प्रकारे तिचे मन शांत करण्याचा, तिला खुश करण्याचा प्रयत्न केला. तिला खाऊ घातले, दुध प्यायला दिले आणि चुचकारुन तिला ट्रकमध्ये बसवले. एकाने आपला कोट काढून तिला पांघरला कारण ओढणी नसल्याने तिची अवस्था फारच लाजिरवाणी झाली होती, ती अस्वस्थ होत पुन्हा पुन्हा आपली छाती आपल्या हातांनी झाकण्याचा प्रयत्न करत होती.

बरेच दिवस उलटून गेले तरी सिराजुद्दीनला आपल्या सकीनाबद्दल काहीच कळले नव्हते. रोज वेगवेगळ्या निर्वासितांच्या छावणीत वेड्यासारखे तिला शोधत फिरणे हे त्याचे रोजचे काम झाले होते, पण तरीही त्याला त्याच्या लेकीचा काहीही पत्ता लागला नाही. रात्र्-रात्र जागून तो अल्लाकडे त्या रजाकार तरुणांना, ज्यांनी त्याला वचन दिले होते की जर सकीना जिवंत असेल तर ते तीला शोधून काढून त्याच्यापर्यंत पोचवतील, त्या तरुणांना यश देण्यासाठी अल्लाची विनवणी करत असे, दुआ मागत असे.

एक दिवस सिराजुद्दीनने निर्वासितांच्या एका छावणीत अचानक त्या तरुण रजाकारांना पाहीले. ते सगळे एका ट्रकमध्ये बसले होते. सिराजुद्दीन अक्षरशः पळतच त्यांच्याकडे गेला. ट्रक निघणारच होता की सिराजुद्दीनने त्यांना विचारले, बाळांनो, माझ्या सकीनाचा काही पत्ता लागला का? सगळ्यांनी एकमुखाने त्याला सांगितले, “काळजी करु नका, लवकरच तिचा पत्ता लागेल आणि ट्रक निघून गेली. सिराजुद्दीनने अजुन एकदा अल्लाकडे त्या तरुणांच्या यशासाठी दुआ मागितली तेव्हा कुठे त्यांचा जीव शांत झाला. जणुकाही मनावरचे ओझेच उतरल्यासारखे वाटले त्याला.

संध्याकाळी नजिकच्याच एका निर्वासित छावणीत सिराजुद्दीन उद्विग्न होवुन बसला होता. अचानक आजुबाजुला काहीतरी गडबड झाली. चार माणसे काहीतरी उचलुन घेवुन जात होते. त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळाले की एक तरुण मुलगी रेल्वे लाईनजवळ बेशुद्ध पडली होती, लोक तिला उचलुन घेवुन आले आहेत. सिराजुद्दीन त्यांच्या मागे मागे चालायला लागला. लोकांनी मुलीला रुग्णालयात तेथील कर्मचार्‍यांच्या हवाली केले आणि ते तिथुन निघुन गेले.

काही वेळ सिराजुद्दीन तिथेच रुग्णालयाच्या बाहेर अंगणात गाडलेल्या एका लाकडी खांबाला टेकुन उभा राहीला आणि थोड्या वेळाने हळुच रुग्णालयात आत शिरला. खोलीत कोणीच नव्हतं. फक्त एक स्ट्रेचर आणि त्या स्ट्रेचरवर पडलेले एक अचेतन शव. सिराजुद्दीन आपली जड झालेली पावले उचलत त्या शवाकडे सरकला. खोलीत अचानक लख्ख प्रकाश झाला. सिराजुद्दीनने त्या शवाच्या पिवळ्या पडलेल्या चेहर्‍यावरील त्या प्रकाशाच्या तिरीपीत चमकणारा तो तिळ पाहीला आणि तो आनंदाने ओरडलाच…

“सकीना…….”

डॉक्टर, ज्यांनी खोलीतला दिवा लावून प्रकाश केला होता, त्याने सिराजुद्दीनला विचारले.. ,”काय झाले? काय पाहिजे?”

सिराजुद्दीनच्या रुद्ध कंठातून कसेबसे दोन तीन शब्द बाहेर पडले, ” मी…, हुजुर मी…तिचा बाप आहे हो.”

डॉक्टरने शवाची नाडी तपासली आणि खोलीच्या खिडकीकडे बोट करत सिराजुद्दीनला म्हणाले…

“खोल दो…!”

सकीनाच्या शरीरात हळुच एक क्षीण हालचाल झाली. आपल्या निर्जीव हातांनी, तीने आपल्या ‘सलवारची नाडी सोडली आणि तितक्याच निर्जीव अलिप्तपणाने आपली सलवार गुडघ्याच्या खाली सरकवली.

सिराजुद्दीन आनंदाने चित्कारला…

“जिंदा है, मेरी बच्ची जिंदा है.. (?)

लेखक : सआदत हसन मंटो

******************************************************************************************************************************

अनुवादक : विशाल कुलकर्णी

26 thoughts on ““खोल दो” : सआदत हसन मंटो : मराठी अनुवाद”

  1. मंटोच्या बहुतेक कथांमधली जिवंत असण्याइतपतच ‘आनंद’ मिळणारी आणि तसा तो मानणारी माणसं (पात्रं असं दुर्दैवाने म्हणवत नाही इतकी ती खरी आहेत) वाचणार्‍याच्या अंगावर काटा आणतात. कितीदा वाचलं तरीही.
    यंदा जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या मंटोला माणसाच्या जन्माला आल्याचं कधीतरी सुख झालं असेल का?

    (हा सगळा लालभडक इतिहास स्वच्छ धुवून काढावा अशी पांगळी इच्छा कैकदा येते मनात!)

    Like

    1. अगदी, अगदी मनातलं बोललीस ! मंटोच का, त्या कालावधीतल्या सगळ्याच लेखकांचं साहित्य असंच आहे. मग तो मजाज असो, कृष्णचंदर असो वा इस्मत चुगताई असोत…
      ही माणसं आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात.

      Like

      1. अरे तिच्या!! तू हे टायपून ठेवलेलं माहीतच नाही मला. नावाच्या टोपणामगून चर्चा करायचे दिवस संपले म्हणायचे 😉

        Like

  2. एक दिवस सिराजुद्दीनने निर्वासितांच्या एका छावणीत अचानक त्या तरुण रजाकारांना पाहीले. ते सगळे एका ट्रकमध्ये बसले होते. सिराजुद्दीन अक्षरशः पळतच त्यांच्याकडे गेली./ आणि ट्रक निघून गेली. >> इथे गेली ऐवजी “गेला” असे हवे आहे.

    Like

      1. हम्म.. कथा पहिल्यांदा वाचतांना ती त्या आठ रजाकारांना सापडली तरीही तिच्या वडिलांना का भेटली नाही हे क्लिक झाले नव्हते ( आठही रजाकार तरुंणांनी हर प्रकारे तिचे मन शांत करण्याचा, तिला खुश करण्याचा प्रयत्न केला. तिला खाऊ घातले, दुध प्यायला दिले आणि चुचकारुन तिला ट्रकमध्ये बसवले. एकाने आपला कोट काढून तिला पांघरला कारण ओढणी नसल्याने तिची अवस्था फारच लाजिरवाणी झाली होती हे वाचून रजाकारांविषयी चांगले मत बनले होते)..

        पण शेवट सुन्न करणारा आहे..

        एक शंका: जर त्या तरुण रजाकारांनीच तिच्यावर अत्याचार केले असे मानले (तसा डायरेक्ट उल्लेख नाहीये म्हणून) तर ती त्यांच्या तावडीतून कशी सुटली याचा काहीच उल्लेख नाहीये कथेत.. नाही का??

        Like

      2. फाळणीच्या त्या काळ्याकुट्ट दिवसांतील सगळ्याच हकीकती जर लक्षात घेतल्या तर हा प्रकार नवीन नव्हता. शिकडो-हजारो तरुणींच्या वाट्याला हे अत्याचार आले होते त्या दिवसात. आपल्याला हवे तितके दिवस त्यांना आपल्या कबज्यात ठेवायचे, वाट्टेल तसे अत्याचार करायचे आणि मन भरले की गलितगात्र अवस्थेत कुठेतरी टाकुन द्यायचे हा त्यावेळी सर्वच दंगलखोरांनी अवलंबलेला मार्ग होता (हिंदु-मुस्लीम दोन्हींनी)त्यामुळे ती कशी सुटली हा फ़ार अवघड प्रश्न नाही. आपले समाधान झाल्यानंतर गलितगात्र अवस्थेत तिला रेल्वे ट्रॆकपाशी टाकुन दिले गेले. कारण या गोष्टींचा त्यांना जाब विचारणारे तेव्हा कुणीच नव्हते. मुळात अशा घटना हजारोंनी होत्या. कायदा, नियम, शासन या सर्व गोष्टी त्यावेळी कुचकामाच्या ठरल्या होत्या.

        Like

      3. फारच सुन्न करून टाकणारी माहिती दिलीत विकु. आज संवेदनशील मनाला वाचतांनाही यातना होतात अश्या प्रसंगातून हजारो-लाखो स्त्रिया गेल्या हे ऐकून शहारा येतो अंगावर.. आणि तेही का? तर काही राजकारण्यांची इच्छा म्हणून.. 😦

        “मन्टो” च्या इतरही अनेक कथा मी उत्सुकतेने आंतरजालावर शोधून वाचल्या.. एकूण ७ कथा मिळाल्या. फाळणीच्या पार्श्वभूमीवर असलेली “खोल दो” हि एक, दुसरी “टोबा टेक्सिंह” आणि तिसरी ” टिटवाल का कुत्ता” सापडली.. बाकी ‘तक्सीम’, ‘खुदा कि कसम’, ‘बू’, ‘ ठंडा गोश्त’ या कथा एकदम वेगळ्या विषयावरच्या.. पण त्याच काळातल्या..

        Like

      4. त्यावेळची एकंदर परिस्थीतीच विचीत्र होती. मंटोच नव्हे तर अनेक जणांनी लिहीलेय त्या कालावधीवर. यात राजेंद्रसिंह, कृष्णचंदर, सरदार अली जाफ़री, इस्मत चुगताई, मजाज लखनवी हे आघाडीवर होते. मंटोच्या अजुनही कथा तुम्हाला खालील दुव्यावर वाचता येतील.

        http://books.google.co.in/books?id=NjKIgwexlQkC&printsec=frontcover&source=gbs_atb#v=onepage&q&f=false

        Like

    1. फ़ाळणीच्या वेळी कित्येक दुर्दैवी भगिनींनी हे प्रत्यक्ष भोगलय विनीता ! राजकारण्यांसाठी तो फ़क्त एका देशाचे विभाजन आणि दोन स्वतंत्र देशांची निर्मीती एवढाच मुद्दा होता. पण अनेकांनी (अक्षरश: लाखो लोकांनी) आपलं सर्वस्व गमावलं त्या दिवसात 😦

      Like

  3. खरे तर मला खरच कोणासाठी काहीतरी करावेसे वाटते.
    हा मनुष्य जन्म आपन असाच घालवायचा का??
    मला एक मुलगा आहे. एक मुलगी दत्तक घ्यावी म्हणून श्रीवत्स (ससून) मधे गेले होते. पण त्यांचे नियम, अटी भरपूर 😦
    आम्ही त्यात नापास! मग आम्ही जे प्रेम त्यांना देऊ इच्छितो त्याला काहीच किंमत नाही का?? नंतर ते राहूनच गेले.
    मुक्तांगन मधे काम करायची इच्छा आहे. पण ते फार लांब पड़ते. तरीपण प्रयत्न करणार आहे. 🙂

    Like

  4. चांगली कल्पना आहे. ममताताईशी बोलून बघ ना एकदा, (ममताताई म्हणजे सिंधुताई सपकाळांची कन्या) सिंधुताईंचा हडपसर येथील आश्रम ममताताई बघते.

    Like

Leave a reply to vinita123 उत्तर रद्द करा.