RSS

हॉंटींग : मी रात टाकली….

05 एप्रिल

काल नेहमीप्रमाणे हातातल्या रिमोटशी खेळत असताना झी मराठी चॅनेलवर क्षणभर थबकलो. प्रत्येक ब्रेकच्या आधी कार्य्क्रमाच्या ब्रेकनंतर येणार्‍या भागाची थोडीशी झलक दाखवायचे आजकाल फॅड आहे. तर मी झी मराठीपाशी थबकलो कारण गुप्त्यांच्या ‘वंदनाताई’ सांगत होत्या….

“तू गाणं छानच गायलस. मुळातच हे गाणं अतिशय गोड आहे. खरेतर ‘हाँटींग’ आहे, त्यांनी अजुन एक दोन उदाहरणे दिली त्यात ‘या डोळ्याची दोन पाखरे…” ही होतं. पण ज्या गाण्याबद्दल त्या बोलत होत्या ते गाणं होतं “जैत रे जैत” मधलं…

मी रात टाकली, मी कात टाकली’

मी बावळटासारखा त्या गाण्याचा संबंध ‘या डोळ्याची दोन…” शी लावला आणि मनातल्या मनात आश्चर्य करायला लागलो. या गाण्यात वंदनाताईंना ‘हाँटींग’ असं काय आढळलं असावं? ब्रेक संपेपर्यंत कसाबसा दम धरला आणि ‘सारेगामा’ सुरु झालं. समोर आधी ‘जैत रे जैत’ मधले त्या गाण्याचे दृष्य झळकले. स्मिताचे ते ओझरते दर्शन आणि कॅमेरा वर्तमानात आला. अमृता सुभाष ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ गात होती… पण माझे मन वर्तमानात यायला तयारच नव्हते. मी कुठेतरी तिथेच लिंगोबाच्या डोंगरावर, कदाचित स्मिताच्या त्या गहिर्‍या डोळ्यात हरवलो होतो. लताबाईंचा दैवी आवाज, बाळासाहेबांचं धुंद करणारं संगीत आणि त्यावर स्मिताची ती मुक्त, थोडीशी स्वैर भासणारी, नाग्यासाठी वेडी झालेली, त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावत ……

मी रात टाकली, मी लाज टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली...”

म्हणत बेभान होणारी चिंधी.

मला क्षणभर वाटले की ते स्वर, ते सुर, ते संगीत , ते शब्द , स्मिताच्या चेहर्‍यावरचे ते उन्मुक्त, स्वैर भाव नकळत एखाद्या तीराप्रमाणे माझ्यावर झेपावताहेत, माझ्याही नकळत मी त्यांच्या आहारी जातोय. त्यांची शिकार बनतोय. त्याच क्षणी जाणवले ‘आपण वंदनाताईंच्या हाँटींगचा अर्थ मुर्खासारखा ‘हाँटेड’ असा लावला होता चुकून. ते शब्द, ते सुर खरोखर हाँटींग होते. प्रचंड गर्दीतही बरोबर तुमचा वेध घेण्याची ताकद त्या सुरात होती. यापुर्वीही खुप वेळा ऐकलेय हे गाणे मी. पण काल वंदनाताईंनी त्या गाण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. भानावर आलो तेव्हा अमृताचा परफॉर्मन्स संपला होता. हो, मी त्याला परफॉर्मन्सच म्हणेन कारण ते अमृताचे स्वर कानावर पडत असताना माझ्या डोळ्यासमोर मात्र जैत रे जैतमधली ‘स्मिता’ होती आणि स्मिताच्या त्या रापलेल्या (चित्रपटातील) चेहर्‍यावरच्या अवखळ निरागसतेला अमृताचे स्वर कुठेच योग्य वाटत नव्हते. मला वाटले आता नेहमीप्रमाणे कौतुक करुन दोन्ही गुप्ते अमृताला ‘नी’ नाहीतर ‘वरचा सा’ असे काहीतरी गुण देणार. पण वंदनाताईंनी धक्काच दिला. मला खटकलेल्या गोष्टीच, म्हणजे नको त्या ठिकाणी शब्दांवर दिलेला जोर, शब्दांचे चुकीचे उच्चार, काही ठिकाणी घसरलेला सुर याबद्दल सांगत वंदनाताईंनी अमृताला शुभेच्छा दिल्या.

मी लगेचच वाहिनी बदलुन टाकली आणि पुन्हा रिमोटशी खेळायला लागलो. पण आता त्या खेळण्यात अजिबात मजा येत नव्हती कारण डोळ्यासमोरच्या विस्तृत कॅनव्हासवर चिंधी आणि कानावर हळुवारपणे येत मनावर कब्जा करणारे ना.धो. महानोरांचे शब्द पिच्छा सोडायला तयारच नव्हते.

कसं होतं ना, बर्‍याच वेळा आपली अवस्था ‘देता किती घेशील दो कराने’ अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. ‘जैत रे जैत’ बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.

या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं …

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ र्वष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.

गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?

चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं…

काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’
मी कादंबरी वाचली. चित्रपटाच्या दृष्टीनं मला ती आवडली. पण मला ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. मी मुळात नाटकातला माणूस असल्यामुळे त्याचा फॉर्म बदलावा असं मला वाटलं. त्या आधी केलेल्या घाशीराम, तीन पैशाचा तमाशा या नाटकांमुळे या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देता येईल काय, यावर मी विचार केला. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. दीदी आणि उषाताई यांनादेखील ही कल्पना आवडली. त्यांनी काम सुरू करायला सांगितलं.

संगीतिकेचं रूप चित्रपटाला द्यायचं असेल तर किमान वीसएक गाणी तरी चित्रपटात घ्यावी लागणार होती. गीतलेखनासाठी ना. धों. महानोर यांना सांगायचं ठरलं. त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च.

दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले.

हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. ‘जैत रे जैत’ च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे. असे म्हणतात की या चित्रपटासाठी महानोरांनी एकुण १९ गाणी लिहीली होती. मला खात्री नाही पण यापैकी प्रत्यक्ष चित्रपटात बहुदा १२ च गाणी वापरली गेली. निदान माझ्या माहितीत तरी तेवढीच आहेत. ही बारा गाणी तुम्हाला खालील दुव्यावरून उतरवून घेता येतील.

जैत रे जैत मधील गाणी

मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, मला पुण्येवंत व्हायचय या इच्छेन पछाडलेला नाग्या, लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्‍या, त्यासाठी ठरलेल्या नवर्‍याला सोडून येणार्‍या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्‍या चिंधीची कथा !

असो, थोडा भरकटलोच मी. आपण बोलत होतो… चिंधीबद्दल, खरेतर मी रात टाकली..” या अजरामर गाण्याबद्दल….!

शब्द अर्थातच ना.धों.महानोरांचे, संगीत पं. हृदयनाथ, स्वर साक्षात कोकिळेचे पण या गाण्यात आपल्याला वेड लावतो तो रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा कोरस !

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार अशी ठामपणे सांगनारी चिंधी. आपल्या नवर्‍याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी.

इथे आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती…
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती….

खुपदा कसं होतं ना… काही गोष्टी अगदी अलवारपणे आपल्याला येवून भिडतात. त्या आपल्याला येवुन बिडेपर्यंत आपल्याला त्यांची जाणिवही होत नाही. हिरव्या गवतात नाही का, कसली तरी सळसळ कायम जाणवत असते, कुठलीतरी चाहूल कानावर येत असते, पण दिसत मात्र काहीच नाही. एखादी नागिण आपल्या शरीराला नागमोडी झोके देत सळसल करत गवतातून निघुन जाते, आपल्याला दिसत नाही पण तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत राहते. इथे महानोरांनी चिंधीच्या चालण्यात तीच अदा, तीच नजाकत तर जाणवली नसेल. खरेतर गाण्याचे बोल पाहता हा प्रसंग खुप मादक करता येवु शकला असता. स्मितासारखी देखणी, रुपगर्विता त्यात अभिनयसम्राज्ञी जब्बारजींच्या दिमतीला हजर होती. पण जब्बारजींनी तो मोह आवरलाय. इथे स्मिता ‘चिंधी’च वाटते. तिच्या चालण्या-बोलण्यातून चिंधीची गावरान तरीही अवखळ अदाच समोर येत राहते. त्यामुळे चिंधी कुठेही मादक वाटली तरी अश्लील वाटत नाही. हे जब्बार पटेलांच्या दिग्दर्शनाचे आणि स्मिताच्या अभिनयाचे यशच म्हणावे लागेल.

ह्या पंखांवरती , मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई , चांदन्यात न्हाती

सगळे पाश मागे सोडून चिंधी निघालीय आपल्या प्रियकराला भेटायला. जणू चांदण्याचे पंख लावून त्यावर नीळेशार आभाळ पांघरून. आता त्या संसाराच्या चार भिंतींची बंधने नाहीयेत, उंबरठ्याचा अडसर नाहीये. एखाद्या मुक्त मोरणी (लांडोरी) किंबहुना आनंदाने बेधुंद होवून नाचणार्‍या मोरासारखी ती आपल्या प्रियाशी मिलनाच्या आनंदाच्या शीतल चांदण्यात न्हातेय. विरहाचे उन्ह कधीच ओसरलेय आता फक्त त्याच्या मिठीत लाभणारी गोड, आश्वासक शीतलता.

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगर भिवरी, त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी , मनमानी , बाई फुलांत न्हाली
….

तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. इथे नाग्या हा ठाकरवाडीचा ढोलिया आहे. म्हणजे देवाचा प्रतिनिधी. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्‍याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय.

ना. धों. तुम्ही खरोखरच ग्रेट आहात. मुळात चिंधीचे हे जगावेगळे पात्र उभे करणारे गोनिदा महान. त्या चिंधीला तिचा खराखुरा चेहरा देण्यासाठी धडपडणारे जब्बार पटेल महान, तिला तिचं अस्तित्व मिळवून देणारी स्मिता महान…..

” जैत रे जैत” च्या माध्यमातून ही संगीतमय मेजवानी आपल्याला देणारे मंगेशकर कुटूंबीय महान ! तुम्ही लेख वाचा, कसा वाटला ते सांगा, मी जातोय पुन्हा एकदा ‘शिकार’ व्हायला, या ‘हाँटींग’ गीताची !

हा अनुभव हवाच असेल तर ….

तुनळीवर इथे पाहा

आपलाच,

विशल्या

 

 

 

 

9 responses to “हॉंटींग : मी रात टाकली….

 1. सुहास

  एप्रिल 5, 2012 at 7:09 pm

  जबरदस्त…. मलासुद्धा हे गाणं आवडायचं कारण म्हणजे अल्टिमेट कोरस. तुझी पोस्ट वाचली आणि संध्याकाळ एकदम सुरेल झाली रे भाऊ 🙂 🙂

   
  • विशाल कुलकर्णी

   एप्रिल 6, 2012 at 10:20 सकाळी

   बस्स, कलाकारको और क्या चाहीये? चाहनेवालोंको खुशी और मन:शांती का अहसास यही तो बख्शीस होती है कलाकारकी 😉
   धन्स रे , भरुन पावलं 🙂

    
 2. Priya

  एप्रिल 5, 2012 at 7:20 pm

  माझ्याबाबतीत म्हणशील तर चार गोष्टी आहेत या गीताबद्दल…..
  लतादिदींचा आवाज
  ना.धो.मनोहरांचे शब्द
  हृद्यनाथांच संगीत
  आणि माझ्या आवडत्या लेखकाचा लेख 🙂
  मस्त लिहिलयेस 🙂
  मला पण फार आवडतं हे गाणं

   
 3. Shekhar Jagtap

  एप्रिल 6, 2012 at 12:22 pm

  Apratim lihilay bhau.. Mhanje gaan avdaychach adhipasun, pan tujh he rasgrahan tujhya ishtyle madhl jast bhavl an ganyachi maja vaadhli.. thanks bhau.. Shikar jhalo!!

   
  • विशाल कुलकर्णी

   एप्रिल 6, 2012 at 2:25 pm

   खुप खुप आभार शेखर 🙂
   मुळातच ना.धों. च्या सगळ्याच कविता अप्रतिम असतात. त्यात मंगेशकर कुटुंबियांचा परिसस्पर्ष झाल्यावर त्यातली गंमत अजुन वाढते.

   महानौरांची ’पक्ष्यांचे थवे’ वाचली आहेस का?

   “गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट बावरा पक्षी
   पाण्यात एक सावली हले बाहुली थरकते उन
   ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून बहकते रान…”

   चंद्र माळून बहकते रान… कसली अफ़ाट प्रतिभा असेल त्या माणसाकडे 🙂

    
 4. TUSHAR

  जून 23, 2012 at 12:38 सकाळी

  vishal sir….kharch…tumhi great aahat..mhanje..he gane mala pan aavadte pan…tumhi jya style ne…ganyachi tarif keliye…tyamule…te ajunch mast vatale…mi attach he song punha aikto…jait re jait mi aaj paryant pahila nahi pan atta nakki pahil…mhanje mala evdhach sangaychay…thanx…tumhi tumchya writing ne kharch….life madhe solid happiness bharliye…thank u sir…

   
  • विशाल कुलकर्णी

   जून 25, 2012 at 5:47 सकाळी

   धन्यवाद मित्रा ! भाऊ, अरे महानोरांच्या कविता आहेत त्या, जिवनामृताने काठोकाठ भरलेल्या. आपण फ़क्त डोळे मिटून तोंड लावायचं 🙂

    
 5. सुलभा

  मार्च 26, 2018 at 1:29 pm

  विशाल, अरे काय लिहितोस तू! अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!! वरती जी “महान ” लोकांची नाव सांगितलीस ना? त्यात मी एक मिळवतेय. असं सुंदर रसग्रहण लिहिणारा “विशाल ” महान! 🙂

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: