RSS

भय इथले संपत नाही : एक अनुभुती

27 मार्च

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ग्रेस,भटसाहेब किंवा आरती प्रभू ई. आणि अशा इतरही महाकविंच्या कवितांचं रसग्रहण वगैरे करायचा विचारही मनात आणु नये. तेवढी आपली पात्रता नाही, निदान माझी तर नाहीच नाही. मुळात रसग्रहण हा प्रकारच फारसा मला जमत नाही. कविने जे कमीतकमी शब्दात सांगितलय ते उगीचच मोठ्ठं करुन समजवून घ्यायचा किंवा द्यायचा प्रयत्न करायचा ही कल्पनाच थोडीशी चुकीची वाटते. मुळात प्रत्येक कविता वाचल्यावर प्रत्येकाची तीबद्दलची अनुभुती वेगवेगळी असु शकते , नव्हे असतेच. आणि महत्वाचे म्हणजे ‘ग्रेस’ समजावून सांगायचा तर आधी तो आपल्याला कळायला हवा. गेली दहा-बारा वर्षे ग्रेस वाचतोय. पण मला तो एक सहस्त्रांशानेही कळला असेल याची मलाच ग्वाही देता येत नाही. असो आता या कवितेबदलचा माझा अनुभव. आधीच स्पष्ट करतो, हे रसग्रहण नाहीये तेवढी माझी झेप नाही, माझा अभ्यासही नाही. मी फक्त हि कविता वाचताना, पुन्हा -पुन्हा ऐकताना मला जाणवलेली माझी अनुभुतीच काय ती मांडु शकतो.

कारण कवितेचं क्षेत्र म्हणजे गझलेसारखं नाही. प्रत्येक शेरात विषय, विचार बदलण्याचा अधिकार देणारं नाही. कविता म्हणजे शेवटपर्यंत हळुवारपणे उलगडत जाणारा एक विचार. त्यात आर्जव असेल, भावनाप्रधानता असेल. त्यातली प्रत्येक ओळ एकमेकांशी संलग्न असते. प्रत्येक ओळीला काही तरी पार्श्वभुमी असते. आता आपल्या कवितेच्या प्रत्येक ओळीमागे काय भावना आहेत, काय अनुभव आहे हे कविलाच माहिती असते. कविता जर सरळपणे उलगडत गेली तर ती वाचकापर्यंत पोचते, नाहीतर मग दुर्बोध होवून बसते. पण या अशा सगळ्या भावना शब्दात, गद्यात बांधण्याचा व्याप नको म्हणुनतर कविता होते. प्रत्येक गोष्ट कविने उलगडून सांगितलीच पाहीजे असेही नाही. पण मग त्यामुळेच तुमच्या वैयक्तिक अनुभुतीला एक वेगळेच परिमाण, एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. म्हणुनच कविने कविता उलगडुन सांगु नये म्हणतात .. पण मग ती काहीं वाचकांसाठी साठी दुर्बोध ठरते तर काहींसाठी अर्थपुर्ण. पण जर तित अनुभुती नसेल तर ती कविता वाचणार्‍याची होत नाही ती कविचीच रहाते.

मायबोलीवरीक एक मित्र सत्यजीत माळवदे यांनी या कवितेबद्दल लिहीताना म्हटलं होतं….

जी ओळ अनुभुती देते ती कविता आणि जे अर्थ स्पष्ट करते ते गद्य…

पण त्यामुळे तोटा असा होतो की ज्यांना कवितेची अनुभुती मिळत नाही, असे लोक त्या अज्ञानामुळे किंवा इतरांच्या उपहासामुळे त्या कवितेपासुन दुर जायला लागतात. अशा कारणांसाठी ती कविता समजुन सांगणं गरजेचं होऊन बसतं. म्हणून जे आपल्याला जाणवलय ते इतरांसह वाटावं. कदाचित प्रत्येकाचा अनुभव, अर्थ, दृष्टीकोन वेगवेगळा असेल पण त्याने आपल्याला मिळणार्‍या आनंदाला कमीपणा येत नाही तो द्विगुणीतच होत राहतो.

माझ्या मते ग्रेसची ही कविता म्हणजे जीवनाच्या सार्थकतेचे अध्यात्म आहे. इथे रुपकांचा आधार घेत कवि मानवी आयुष्याच्या अध्यात्मावर भाष्य करतो.

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

कवी : ग्रेस

**************************************************************************************************

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

एखाद्या विरही प्रियकराच्या दृष्टीन पाहिल्यास कितीही दिवस उलटले असले, कितीही काळ लोटला असला तरी तिच्याबरोबर घालवलेल्या त्या आठवणी पिच्छा करने सोडत नाहीत. प्रत्येक संध्याकाळ तिची एक नवी आठवण घेवून सामोरी येते, अशात पुन्हा जर का ती समोर येवून उभी राहीली तर. तो क्षण पेलायला जमेल्…अहं, काही उमजत नाही, भय इथले संपत नाही…..

आयुष्याच्या रहाटगाडग्यामध्ये कोणी किती वरवरचे आधार शोधले वा परिस्थितिशी झुंजायचे ठरवले सगळे उपाय तात्पुरते, तेवढ्यापुरतेच असतात…. आत, मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी मनाला सतत भेडसावणारी अनामिक भीतिची भावना कधीच सरत नाही…. या वस्तुस्थितिच्या जाणीवेतून कविमनाचा हा उद्गार आहे… “भय इथले संपत नाही!”

कामाच्या रगाड्यात दिवस संपतो पण संध्याकाळ झाली की मग पुन्हा ते गुंते भेडसावयाला लागतात. मग त्या परमेशाने कधी मातेच्या रुपातुन कधी प्रियेच्या माध्यमातुन मला शिकवलेलं प्रेम गीत बनून ओठांवर येतं. गाण्याचं कसं असतं ना एकदा गायला लागलं की मग जगाचं भान विसरावं, पुर्णपणे तल्लीन होवून गावं, एकरुपतेनं आळवावं तर त्या गाण्याला अर्थ येतो. प्रेम तरी अजुन काय वेगळं आहे. तिथे पण ही समरसता, हि एकाग्रता , हे झोकुन देणं हवंच आहे आणि हे मी तुझ्याकडून शिकलोय…मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

ग्रेस यांचा नेहमीच गुढतेकडे ओढा असतो. पण त्यांच्या गुढतेला अनेक पदर असतात, अनेक अर्थ असतात. सर्वसाधारणपणे आजुबाजुच्या जगाचा विचार करत ग्रेस अतिशय अर्थपुर्ण अशी प्रतीके इथे मांडतात. सर्वसामान्यतः झरे आणि चंद्र हे प्रेमभावना, आपुलकी, जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी काव्यात वापरले जातात. या प्रतिमा देखील किती सुंदर आहेत बघा, झरे एकसारखे कधीच नसतात, कधी आटतात तर कधी भरभ्रुन वाहतात, तसाच चंद्र, कलेकलेने वाढत जाणे या बरोबरच क्षय होणे हे ही चंद्राचे वैशिष्ठ्य . जणु काही दोन व्यक्तींमधल्या भावना मग त्या प्रेमाच्या असोत वा द्वेषाच्या त्या कधीच एकसारख्या नसतात, कायम बदलत राहतात हेच तर सांगायचे नाहीये ना ग्रेसना इथे “हे झरे चन्द्र सजणांचे” मधून? इथे ‘सजणांचे’ हा शब्द प्रितीचे सुचक आहे. तेच ग्रेस लगेच पुढे म्हणतात “ही धरती भगवी माया”….. भगवा रंग हे तटस्थ वृत्तीचे, अलिप्ततेचे, अनासक्त निरपेक्षतेचे लक्षण मानले जाते… आणि धरती ही माता म्हणून तिची सर्वांना एका दृष्टीने पाहण्याची वृत्तीही इथे ग्रेसना अभिप्रेत असावी. ग्रेस म्हणतात ‘पृथ्वीचे’ एक नाव ‘क्षमा’ आहे, तिला ‘शांता’ ही म्हणतात. आपल्या आयुष्याकडे एका त्रयस्थ वृत्तीने पाहण्याची ही कविची वृत्ती आपोआप त्याला ‘शांतेच्या’ बरोबरीला नेवून बसवते. शेवटी…

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया” … केवढी सुंदर कल्पना आहे. सगळा अहंकार मुळातुन उखडून टाकणारी. अगदी एखाद्या झाडाच्या मुळाशी रुजलेले बीयाणे, त्याचे आधी लहानसे रोप होते, मग त्या मोठ्या झाडाचा आधार घेत त्याच्या सावलीत ते हळुहळु बहरते, मोठे होते. मोठे झाले की पुन्हा ते त्याच्या तळाशी रुजु पाहणार्‍या बीयाण्याला आधार देते. आपलं आयुष्यही असंच असावं असं तर ग्रेसना सुचवायचं नाहीये ना इथे? एक प्रकारे ज्याला आपण जीवनचक्र म्हणतो तेच रहाटगाडगे…

त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

मानसिक आंदोलनांच्या त्या विद्ध अवस्थेत एखादा प्रेरणेचा, प्रेमाचा , विश्वासाचा हळवा बोलही एक वेगळीच जगण्याची, जगवण्याची ताकद देवून जातो. मग तो प्रियेचा असेल, गुरुंचा असेल, आईचा असेल किंवा एखाद्या जवळच्या मित्राचा असेल. पण तो आधाराचा एक शब्दही अशा वेळी खुप मोलाचा ठरतो. “सीतेच्या वनवासातील…..” मला वाटते इथे कविने थोडी लिबर्टी घेतलेली असावी. रामायणातील सीतेला शोधायला गेलेल्या हनुमंताने रामाची खुण म्हणुन सीतेला दिलेली अंगठी तिचा संदर्भ इथे कविने रुपकात्मक रित्या घेतला असावा. ती अंगठी सीतेला त्या अशोकवनात त्या राक्षसींच्या सोबतीत दिवस कंठताना ‘माझा राघव येणार आहे’ हा विश्वास देणारी एक छोटी घटना आहे. पण या लहानश्या वाटणार्‍या प्रसंगाने सीतामाईच्या मनातली सगळी अनिश्चितता मिटवून टाकलेली आहे. मनातली सगळी आंदोलने, सगळे किंतु एका क्षणात मिटवून टाकले आहेत. इथे कविला असा एखादा बोल म्हणजे भवसागरातून मुक्ती देणारा विश्वास आहे असे वाटले तर त्यात नवल ते काय? कुठल्याही आनंदाच्या क्षणी, प्रसंगी आपण आपल्या घराला तोरण बांधुन त्या प्रसंगाचे आनंदाने स्वागत करतो. पण ग्रेस यांची कविता कधीच स्वतःशी अडकलेली नाही. ती विश्वव्यापक आहे, त्यामुळे ते या आनंदाच्या प्रसंगी थेट क्षितीजालाच तोरण बांधतात. जणु ज्ञानदेवांने मागितलेल्या पसायदानाची पुनरावृत्तीच !

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

एकदा का परतीचे वेध लागले की आपोआपच डोळ्यासमोर परमेशाची मुर्ती दिसू लागते, नकळत पावले देवळाकडे वळतात. डोळे मिटून हात जोडून आपण त्याच्या समोर नतमस्तक होतो आणि मग नकळत त्याच्या सर्वसमावेषकतेचा साक्षात्कार होतो. अगदी ‘खांब फोडून’ बाहेर आलेल्या नरसिंहासारखा तो सर्वत्र आहे याची जाणिव होते. गालिबने एका ठिकाणी म्हटले आहे..

“या तो पीने दें मस्जीदमें बैठकर…
या फिर वो जगह बता जहाँ खुदा नही…!”

आपल्या मनात त्या सर्वशक्तीमान परमेशाबद्दल असलेली श्रद्धा व्यक्त करताना कुठल्यातरी मुर्त प्रतिकाची आवश्यकताच का भासावी? ग्रेस स्वतःच्या कवितेबद्दल बोलताना स्वतःला (सर्वसामान्य जिवाला) मात्र नेहमीच क्षुद्राहून क्षुद्र मानतात, त्या अथांग, अफाट निसर्गापुढे आपणच नेहमीच बोटाच्या नखाएवढे सुक्ष्म ठरतो. त्या नेमक्या क्षणी जेव्हा ‘क्षितीजाला तोरण’ बांधायची मनाची तयारी झालेली असते, जेव्हा त्या त्या ईशाच्या सर्चसमावेषकतेची खात्री पटलेली असते. त्या द्वैत्-अद्वैताचे अंतर मिटवणार्‍या क्षणी “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” अशी भावना मनात निर्माण होणे साहजिक आहे. अशा वेळी त्या सर्वश्रेष्ठ शक्तीशी समरस होण्याचा तो क्षण आपल्याला आपल्या सुक्ष्मतेची, आपल्या त्याच्याशी एकरुपतेची जाणीव करुन देणारा असतो. त्या ‘मी’ चा विसर पाडणार्‍या क्षणी आपली अवस्था त्या एका सुक्ष्म थेंबासारखीच असते.

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

एकदा का ‘मी’ पासून सुटका झाली की एकप्रकारची मनःशांती अनुभवाला येते. संध्याकाळी फुलणार्‍या शांत, स्निग्ध कमलपुष्पाप्रमाणे मन नितळ होवून जाते. सगळ्या षडविकारांपासुन मुक्त अशी ही अवस्था म्हणजे आत्मिक, अध्यात्मिक श्रुंगाराची एक विलक्षण अवस्थाच जणू. तो मोक्षाचा क्षण असतो, स्वतःला विसरण्याचा क्षण असतो. स्वतः थेंबरुपाने त्या क्षितीजरुपी सागरात मिसळून जाताना त्या सुशांत, भव्य , अथांग आसमंताची सर्वसमावेषक निळाई अनुभवास येते आणि कदाचित तोच क्षण मुक्तीचा असतो. आता देहाचे आकर्षण सरलेले असते, तो केवळ एक निमीत्तमात्र उरलेला. केवढी सुंदर कल्पना आहे नाही. स्वतःला पुर्णपणे विसरुन त्या अथांग पसरलेल्या निळाईत एकरुप व्हायचे.

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

इथे ग्रेस एक शाश्वत सत्य सांगून जातात. जोपर्यंत आपण मानवी देहाच्या आसक्तीतुन बाहेर पडत नाही, जोपर्यंत भौतिकाची आस संपत नाही तोपर्यंत या नश्वर देहातील इंद्रीयांच्या संकुचित आणि मर्यादित पातळीवरुन निर्माण होणार्‍या भावनेला, जाणिवेला नीट पाहीलं तर त्यात फक्त दु:खाचीच जाणिव जास्त प्रकर्षाने होते. अशा अवस्थेत वाचेचे इंद्रीयच काय, पण काया वाचा मने आपण अगदी त्या परमेशापुढेही केवळ दु:खाचेच रडगाणे गात राहातो. पण एकदा का हे द्वैत सरलं, एकदा का त्या परमेशाशी एकरुपता लाभली की उरतं ते निर्विवादपणे मन:शांती, समाधान देणारं ‘कैवल्याचं चांदणं’, उरते ती केवळ स्वतःच्या सुक्ष्मतेची, त्या उरल्या सुरल्या थेंबाची एक आठवण. ते स्मरण मग कायम चांदण्याची शीतलताच वाटत राहतं.

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

आपण सर्व सामान्य माणुस आहोत. देव किंवा संत नव्हे. त्या एकरुपतेच्या ओझरत्या क्षणी अगदी साहजिकरित्या एक विचार मनात उभा राहतो तो म्हणजे हे जे काही चाललय ते नक्की काय आहे? ही खरोखरीची निर्विकारता आहे, परमेशाशी संवाद साधणे आहे की एखाद्या क्षणिक निराशेतुन, एखाद्या तात्कालिक घटनेतुन जन्माला आलेलं हे ‘स्मशान वैराग्य’ तर नव्हे. की..की खरोखरच तुकोबा म्हणतात तसे ‘आता उरलो उपकारांपुरता…!” अशी अंतीम समाधानाची, सच्च्या विरक्तीची, मनःशांतीची ती उच्च अवस्था आहे. आणि विचारांच्या या कल्लोळातच ग्रेस समर्थपणे आपल्याला जाणिव करुन देतात की एखाद्या झाडावरच्या सुकलेल्या पाना-फुलांप्रमाणे मनातले सर्व विचार आणि विकार गळून पडतात तो क्षण…. तो क्षण म्हणजे जीवनाच्या सार्थकतेचा, खर्‍या मोक्षाचा. अध्यात्मात या अवस्थेला ‘समाधी’ अवस्था असे म्हटले जाते.

ग्रेस यांची लेखणी, पंडीत हृदयनाथांचं संगीत आणि लताबाईंचा सुरेल , दैवी स्वर…. ही युती आता पुन्हा होणे नाही.

हि दैवी युती इथे अनुभवता येइल.

विशाल…

 

9 responses to “भय इथले संपत नाही : एक अनुभुती

 1. सुहास

  मार्च 27, 2012 at 2:21 pm

  सहीच… एकदम अप्रतिम. !!!

  ग्रेस एक गुढ आहे, आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना ते गेले 😦

  विशालभौ, अश्या काही निवडक कविता आणि त्यांचे डिटेलवार रसग्रहण करावे अशी विनंती करतो. प्लीज !!

   
 2. sagarsbhandare

  मार्च 27, 2012 at 7:57 pm

  विशाल मित्रा,

  तू स्वतःकडे कमीपणा घेतला आहेस हा तुझा विनय आहे. पण ग्रेस यांच्या या कवितेचे रसग्रहण तू खरेच उत्तम केले आहेस. किंबहुना अशा प्रकारची रसग्रहणे करण्यासाठी जे कवीचे संवेदनशील मन लागते ते तुझ्याकडे अगोदरच आहे. तेव्हा अशा प्रकारची काव्य-रसग्रहणे अवश्य लिहित जा. तुझ्यात ती क्षमता नक्कीच आहे. कविता आवडणे वेगळे पण त्या कवितेच्या आनंदरसात दुसर्‍यांनाही डुंबायचे कसे? हे शिकवणे म्हणजे खरेच एक अत्भुत कला असते.
  तेव्हा तुला रसग्रहण येत नाही हा तुझा गैरसमज आहे. त्याबद्दल तू मनात कमीपणा बाळगायचे काही कारण नाही 🙂 आणि अवश्य लिहित जा.

  सर्वच कवितेचे रसग्रहण अगदी छान केले आहेस तू.

  त्यामुळे त्यातले सर्वात छान रसग्रहण कशाचे झाले ते निवडणे अवघडच आहे. पण ग्रेस यांच्या या कवितेतील पुढील ओळीं माझ्या विशेष आवडीच्या आहेत

  “झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया”
  आणि या ओळींचे रसग्रहण तू अगदी समर्पक आणि सुंदर पद्धतीने केले आहेस. रसग्रहण खूप खूप आवडले. अजून अशाच सुंदर सुंदर रसमयी तुझ्याकडून वाचावयास मिळो यासाठी शुभेच्छा

   
 3. स्वागता

  मार्च 28, 2012 at 2:17 सकाळी

  खूप आवडला लेख….!http://www.youtube.com/watch?v=xa5IOfX0YRM&feature=related

   
 4. anuvina

  मार्च 28, 2012 at 10:20 सकाळी

  जबरदस्त रसग्रहण केले आहे. प्रत्येक ओळ, तिच्यातील शब्द आणि त्यांचा मतितार्थ सोप्या भाषेत सांगणे खूप कठीण असते …. आणि त्यात कविता कुणाची ??? तर कवी ग्रेस यांची …. मग तर ते शिवधनुष्यच. मराठी कवितेच्या अभ्यासकांसाठी उत्तम मार्गदर्शन पर लेख लिहिल्याबद्दल आभारी आहोत.

   
 5. Tejas

  मार्च 29, 2012 at 3:06 pm

  Very Good
  Actually till now i have herd this poem as a song from Mahashweta.
  But when great poetic Grace has passed away. i got to know this is written by him and it have many meanings
  today i thought to search for actual meaning
  bu i got to know that there is nothing specific one
  but Dear friend your explanation is really help full, because i got to know very important and hidden meanings of this poem…………
  Its really touched my heart
  Thanks ..
  Tejas W

   
  • विशाल कुलकर्णी

   मार्च 29, 2012 at 4:17 pm

   मन:पूर्वक आभार तेजस 🙂
   माझ्या लेखनाने जर तुम्हाला आनंद, समाधान दिले असेल तर त्यामागची मेहनत मला भरुन पावली 🙂

    
 6. Vrushali

  जून 15, 2013 at 3:14 pm

  Hi kavita mala khup khup aawadate……….. Aaj ticha arth pan samajla………… Kavi Grace mhanje mala nehmich kaahitari gudh vaatat aale hote aaj tumchymule tyana samjun gheta aale…… Thanks a lot……..

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: