मायबोली – शीर्षकगीत : प्रकाशन

मायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीपासून सहभागी असणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन. या शीर्षकगीताची जी छोटी झलक होती, तिला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात, तसेच या संपूर्ण गीतालाही तुम्ही आपलेसे कराल, अशी आशा आहे.

अ‍ॅडमिन – मायबोली.कॉम

या उपक्रमाचे मुख्य संयोजक योगेश जोशी यांचे मनोगत:
हे गीत खर्‍या अर्थाने मायबोलीकरांचे गीत असावे आणि त्याला जागतिक स्वरूप असावे ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना मुख्यत्वे तीन गोष्टींना प्राधान्य दिले होते. गीतकार उल्हास भिडे यांनी लिहिलेल्या अतिशय दर्जेदार गीताला व त्यातील शब्दांना न्याय देणे, या गीताला दिलेल्या संगीत साजाला न्याय देणे, आणि यात सहभागी झालेल्या मायबोलीकरांच्या प्रयत्नांना न्याय देणे. दर्जात कुठलीही तडजोड न करता या सर्वांचे संतुलन राखणे ही एक प्रकारे तिहेरी कसरतच होती. शिवाय हे गीत ऐकणार्‍याच्या ओठी सहज बसेल, मायबोलीकरांना सहज गुणगुणता येईल, खेरीज हे गीत सर्व “मायबोलीकर” वा मायबोलीकर नसलेल्या सर्वांच्या मनात रुजेल, अशा प्रकारे त्याला संगीतबद्ध करायचे हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पुढील वाटचाल करायचे ठरवले होते. या गीताशी संबंधित सर्वांचे संपूर्ण सहकार्य व सहभाग केवळ यांमुळेच ही कसरत शक्य झाली आणि एकंदरीत मायबोली शीर्षकगीत कुण्या एकाचे न राहता सर्वांचे झाले हेच या गीताचे यश म्हणावे लागेल. किंबहुना यातील सहभागी ज्येष्ठ मायबोलीकरांचे शुभाशिर्वाद, समवयस्क मायबोलीकर गायकांचे प्रोत्साहन, बालगोपाळांनी आपल्या सुरांतून गुंफलेले मोती, सर्वांच्या कुटुबियांनी दिलेला पाठींबा, आणि मायबोली संस्थापक व अ‍ॅडमिन टीम यांनी वेळोवेळी केलेली मदत व मार्गदर्शन या “पंचम” संगमातून हे गीत जणू परिपूर्ण झाले आहे. ज्यांचे संगीत ऐकून आमच्या पिढीची कर्णेंद्रिये “सूर” समजू लागली आणि नादब्रह्माचे माझे दैवत- पंचम दा (आर.डी. बर्मन) यांचा जणू अशाप्रकारे आशीर्वाद या गीताला लाभला आहे असे मी मानतो.

यातील सहभागी जवळ जवळ सर्वच मायबोलीकर (एक दोन अपवाद वगळता) हे व्यावसायिक गायक नाहीत. त्या सर्वांनी आपापले दैनंदिन व्यवसाय, घर, जबाबदार्‍या हे सर्व संभाळून या गीतासाठी केलेली मेहनत व सर्व प्रकारे केलेली मदत, या सर्वाचे मोल माझ्या लेखी अधिक आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागात वा शहरात राहणार्‍या तरीही “मायबोलीकर” या एका नात्याने एकाच मायबोली कुटुंबाचे सदस्य असलेल्या अशा या गीताशी संबंधित सर्वांचे योगदान याला “मायबोली स्पिरीट” असे म्हटले तर वावगे ठरू नये.

या जागतिक मायबोली गीताचा गेले जवळ­जवळ पाच महिने सुरू असलेला अद्भुत प्रवास आज अंतिम मुक्कामी पोहोचला आहे. या संपूर्ण प्रवासात या गीतातील प्रत्येक शब्द या गीताशी संबंधीत सर्वांनीच अक्षरशः जगला आहे हे सर्वांच्या अनुभव लेखनातून स्पष्ट होते.

या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूपः
जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन.

जवळ जवळ पंधरा वर्षांचा इतिहास व दर्जेदार साहित्यिक परंपरा असलेल्या “मायबोली.कॉम” या संकेतस्थळाची आजवरची ओळख ही “मायबोलीशी नातं सांगणार्‍या जगभरच्या पाऊलखुणा” अशी असली तरी या मायबोली शीर्षकगीतामुळे आजपासून “आंतरजालाच्या जागतिक नकाशावर मायबोलीच्या पाऊलखुणा” आता कायमस्वरूपी कोरल्या गेल्या आहेत, असेच एक मायबोलीकर म्हणून म्हणावेसे वाटते.

मायबोलीच्या इतिहासात या शीर्षकगीताच्या रूपाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून एक कायमस्वरूपी ठेव या गीताशी संबंधीत सर्वांच्या नावाने कायम राहील या भावनेने नतमस्तक व्हायला होते आणि मायबोलीचा अभिमान वाटतो.

वर म्हटले तसे मुळात गीताचा आत्मा श्रीमंत आहे. त्याला सुरात साकारणारे कलाकार यांचे प्रयत्न व कार्यासक्ती तितकीच उल्लेखनीय आहे. त्यामुळे जर काही दोष, उणीव असेल तर या गीताचा संगीतकार व या टीमचा एक प्रतिनिधी या नात्याने त्या जबाबदारीची मला संपूर्ण जाणीव आहे. खरे तर कुठलीही कलाकृती (गीत, संगीत, चित्र, इ.) ही जास्ती जास्त वाचक, श्रोत्यांपर्यंत पोहचावी हेच कुठल्याही कलाकारासाठी सर्वात महत्वाचे असते. कलाकाराचा आणि त्याचबरोबर कलेचाही विकास होण्यात ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे यात दुमत नसावे. मायबोलीने असे जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याने आज हे गीत शब्दशः सातासमुद्रापार पोहोचले आहे. एखाद्या कलाकाराला अधिक काय हवे?
बाकी रसिक श्रोता हाच मायबाप सरकार असल्याने त्याचे मत, अभिप्राय, आवड, निवड सर्वच शिरसावंद्य!

मायबोली शीर्षकगीत हे निव्वळ गीत नसून एक विचार आहे, संकल्पना आहे, अनुभव आहे, अभिव्यक्तीचे प्रकटीकरण आहे. म्हणूनच निव्वळ शब्द, सूर, ताल, लय या चौकटीत न अडकता हे गीत रसिक श्रोत्यांच्या मनाच्या संवेदनातून हृदयाच्या गाभार्‍यात वसेल अशी प्रामाणिक सदिच्छा व्यक्त करतो.

-योग (योगेश जोशी)

वरील गीतातील गायक क्रमः (मूळ गीत ईथे आहे.)

[मायबोली…..] (भुंगा)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेऊन ध्यास आली उदयास मायबोली (अनिताताई, योग)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी
घेउन ध्यास आली उदयास मायबोली ║धृ║ (समूह- मुंबई, पुणे, दुबई)

मिटवून अंतराला, जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते, विश्वात मायबोली (अगो व पेशवा)
[विश्वात मायबोली] (भुंगा) ||१||

सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अनिलभाई)
सदरांच्या पदरांनी, प्रत्यंगी नटलेली (अंबर व जयवी)
साहित्य वाङ्मयाची, ही खाण मायबोली (सई) ||२||

[युडलिंग (योग) आणि कोरस (अनिताताई, रैना)]

सार्‍या कलागुणांना, दे वाव मायबोली (प्रमोद देव व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (प्रमोद देव, व रैना)
सार्‍या नवोदितांची, ही माय मायबोली (देविका, कौशल, सृजन व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
ही माय मायबोली (सृजन)
भाषा मराठमोळी, हर अंतरी फुलावी (दिया व समूह)
घेउन ध्यास आली उदयास मायबोली (दिया व समूह) ||३||

चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (वर्षा व अनिताताई)
[मधले संवाद- भुंगा, रैना व योग]
चर्चा, मतांतरांची, अन् वादविवादांची (मिहीर)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (मिहीर व समूह- विवेक देसाई, भुंगा, प्रमोद देव)
परिणती सुसंवादी, घडविते मायबोली (अनिताताई, सई, स्मिता, पद्मजा) ||४||

सहजीच जीवनाचा, अविभाज्य भाग झाली (योग व सारिका)
[हार्मनी समूह-भुंगा, प्रमोद देव, विवेक देसाई, पद्मजा, सई, स्मिता]
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (योग, सारिका व सर्व गायक)
अमुच्या मनी विराजे, अभिजात मायबोली (पुरूष व स्त्री गायक)
अभिजात मायबोली (सर्व) ║५║

मायबोली.. (सर्व गायक)

संपूर्ण श्रेयनामावली:
गीतकारः ऊल्हास भिडे
संगीतकारः योग (योगेश जोशी)
गायकः
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर
कुवेतः जयवी-जयश्री अंबासकर
इंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)
वाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग
संगीत संयोजकः प्रशांत लळीत
ध्वनिमुद्रण तंत्रज्ञः

  • नदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.
  • जयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.
  • संजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.
  • मेरशाद- अल शिबाक मुझिक सेंटर, दुबई.

मायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)
झलक ऑडियो व्हिज्युअल टीम – आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc

*****

डाऊनलोड / Download:

मायबोलीचे शीर्षकगीत तुम्ही या दुव्यावरून तुमच्या संगणकावर/MP3 प्लेयरवर उतरवून घेऊ शकता.

किंवा इथे http://dn1.maayboli.com/mbsg/maaybolishirshakgeet.mp3

कायदेशीर सूचना:

१) संपूर्ण गाणं मायबोलीवरून डाऊनलोड करता येईल. गाण्याचे सगळे हक्क मायबोलिकडे असले तरी गाणं डाऊनलोड करणे, गाण्याची हवी तितकी वेळा कॉपी करणे, दुसर्‍याला देणे, कुठल्याहि माध्यमात (radio, TV etc), सार्वजनिक रित्या वाजवणे हे सगळे करण्याचा पूर्ण कायदेशीर परवाना असेल. कुणाचीही परवानगी लागणार नाही.

२) इतकेच नाहि तर कुणिही आपल्या ब्लॉगवरूनही त्याची प्रत Download साठी ठेवू शकतो. फक्त यासाठी काम केलेल्या सगळ्यांचा आदर म्हणून आणि त्यांना त्याचे श्रेय मिळावे म्हणून maayboli.com/sheershakgeet ही लिंक द्यावी लागेल.

३) गाण्याचे काहीच तुकडे दुसर्‍या कामात वापरणे, गाण्यात बदल करणे, वाजवण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही आर्थिक फायदा मिळवणे (उदा. फक्त याच एकट्या गाण्याची सीडी करून विकणे), गाणे किंवा गाण्याचा भाग जाहिरातीसाठि वापरणे असे कुणाला करता येणार नाही.

४) एखाद्या सीडी अल्बममधे इतर गाण्यांबरोबर जर मायबोली गीत समाविष्ट करायचे असेल तर खालील अटींनुसार परवानगी असेल. गाणे संपूर्ण असावे, आणि maayboli.com/sheershakgeet ही लिंक असावी आणि या गाण्याचे सर्व हक्क मायबोलीकडे आहेत याचा उल्लेख पॅकेजिंगवर असावा. पण वर २ मधे लिहल्याप्रमाणे फक्त या एका गाण्याचा (किंवा टीझरचा) अल्बम करता येणार नाही.

कदाचित मराठी गाण्यांच्या इतिहासात हे पहिलंच गाणं असेल की गाण्याचे मालकी हक्क असूनही रितसर हव्या तितक्या वेळा कॉपी करण्याची, वाजवण्याची कायदेशीर परवानगी दिली जाते आहे. त्यामुळे प्रत्येक प्रत आपोआप कायदेशीर असेल.

धन्यवाद

मायबोली अ‍ॅडमिन टीम

***************************************************************************************************************************************************************

तळटिप : हा लेख माझ्या या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी दिल्याबद्दल मायबोली अ‍ॅडमिन टीमचे मन:पूर्वक आभार !

विशाल…..

2 thoughts on “मायबोली – शीर्षकगीत : प्रकाशन”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s