रॉंग नंबर : भाग ४

रॉंग नंबर : मागील कथानक

“हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ. ते तू कसे करणार आहेस हे मला माहीत नाही पण तू यशस्वीपणे करशील याची खात्री आहे मला.”

ब्रिगेडीयर चक्रवर्तींनी अतिशय हताशपणे आपले हात हवेत उडवले.

“ओके, डन विथ रिग्रेट !”

तसे डॉक्टर चिटणीस खळखळुन हसायला लागले.

आपल्या या देशभक्त पण चक्रम मित्राकडे चक्रवर्ती पाहातच राहीले. डॉक्टर चिटणीस आणि त्यांची मैत्री गेल्या १७ वर्षांपासून अबाधित होती. तेव्हा चक्रवर्ती सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत होते. नुकतेच मिलीटरी इंटेलिजन्सने त्यांना आपल्याकडे ओढून घेतलेले. त्यावेळी अशाच एका केसच्या निमीत्ताने त्यांच्यावर डॉ. चिटणीसांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. अगदी तेव्हापासून हा माणूस असाच बेधडक आणि बर्‍यापैकी विक्षीप्त म्हणून ओळखला जात असे. पण एका बाबतीत दोघेही अगदी सारखे होते, ते म्हणजे कमालीची आणि प्रखर देशभक्ती आणि त्यासाठी कुठल्याही थराला जावून वाटेल तो त्याग करण्याची वृत्ती.

यावेळेस पुन्हा एकदा चिटणीसांनी आपले प्राण पणाला लावले होते. चक्रवर्ती आणि चैतन्य दोघेही त्यांच्या रक्षणासाठी पराकोटीचे प्रयत्न करणारच होते. पण यावेळेस सामना पख्तुनीबरोबर होता.

*********************************************************************************************************

“शिर्‍या, सतीश बोलतोय. काहीतरी प्रचंड घातक प्रकरण शिजतेय खरे. कारण प्रचंड गोपनीयता बाळगली जातेय. मिलीटरी इंटेलिजन्समध्ये काही मित्र आहेत माझे. त्यांच्याकडून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग नाही. कुणालाच याबद्दल काहीही माहिती नाही. मग मी जरा वेगळ्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी भारतीय सेनेचा एक अधिकारी विमल गुप्ता विमानात बेशुद्धावस्थेत सापडला होता. तो कुठल्यातरी महत्त्वाच्या कामगिरीवर होता एवढेच कळले आणि आता तो मिलीटरी इंटलिजन्सच्या ताब्यात आहे. ते लोक त्याला टॉर्चर करताहेत. कदाचित त्या घटनेचा या घटनेशी काही संबंध नसेलही, पण का कुणास ठाऊक माझं अंतर्मन मला खात्री देतय की त्या अधिकार्‍याचं असं बेशुद्धावस्थेत सापडणं, त्याला त्याबद्दल मिलीटरी इंटेलिजन्सने आपल्या ताब्यात घेणं आणि त्याचवेळेस नेमका हा पख्तुनी भारतात उतरणं. या सर्व घटनांचा परस्परांशी काहीतरी संबंध नक्कीच आहे.”

“च्यायला सत्या, सालं तुझ्यासारख्या एका सामान्य पोलीस इन्स्पेक्टरच्या एवढ्या कुठे-कुठे ओळखी कशा निघतात रे?”

शिर्‍याने सतीशला डिवचण्याचा प्रयत्न केला पण सतीश शांत होता.

“ते महत्त्वाचं नाहीये शिर्‍या, तरीही तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो या आधी काही केसेसवर कमिशनर साहेबांच्या हुकुमावरून मी मिलीटरी इंटेलिजन्सबरोबर काम केलेले आहे. त्यामुळे काही ओळखी आहेत. तिथेही इन्स्पे. सतीश रावराणे या नावाला थोडीफार किंमत आहे.”

“अरे यार मी जस्ट गंमत केली तुझी. बाय द वे, माझे अंडरवर्ल्डमधील खबरे विमानतळ, बस अड्डे, हाय वे , ट्रेन्स सगळीकडे लक्ष ठेवुन आहेत. पख्तुनीची किंवा कुठल्याही संशयास्पद व्यक्तीची खबर आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे मी. तू त्याचा एखादा फोटो मिळवू शकशील काय?”

“ते सोपय मित्रा. मी तासाभरात त्याचे एखादे छायाचित्र मिळवून तुझ्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करतो. तासाभरात तुझ्या मोबाईलवर असेल त्याचा फोटो. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण पख्तुनी वेश बदलण्यात पटाईत आहे. सद्ध्या माझ्याजवळ एवढीच माहिती आहे की गेली काही वर्षे पख्तुनी आणि मिलीटरीचा एक अधिकारी कॅप्टन चैतन्य निंबाळकर यांच्यात एक अघोषीत युद्ध सुरू आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी चैतन्यमुळे पख्तुनी अपयश स्विकारावे लागलेले आहे. पण तरीही आत्तापर्यंत पख्तुनीला पकडण्यात चैतन्यला यश मात्र आलेले नाही. कॅप्टन चैतन्यचे डिटेल्स मी तुला पाठवतो लगेचच. कारण पख्तुनी आहे म्हणजे चैतन्यही या केसमधे असणारच. माझा सल्ला आहे की यु कीप अवे फ्रॉम धिस नाऊ. खुप मोठी नावे आहेत यात. कॅप्टन चैतन्य निंबाळकर हे आर्मीच्या रेकॉर्डसमध्ये अतिशय आदराने घेतले जाणारे नाव आहे.”

सतीश अगदी गंभीरपणे बोलत होता.

“गॉड…, म्हणजे दोघा-दोघांशी सामना करावा लागणार तर.” शिर्‍या स्वतःशीच पुटपुटला पण सतीशच्या तीक्ष्ण कानांनी ते टिपलेच.

“म्हणजे? शिर्‍या तू नक्की कशासाठी यात उतरतो आहेस? एक लक्षात ठेव, जर तू विरूद्ध बाजुला असशील तर आपली मैत्री तिथेच संपली हे लक्षात ठेव.”

“तू मला लगेचच भेटू शकशील सतीश? काही गोष्टी मी तुझ्यापासुन लपवल्या आहेत. पण आता वैयक्तीक स्वार्थ बाजुला ठेवायची वेळ आलेली आहे असे दिसतेय मला. तू मला भेटच मी थोड्या वेळातच माहीम सर्कलला पोचतो. इट्स अर्जंट. जमेल ना?”

“तू ये शिर्‍या, मी जमवतोच.”

थोड्याच वेळाने शिर्‍या आणि सतीश भेटले.

सतीशचा चेहरा विलक्षण गंभीर झाला होता. शिर्‍या मान खाली घालुन बसला होता.

“सत्या खरेच सांगतो मी या केसमध्ये ओढला गेलो ते त्या साठ कोटींच्या हिर्‍यांसाठी. पण हे प्रकरण काहीतरी वेगळेच दिसतेय. आधी मला वाटले होते तस्करीचे वगैरे प्रकरण असेल. पण केवळ साठ कोटींच्या हिर्‍यांसाठी पख्तुनीसारखा माणूस एवढा मोठा धोका पत्करणार नाही. आणि तो कुणी सामान्य तस्करही नाही.मग तो कशाला आला असावा आणि त्या हिर्‍यांचा काय संदर्भ असेल या केसमध्ये?”

“काहीतरी लोचा आहे शिर्‍या. ज्याअर्थी मिलीटरी इंतेलिजन्स यात सामील आहे त्याअर्थी …….” सतीश गंभीर झाला होता.

“येस सत्या, एक अंदाज सांगतो माझा. हिर्‍यांबद्दल पख्तुनीला चैतन्यला कळवण्याची गरज का भासावी?” शिर्‍याचे डोळे आता त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये चमकायला लागले होते.

“साधी गोष्ट आहे शिर्‍या, ते हिरे भारत सरकारच्या मालकीचे असणार. आणि आता……………

एकदम सतीशच्या काहीतरी लक्षात आले आणि तो चमकुन शिर्‍याकडे पाहायला लागला.

“शिर्‍या.. म्हणजे..म्हणजे त्या हिर्‍यांबरोबर अजुनही काही…..

“येस स्वीट हार्ट, येस! त्या हिर्‍यांबरोबर अजुनही काहीतरी पख्तुनीच्या हातात पडलेले आहे. आणि ते जे काही आहे ते मिलीटरीच्या, पर्यायाने भारत सरकारच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. पण मग ते काय आहे? आणि जर ते इतके महत्त्वाचे आहे तर पख्तुनी ते घेवुन भारतात परत कशाला आलाय? त्याला ते तिथुनच भारताविरुद्ध वापरता येवु शकले असते ना?”

सतीश कमालीचा उत्साहीत झाला होता.

“शिर्‍या वुइ आर ऑन राईट ट्रॅक. एक ल़क्षात घे, जर पख्तुनीला काहीतरी महत्त्वाचे मिळालेय आपल्या देशाविरुद्ध आणि तरीही तो भारतात उतरतो आणि भारतीय गुप्तहेरखात्याच्या एका जबाबदार अधिकार्‍याला आपल्याजवळ हिरे म्हणजे पर्यायाने ती अज्ञात वस्तुही असल्याचा इशारा देतो. म्हणजे…याचाच अर्थ त्याच्याकडची माहिती किंवा ते जे काही आहे ते अपुर्ण आहे, अर्धवट आहे. मला वाटते जर ती माहिती असेल तर ती सांकेतीक कोड्समध्ये असणार आणि ती डिकोड करणे त्यांच्याकडच्या लोकांना जमलेले नाहीये त्यासाठी म्हणून पख्तुनी भारतात…………..

एक्..एक …एक मिनीट शिर्‍या. मिलीटरी इंटेलिजन्सचे प्रमुख श्री. चक्रवर्ती यांच्या ऑफीसात माझा एक मित्र आहे. त्याच्याकडून एक माहिती मिळाली होती मला की आज सकाळी चक्रवर्ती साहेब डॉ. चिटणीसांना भेटले होते. त्यांच्यात जवळ जवळ तासभर काहीतरी चर्चा झाली.

शिर्‍या, कोडे सुटतेय. डॉ. चिटणीस हे जैव तंत्रज्ञानातले एक्सपर्ट आहेत आणि गेले काही महीने-वर्षे त्यांचा कुठल्यातरी विषाणुवर रिसर्च चालु आहे. माय गुडनेस शिर्‍या. वी आर मच क्लोजर नाऊ. बहुतेक चिटणीसांच्या त्या संशोधनाची फाईल …येस ती फाईलच पख्तुनीच्या हाती पडलेली आहे. चिटणीसांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड लक्षात घेतला तर ती माहिती त्यांनी संरक्षीत करुन ठेवली असणार. तीच डिकोड करण्यासाठी त्यांना आता डॉ. चिटणीस हवे आहेत. म्हणजे धोका डॉक्टरांना आहे. ओह गॉड !”

सतीशने आपले बोलणे संपवून शिर्‍याकडे पाहीले. शिर्‍या संशयाने त्याच्याकडे पाहात होता.

“ओके..ओके..असा बघू नकोस. एवढी सगळी माहिती माझ्यासारख्या सामान्य पोलीसाला कशी? हिच तुझी शंका आहे ना! सद्ध्या एवढेच सांगेन की मी अजुनही इंटेलिजन्सशी संबंधीत आहे. पण ही केस मात्र खरोखरच माझ्यापासूनही गुप्त ठेवण्यात आलेली होती. एक मिनीट, आपण चैतन्यशी बोलु…..”

सतीशने खिशातुन सेलफोन काढला आणि चैतन्यला फोन लावला.

“…………”

“हॅलो कोण बोलतेय?” इति सतीश

“…………”

“हॅलो चैतन्यसाहेब आहेत का? मी गुलाम बोलतोय. ”

गुलाम? शिर्‍या, डोळे फाडून सत्याकडे पाहायला लागला.

“माफ करा ते सेलफोन घरी विसरुन गेलेत. मी त्यांची पत्नी बोलतेय. काही मेसेज द्यायचाय का त्यांना?”

पलिकडून आवाज आला तसा सतीशच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

“नमस्ते भाभीजी, साहेबांना सांगा गुलामचा फोन होता म्हणून संध्याकाळी मी परत फोन करेनच.”

सतीशने फोन खाली ठेवला आणि रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला.

“शिर्‍या, चैतन्य कुठल्यातरी संकटात सापडलाय बहुदा.”

“कशावरून तू त्याच्या बायकोशी बोललास ना आत्ता. काय सांगितले तीने.”

“शिर्‍या चैतन्यचे लग्नच झालेले नाही अजुन. त्याची फियान्सी अदिती सद्ध्या हॉस्पीटलमध्ये आहे. ज्याअर्थी समोरची व्यक्ती ती चैतन्यची पत्नी आहे म्हणून सांगत्येय त्याअर्थी चैतन्य त्यांच्या ताब्यात आहे. पण कुठे असावा तो? आणि जर त्याला किडनॅप केलेय तर त्याचा फोन का चालु ठेवलाय अजुन?”

“त्याचा फोन चालु आहे? एक मिनीट….!”

शिर्‍याने खिश्यातून आपला सेलफोन काढून एक नंबर डायल केला.

“मॅक्सीस, शिर्‍या बोलतोय. जर मी तुला एखादा मोबाईल नंबर दिला तर त्यावरुन तो मोबाईल या घडीला कुठे आहे ते शोधून काढू शकशील तू?”

“फोन चालु असेल तर अप्रॉक्स एरीया सांगता येइल. पन्नास एक मिटरच्या अ‍ॅक्युरेसीने. त्यापेक्षा जास्त नाही.”

“पुरेसे आहे, बाकीचे मी बघून घेइन, सत्या नंबर सांग चैतन्यचा.”

सत्याने सांगितलेला नंबर शिर्‍याने मॅक्सीसला पुरवला.

“थोडा वेळ वाट पाहू आपण.”

“हा मॅक्सीस कोण आहे?”

शिर्‍या डोळे मिचकावत मंदपणे हसला.

“एक प्रोफेशनल हॅकर आहे, गुन्हेगारी विश्वातला. बँकाच्या सुरक्षा व्यवस्था भेदण्यात माहीर आहे मॅक्सीस.”

तसा सत्याने डोक्यावर हात मारला.

१५-२० मिनीटात शिर्‍याचा फोन वाजला.

“शिर्‍या, कन्फर्म सांगता नाय येणार पण हा फोन सद्ध्या मलबार हिलच्या जयप्रकाशनगर झोपडपट्टीच्या परिसरात कुठेतरी आहे. कुणाचा नंबर आहे हा? कुठल्याच डिरेक्टरीत लिस्टेड नाहीये. तू कुठल्या भानगडीत आहेस आता शिर्‍या.”

“काम झालं तर तुला तुझा मोबदला मिळेल मॅक्स, तू आम खा गुठलीया मत गीन.”

शिर्‍याने फोन ठेवला.

“चल, आपल्याला मलबार हिलला जायचेय.”

“एक मिनीट मी चौकीत कळवतो, काही माणसं हवीत आपल्याला?”

“नको पोलीस बघीतले की शत्रु सावध होण्याची शक्यता आहे.”

सत्याने चौकीत फोन करून काही कामासाठी बाहेर जात असल्याची खबर दिली. दुसर्‍याच क्षणी शिर्‍याची झोंडा सुसाटत मलबारहिलच्या दिशेने निघाली होती.

“मोमीन, शिर्‍या बोलतोय. लक्षात आहे ना?”

“बस्स का शिर्‍याभाई, तेरेको कैसे भुल सकता है कोइ? बोल कैसे याद किया?”

“मोमीन, आज्-काल या दोन दिवसात जयप्रकाश नगर मध्ये काही नवीन हालचाल.?”

“साला तू सचमुच शैतान है, शिर्‍या! आत्ता दोन तासापुर्वीच एका मेटॅडोरमधुन एक बकरा पकडून आणलाय टकल्याच्या माणसांनी. कुणीतरी चिकणा पोरगा आहे, बहुतेक खंडणीचा लोचा है!”

“मोमीन, एक काम करणार?”

“त्याच्यावर नजर ठेवायची? केलं. फिकर मत करना भाय, अब जब तक तुम नै बोलेगा वो लोग उस छोकरेको उदरसे हिला नै पायेगा. अगर कोशिशभी करेगा तो मोमीनके बंदे उनको सिधा उपर पहुंचायेंगे.”

“असलं काहीही करु नकोस. फक्त लक्ष ठेव. मी पोहोचतोच आहे अर्ध्या-पाऊण तासात.”

शिर्‍याने अ‍ॅक्सलरेटरवरचा दाब वाढवला.

************************************************************************************************************

“याद रखना युसुफमिया, आदमी बेहद्द खतरनाक है! उससे उलझना मतलब मौतसें खैलना! खुद मुझे भी डर लगता है उससे उलझते वक्त! और सबसे अहम बात उसको खरोच भी नही आनी चाहीये, उसके अगर कुछ हुआ तो मै तुम्हें जिंदा नही छोडुंगा!”

पख्तुनीने फोन खाली ठेवला. यावेळेस त्याने आपल्या मार्गातला सगळ्यात मोठा काटा जरा वेगळ्या पद्धतीने हाताळायचा ठरवला होता. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात त्याने अनेक माणसे पेरुन ठेवलेली होती. त्यापैकीच एक युसुफ गिलानी. अंडरवर्ल्डमध्ये टकला युसुफ म्हणून ओळखला जाणारा युसुफ ड्र्ग्स तस्करीच्या व्यवसायात होता. ड्रग्स तस्करी, गुंडा गर्दी, सुपारी घेवुन माणसे मारणे हे वरवरचे उद्योग करणारा युसुफ टकला प्रत्यक्षात मात्र आय.एस.आय.चा ट्रेनड एजंट होता. त्यामुळेच हे काम पख्तुनीने त्याच्यावर सोपवले होते. अतिशय थंड डोक्याचा आणि खुनशी माणुस म्हणुन युसुफ ओळखला जात असे. चैतन्यला खुप चांगल्या पद्धतीने ओळखुन होता तो. हे काम आपल्या नेहमीच्या कामाइतके सोपे नाही हे त्याला पक्के ठाऊक होते.

त्यादिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आन्हिके आटपून चैतन्यने आपली सरकारी जीप बाहेर काढली. सीटवर बसतानाच त्याला ते जाणवले होते. कुणीतरी पाठलागावर आहे याची त्याला जाणीव झाली होती. त्याने बगलेत अडकवलेले रिवॉल्व्हर चेक केले. पुढच्याच क्षणी त्याला आपल्या डोळ्यासमोरचा रस्ता फिरत असल्याची जाणीव झाली. काही कळेपर्यंत त्याने गाडी फुटपाथवर चढवली होती.

शुद्ध हरवण्यापुर्वी त्याने एकच वाक्य ऐकले….

“अरे ये तो हमारे कॅप्टनसाहब है! रजिया, भाईसाब…, थोडी मदत करो कॅप्टनसाहबको मेरी गाडीमें बिठावो, इन्हे हॉस्पीटल ले जाना पडेगा!”

तो आवाज चैतन्यने कुठेतरी ऐकलेला होता. आपलं अपहरण होतय याची त्याला खात्री पटली होती. पण…

येस, आता आठवलं काय झालय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने एक सणसणीत शिवी हासडली. एका अतिशय साध्या युक्तीला बळी पडला होता तो. मघाशी सीटवर बसताना पार्श्वभागाला काहीतरी टोचल्याची अंधुकशी जाणीव त्याला झाली होती. काहीतरी चावलं असेल म्हणून त्याने सोडून दिलं होतं. पण आता त्याला खात्री होती की कुणीतरी एखाद्या छोट्याश्या सुइला काहीतरी गुंगी येणारे औषध लावून ती त्याच्या गाडीच्या सीटला अ‍ॅडजस्ट करुन ठेवली होती. पुढचा काही विचार डोक्यात यायच्या आधीच त्याची शुद्ध हरपली होती.

…………………………………………………………………………………………………………….

“ये तो बेहद्द आसान था हुजुर, ये बंदा तो एकदम बेवकुफ निकला!”

जयप्रकाश नगर झोपडपट्टीच्या त्या अगदी मध्यभागी असलेल्या खोलीत, समोरच्या कॉटवर बांधलेल्या अवस्थेत बेहोश पडलेल्या या देखण्या तरुणाकडे बघत रजिया उर्फ नफीसाने आवंढा गिळत युसुफला उद्देशुन म्हटले.

“नही नफीसा, हमारी किस्मत अच्छी थी, वरना ये शख्स शैतान से कम नही है! इसको बांधकरही रखना और बेहोशीकी हालतमेंही रखना! एक बात पल्ले बांधलो इसे होश आ गया तो फीर इसे संभालना मुश्किल हो जायेगा!”

“इसके इस मोबाईल का क्या करु, फेक दु कही?”

“नही, बिलकुल नही, इससे बंदेके गायब होनेकी खबर आऊट हो जायेगी, फोन चालु ही रहने दो. बजे तो उठाना मत, बस्स,  हो सके तो एखाद-दुसरे कॉलको कुछ आनन फानन जबाब दे देना, जैसा पासही में गये है या फीर अभी आते ही होंगे..ताकी किसीको शक ना हो! मै फोन करते रहुंगा, बाहर अपने आदमीयोंका पहरा रहेगा, थोडा भी खतरा लगे तो शकील को बोल देना, वो बाहरही होगा! मै शामको वापस आउंगा!”

त्यानंतर युसुफ टकला बाहेस निघून गेला.

चैतन्यचा फोन सारखा वाजतच होता एकदोन फोन नफीसाने टाळले. एक फोन मात्र तीने उचलला. टकल्याची सक्त ताकीदच होती तशी.

फोन उचलुन ती गप्पच राहीली…

“…………”

“हॅलो कोण बोलतेय?”

“…………”

“हॅलो चैतन्यसाहेब आहेत का? मी गुलाम बोलतोय. ”

पलिकडे बहुदा कोणीतरी गुलाम म्हणून व्यक्ती होती. त्याला काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून तीने सांगितले.

“माफ करा ते सेलफोन घरी विसरुन गेलेत. मी त्यांची पत्नी बोलतेय. काही मेसेज द्यायचाय का त्यांना?”

“नमस्ते भाभीजी, साहेबांना सांगा गुलामचा फोन होता म्हणून संध्याकाळी मी परत फोन करेनच.”

तीने फार मोठी घोडचुक केली होती. अर्थात चुक टकल्याची होती, चैतन्यबद्दलची सगळी माहिती तिला द्यायला हवी होती. पण चैतन्य अविवाहीत आहे हे तिला माहीत नव्हते आणि फोनवर पलिकडच्या बाजुला मुंबई पोलीसांचा एक अतिशय धुर्त आणि चाणाक्ष पोलीस अधिकारी आहे याचा तिला संशय येणेही शक्य नव्हते. चैतन्यचा फोन चालु ठेवणे ही टकल्याची मोठी चुक होती. तीची फळे पख्तुनीला भोगावी लागणार होती.

क्रमशः

 

 

 

 

21 thoughts on “रॉंग नंबर : भाग ४”

Leave a reply to विशाल कुलकर्णी उत्तर रद्द करा.