RSS

रॉंग नंबर : भाग ३

23 सप्टेंबर

रॉंग नंबर : भाग १
रॉंग नंबर : भाग २

****************************************************************************************

“कर्रर्रर्र..क्क्क..क्कच्च्च्च्च्च……

भयाण वेगात आलेली ती झोंडा ’तरन्नुम’च्या दारात येवून कच्चकन थांबली तसा ’तरन्नुम’च्या सिक्युरिटी गार्डने खिशातला रुमाल काढून आधी घाम पुसला आणि मग घाबराघुबरा होत हॉटेलच्या काचेच्या दरवाजातून अंतर्भागात डोकावून बघीतले. तसे आतल्या बाजुला उभा असलेला जाफर पटकन अजुन आतल्या भागात पळाला. त्या गार्डच्या समोरच्या बाजुला उभ्या असलेल्या दुसर्‍या गार्डने त्याला हळुच सांगितले.

“तू ये साबको जानता है ना अच्छेसे, तो उनका बता देना अंदर मत जाये करके. अंदर सावत्याभायका पुरा गँग डेरा डालके बैठेला है.”

तसा समोरचा हसला.

“छोड यार, मेरको वो फिकर नै, मेरेको फिकर इस बात का है, की अगर आज राडा हुवा तो अपनेको दुसरा नोकरी ढुंडना पडेगा. ये बार तो गया समझ. उपरवाला सावत्याभायको थोडा अक्कल दे बस्स. शिर्‍याभाऊसे उलझना सावत्याभायके बस का रोग नै है बाबा.”

त्याने गडबडीत झोंडातून खाली उतरणार्‍या तिच्या मालकाला एक कडक सलाम ठोकला.

“डर मत वासिम, आज मै राडा करने नही आया. एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय इथे.”

शिर्‍याने त्याच्या खांद्यावर हलकेच थोपटत त्याला दिलासा दिला.

“पण जर का सावत्याने राडा करायची कोशीश केली तर आज तरन्नुम झोपलं म्हणून समज.”

गेटचे दार उघडता-उघडता अर्ध्यातच थांबत शिर्‍याने पुन्हा एकदा वासिमकडे बघितले..

“जर तसे काही झालेच तर उद्यापासून माझ्याकडे ये कामाला.” आणि आपल्या गाडीची चावी त्याच्याकडे टाकली.

“मै तैय्यारीमें रहता हू शिर्‍याभाऊ!”

शिर्‍या नुसताच हसला आणि दार उघडून आत शिरला. आत सावत्याची गॅंग त्याच्या स्वागताला हजरच होती. पांढर्‍याशुभ्र खादीच्या कपड्यातला सावत्या कोळी एखाद्या कार्पोरेटरसारखा दिसत होता. स्वच्छ पांढरे कपडे, व्यवस्थित दाढी केलेली, डोक्यावर गांधी टोपी, पायात कोल्हापूरी चपला. गळ्यात सोन्याची किमान दहा तोळ्याची चेन. तिच्यात लटकलेला साईबाबाचा फोटो आणि हाताच्या दाही बोटात चमकणार्‍या घसघशीत सोन्याच्या अंगठ्या. आजुबाजुला त्याची १५-२० माणसे. वरकरणी जरी शांत भासत असला तरी सावत्याच्या खिश्यात कायम एक देशी घोडा आणि कंबरेला कोल्हापूरी ‘घाव’ असतो हे शिर्‍याला माहीत होते. पण असले नमुने शिर्‍याच्या खिजगणतीतही नसत.

शिर्‍याला बघताच नव्यानेच सावत्याच्या टोळीत भरती झालेला ‘जाफर’ आपल्या भाईवर इंप्रेशन पाडण्याच्या हेतूने पुढे झाला. आपल्या पायमोज्यामध्ये खोचलेला रामपूरी हातात काढून त्वेषाने शिर्‍याच्या अंगावर धावला. सावत्या, जाफर्-जाफर करतोय तोपर्यंत आपला रामपूरी उगारत जाफर शिर्‍याच्या अंगावर तूटून पडला होता. पण क्षणभर काय झाले ते त्याला कळालेच नाही. त्याला धावलेला पाहून शिर्‍या अलगद डाव्या पायावर रेलला, शरीराचा सगळा भार डाव्या पायावर तोलत आपला उजवा पाय पुर्णपणे हवेत तोलत त्याने एक गिरकी घेतली. त्या गिरकीबरोबर सणकत आलेली शिर्‍याची लाथ तोपर्यंत शिर्‍याच्या आकस्मिक हालचालीमुळे आपला तोल जावून पुढे तिरका झुकलेल्या जाफरच्या मानेवर वीजेसारखी पडली आणि पुढच्याच क्षणी जाफर थोबाडावर शेकून पालथा पडलेला होता आणि सावरलेला शिर्‍या त्याच्या मानगुटीवर पाय देवून शांत उभा होता.

तसा सावत्या खदखदून हासला.

“साल्या, कुणी सांगितला होता अतिशहाणपणा करायला. संज्या, याला हाकल बे, हा आपलीच वाट लावायचा एक दिवस.”

“शिर्‍या, तू आपल्या होटेलात कशाला आलायस ते माहीत नाय मला. पण साला जिगर आहे तुझ्याकडे. आपली खुन्नस नंतर कधीतरी काढेन, हितं राडा करून माझ्याच हॉटेलची वाट लावायची इच्छा नाहीये मला. पण जर राडा करायलाच आला असशील तर आपली पण तयारी आहे.”

तसा शिर्‍या समंजसपणे हसला. पुढे वाकुन खाली पडलेल्या जाफरला त्याने हात दिला.

“उट बे, बरोबरीचा माणुस पाहून हात उचलत जा. चल फुट आता. सावत्या, माझं अस्लमभाईकडे काम आहे, मी त्याला भेटायला आलोय. तुझ्याशी मारामारी करण्यात मला इंटरेस्ट नाही. ते प्रकरण मी तिथेच विसरलोय. हा…आता तुच जर बदला-बिदल्याच्या बाष्कळ आणि बालिश कल्पना घेवुन असशील उभा तर ये माझी तयारी आहे.”

अस्लमभाईचं नाव काढताच सावत्या शांत झाला. अस्लमभाई म्हणजे गुन्हेगारी जगतातलं एक तटस्थ बेट होतं. त्याला कुठल्याही गोटात बिनशर्त प्रवेश होता. कारण अस्लमभाई म्हणजे त्या एकच छिद्र असलेल्या मुर्तीसारखा होता. कुठलीही गोष्ट त्याच्या कानात जात गेली की तसंच महत्वाचं आणि आवश्यक कारण असल्याशिवाय तोंडातून बाहेर पडत नसे. त्यामुळे अस्लमभाई म्हणजे गुन्हेगारी जगतातील प्रत्येकाचा दोस्त होता. निदान दुश्मनतरी नक्कीच नव्हता. साठीचा हा म्हातारा गुन्हेगारी जगतात मांडवलीसाठी ओळखला जायचा. मोठ्यात मोठा गुन्हेगार सुद्धा त्याचा शब्द टाळत नसे. सावत्याने देखील आपले दोन्ही हात वर करत आपल्या माणसांना मागे सरकण्याचा इशारा केला आणि स्वतः तेथुन निघून गेला. तसा बाहेर उभा असलेल्या वासिमने सुटकेचा नि:श्वास सोडला.

“अस्सलाम वालेकुम अस्लममिया !”

“आओ बेटा, बैठो……, बोलो क्या काम था?”

अस्लममियाने एकदम मुद्द्याला हात घातला. त्याच हेच वागणं शिर्‍याला प्रचंड आवडत असे. उगीच नमनाला घडाभर तेल ओतत न बसता लगेच मुद्द्यावर येणारी माणसे शिर्‍याला आवडत. शिर्‍या त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसला. एका वेटरला बोलवून त्याने ऑर्डर दिली…

“एक मॅकडॉवेल नं.१ लेके आ, और कुछ खानेको.”

“साले तू दो साल पहले जब मिला था तो एकदम कडका था, तब भी यही पिता था. आज करोडपती बन गया है तो भी वही पीता है… बदलेगा नही साले तू.”

“भाईजान, आदमी तो वही है ना? ”

शिर्‍याने हसतच विचारले आणि पुढे सरकून अस्लमभाईला पुढे सरकण्याची खुण केली आणि शिर्‍या बोलायला लागला. पुढची पाच मिनीटे खाली मान घालुन अगदी हळु आवाजात शिर्‍या बोलतच होता.

आपले बोलणे संपवून शिर्‍याने वर मान उचलली आणि त्याला अस्लमभाईच्या डोळ्यात साकळलेली भिती दिसली.

“तू इस बात को भूल जा बेटा. तू अभी बच्चा है मानता हूं की तू बडा दिलेर और ढीट बंदा है, लेकिन ये लोग बहुत खतरनाक है बेटे. जिस आदमी की तू बात कर रहा है उसकी खबर मुझे उसके हिंदुस्तानमें आते ही लग गयी थी. मी इंडियन आर्मीला त्याचवेळी ही खबर दिली होती. हा आंतरराष्ट्रीय मामला आहे बच्चे. तू इसमे मत पड. वो बंदा पाकिस्तानी जासुस है, जासुस क्या मौत है मौत! दिलबागखान पख्तुनी है उसका नाम. जरुर किसी अहम मामलेके तहत आया होगा. कुछ ना कुछ जरुर होनेवाला है आनेवाले समय मे. अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी त्याच्यापासून लांब राहीलेलेच बरे. ये लोग बडे खुंखार होते है, अपने मकसद के लिये कुछ भी कर सकते है!”

“तूम्ही मला फक्त त्या दिलबागबद्दल अजुन माहिती द्या अस्लममिया. मैने क्या करना है ये मै तय करुंगा. अगर वो मौत है और वो मुंबईकी तरफ बढ रहा है तो ऐसे आदमी को मै मुंबईमें खुले आम घुमने नही दे सकता. हा आमचा देश आहे, कोणीही यावे आणि टपली मारुन जावे हे आता चालणार नाही. वो होगा मौत का फरिश्ता पण मलाही ‘बिलंदर’ म्हणतात. जर तो कुठल्या वाईट हेतुने भारतात आलेला असेल तर त्याला परत जाऊ देणार नाही मी यावेळी. और मिया सवाल साठ करोड के हिरोंका भी तो है?”

शिर्‍याच्या आवाजातला गंभीरपणा जावून अचानक त्याच्या आवाजात नेहमीची मिश्किल चमक आली.

“अल्लाह्ह्ह्ह… मै जानता था तू नही मानेगा. ऐक तर……..”

आणि अस्लममिया बोलायला लागले.

****************************************************************************************

“शिर्‍या, मी सतीष बोलतोय. माझा अंदाज खरा ठरलाय. तो…….

“माहिताय, तो दिलबागखान पख्तुनी आहे. सत्या, तू तो यावेळी कशासाठी आलाय त्याबद्दल जास्त माहिती मिळते का बघ. मी माझ्यापरीने शक्य ती माहिती काढतोच आहे. पण हा माणूस जर काही वाईट हेतुने आलेला असेल तर परत जाणार नाही पाकिस्तानला.”

शिर्‍याचा आवाज अतिशय थंड आणि जहरी झालेला होता.

“शिर्‍या, ट्राय टु अंडरस्टँड ! हा अतिशय गोपनीय मामला आहे. आय एम नॉट सपोजड टू स्टेप इन. हे प्रकरण मिलिटरी इंटेलिजन्सच्या अखत्यारित येतं. त्यांना कुणकुण जरी लागली मी यात काही चौकषी करतोय तर क्षणात माझी उचलबांगडी होइल येथुन.”

“तसं झालं तर नोकरी दे सोडून. तुला तुझी डिटेक्टिव्ह एजेन्सी चालु करायची होती ना रिटायरमेंट नंतर ती आत्ताच कर म्हणे. पैसा मी पुरवेन. पण आज दुपारपर्यंत मला शक्य ती सगळी माहिती हवी. या माणसाला लवकरात लवकर गाठायला हवं. आणि हो, शक्य असेल तर आर्मी इंटेलिजन्सतर्फे हि केस कोण हँडल करतेय ते कळू शकेल का आपल्याला?”

“अवघड आहे. त्यांची कामं खुप गुप्त असतात. पण मी प्रयत्न करतो.”

“कॅप्टन चैतन्यला वाटत होते की यावेळी त्याला एकट्यालाच पख्तुनीशी मुकाबला करायचा आहे. पण अजुन दोघे त्याच्या बाजुने या युद्धात उतरणार होते. फरक एवढाच होता की दोघांपैकी एक फक्त देशाबद्दलचे आपले कर्तव्य, आपल्या देशभक्तीसाठी म्हणून उतरला होता तर दुसर्‍याचे आकर्षण होते पख्तुनीकडे असलेले ‘साठ कोटींचे हिरे’ !

त्या साठ कोटींच्या हिर्‍याबरोबर असलेल्या गोष्टीचे मुल्य त्या साठ कोटींपेक्षा लाखो पटीने अधिक होते हे मात्र त्यांच्यापैकी फक्त चैतन्यलाच माहीत होते आणि……

पख्तुनीला…..!!

****************************************************************************************

“डॉक्टर, आर यु सिरीयस अबाऊट धिस?”

“आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का चक्रवर्ती?”

“डॉक्टर चैतन्य त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. लवकरच ती चिप आपल्याकडे असेल.”

“चक्रवर्ती, चैतन्यच्या क्षमतेबद्दल कसलाही अविश्वास नाहीये माझ्या मनात. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर ती चिप पख्तुनीकडे असेल, तर आपण रिस्क घेवु शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत शक्य तितक्या लवकर ती चिप आपल्या ताब्यात यायलाच हवी.”

“पण म्हणून काय त्यासाठी तुझ्या प्राणाची रिस्क घ्यायची डॉक्टर? सॉरी, पण हे मला मान्य नाही! डॉक्टर सिद्धार्थ चिटणीसांचे प्राण मी तरी पणाला लावू शकत नाही. आज तुझी देशाला खुप गरज आहे मित्रा. जैव तंत्रज्ञानातला तुझ्यासारखा तज्ञ माणुस गमावणे देशाला परवडण्यासारखे नाहीये.”

“मग ते महाभयानक हत्यार पाकिस्तानसारख्या आपल्या वाईटावरच टपून बसलेल्या शत्रुच्या हातात पडणे परवडण्यासारखे आहे का? डॉ. चिटणीस देशापेक्षा मोठा आहे का चक्रवर्ती? वेडेपणा करु नकोस. देश राहीला तर माझ्यासारखे हजारो चिटणीस जन्म घेत राहतील, पण जर देशच नाही राहीला तर चिटणीसाच्या असण्याला काही तरी अर्थ आहे का?”

“पण डॉक…….?”

“धिस इज फायनल चक्रवर्ती! आणि तू, चैतन्य आहातच ना माझ्या संरक्षणाला. एक लक्षात घे चक्रवर्ती या वेळेस पख्तुनी फक्त माझ्यासाठी आलाय कारण माझ्याशिवाय आणि माझ्या त्या डिव्हाईसशिवाय ती चिप कुठेही वापरता येणार नाहीये. हे त्याच्या लक्षात आणुन दिलेले असणार त्यांच्या संगणक तज्ञांनी. त्यामुळे तो मला पळवण्याचा प्रयत्न करणार तेही माझ्या त्या डिव्हाईससहीत.”

“पण एवढी महत्वाची, एवढी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली ती चिप गायब झालीच कशी डॉक?”

“अरे आम्ही तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक प्लान ठरवला होता. ती चिप एका ठिकाणी आणि डिव्हाईस एका ठिकाणी अशा पद्धतीने सुरक्षीत ठेवायचे ठरले होते. म्हणजे एकाच वेळी दोन्ही गोष्टी कुठल्या चुकीच्या हातात पडू नयेत हा एकमेव उद्देष्य होता. मी असेही ठरवले होते की जर चिप चोरीला गेली किंवा हरवली तर मी माझ्याकडचे ते डिव्हाईस नष्ट करुन टाकायचे. म्हणजे शत्रुला एकच पर्याय शिल्लक राहील त्या चिपमधील माहिती मिळवण्याचा तो म्हणजे ते डिव्हाईस नव्याने तयार करणे किंवा त्यासाठी मला किडनॅप करणे. बाकी दुसरा एकच पर्याय आता त्याच्या हातात शिल्लक आहे. कारण ते डिव्हाईस जरी त्याने तयार केले तरी चिप अनलॉक करण्यासाठी लागणारा पासवर्ड ब्रेक करणे त्यांना जमणार नाहीये. त्यासाठी त्यांना माझीच गरज भासणार आहे.”

“का त्यात असे काय अबघड आहे? आजकाल सायबरजगात अनेक कुख्यात हॅकर्स आहेत. आय.एस. आय. कडे तर असणारच. ”

“त्यांच्याकडे जर तसा हॅकर असता तर पख्तुनी भारतात आला असता?”

डॉ. चिटणीसांच्या या प्रश्नाला मात्र चक्रवर्तींकडे उत्तर नव्हते. तसे डॉ. चिटणीस मंदपणे गालातल्या गालात हसायला लागले.

“हसतोयस काय डॉक? मला काहीच कळत नाहीये. कारण माझ्या माहितीप्रमाणे पाकिस्तानी आणि चिनी हॅकर्स हे खरोखर बुद्धिमान आहेत. मग त्यांना तुझी चिप अनलॉक का करता येवु नये. आणि त्यासाठी त्यांना तुझ्या त्या डिव्हाईसचीच गरज का भासावी?”

चक्रवर्ती जाम भंजाळले होते.

“चिडू नकोस ब्रिगेडीयर, कुल डाऊन मॅन..कुल डाऊन ! सगळे सांगतो आधी एक तर कंप्लीट होवु दे. तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षीत ठेवायच्या या हेतुने ती चिप आम्ही तुमच्या मिलीटरी इंटेलिजन्स च्या सेफ व्हॉल्टमध्ये ठेवायचे ठरवले होते. तसे आपले बोलणेही झाले होते व त्यानुसार मा. राष्ट्रपतींची म्हणजे तिन्ही सुरक्षादलांच्या प्रमुखाची परमिशनही काढण्यात आली होती. पण कोण जाणे कशी पण ही बातमी फुटली. आणि ती चिप आपल्याबरोबर कॅरी करणारा माझा सहाय्यक विमल विमानातच बेशुद्धावस्थेत सापडला. त्याच्याकडची ती चिप गायब झालेली होती. मुळात ती अगदी मायक्रो साईझची चिप असल्याने आपण कुणाच्याही लक्षात येवु नये यासाठी अगदी साध्या पद्धतीने एका छोट्या मोबाईलमध्ये प्लांट केलेली होती. ही गोष्ट अगदीच गोपनीय असल्याने आपण सगळेच अगदी बिनधास्त होतो. ”

“तरीही माझी दोन माणसे कायम पाळतीवर होती विमलच्या. पण तरीही ती चिप गेलीच.”

चक्रवर्ती हताशपणे म्हणाले.

“म्हणुन तर म्हटलं ना, कुणीतरी आतल्याच माणसाने ही खबर फोडलीय. आणि ही गोष्ट तू, मी आणि विमलच्या शिवाय इतर कुणालाही माहीत नव्हती. पण तरीही ती चिप गायब झालीच.”

“आम्ही विमलला ताब्यात घेतले आहे डॉक. त्याचा तो मोबाईलही आमच्या ताब्यात आहे. फक्त त्यातली ती मायक्रोचिप मात्र गायब झाली आहे. पण अनंत प्रकारे टॉर्चर करुनही विमल मला काही माहीत नाही असेच म्हणतोय. तो स्वतःही विलक्षण गोंधळात पडलेला आहे. का कोण जाणे पण माझी अशी खात्री व्हायला लागलीय की यात विमलचा काहीही हात नाहीये. मग राहता राहीलो तू आणि मी. तुझ्या देशभक्तीबद्दल माझ्या मनात यत्किंचीतही शंका नाही आणि मी स्वतःही हे कृत्य करण्यापेक्षा मरण पत्करेन हे तुला चांगलेच माहिती आहे. आणि म्हणूनच माझा गोंधळ अजुनच वाढत चालला आहे. जर तुही नाही, मीही नाही आणि विमलही नाही तर ही बातमी बाहेर फुटली कशी? हे कोडे सुटेल तेव्हा सुटेल. कदाचित चैतन्य जरी या वेळी पख्तुनीला पकडण्यात यशस्वी ठरला तरी पख्तुनीच्या तोंडून ही गोष्ट उगळवून घेणे महाकठीण काम आहे.”

चक्रवर्तीने हताशपणे आपल्या हाताची मुठ जोरात टेबलावर आदळली.

“बरं ते ठेव बाजुला सद्ध्या. मला एक सांग तुझे ते डिव्हाईस म्हणजे नक्की काय आहे?”

आता डॉ. चिटणीसांच्या डोळ्यात चमक आली.

“येस, आता तू मुळ मुद्द्यावर आलास. हे बघ आधी आपण त्या चिपबद्दल बोलू. माझ्या काही बुद्धिमान सहकार्‍यांच्या साह्याने मी त्या चिपवर डेटा राईट करताना त्यावर एक विशिष्ठ प्रकारचे फर्मवेअर इंन्स्टॉल केले आहे. त्यामुळे काय होइल तर योग्य त्या पासवर्डशिवाय जर ती चिप कुणी हॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्या मायक्रोचिपमधील सर्व डेटा आपोआप करप्ट होइल आणि कुणाच्याही उपयोगाचा राहणार नाही. त्यामुळे मी थोडासा बिनधास्त होतो. पण आता ज्याअर्थी पख्तुनी भारतात उतरलाय त्याअर्थी त्याच्या संगणकतज्ञांना ही बाब कळुन चुकलीये किंवा त्यांनी रिस्क घ्यायचे टाळलेय. कारण अशा महत्त्वाच्या चिप्सच्या बाबतीत शक्यतो ही काळजी नेहमीच घेतली जाते.

आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चिप अनलॉक कशी करायची? तुला तर माहीतच आहे चक्रवर्ती, तुला तर माहीतच आहे चक्रवर्ती, अशा मायक्रोचिप्स किंवा ज्याला इप्रॉमही म्हटले जाते. हे इप्रॉम प्रोग्रॅम करण्यासाठी तुम्हाला मायक्रोप्रोसेसर किंवा तत्सम डिव्हाईसची गरज लागते. ही चिप तयार करताना आम्ही अशा प्रकारचे फर्मवेअर त्यासाठी तयार केले होते….

“एक मिनीट प्रथम हे फर्मवेअर म्हणजे काय?”

“कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा डिव्हाईस फंक्शनल करण्यासाठी वापरले जाणारे साहाय्यक सॉफ्टवेअर असे सोप्या भाषेत सांगता येइल फारतर. फार टेक्निकल डिटेल्समध्ये जायची गरज नाहीये. तर आम्ही जे फर्मवेअर तयार केले आहे हे ते इप्रॉम म्युपीला म्हणजे मायक्रोप्रोसेसरला अटॅच केल्यावर प्रथम एक अल्फान्युमरीक पासवर्ड मागते. तुझ्या माहितीसाठी इथपर्यंत काहीही धोका नाहीये. अगदी हा पासवर्ड हॅक केला जाऊ शकतो. कदाचित पाकी तज्ञांनी तो हॅक केलाही असेल. पण त्या दारातून पार पडले की माझे सॉफ्टवेअर दुसरा पासवर्ड मागते आणि चुकीचा पासवर्ड जर फीड केला तर सगळा डेटा करप्ट करुन टाकते. आता तो पासवर्ड जर त्यांना हवा असेल तर त्यांना माझे अपहरण करावेच लागेल. कारण हा दुसरा पासवर्ड आहे डोळ्याचे (रेटीना) स्कॅन इंप्रेशन. त्यासाठी त्यांना एकतर मला पळवावे लागेल किंवा माझा डोळा तरी पळवावा लागेल. माझ्याकडच्या मायक्रोप्रोसेसर डिव्हाईसला असा रेटीना स्कॅनर आम्ही अटॅच केलेला आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यांचे पासवर्ड चिपला देणे आम्हाला शक्य झाले. यातला दुसरा पर्यायही बिनकामाचा आहे कारण इथेही आम्ही एक गोची करुन ठेवलेली आहे. इथे आमचे फर्मवेअर दोन्ही डोळ्यांचे इंप्रेशन मागते आणि त्याचाही क्रम ठरलेला आहे. जर इंप्रेशन चुकीच्या क्रमाने दिले गेले तरीही डेटा करप्ट होणार हे निश्चित. त्यामुळे जर ती चिप अनलॉक करायची असेल तर मला पळवणे त्यांना मस्टच आहे.”

डॉ. चिटणीसांनी एक लांब श्वास घेतला आणि चक्रवर्तींकडे पाहात समोरच्या टेबलावर हळुवारपणे ठेका धरला.

“है अगर दुश्मन्..दुश्मन्…जमाना, गम नही, गम नही….

कोई आये, कोई ….हम्…किसीसे कम नही, कम नही !”

तसे चक्रवर्ती प्रथमच मोकळेपणाने हसले.

“नालायक आहेस साल्या. हे करताना सरळ सरळ स्वतःचा जीव असा धोक्यात घालताना लाज नाही वाटली तूला?”

तसे डॉक्टर चिटणीस खदखदुन हसायला लागले.

“मादरे वतनसे बढकर कुछ नही होता मेरे दोस्त, कुछ भी नही!”

चक्रवर्तींनी त्यांच्याकडे बघत हसत हसतच कोपरापासुन हात जोडले. पण त्यांचे डोळे मात्र आपल्या या वेड्या मित्राबद्दलच्या मायेने, काळजीने आणि महत्त्वाचे म्हणजे अभिमानाने गच्च भरुन आले होते.

“बादवे डॉक, एक थोडी गोपनीय गोष्ट विचारु. आतापर्यंत मला एवढेच सांगण्यात आलेय की त्या चिपमध्ये कुठल्यातरी महाभयानक शस्त्राबद्दलचा डेटा आहे…..”

“सॉरी ब्रिगेडीयर….!”

“ओके, नाही विचारणार! आय नो, दॅट्स अ टॉप सिक्रेट !”

“माफ कर मित्रा, पण सद्ध्या तरी त्याबद्दल मला आणि मा. राष्ट्रपतींनाच माहिती आहे. अगदी माझ्यासाठी ते डिव्हाईस तयार करणार्‍या माझ्या सहकार्‍यांनादेखील, अगदी विमलला देखील त्या चिपमध्ये कुठल्या शस्त्र्ताबद्दलचा डेटा आहे हे माहीत नाही. मुळात त्यात एखाद्या नव्या महाभयानक शस्त्राबद्दलचा डेटा आहे ही गोष्ट सुद्धा आम्हा दोघांबरोबर फक्त तुला आणि विमललाच माहीत आहे. इतरांना काहीही कल्पना नाही.”

“आणि डॉक त्या हिर्‍यांबद्दल काय? ”

“मलाही तेच कोडे पडलेय ब्रिगेडीयर! ती देशाची संपत्ती आहे. तुमचे संरक्षण असल्यामुळे खुद्द मा. राष्ट्रपतींच्या आदेशावरून ते हिरे एका जागेवरून दुसर्‍या जागेवर हलवण्यासाठी म्हणून विमलच्या ताब्यात देण्यात आले होते. पण शत्रुच्या माणसांना त्याच्याबद्दलही माहिती होती. नक्कीच कुणीतरी आतलाच माणुस इन्व्हॉल्व्ह आहे या प्रकारात. चक्रवर्ती आधी त्याला शोधुन काढणे खुप महत्वाचे आहे.”

“मी ते काम हायस्ट प्रायोरिटीवर करतोय डॉक! खरेतर तुला सांगायला हरकत नाही, आम्हाला आमचा संशयित मिळालाय. १-२ दिवसात खात्री झाली की तो आपल्या ताब्यात असेल. आमची २४ तास नजर आहे त्याच्यावर.”

चक्रवर्तींनी हलक्या आवाजात सांगितले तसे डॉक्टर चिटणीसांनी थंड निश्वास सोडला.

“हम्म….! पुढे मागे जर मा. राष्ट्रपतींनी परवानगी दिलीच तर मी तुला त्याअ शस्त्राबद्दल सांगेनही ब्रिगेडीयर. पण त्या आधी ती चिप परत मिळवणे किंवा नष्ट करणे हे आपले पहीले काम आहे. त्यासाठी तरी निदाम पख्तुनीपुढे गळाला लावलेले आमिश बनून उभे राहणे मला गरजेचे आहे मित्रा. आय एम सॉरी बट यु हॅव टू अरेंज दॅट समहाऊ. ते तू कसे करणार आहेस हे मला माहीत नाही पण तू यशस्वीपणे करशील याची खात्री आहे मला.”

ब्रिगेडीयर चक्रवर्तींनी अतिशय हताशपणे आपले हात हवेत उडवले.

“ओके, डन विथ रिग्रेट !”

तसे डॉक्टर चिटणीस खळखळुन हसायला लागले.

आपल्या या देशभक्त मित्राकडे चक्रवर्ती पाहातच राहीले.

क्रमशः

 

9 responses to “रॉंग नंबर : भाग ३

 1. Manish

  सप्टेंबर 24, 2011 at 2:43 pm

  Khup Chan. Are kadhechya 2 bhagat etke antar ka hote. Me kal pahilyanda tuzya blog var aalo. 2nd part chi date july hoti mhanun vatale etar bhag kuthe aahet. Khup chan lihitos katha.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 3, 2011 at 11:58 सकाळी

   अरे नोकरी बदलली. त्यामुळे थोडा व्यस्त होतो. आता पुर्ण करेन पटापट. धन्यवाद !

    
 2. महेंद्र

  सप्टेंबर 30, 2011 at 9:33 सकाळी

  गुरुनाथ नाईकांची स्टाइल आठवली.. छान जमली आहे.

   
 3. विशाल कुलकर्णी

  सप्टेंबर 30, 2011 at 5:50 pm

  एक काळ होता दादा, जेव्हा गुरुनाथ नाईक आणि चिंतामणी लागु हे खुप वाचले. नंतर त्या पाल्हाळिक लेखनाचा कंटाळा यायला लागला. आता कळतेय…. 🙂
  आभार !
  मनिष, तुमचेही आभार !

   
 4. SUNIL

  नोव्हेंबर 1, 2011 at 11:56 सकाळी

  vishal i like your story please complete it as soon as possible, and if possible please mail me the date of your compilation.

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 1, 2011 at 3:05 pm

   जरुर सुनिल. नक्कीच ईमेल करेन तुम्हाला. लवकरच टाकतोय पुढचा भाग ! आभार्स 🙂

    
 5. भोवरा

  नोव्हेंबर 6, 2011 at 8:26 pm

  भन्नाट मित्रा, छान लिहितोयस…
  दीर्घ कथे साठी प्रयत्न करू शकतोस.

   
 6. vaibhav14476

  जानेवारी 1, 2014 at 1:21 pm

  सापडल्या बाबा उरलेल्या कथा . पण या सर्व कथा सहज एका मागोमाग एक अशा प्रकारे मुख पृष्ठावरच नावे वाचता येतील अशा ठेवता येणार नाहीत का ? म्हणजे भयकथा ३६ असे लिहले आहे तिथे ३६ कथा नावे देता येणार नाहीत का ? आपल्याला पाहिजे त्या नावावर क्लिक करायचे कि कथा ओपन होईल असे .

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: