******************************************************************************************************************************************************************
“इ है,,,इ है बंबई नगरीया तू देख बबुआ….”
त्याने चादरीतुनच हात बाहेर काढला आणि सेलफोन उचलून चादरीच्या आत घेतला. यावेळी त्याला फोन करणार्या दोनच व्यक्ती होत्या एक तर औध्या नाहीतर सतीश.
“च्यामारी पहाटे-पहाटे ९.३० वाजता उठवताना लाज कशी वाटत नाही या लोकांना? बोल बे सुक्काळीच्या… ”
कावलेल्या आवाजात शिर्याने आधी फोनकर्त्याला दोन शिव्या हासडल्या. काल रात्री जुहूच्या शेट्टीच्या हॉटेलमध्ये ७०-८० हजार घालवून झाल्यावर वैतागलेला शिर्या पहाटे दोन – अडीचच्या दरम्यान आपल्या लोखंडवालातल्या घरी पोहोचला होता. खिशाला चांगलाच बांबु बसलेला असल्याने तशी रात्रभर झोप नव्हतीच. शेवटी पहाटेच्या सुमारास उद्या कुठ्ल्यातरी बेटींगच्या अड्ड्याला भेट देवून पैसा रिकव्हर करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याला झोप आली होती. नाहीतरी ते लोक एवढा पैसा घेवून काय करणार होते, त्यातले चार्-पाच लाख शिर्याच्या खिश्यात गेल्याने असा काय फरक पडणार होता. एक दोघांची हाडे मोडावी लागली असती फक्त. तेरी भी चुप मेरी भी चुप. पुढचे काही दिवस अदृष्य व्हावे लागले असते फक्त. पण गेलेला पैसा दामदुपटीने परत मिळवल्याशिवाय त्याच्या जिवाला आराम लाभणार नव्हता. त्यात पहाटे पहाटे साडे नऊ वाजता त्याचा फोन बोंबलायला लागला होता….
“गुड मॉर्निंग ब्रो, आय एम बॅक!” तिकडून आवाज आला आणि फोन ठेवला गेला.
“कोण येडा होता कुणास ठाऊक?” शिर्याने मोबाईल साईड टेबलवर ठेवून दिला आणि काही क्षणातच तो पुन्हा निद्राधीन झाला…..
थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला…आणि वाजतच राहीला…
वैतागुन शिर्याने शिव्या देतच फोन उचलला…
“बोल बे भ………
“कॅप्टन, आय एम बॅक! धिस टाईम आय एम गोइंग टू रॉक. आणि हो यावेळेस येताना तुझ्यासाठी ६० कोटीचे हिरे घेवून आलोय बरोबर, सी यु सुन माय डिअर फ्रेंड !”
हिर्यांबद्दल ऐकताच शिर्याचे कान ताठ झाले.
“ओह थँक्स यार, कुठे भेटुया?”
तशी पलिकडची व्यक्ती सावध झाली.
“कोण आहेस तू? तू कॅप्टन असुच शकत नाहीस. लगता है राँग नंबर लग गया.”
पलिकडून क्षणार्धात फोन डिसकनेक्ट झाला आणि शिर्याची झोपही !
शिर्याने लगेच एक नंबर फिरवला…..
“हॅलो…इन्स्पेक्टर रावराणे हिअर !”
“सतीश, शिर्या बोलतोय…. एक नंबर लिहून घे. मला या नंबरबद्दल शक्य होइल ती सर्व माहिती हवी. आत्ता दोन मिनीटापुर्वी दोन वेळा या नंबरवरून फोन येवुन गेला मला. किमान नंबर कुणाच्या नावावर आहे आणि कुठून आला होता ही माहिती हवी.”
“तू एवढ्या लवकर उठलास पण? बाय द वे, अरे काय म्हणाला तो? तुला कशासाठी फोन केला होता त्याने?”
“सतीष, तो फक्त एवढेच म्हणाला की मी परत आलोय आणि त्याने फोन डिसकनेक्ट केला.”
शिर्याने हिर्यांबद्दल रावराणेंना सांगायचे प्रकर्षाने टाळले. नाहीतर रावराणे आधी त्याच्याच मागे लागले असते.
“दोन्ही वेळा त्याने फक्त “मी परत आलोय” हे सांगायला फोन केला? शिर्या…. काय लपवतोयस? काही नवीन लफडं तर करून ठेवलं नाहीस ना?”
“साल्ला…आला का तुला वास लगेच? अरे म्हणुन तर मीपण थोडा संभ्रमात पडलोय. एकच गोष्ट सांगायला तो दोन दोन वेळा फोन का करेल?”
“टेक इट फ्रॉम मी शिर्या ! तो नक्की राँग नंबर असणार आणि जरी कबुल करत नसलास तरी तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतो आहेस. पण म्हणूनच मी या फोन नंबरचे डिटेल्स शोधून काढणार आहे.”
रावराणेंनी फोन ठेवला आणि शिर्याने एक थंड निश्वास टाकला.
“च्यायला पक्का पोलीसवाला आहे, याच्यापासून काहीच लपवता येत नाही. पण कोण असेल तो? साल्याकडे ६० कोटीचे हिरे आहेत.”
शिर्याचे हात सळसळायला लागले होते. कालच ७०-८० हजाराला बांबु बसला असल्याने त्याने या प्रकरणात लक्ष घालायचे नक्की केले होते. तसेही त्यांचे अंतर्मन काही वेगळीच ग्वाही देत होते. आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडणार असलं की अशी फिलींग्ज यायची त्याला. नव्याने येणार्या अनामिक साहसाच्या कल्पनेने त्याचे बाहु स्फुरण पावायला लागले होते. तो आतुरतेने हातातल्या मोबाईलकडे बघत बसला…
थोड्याच वेळात सत्याचा फोन येणार याची खात्री होती त्याला.
आणि फोन वाजला……..
“शिर्या, सतीष बोलतोय. हा फोन तूला गुजरातमधून आला होता. गुजरात-पाक बॉर्डरवरच्या एका छोट्याश्या खेड्यातून. फोन कुणा पंडीत रघुवीर शर्माच्या नावावर आहे. पण ते फेक नाव असणार. माझा अंदाज खरा ठरला. काहीतरी मोठी भानगड आहे नक्की. शिर्या, स्पष्टपणे सांग, काय भानगड आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे कुठल्यातरी संकटात सापडल्यावर तूला माझी आठवण येइल. जर आत्ता काही सांगितले नाहीस तर त्यावेळी मी तुझ्या मदतीला येणार नाही सांगून ठेवतो.”
“सत्या, मला पण नक्की काहीच माहीत नाही. एवढेच सांगतो. त्या माणसाला कुणा कॅप्टनशी बोलायचे होते. पण राँग नंबर लागून फोन मला आला. बोलणारा माणुस…, त्याची भाषा…थोडीफार उर्दुची झाक होती त्याच्या बोलण्यात. म्हणूनच मला शंका आली आणि मी तूला फोन केला.”
शिर्याने बिनधास्त ठोकून दिले. रावराणेंचा इतक्या सहजासहजी विश्वास बसणार नाही याची खात्री होती त्याला. पण त्यांना नंतर पटवता आले असते.
गुजरात बॉर्डर……?
शिर्याने आणखी एक नंबर फिरवला.
“सलाम अस्लमभाई, कैसे हो?”
“या अल्लाह, सुबह सुबह मैने किसका मुंह देखा था? इस शैतानको मेरी याद कैसे आ गयी?” अस्लमभाईचा मिस्कील आवाज कानावर पडला आणि शिर्या स्वतःशीच हसला.
“मुसिबतके वक्त सभीको अपने भाईबंद याद आते है अस्लमभाई. मग तो माणुस असो वा शैतान.”
शिर्याने खुसखुसत वार परतवला तसा अस्लमभाई खळखळून हसला.
“साले..तू सुधरेगा नाही. बोल्….कैसे याद किया?”
“भाई, कुछ काम था, फ्री हो?”
“आजा ‘तरन्नुम’पें ! दोन पेग लावू आणि बोलू……….!!”
“तरन्नुम…?” शिर्याने दोनच मिनीटे विचार केला आणि लगेचच होकार दिला.
“ठिक आहे, दोन तासात मी पोचतोच. बेसमेंटला भेटूया ‘तरन्नुम’च्या.”
“ओह, लगता है कोइ तगडा बकरा फसा है…जो तू ‘तरन्नुम’मे आनेकोभी तैय्यार हो गया. मी तर मजाक करत होतो यार, तू सांग्..तू म्हणशील तिथे भेटू या. तो ‘सावत्या’ घातच लावून बसला असेल तू कधी तरन्नुमला येतोस त्याची. मागच्या वेळेस त्याचं आठ एक लाखाचं नुकसान केलंस तू.”
“छोड यार, असल्या सावत्या-फावत्याला शिर्या घाबरत नाही. त्याने बेइमानी केली त्याचं फळ त्याला दिलं मी. आज जर आडवा आला तर कायमचा आडवा होइल तो. मी पोहोचतोच आहे दोन तासात. तिथेच भेटू.”
शिर्याने फोन ठेवला. घड्याळ साडे दहाची वेळ दाखवत होतं. बरोब्बर अकरा वाजताच्या सुमारास लोखंडवालामधल्या शिरीन अपार्टमेंतमधून शिर्याची ‘झोंडा’ सुसाट वेगाने बाहेर पडली. गेटवरच्या वॉचमनने आकाशाकडे बघत हात जोडले.
“भगवान, सबकुछ ठिक ठाक रखना, लगता है आज किसीकी शामत आयी है!”
क्रमशः
विशाल कुलकर्णी
*****************************************************************************************************************************************************************
Gurunath
जुलै 8, 2011 at 6:12 pm
विशाल दादा नमस्कार,
तुमची ही “हेरकथामाला” फ़ारच आवडली, मला पण मुळात अशीच एक कथा लिहायची होती, पण अननुभवी असा मी थोडा संकोचलो व त्यातल्यात्यात एक लघुकथा प्रकार लिहिला आहे, मुळात ह्या कथा हळुहळु उलगडणा~या असल्यामुळे ह्या दिर्घकथाच ब~या वाटतात, पण पहिलाच प्रयत्न म्हणुन मी लघुकथा लिहुनच थांबलो. ब्लॉग साठी तुमचा सल्ला पण नक्की आवडेल मला.
माझा ब्लॉग,
antarmanaatun.blogspot.com हा आहे, थोडा वेळ तरी नक्कीच झेलाल हा ब्लॉग अशी अपेक्षा!!!!!
गुरुनाथ
विशाल कुलकर्णी
जुलै 20, 2011 at 2:28 pm
धन्यवाद मित्रा ! जरुर बघेन तुमचा ब्लॊग 🙂
mahesh chate (C.M)
सप्टेंबर 17, 2011 at 11:05 pm
mast
विशाल कुलकर्णी
सप्टेंबर 20, 2011 at 12:30 pm
आभार 🙂
vaibhav14476
जानेवारी 1, 2014 at 12:36 pm
वाचला पहिला भाग . हि लेखमाला तरी पूर्ण असावी हीच लेखक चरणी प्रार्थना .
विशाल विजय कुलकर्णी
जानेवारी 7, 2014 at 6:18 pm
वैभव, फ़क्त वर्तुळ आणि पुर्वनियोजीत या दोन कथा अपुर्ण आहेत. बाकी सर्व लेखन पुर्ण आहे. धन्यवाद.
Saurabh Shikare
नोव्हेंबर 19, 2015 at 4:04 pm
Mast