RSS

आम्ही एकशे पाच….

14 एप्रिल

लहानपणी आज्जीकडून एक गोष्ट नेहमी ऐकायला मिळायची.

कौरवांची कपटनीती आणि धर्मराजाची अतिरेकी नितीमत्ता यांचा परिणाम म्हणून कौरवांना पांडवांना द्युतात हरवण्यात यश आले. नेसुच्या वस्त्रानिशी १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास असे द्युताचे फळ पदरात पाडून घेवून पांडव द्रौपदीसह वनवासाला रवाना झाले. पांडव वनवासात आपले आयुष्य कंठत असताना एकदा शकुनीने दुर्योधनाच्या कपटी, कुत्सीत मनात त्यांची थट्टा मस्करी करण्याचे भरवले आणि मृगयेचे निमीत्त करून राजा दुर्योधन पांडव वास करून होते त्या अरण्यात आपल्या ऐशोआरामासकट सर्व परिवार सवे घेवून दाखल झाला. कर्णादी महावीर बरोबर होतेस. अरण्यात मृगया करीत असताना एका सरोवरात आपल्या स्त्रीयांसह जलविहार करीत असलेला चित्ररथ गंधर्व कौरवांच्या नजरेस पडला.झाले… कौरवांनी चित्ररथांच्या स्त्रीयांची चेष्टा-मस्करी, छेड छाड करण्यास सुरूवात केली. आपल्या सामर्थ्याची घमेंड आणि कर्णासारख्या महापराक्रमी वीराची आंधळी सोबत माणसाला कुठल्याही पातळीवर उतरवू शकते. पण क्रोधीत झालेल्या चित्ररथ गंधर्वाने कौरवांबरोबर तुंबळ युद्ध करून सर्वांना कैद केले. अगदी कर्णाचीसुद्धा त्याच्यापुढे काही मात्रा चालली नाही. जवळच वास करीत असलेल्या पांडवांपर्यंत ही बातमी पोचताच भीमार्जुनादी पांडव खुश झाले. अत्याचारी, घमंडी कौरवांबरोबर असेच व्हायला हवे असे सगळ्यांचेच मत झाले. पण धर्मराजाचा विचार काही वेगळाच होता.

“एक लक्षात ठेवा बंधुनो, आपापसात भलेही आपले कितीही वाद असोत, ते आपण आपल्या पातळीवर लढत राहून, सोडवत राहू. पण गोष्ट जेव्हा बाहेरील शत्रुशी लढण्याची असेल तेव्हा एक लक्षात ठेवा कसेही असले तरी कौरव आपले चुलत बंधूच आहेत. आपापसात लढताना जरी आपण १०० कौरव आणि ५ पांडव असलो तरी बाह्य शत्रुशी लढताना आपण नेहमीच १०५ आहोत.”

आणि नंतर मग भीमा आणि अर्जुन दोघांनीच आपल्या पराक्रमाच्या जोरावर चित्ररथ गंधर्वाचा पराभव करून त्याच्या तावडीतून कर्णासहीत कौरवांची मुक्तता केली. लज्जीत कौरव परत हस्तिनापूराला परतले.

धर्माने त्यावेळी घालून दिलेला हा आदर्श आपण आजही पाळतोच आहोत. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात कितीही वाद असले तरी बाह्य आक्रमणांशी लढताना मग ती मानवनिर्मीत असुद्यात किंवा निसर्ग निर्मीत आपण नेहमी एकत्र येवुन अगदी १०५ होवून त्या संकटाचा सामना करतो. मग ते देशाच्या वेगवेगळ्या भागात झालेली भुकंप किंवा त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती असो किंवा २६/११ चा मानवनिर्मीत दहशतवादी हल्ला असो. अशा बाह्य आक्रमणाचा सामना करताना आपण नेहमीच १०० आणि ५ असे नसून १०५ असतो आणि हिच गोष्ट आज इतक्या परकीय तसेच नैसर्गिक आपत्ती येवुनही आजही आपण टिकून आहोत याचे कारण आहे. हुश्श्श….

नमनालाच घडाभर तेल झाले ना…! असंच होतं माझं. लिहायला बसलो की वाहवत जातो आणि आजच्या लेखाचा विषय तर भलताच जिव्हाळ्याचा आहे. तर प्रश्न आहे १०० आणि ५ चा ! आपले सख्खे शेजारी आणि आपण नेहमीच एकमेकासाठी आलटून पालटून कौरव-पांडवाची भुमीका करत असतो. अर्थातच मी बोलतोय मुंबईकर आणि पुणेकर या परंपरागत वाद्-संवादाबद्दल. कौरव्-पांडवांचा वाद त्यांच्या पिढीपाशीच संपून गेला. पण आपण मात्र गेल्या कित्येक पिढ्या मुंबईकर्-पुणेकर हा वाद अभिमानाने जपत आलोय. हो अभिमानानेच….

आपल्यासाठी मुंबईकर असणे जेवढे महत्त्वाचे, अभिमानाचे आहे तेवढेच पुणेकरांसाठी पुणेकर असणे आणि जेवढा आकस पुणेकरांना मुंबईकरांबद्दल असतो तेवढाच मुंबईकरांना पुणेकरांबद्दल.

“अरे पुण्याला केवढा मोठा सांस्कृतिक का काय म्हणतात तो इतिहास आहे. संस्कृती आहे. उगीच नाही पुण्याला विद्यानगरी म्हणत. त्याऊलट मुंबईला स्वतंचे असे काय आहे? देशभराच्या कानाकोपर्‍यातून एकत्र आलेल्या नाना लोकांच्या हजार भेसळींनी बनलेलं गाव ते त्याला कसली आलीय संस्कृती?” (सच्चा पुणेकर कधीही मुंबईला किंवा अन्य कुठल्याही शहराला शहर, सिटी म्हणत नाही. त्याच्या दृष्टीने पुणे हे एकमेव शहर बाकी आपली सगळी गावं. (including London, Parice गेलाबाजार Newyork सुद्धा) हे पुणेकरांचे मुंबईबद्दलचे ज्वलंत मत आणि पुण्याबद्दलचा जाज्वल्य अभिमान !

तर “साला पुणे तिथे सगळेच उणे!  दारात उभे राहीलेल्याला पाणी द्यायच्या आधी गेटवरची पाटी दाखवतील “beware of Dogs” वाली.  सालं, आठवड्यातून एकदा चितळ्यांची बाखरवडी नाहीतर श्रीखंड खायचं ही यांची सुबत्तेची व्याख्या ! काय चाटायचीय त्या संस्कृतीला ! इथे बघा, प्रत्येकाला रोजी रोटी मिळते, आमची मुंबई सगळ्यांना सामावून घेते, पोटाला अन्न देते. मग ते बिहारी असोत वा बांग्लादेशी. उगाच नाही देशाची आर्थिक राजधानी म्हणतात मुंबईला.

एकंदरीत काय तर पुणे-मुंबईकरांच्या अभिमानाला आणि एकमेकाच्या तंगड्या खेचायला कुठलेही कारण चालू शकते. या सगळ्या पाल्हाळाचे कारण म्हणजे परवा पुणे वॉरीयर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मॅचच्या वेळी आलेला वेगळा अनुभव. खरेतर मॅच होती पंजाब आणि पुणे या संघामध्ये. गंमत म्हणजे पंजाब संघाचा कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट एक ऑस्ट्रेलियन आणि पुण्याचा कर्णधार युवी एक अस्सल पंजाबी ! बीसीसीआय वाले ग्रेट, खेळाडु ग्रेट आणि एक ऑस्ट्रेलियन आणि एक पंजाबी यांच्यातल्या युद्धाला डोक्यावर घेणारे पुणे-मुंबईकर त्याहूनी ग्रेट. या मॅचला पुण्याहून आलेलं पब्लिक तर होतंच विशेष म्हणजे पुणेकरांबरोबर मुंबईकरही पुणे वारियर्सना सपोर्ट करायला तेवढ्याच प्रचंड संख्येने उपस्थित होते. हिच परिस्थीती मुंबई इंडीयन्सच्या सामन्याच्या वेळीही असते. पुणे किंवा मुंबई संघाची कुठलीही मॅच इतर कुठल्याही संघाशी असो आमचा पाठींबा आपल्या शेजारी संघाला नक्की असणार? पण पुणे आणि मुंबई जेव्हा परस्परांना भिडतील तेव्हा…

परवाच्या पुणे-पंजाब मॅचनंतर, मॅच बघायला मालाड कि बोरीवलीहून आलेल्या एका क्रिकेटच्या चाहत्याने सांगितले की इतर कुठल्याही संघाबरोबर पुण्याची मॅच असू दे आमचा पुर्ण पाठींबा पुणे वॉरीयर्सना असेल. पण मुंबईबरोबरच्या सामन्यात मात्र आपली-तुपली खुन्नस !

माझी मनापासून इच्छा आहे की फायनल मुंबई इंडीयन्स आणि पुणे वॉरीयर्स या दोन संघामध्येच व्हावी. मग पुणेकर आणि मुंबईकर १०५ व्हायचे की १०० आणि ५ व्हायचे ते त्यांचे ते ठरवोत. पण माझ्यासारख्या प्रत्येक ‘विदुराला’ विजय आपलाच झाल्याचा आनंद नक्कीच अनुभवता येइल.

विशाल…

 

11 responses to “आम्ही एकशे पाच….

 1. मंदार जोशी

  एप्रिल 14, 2011 at 2:41 pm

  >>माझी मनापासून इच्छा आहे की फायनल मुंबई इंडीयन्स आणि पुणे वॉरीयर्स या दोन संघामध्येच व्हावी.

  अगदी, अगदी. माझी ही हीच इच्छा आहे 🙂

   
 2. विशाल कुलकर्णी

  एप्रिल 14, 2011 at 2:44 pm

  तथास्तु 🙂

   
 3. Nagesh Deshapande

  एप्रिल 14, 2011 at 6:33 pm

  “जबरदस्त…”

  या एकाच शब्दात माझी प्रतिक्रिया. दुसरे काही असुच शकत नाही सुंदर लिहले आहेस.

  या लेखातील छोटा भाग माझ्या फेसबुक लावतो आहे.

  धन्यवाद.

   
 4. bolmj

  एप्रिल 15, 2011 at 4:14 pm

  मस्त लेख !!
  मला पुणे –मुंबई –पुणे फिल्म ची आठवण आली

   
 5. Priya Kulkarni

  एप्रिल 15, 2011 at 5:17 pm

  इतर कुठल्याही संघाबरोबर पुण्याची मॅच असू दे आमचा पुर्ण पाठींबा पुणे वॉरीयर्सना असेल. पण मुंबईबरोबरच्या सामन्यात मात्र आपली-तुपली खुन्नस !

  me too.. me too…

  —Priya.

   
 6. वैभव टेकाम

  मे 9, 2011 at 1:13 pm

  खरंच विशाल…तसाही मी सुद्धा ६ वर्षे पुण्यात काढली, तिथल्या हवेशी प्रेम आहेच त्यामुळे…पण जेव्हा गोष्ट म्याच ची येते…आपला पाठींबा मुंबईलाच…आणि तोही त्या एका माणसाखातीर!

   
 7. nandan1herlekar

  जून 1, 2011 at 11:00 सकाळी

  http://nandan1herlekar.wordpress.com/2011/05/31/indireche-arials-2/#comments
  Please see this link. It is about our Marathi programme Indireche Arials. produced and directed by Swati Kulkarni, music by Nandan Herlekar, background music scored by Shantanu Herlekar. A programme full of songs, dances, recitations and depictions. Must see!

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: