RSS

“ब्राव्हो, ये हुयी ना कुछ बात! “

23 डिसेंबर

“ओ हिरो, बसमध्ये बसतानाच खिश्यात बघायचं सुटे आहेत का नाही ते. सालं इथे काय टांकसाळ आहे काय आमच्याकडे नाण्यांची? कुणाकुणाला म्हणुन सुट्टे द्यायचे?”

परवा वाशीवरून बेलापूरला जाताना तिकीटासाठी मी पुढे केलेल्या पन्नासच्या नोटेवर कंडक्टरची हि प्रतिक्रिया होती. काही प्रमाणात मला त्यांचे म्हणणे पटले. पण माझ्याकडे सुट्टे अजिबातच नव्हते. मी हि गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणुन दिली.

“मग बसलात कशाला बसमध्ये?” त्याची उर्मट प्रतिक्रिया. मी काही बोलणार इतक्यात माझ्या मागच्या सीटवर बसलेले एक आजोबा मध्येच बोलले….

“कंडक्टर, आधी आपली भाषा सुधारा. ते सरळपणे उत्तरे देताहेत म्हणुन उगाचच मुजोरी करु नका. सुट्टे का नसतात तुम्हा लोकांकडे ते माहीत आहे आम्हाला. वाशी डेपोपाशी असलेल्या त्या छोट्या हॉटेलात ९० रुपयांच्या चिल्लरसाठी शंभराची नोट मिळते. हे आता सगळ्यांना कळुन चुकलेय. उगीच कांगावा करु नका. बस सरकारची आहे , जनतेच्या सेवेसाठी आणि सोयीसाठी आहे. आम्ही बसमधुन प्रवास करतो म्हणुन तुम्हाला तुमचे पगार मिळतात. समजले?”

यानंतर बरेच काही झाले आणि नंतर त्या कंडक्टरने मला पन्नासच्या नोटेवरच तिकीटही दिले आणि उरलेली चिल्लरही परत दिली. प्रश्न चिल्लरचा नाही किंवा कंडक्टरच्या प्रामाणिकपणाचाही नाही. चिल्लरची समस्या सगळीकडेच असते. पण त्यावरुन हे कंडक्टर्स ज्यापद्धतीने प्रवाशांशी वागतात ते खरोखर निंदनीयच आहे. केवळ चिल्लरच नव्हे तर अनेक गोष्टी असतात ज्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. पण हे ड्रायव्हर – कंडक्टर पडले सरकारी नोकर. त्यामुळे बस जणु काही आपल्या खाजगी मालकीची आहे या पद्धतीनेच ते वागत असतात.

अर्थात नेहमी चुक त्यांचीच असते असेही नाही. परवाचीच घटना. मुरबाड रोडवर एका बसचा धक्का लागुन एक बैलगाडीचालक किरकोळ जखमी झाला, तर गावकर्‍यांनी त्या बस चालकाला एवढी बेदम मारहाण केली की त्याला डोक्याला २१ टाके घालावे लागले. झाले त्याने चिडलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारले. एक तर चुकून लागलेला धक्का, त्यावरुन बेदम मारहाण. आता मारहाण करणारे काही ठराविक समाजकंटक असतात, पण त्याची शिक्षा मात्र सगळ्याच प्रवाशांना भोगावी लागली ना.
मटातली मुळ बातमी: http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7142503.cms

अर्थात या अशा घटना अपवादात्मकच. बहुतेक वेळा बस वाहक – चालकांच्या मुजोरीचीच उदाहरणे ऐकायला, पाहायला मिळतात. दुर्दैव असे आहे की त्यांच्या विरोधात केल्या गेलेल्या तक्रांरींची दखल ते तर सोडाच पण आपली यंत्रणाही घ्यायला तयार नसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक शक्यतो त्यांची तक्रार करायला जात नाही. त्यासाठी आपला थोडादेखील वेळ वाया घालवण्याची कुणाचीच तयारी नसते. त्यामुळे दिवसेंदिवस हे बस चालक्-वाहक जास्तच सोकावत चालले आहेत.

या पार्श्वभुमीवर विरार (पुर्व) येथील काही बच्चे कंपनीने दाखवलेले धैर्य आणि त्यांनी मुजोर, मगरुर बस चालकांच्या, एस. टी. खात्याच्या विरोधात दिलेला लढा खरोखर अनुकरणीय आहे.

“एसटी बसमधून प्रवास करताना अनेक ड्रायव्हर-कंडक्टर वाईट वागतात… सकाळी बस येतच नाही… आम्हाला धक्का मारून बाहेर काढतात… एक-दोन ड्रायव्हर बस चालवताना मोबाइलवर बोलतात… अशा अनेक तक्रारींचा पाढा विरार पूर्वेकडील काही विद्यार्थ्यांनी बुधवारी महापौरांसमोर पुन्हा एकदा वाचला. काही दिवसांपूवीर्च विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी थेट महापौरांकडे जाऊन केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रवासादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याने वैतागलेल्या २० ते २५ लहानग्यांनी बुधवारी दुपारी महापौरांचे कार्यालय गाठले. ‘हे विद्यार्थी तुमच्या मुलांसारखे आहेत. त्यांना त्रास देताना जरा तरी लाज वाटायला हवी’, असे संतप्त महापौरांनी एसटीच्या वाहतूक नियंत्रकाला बजावले.

विरार पूवेर्कडील गडगापाडा, चांदीप, साईनाथ नगर अशा भागांतून अनेक मुले पश्चिमेला उत्कर्ष विद्यालयात शिकण्यासाठी येतात. एसटी बसचा सवलतीमध्ये पास मिळत असल्याने विद्यार्थी बसचा प्रवास करतात. मात्र, सकाळी सातच्या आधी व शाळा सुटल्यानंतर दुपारी सवाबाराच्या सुमारास वेळेवर बस मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. बस प्रवासात अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना रिक्षेतून जादा भाडे देऊन प्रवास करावा लागतो किंवा चालत यावे लागते. विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूवीर् महापौरांची भेट घेऊन त्यांना या समस्यात लक्ष घालण्यास सांगितले होते. यानंतर तीन-चार दिवस एसटी कर्मचार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर ‘तुम्हाला फोटो काढायची हौस आहे ना…’ असे म्हणून एसटीचे काही कर्मचारी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करायला सुरूवात केली. पुन्हा आपले ये रे माझ्या मागल्या सुरु झाले.

यामुळे वैतागलेल्या त्याच काही विद्यार्थी-विद्याथिर्नींनी महापौर राजीव पाटील यांचे एसटी बस स्थानकाजवळच असलेले कार्यालय गाठले. महापौरांनी बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकाला कार्यालयात बोलावून त्यांचा समाचार घेतला. ‘विद्यार्थ्यांना यापुढे त्रास दिलात तर तुमची अजिबात गय करणार नाही. या मुलांना त्रास देताना तुम्हाला लाज वाटत नाही काय’, असा सवाल करून यापुढे विद्यार्थ्यांकडून तक्रार आली तर एसटीच्या या कर्मचाऱ्यांना अद्दल घडवू, असा सज्जड दम महापौर व बविआचे नेते उमेश नाईक यांनी दिला. या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रकासमोरच आपली गार्‍हाणी सांगितली.

त्यानंतर अर्नाळा एसटीच्या डेपो मॅनेजरांना महापौरांनी फोन लाऊन आपल्या कार्यालयात विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिकिटाचे पैसे परत मिळत नाहीत, काही जण शिव्या देतात, स्टॉपवर बस थांबवत नाहीत, शहर बस तसेच लांब पल्ल्याच्या बसमध्ये आम्हाला प्रवेश मिळत नाही… अशा अनेक तक्रारी लहान मुलांनी केल्या. यापुढे त्रास देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची नावे व एसटी नंबर लिहून ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
हि बातमी कालच्या मटात वाचली, बराचसा मजकुर तिथून तसाच कॉपी – पेस्ट केला आहे. या प्रश्नाला प्रथम मटानेच उचलुन धरले होते. मटाचे त्याबद्दल आभार आणि अभिनंदन.
मटामधील मुळ बातमी : http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7148527.cms

त्याहीपेक्षा कौतुक वाटते ते त्या चिमुरड्यांचे, ज्यांनी सरळ महापौरापर्यंत जाण्याची हिंमत दाखवली. त्या छोट्या वीरांपासुन प्रेरणा घेऊन आपणही त्यांचे अनुकरण करायला. जिथे अन्याय होताना दिसतोय मग तो रिक्षाचालकांचा असो, बस चालक्-वाहकांचा असो वा अन्य कुठलाही असो, आवाज उठवायलाच हवा.

त्या छोट्या वीरांचे त्यांच्या धाडसासाठी मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !

असं काही वाचायला, ऐकायला मिळालं की मुखातून एकच वाक्य बाहेर पडते…

“ब्राव्हो, ये हुयी ना कुछ बात! ”

विशाल कुलकर्णी

 

4 responses to ““ब्राव्हो, ये हुयी ना कुछ बात! “

 1. सचिन

  डिसेंबर 23, 2010 at 8:32 pm

  ब्राव्हो….

  खरचं कौतुक वाटते त्या चिमुरड्यांचे.

   
 2. देवेंद्र चुरी

  डिसेंबर 24, 2010 at 1:07 सकाळी

  “ब्राव्हो, ये हुयी ना कुछ बात! “……

   
 3. महेंद्र

  डिसेंबर 24, 2010 at 9:14 सकाळी

  ग्रेट जॉब..कौतूक वाटतं…

   
 4. महेंद्र

  डिसेंबर 24, 2010 at 9:16 सकाळी

  प्रश्न एकच आहे, त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे स्पष्ट केले नाही.
  त्या ऐवजी एखाद्या जबाबदार व्यक्तीला तिथे बसवून ठेवणे जास्त योग्य झाले असते, मुलांवर जबाबदारी टाकणे, की त्यांनी नावे कळवावी हे काही पटत नाही. आपले काम दुसऱ्यावर ढकलणे बरोबर नाही. कंडक्टर बरोबर वागत नसेल तर बेस्ट ज्याप्रमाणे एखाद्या स्टॉप वर मार्शल उभे करतात, तसे करता येईल

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: