RSS

मला विठोबा भेटला होता….!

29 नोव्हेंबर

‘गाता गाता मज मरण यावं। माझं गाणं मरणानंही ऐकावं’

केवढी दुर्दम्य इच्छा शक्ती असेल या माणसाकडे. आपली इच्छा पुर्ण करायला त्याने मृत्युलाही भाग पाडलं. साक्षात त्यालाही नमवलं. कोळीगीते असोत, तुकोबाचे अभंग असोत वा जांभुळाख्यानासारखी दुर्लक्षीत लोककथा असो, हे सगळेच लोक कला साहित्य अतिशय सराईतपणे हाताळत ‘बाबा’ कुठल्याक्षणी आपल्या काळजाचा ठाव घेत हे लक्षातच येत नसे.

baba

परवा नागपुरात त्यांचे आराध्यदैवत अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करीतच हजारो रसिकांच्या साक्षीने ‘बाबां’नी आपले या पृथ्वीतलावरील कार्य संपवले आणि त्या भक्तजनवत्सलु अशा विठ्ठलाचाच जणु अंश असलेला हा विठ्ठल परत आपल्या विठ्ठलात सामावून गेला.

गेल्या काही दिवसात ‘बाबां’बद्दल अनेक वृत्तपत्रांनी बरेच काही लिहीले आहे. त्यामुळे मी त्याची पुनरावृत्ती न करता मला आलेला ‘बाबांचा’ अनुभव मांडतोय. माझ्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा असा थोडा थोडका नव्हे तर एक पुर्ण ‘अर्धातास’ मी बाबांच्या सहवासात घालवलाय. जो आयुष्यभर माझ्या समवेत राहणार आहे.

१९९८ साली पुण्यातल्या कुठल्यातरी एका कार्यक्रमात बाबांची भेट झाली होती. तो कार्यक्रम तसा फार मोठा वगैरे नव्हता, पण त्या कार्यक्रमाने बाबांचे मोठेपण पहिल्यांदा अनुभवायला मिळाले. कुठ्ल्यातरी छोट्याशा संस्थेने घेतलेल्या एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमात बाबांना प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावण्यात आले होते. मी ही असाच उपटसुंभासारखा पोहोचलो होतो. संचालकापैकी कुणाचातरी वशिला लावुन मी काव्यवाचनात माझाही लंबर लावुन घेतला होता. त्यावेळी नुकताच लिहायला लागलो होतो. कविता हे व्यक्त होण्याचे एक साधन आहे एवढेच माहीत होते. कवितेचे, काव्य लेखनाचेही काही नियम असतात हे त्यावेळी माहीतच नव्हते. सुचेल ते खरडायचे एवढेच माहीत. त्या कार्यक्रमात मी माझी ‘आक्रंदन’ हि कविता वाचुन दाखवली होती. फक्त वाचुनच … !

त्यावेळी माझ्या मते ती कविता खुपच सॉलीड होती. (आता माझे मत बदललेय)

माझं जळणं, त्याचं जाळणं,
कधी थांबलंच नाही,
जेंव्हा कळालं तेंव्हा जाणवलं,
राख गोळा करायलाहीं..
शिल्लक कोणी उरलं नाही.
करपलेल्या जाणिवांचं,
मुक आक्रंदन..
कसं कोण जाणे
कोणी ऐकलंच नाही.
ते घाबरतात,
माझ्या जवळ यायला…
स्वतःच्याच प्रेतावर टोची मारणार्‍या,
माझ्यासारख्या निशाचराला…
जवळ करायला…
कसं सांगु.., कसं समजावु….
त्यांच्या परक्या चोचींपेक्षा,
माझी स्वतःची चोंच
कितीतरी..
सुसह्य आहे !

कविता वाचन हा काही वेगळा प्रकार असतो हे ज्ञातच नव्हते. मी आपली सरसकट धडा वाचावा तशी कविता वाचून दाखवली. आता कळतेय, तशीही ती कविता वाचावीच लागणार होती कारण तीच्यामध्ये गेयता नावाचा काहीच प्रकार नव्हता. लोकांनी (बहुदा सौजन्य म्हणुन किंवा फारतर किव आली असेल म्हणुन) पण टाळ्या वाजवल्या. मी खुशीत येवुन आनंदाने बाबांच्या पाया पडलो. बाबांनी हळुच सांगितलं,

“पोग्राम संपल्यानंतर भेट लेकरा!”

तो कार्यक्रम संपल्यानंतर साधारण अर्धातास मी बाबांबरोबर बोलत होतो. ‘बाबा’ कवितेबद्दल, माझ्याच नाही एकंदरच कविता या साहित्यप्रकाराबद्दल बोलत होते आणि माझ्या मनावरची जळमटं दुर होत होती. खरेतर मी कोण कुठला? एक अनाहुतपणे कार्यक्रमात घुसलेला अनपेक्षीत घुसखोर. पण बाबांनी जवळ घेवुन माझ्याबद्दल, माझ्या लेखनाबद्दल सर्व माहिती विचारुन घेतली. मी सोलापूरचा आहे हे समजल्यावर आमच्या श्री. दत्ता हलसगीकर सरांबद्दल आवर्जुन विचारलं, त्यांना नमस्कार सांगितला. त्यांच्याशी बोलताना हा काळा, धिप्पाड , एखाद्या पैलवानासारखा दिसणारा माणुस , त्याच्याजवळ कितीतरी मोठा ज्ञानाचा खजिना बाळगुन आहे हे जाणवत होते.

माझ्या कवितेच्या बाबतीत मला दोन दिग्गजांचं मार्गदर्शन लाभलं….! सोलापूरला ‘सेवा सदन प्रशालेत’ एकदा कै. शांता शेळके यांनी माझ्या मुक्तछंदातल्या कविता वाचुन ‘कविता आणि गेयता’ यांचं खुप छान विश्लेषण केलं होतं, समजावलं होतं. (सेवा सदन ही कन्या प्रशाला आहे, त्या शाळेतल्या एका शिक्षिका माझ्या कवितालेखनाबद्दल जाणुन होत्या, म्हणुन त्यांनी माझ्या काही कविता कै. शांताताईंपर्यंत पोचवण्याची व्यवस्था केली होती. नंतर मग कै. शांताताईंनी त्यांच्याकरवी मला बोलवून घेतलं आणि बरच काही समजावुन सांगितलं). आणि दुसरे म्हणजे बाबा उर्फ लोकरंगनायक, लोकशाहीर विठ्ठल उमप यांची ती भेट. त्यानंतर अजुनही माझ्या कवितेत फारसा फरक नाही पडलेला हि गोष्ट अलाहिदा. असो, आजही शिकतोच आहे. पण त्या दोन भेटींनी माझी कविता या साहित्यप्रकाराकडे बघण्याची दृष्टीच बदलुन टाकली. तोपर्यंत कविता करणारा मी कविता अनुभवायला शिकलो. मग हळु हळु कविता सुचायला लागल्या, रचणं कमी होत गेलं.

काल “बाबांच्या” अकाली (हो मी त्याला अकालीच म्हणेन, कारण बाबांसारखा कलावंत पुन्हा होणे नाही) एक्झीटनंतर या माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंगाची आठवण झाली. बाबांबद्दल बहुतेक वृत्तपत्रांनी खुप काही लिहीलेय, छापलेय त्यामुळे पुन्हा तेच लिहुन पुनरावृत्तीची चुक नाही करणार मी.

‘बाबा’ तुम्ही फक्त देह सोडलाय. पण तुमचं अस्तित्व, तुमची गाणी, तुम्ही सहजसुंदरपणे सादर केलेले वासुदेव, पोतराज, धनगरी नृत्यापासून ते भारुड, गोंधळ, जागरण असे अनेकानेक लोककलाप्रकार ते अभंग, कोळीगीते असे लोककलाप्रकार कायम आमच्या मनात जिवंत राहतील. अंगावरचा तो शेहेचाळीस वारी अंगरखा सावरीत त्याचा कुठेही अडथळा न होवु देता तुम्ही सादर केलेली द्रौपदी आम्ही कसे विसरणार आहोत?

मला खात्री आहे बाबा तुम्ही आहात इथेच, आम्हा रसिकांना सोडुन तुम्ही जावुच शकत नाही! त्यावेळी कळलंच नव्हतं, पण आता जाणवतय मला तो ‘विठोबाच’ भेटला होता.

विशाल.

 

11 responses to “मला विठोबा भेटला होता….!

 1. sahajach

  नोव्हेंबर 29, 2010 at 6:09 pm

  विशाल खरयं तुझं तूला विठोबा भेटला होता….

  पोस्ट अप्रतिम….

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 29, 2010 at 8:30 pm

   गीत, संगीत, कविता, पदे, भारुडे, अभिनय कुठलेही असे क्षेत्र नाही ज्यात बाबांना गती नव्हती. खर्‍या अर्थाने अष्टपैलु व्यक्तिमत्व होते बाबा म्हणजे.

    
 2. सचिन

  नोव्हेंबर 29, 2010 at 6:20 pm

  अरे भाग्य लागत अशा मोठ्या लोकांच मार्गदर्शन मिळायला.

  भावपूर्ण श्रद्धांजली……

   
 3. विद्याधर

  नोव्हेंबर 29, 2010 at 7:42 pm

  विशालदादा…
  नशीबवान आहेस तू!!! खरंच!!
  बाबांना माझा प्रणाम!

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 29, 2010 at 8:26 pm

   खरोखर, बाबांना भेटणे हा अनुभव खुप काही शिकवणारा, सगळा दृष्टीकोनच बदलुन टाकणारा होता. आता बाबा नाहीत ही कल्पनाच पटत नाहीये. 😦

    
 4. देवेंद्र चुरी

  नोव्हेंबर 30, 2010 at 9:37 सकाळी

  भाग्यवान आहेस रे..
  खरच विठोबाच भेटले होते रे तुला….

   
 5. nandan1herlekar

  डिसेंबर 6, 2010 at 9:44 pm

  खूप छान लेख आहे. उमप हे फार मोठे होते. आपले जीवितकार्य करत असतानाच त्यांना मृत्यू यावा हा फार दुर्लभ योग या विभूतीला लाभला. धन्य ते जीवन!

   
  • विशाल कुलकर्णी

   डिसेंबर 7, 2010 at 4:35 pm

   धन्यवाद नंदनजी 🙂

    
   • nandan1herlekar

    डिसेंबर 11, 2010 at 1:55 pm

    nandanji.blogspot.com वर चा माझा लेख वाचला का? आपल्या प्रतिक्रिया हव्या आहेत

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: