RSS

मी परत येइन ….

15 नोव्हेंबर

तांदळ्याला जाणारी एस.टी. तडवळे फाट्यावर थांबली. ड्रायव्हरने सीटखाली ठेवलेली डाकेची पिशवी उचलुन फाट्यावर उभ्या असलेल्या दिरगुळे मास्तरांच्या हवाली केली. मास्तरांनी हातावर मळलेली तंबाखु थोडी दाढेखाली दाबली, उरलेली ड्रायव्हरच्या हातावर टेकवली.

“कसं काय मास्तर, बरं हाय ना?”

“होय की, सगळं ठिक आहे सखारामदादा.”

मास्तरांनी डाक आपल्या ताब्यात घेतली आणि हसुन उत्तर दिले. हा त्यांचा रोजचा संवाद होता. हिच दोन वाक्ये ते गेली कित्येक वर्षे उच्चारत आले होते. ड्रायव्हर बदलत राहायचे, पण दिरगुळे मास्तर मात्र तसेच होते, तेच होते. तालुक्याच्या गावाहुन निघून तांदळ्यामार्गे पुढच्या तालुक्याकडे जाणारी आणि तडवळ्याच्या फाट्यावर थांबणारी ती एकमेव एस. टी. होती. सकाळी आठ वाजताची तिची वेळ होती. पण कधी तिला आठ वाजता तिथे आलेलं कुणी पाहीलं नव्हतं. साडेआठ तरी वाजायचे. दिवसातून तेवढी एकच एस.टी. फाट्यावर थांबायची. संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान परत तीच गाडी परत तिथे क्षणभर थांबुन परत तालुक्याला जात असे. खरेतर फाट्यापासुनही तडवळं किमान आठ किलोमीटर अंतरावर होतं. पण पक्की सडकच नसल्याने एस.टी. आत येवुच शकत नसे. मग फाट्यापासुन गावापर्यंत ११ नंबरची बस. दुसरा पर्यायच नव्हता. आता तुमचं नशीबच जोरावर असेल तर गावातली तालुक्याच्या गावाला गेलेली एखादी बैलगाडी तुम्हाला मिळून जाईल. नाहीतर एखादा सायकलवाला डबलसीट घेवुन जायला तयार झाला तरच पायपीट वाचायची. नाहीतर आहेच आपलं कदम कदम बढाये जा……

तडवळं तसं अगदीच छोटं गाव. इनमिन तीन्-चारशे वस्ती. गावात नुकतीच लाईट आलेली होती. चौथीपर्यंतची एक प्राथमिक शाळा होती नाही म्हणायला. शाळेत दररोज सकाळचा पेपर यायचा तेवढाच काय तो बाहेरच्या जगाशी संपर्क. अन्यथा कोणी आलं गेलं तालुक्याच्या गावाला तरच. दवाखाना वगैरे तर सोडूनच द्या. नाही म्हणायला तालुक्याच्या ठिकाणी थोडंफार शिक्षण घेतलेली एकुलती एक “अनुसुया सिस्टर” होती गावात. गावातली एकमेव डॉक्टर (?) हो …डॉक्टरच! म्हणतात ना वासरात लंगडी गाय …….! गावकरी पोराची चौथी झाली कि एक तर त्याला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला पाठवायचे नाहीतर आहेच आपली एकर-दोन एकर शेती. बाहेर शिकायला जाणारी पोरं फाट्यापर्यंत चालतच यायची. त्यातल्या त्यात ज्यांची परिस्थिती जरा बरी आहे त्या शेतकर्‍यांनी सायकल घेवुन दिली होती आपल्या पोराला. त्यातलाच कुणी भेटला तर तुमचं नशीब. गावात एकुलते एक दिरगुळे मास्तर, तेच शिक्षक, तेच पोस्टमन. कारण त्यांच्याकडे घरी पोस्टाची पेटी होती. दररोज सकाळी उठलं की सायकल उचलायची आणि तडवळे फाटा गाठायचा. एस्.टी. नं काही डाक आली असेल तर घ्यायची, घरी यायचं. जेवण करुन शाळेत पळायचं. काही बाहेर जाणारी डाक असेल तर संध्याकाळची गाडी गाठण्यासाठी परत धडपड करावी लागे. अर्थात पत्रं वाटण्यासाठी मास्तर कुठं जात नसत. लोकच शाळेत येवुन विचारुन जायचे. शाळा म्हणजे सुद्धा एक विनोदच होता. शाळा म्हणजे काय तर एक पत्र्याची शेड होती. पहिली ते चौथी …. सगळे मिळुन ५०-५५ विद्यार्थी. ते ही सगळे त्या एकाच वर्गात बसायचे. मास्तरही एकच…. दिरगुळे मास्तर ! पण रोज सकाळी उठुन साडे आठची एस. टी. गाठुन काही डाक आलेली असली तर ती घेवुन येणे एवढे एक काम सोडले तर बाकी दिवसभर आराम असायचा. त्यामुळे दिरगुळे मास्तर टुकीनं राहत होते. गावातच त्यांनी चार एकर जमीन घेवून ठेवली होती. सकाळी पोरांना काहीतरी अभ्यास नेमुन दिला की मास्तर शाळेपासुन फर्लांगभर अंतरावर असलेल्या आपल्या शेतीकडे ल़क्ष द्यायला मोकळे.

तडवळं तसं एकाच रस्त्याभोवती उभं असलेलं छोटंसं गाव. गाव कसलं वस्तीच होती म्हणा ना ती छोटीशी. वेशीपाशीच एक पाच बाय पाचचं लहानसंच मारुतीरायाचं मंदीर होतं. तिथंच छोटीशी चावडी. चावडीला लागुन असलेली चार रहाटाची विहीर हा गावातला एकुलता एक पाणवठा. नाही म्हणायला गावापासुन अर्ध्या मैलावर एक ओढा वाहायचा. गावातल्या बाया बापड्या दुपारच्याला जेवणं आटपली की धुणी धुवायला ओढ्यावर जायच्या. गावात बहुतांशी सगळी कुळवाड्याचीच घरं. एक दोन मराठा घरे आणि मारुतीचे पुजारी म्हणजे श्रीराम गुरुजींचं एक ब्राह्मणाचं घर तेवढं होतं. पण त्यांची पत्नी वारल्यापासुन त्यांनी बिछाना धरलेला होता. त्यामुळे गेली कित्येक वर्षे मारुतीराया एकटाच होता. अधुन मधुन शेजारच्या वस्तीवरला गुरव येवुन पुजा करुन जायचा तेवढेच. श्रीराम पुजारी गेल्या कित्येक वर्षात मारुतीच्या देवळासमोरही आलेले नव्हते.

इथुन तिथुन सगळी बसकी घरं. नाही म्हणायला रावताचा पडका वाडा होता. वाडा म्हणजे काय तर नुसतच पडकं बळद शिल्लक होतं. अर्थात आजच्या जगाला मान्य नसलं तरी गावात म्हारवडाही होती आणि गावाच्या बाहेरच होता. अजुनही त्यांचा वेगळाच प्रपंच होता. वेशीपाशी असलेलं तुका न्हाव्याचं घर आणि त्याला लागुन असलेलं सदोबा परटाचं ‘हॉटेल फायस्टार’ ही गावातल्या रिकामटेकड्याची परवलीची ठिकाणं होती. सदोबाच्या फायस्टार मध्ये चहा-भजी, बिस्किटे मिळायची. कधी कधी आठवड्याचे सुरवातीचे तीन चार दिवस उसळ पाव पण मिळायचा. पण बस्स तेवढेच. गावातली माणसंही शांत स्वभावाची होती. म्हारवडा वेगळा असला तरी वाद नव्हते. दिरगुळे मास्तरांच्या प्रयत्नाने हळुहळु म्हारवड्याचा शेवट व्हायला लागला होता. तिथली माणसं गावात मिसळायला लागली होती. तडवळ्यानेही त्यांना आपले मानले होते. एकंदरीत काय तर तडवळं अतिशय शांत पणे आपलं स्थीर आणि निवांत आयुष्य जगत होतं. सारं कसं आलबेल होतं.

प्रत्येक गावात काहीतरी दंतकथा असावीच लागते. तडवळ्यालाही होती. आबा देसाईंचा पडका वाडा…..! गावापासुन फर्लांगभर अंतरावर असलेल्या देसायांच्या पडक्या वाड्याबद्दल अनेक प्रवाद होते. कुणाला तिथं केस मोकळे सोडलेली , हिरवी साडी नेसलेली बाई दिसली होती. तर कुणाला वाड्यातल्या माजघरात तुळईला लटकलेल्या एका बाबाचा मृतदेह दिसला होता. पण शेवटी त्या अफवाच होत्या. असं काही खरोखर तिथे आहे, किंवा मी पाहीलय हे छातीठोकपणे सांगणारं कुणीच नव्हतं. एक गोष्ट नक्की की देसायांच्या वाड्याचा विषय निघाला की आपोआप आवाज दबले जायचे. गेली कित्येक वर्षं वाडा रिकामाच होता. पण वाड्यावर फिरकायची कुणाची छाती नव्हती. काहीशे वर्षापुर्वी वाड्यातल्या देसायांच्या घराण्याचा निर्वंश झाला होता. सुबेदार देसाईंची बायको आक्कासाहेब आणि सुबेदार स्वतः अतिशय गुढपणे मरण पावले होते. पण एवढं सोडलं तर तडवळ्याला वाड्याचा काही त्रास नव्हता. वाडा गावापासुन जवळपास तुटलाच होता. तिथे कायम एक भीषण शांतता पसरलेली असे. वाड्याची आवारातली आता कोरडी पडलेली विहीर आणि परसातला सुकलेला वड यामुळे वाड्याला एकप्रकारची भीषणता लाभली होती. गावातला कुणीही चुकूनही तिकडे फिरकत नसे. पण हि शांतता फसवी होती. हा निवांतपणा वरवरचा होता. गेल्या काही दिवसापासुन गावात काही विचित्र घटना घडायला सुरूवात झाली होती. लवकरच काहीतरी घडणार होतं. वाड्यातील शांतता आपल्या हृदयात एक प्रकारचा ज्वालामुखी वागवत असावा. लवकरच त्याचा स्फोट होणार होता. तडवळ्याची शांतता ढवळली जाणार होती. काल घडलेली ती घटना जणु भविष्यात गावावर कोसळणार्‍या महासंकटाची नांदीच होती. झालं असं………………

**********************************************************************************************************

“कुशे, आजच्याला न्ह्येरी नगो. भाकरी दे बांदुनशान कोरड्यासाबरुबर. तकडंच न्ह्येरी घिन खाऊन. तुजं काम आटीपलं की मंग ये भाकर घेवुन दुपारच्याला. लै काम पडल्यालं हाय आज. म्हसोबाची पट्टी नांगरुन घ्येयाची हाय. रघुबा फकस्त आजच्यालाच बैलं द्येयाला राजी झालाय. तेवडी जमीन नांगरुन घेतली की मग फुडच्या कामाल मोकळीक व्हयील बग.”

शिरपा घाईतच होता. गावकुसाबाहेर त्याची तीनेक एकराची जमीन होती. शिरपा , त्याची बायको कुसुम आणि चार वर्षाची त्याची लेक रंगी. रंगीच्या नंतर कुशा दोन वेळा पोटुशी राहीली होती. पण दोन्ही वेळी काही ना काही होवून पोर गर्भातच गेलं होतं. यावेळी कुशा पुन्हा एकदा गर्भार होती. शिरप्याला लेकच पाहीजे होता.

शिरप्यानं भाकर बांधुन घेतली आणि रानाकडं निघून गेला. कुशाची घरातच आवरा आवर चालली होती. कामं संपली आणि आता कायतरी खाऊन घ्यावं म्हणुन कुशानं रंगीला हाक मारली.

“रंगे, ये रंगे, ये गं बाय दोन घास खावन घेवया. मग दुपारच्याला पुन्यांदी भाकर घिवुन शेतावर जायाचं हाय तुज्या बासाठी.”

रंगीकडुन ओ नाही की ठो नाही.

“कुठं गेली भवानी? रंगे……

कुशा रागारागातच हाका मारत घराच्या बाहेर आली. रंगी जवळपास कुठेच दिसेना. तशी कुशानं शेजारच्या घरात विचारलं. पण रंगी तिथेही नव्हती. आजुबाजुची माणसं सांगत होती की मघाशी इथेच खेळत होती बाभळीखाली. पण दिसत तर नव्हती. घाबर्‍याघुबर्‍या कुशाने सगळा गाव धुंडाळला. इनमीन पन्नास – साठ घराचा गाव. अर्ध्या तासातच सगळा गाव फिरुन झाला पण रंगी कुठेच सापडत नव्हती. आता मात्र कुशीचा धीर सुटला. गावातल्याच एका पोराला तिने शिरप्याला बोलवायला शेतावर धाडुन दिलं. वेशीवरनं एक हाक मारली तर गावच्या शेवटच्या घरात ऐकु जाईल एवढंसं गाव. त्यात शिरप्याची रंगी कुठंतरी गायब झाल्याची बातमी पसरायला किती वेळ लागणार होता. सारं गाव झाडुन रंगीला शोधायच्या कामाला लागलं. पण रंगी कुठंच सापडली नाही?

रातभर कुशा या अंगाची त्या अंगावर होत तलमळत होती. शिरपापण वेडावल्यासारखा झाला होता. कसाबसा डोळे मिटून पडला होता. पोराचं वेड असलं तरी रंगीवर त्याचा पण जीव होताच की. रात्री एक दिडच्या सुमारास कुशाला दारापाशी कुणीतरी कण्हल्यासारखा भास झाला म्हणुन कुशानं दार उघडलं तर दाराबाहेर अंगाचं मुटकुळं करुन रंगी पडली होती. चेहरा वेदनांनी अतिशय पिळवटलेला. आधीच पोरीच्या काळजीने अर्धी झालेली कुशा ते बघुन मोडुनच पडली. दाराचा आवाज झाला म्हणुन उठलेला शिरपाही आपल्या लेकीची अवस्था बघुन अवाक झालेला होता. रंगीला घेवुन दोघांनी लगेच अनसुया सिस्टरचं घर गाठलं. रंगीची ती अवस्था पाहीली आणि अनसुया सिस्टरच्या काळजात लक्क झालं. सकाळी चांगली हसत खेळत असणारी पोरगी आता अर्धी झाली होती. सारं शरीर पांढरं फटक पडलं होतं. जणु काही अंगातलं सगळं रक्त काढुन घेतलं असावं. लक्षणं सगळी अ‍ॅनिमियाची होती. सिस्टरने तात्पुरती काही औषधे दिली आणि शिरपाला सकाळच्या गाडीनं रंगीला तालुक्याच्या ठिकाणी घेवुन जायचा सल्ला दिला. शिरपाची रात्र अशीच गेली. रामपारी कधीतरी थोडा वेळ डोळा लागला असावा. त्याला जाग आली ती कुशाच्या किंकाळीनेच.

शिरपाची झोप उडाली, तो तसाच उठुन बसला. कुशा धाय मोकलुन रडत होती. त्याने घाई घाईने कुशाच्या मांडीवर झोपलेल्या रंगीला हात लावला आणि तो चमकलाच…. रंगीचं शरीर थंडगार पडलं होतं. श्वास कधीच थांबला असावा. आता मात्र शिरपाचाही धीर सुटला , तो ढसा ढसा रडायला लागला. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकुन क्षणार्धात सगला गाव शिरपाच्या झोपडीसमोर जमा झाला. त्यांच्यापैकीच कुणीतरी बायकांनी कुशाचा ताबा घेतला. पुरुषमंडळी पुढच्या तयारीला लागली. दहा-अकरा वाजेपर्यंत तर सगळं आटोपलं होतं. कालपर्यंत वेशीवरच्या मारुतीच्या मंदीरात खेळणारी हसरी रंगी आज काळ्या माती आड गेली होती. रंगीचा मृतदेह दफन करुन गावकरी घरी परतले. बायका संध्याकाळपर्यंत होत्या. पण नंतर एकेक जण आपापल्या घराकडे परतला. जगरहाटी थोडीच थांबते कुणासाठी?

पंधरा – वीस दिवस असेच गेले. कुशा आणि शिरपा अजुनही त्या धक्क्यातुन सावरले नव्हते. पण जगायचं तर काम थांबवून चालणार नव्हतं. मुलीचा शोक विसरुन तो शेतीच्या कामाला लागला. त्या रात्री कामं उशीरापर्यंत चालु होती म्हणुन शिरपा रातच्याला रानावरच थांबणार होता. पण ती रात्र त्याच्या आयुष्यात प्रचंड बदल घडवुन आणणार होती. तो बरंच काही गमावणार होता. पण पुढे जे काही घडणार होतं त्याची ती केवळ सुरुवात होती आणि ते केवळ अपरिहार्यच होतं.

कुशा घरी एकटीच होती. कधी झोप लागली ते तिला कळालेच नाही. त्या रात्री साडे बाराच्या दरम्यान दारापाशी कसलीशी खुडबुड झाली म्हणुन कुशा जागी झाली.

“कोन हे इकत्या रातीला?”

दार न उघडता कानोसा घेत घेत कुशाने विचारलं.

“आये, म्या हाये गं, लै भुक लागलीया. कवाड उघीड की!” रंगीचा आवाज.

त्या क्षणी कुशा सगळं विसरली. आपल्या पोरीला आपणच काल मातीआड करुन आलोय हे ही ती विसरली. आता फक्त तिच्यातली आई जागी होती. लेकीच्या मायेने आसुसलेल्या आईने दार उघडलं…!

“आई मी येवु का? भुक लागलीय गं खुप……”

दारात रंगी उभी होती, तिची रंगी…., तिची हसरी, खेळकर लेक. मायेच्या, वात्सल्याच्या भरात कुशाने आपले हार पसरले. तशी रंगी धावत धावत आईच्या कुशीत शिरली. आवेगाच्या भरात तिच्या ल़क्षातच आलं नाही की रंगीचं अंग थंडगार पडलय. तिने रंगीला कडेवर उचलुन तिचे मटामटा मुके घ्यायला सुरूवात केली. तिच्या कडेवर असलेल्या रंगीचे डोळे क्षणभर चमकले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिने आपलं तोंड उघडलं, तोंडातले दोन सुळे चमकले तशी तिच्याकडे बघणारी कुशी घाबरली. तिला पहिल्यांदाच जाणवलं ही आपली रंगी नाही. रंगीचं फक्त शरीर आहे, त्यामागचा बोलवीता धनी कुणी दुसराच आहे. तिने रंगीला दुर लोटण्याचा प्रयत्न केला, पण रंगीने तिच्या गळ्याला करकचुन मिठी मारली आणि आपले तिक्ष्ण सुळे कुशाच्या मानेवर टेकवले. ते तिक्ष्ण सुळे जसे तिच्या मानेत घुसले तशी क्षणभर एका प्रचंड वेदनेचा कल्लोळ तिच्या अंगांगात पसरला. पण क्षणभरच…., दुसर्‍याच क्षणी ती भान विसरली. जसं-जसं रंगी तिचं रक्त शोषत होती, तस तशी सुखाची एक विलक्षण उर्मी तिच्या शरीरावर पसरत चालली. अतिव तृप्तीने तिने आपले डोळे मिटून घेतले……

ती भानावर आली तेव्हा रंगी तिच्या कडेवर नव्हती….दारात उभी होती. तिला आपल्याबरोबर यायला खुणावत होती.

“अगं पण भायेर केवढा अंधार हाये.” कुशा बाहेरच्या अंधारात बघत म्हणाली. तिच्या मनावरची धुंदी अजुनही उतरली नव्हती.

“चल, म्या एकटी न्हाये, त्ये हायती की आपल्या बरोबर.” रंगी बोलली. कालपर्यंत बोबडं बोलणारी आपली रंगी इतकं स्वच्छ आणि स्पष्ट बोलायला लागली हे त्या वेडीच्या ध्यानातही आलं नाही आणि कुशा आपल्या लेकीच्या मागे निघाली.

आता तिलाही खुप भुक लागली होती. तिची भुक तर डबल होती. पोटातला गोळा पण भुकेला होता ना……..

**********************************************************************************************************

फाट्यावर नेहमीप्रमाणे गाडी थांबली. दिरगुळे मास्तरांनी डाक ताब्यात घेतली. नेहमीप्रमाणे ड्रायव्हरबरोबर दोन शब्द बोलून आणि तंबाखुची चिमूट दाढेखाली दाबुन त्यांनी सायकलला टांग मारली.

“अहो…अहो काका, जरा थांबता का? हे कुठलं गाव आहे?”

एक नाजुक आवाजातला प्रश्न कानी आला. मास्तरांनी आवाजाच्या रोखाने नजर वळवली. एक २७-२८ वर्षाची सुस्वरुप मुलगी बसमधुन उतरुन उभी होती. पाठीवर एक ट्रॅव्हल बॅग अंगात जीन्स, शॉर्ट कुर्ता असा आधुनिक वेष…… !

तिने प्रसन्न हसुन दोन्ही हात जोडले.

“नमस्कार… मी अदिती! मला तडवळ्याला जायचं होतं. ड्रायव्हरने इथे उतरवलं, पण इथे तर कुठलंच गाव दिसत नाहीये.”

दिरगुळे मास्तर तिच्याकडे पाहातच राहीले.

क्रमशः

 

4 responses to “मी परत येइन ….

 1. bhagyashree

  नोव्हेंबर 24, 2010 at 1:51 pm

  mast vatat ahe katha

   
 2. Vaibhav Joshi

  डिसेंबर 26, 2013 at 7:45 pm

  अतिशय उत्कृष्ठ भय कथा . फेसबुक वर आमच्या भुताटकी ग्रुप मध्ये आपल्याला आमंत्रित करत आहे . कृपया पुढे दिलेल्या लिंक वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा हि विनंती . https://www.facebook.com/groups/264162100360484/471176042992421/?notif_t=like

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: