RSS

वाघाची डरकाळी, ५० डेसिबेल आणि घराणेशाही ……….

18 ऑक्टोबर

“माझी स्टाइल चोराल, पण विचारांचं काय. माझे विचार त्या स्टाइल चोरात येणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊन जनतेत जाताहेत. तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. हा जमलेला जनसागर याची साक्ष देतो!”

शिवतिर्थावर शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा गरजला. काल विजयादशमीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे होणार किं नाही होणार, सायलेंट झोन, ५० डेसिबेल अशा अनेक समस्यांमध्ये गुरफटलेला शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत पार पडला. शिवसेनेच्या वाघाने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत डरकाळी फोडली. आपल्या खुमासदार भाषणात साहेबांनी अनेक मुद्दे मांडले, अनेकांवर शरसंधान केले. त्यांची माहिती जवळजवळ सर्व मुख्य वर्तमानपत्रांतून आलीच आहे. या सभेत ५० डेसिबेलची मर्यादा ओलांडुन ९०-९५ डेसिबेलपर्यंत आवाज वाढला. खरेतर वाघाच्या डरकाळीला आवाजाची मर्यादा घालायची हाच मुर्खपणा वाटतो मला. वर्षातून एकदा येणार्‍या दसरा मेळाव्याला तरी हा नियम अपवाद ठरावा असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित ते चुकही असेल पण एक सच्चा शिवसैनिक या नात्याने मलातरी असे वाटते. असो, आता किमान आठवडाभर हा मुद्दा मिडीयावाले चघळत राहतील. निखील वागळेंच्या आवाजाला अजुन धार चढेल. सामान्यजनातही हा मुद्दा वारंवार उगळला जाईलच. त्यामुळे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. तो माझा प्रांतही नाही.

मला माझ्या ब्लॉगवर त्याची दखल घ्यावीशी वाटली त्याचे कारण म्हणजे साहेब म्हणाले की…..

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!”

यावेळी साहेबांनी केलेले विधान सॉलीडच आहे…

“शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही.”

गंमत अशी की साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णकुंजवाल्यांनी म्हणजे राजनीच उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं आणि वर हे आपल्याला आवडलं नाही म्हणून शिवसेनेचा त्याग केला. खरं खोटं राजना आणि साहेबांनाच माहीत, वाईट या गोष्टीचं वाटतय की हे सगळं बोलताना साहेब एका गोष्टीकडे सरसकट दुर्लक्ष करताहेत की शिवसेनेपासून तूटून राजने स्थापन केलेली मनसेना फार थोड्या काळात शिवसेनेला आव्हान देण्याइतकी सक्षम झालीये. शिवसेनेच्या जागा घेणे जरी फार प्रमाणावर मनसेला शक्य झालेले नसले तरी मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेचा फार मोठा मतदार शिवसेनेपासून दुरावत चाललाय. इतकी वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ असलेले, कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न केलेले बाळा नांदगावकर, शिरीष पारकर यांच्यासारखे कित्येक कट्टर शिवसैनिक शिवसेनेची इतक्या वर्षाची साथ सोडून राजबरोबर जातात. छगन भुजबळांसारखा ज्याने शिवसेना महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात पोचवली असा खंदा कार्यकर्ता शिवसेना सोडताना घराणेशाहीचाच आरोप करतो. आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

त्यातही पुन्हा, गेली कित्येक वर्षे विद्यार्थीसेनेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे अनेक युवा नेते जे विद्यार्थीसेनेतच म्हातारे झाले, त्यांना डावलून शिवसैनिकांनी (?) पुन्हा एकदा आपल्या सुज्ञपणाचा (?) दाखला देत युवासेनेच्या नेतृत्वासाठी काल आलेल्या, संघर्षाचा महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव, अभ्यास नसलेल्या आदित्य ठाकरेंची निवड केली. म्हणजे काँग्रेसजन जे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत… म्हणजे इंदिराजीं, संजय, नंतर राजीवजी नंतर सोनीया आणि मग आता राहूल………..! तरीही ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही हा जनमताचा कौल आहे. काँग्रेसला विरोध करत मोठ्या झालेल्या शिवसेनेतही आता तेच होतय…. साहेब शिवसेना सांभाळत होते तोपर्यंत माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक सर्वस्वाने शिवसेनेला बांधलेला होता. पण साहेबांच्या नंतर आता उद्धव आणि त्यानंतर आदित्य….! शिवसेनाही त्याच मार्गाने चाललीये आणि साहेब म्हणताहेत शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही हा शिवसैनिकांचा कल आहे. मला वाटतं शिवसेनेचं भलं कशात आहे हे साहेबांना माझ्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने कळतं, मग उद्धवजींच्या वेळचा ताजा अनुभव पाठिशी असताना पुन्हा युवासेनेची कमान आदित्यच्या हाती सोपवून एकप्रकारे घराणेशाहीलाच प्रोत्साहन देणं योग्य आहे का? आदित्यकडे तेवढा अनुभव, तेवढी ताकद आहे का? किंवा जर आदित्य हे उद्धवजींचे सुपूत्र नसते तर हे युवराजपद, युवासेनेचे नेतृत्व त्यांना मिळाले असते का?

कधी कधी शंका येते की जे उद्धवजींच्या बाबतीत झाले, म्हणजे त्यांचा राजकारणात उशीरा झालेला प्रवेश, त्यामुळे उठलेले वादळ या सर्व गोष्टी आदित्यच्या बाबतीत पुन्हा फेस कराव्या लागू नयेत म्हणून तर अवघ्या २० व्या वर्षी आदित्यचा युवराज म्हणून राज्याभिषेक करण्यात आला नसावा? म्हणजे अजुन ५-१० वर्षात आदित्य राजकारणात मुरतील आणि तथाकथीत निष्ठावंत शिवसैनिक (?) उद्धवजींच्या नंतर कार्याध्यक्ष म्हणून आदित्यची निवड करायला सिद्ध होतील. कुणालाही बोलायला जागाच उरणार नाही. आता इतके वर्षे शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिक तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे म्हणत मनोमन बोटे मोडत वरवर नव्या युवराजांचा जयजयकार करतील म्हणा, पण त्यांना कोण विचारतो? मग त्यांच्यापैकी काहीजण आतल्या आत दुखावल्या जावूनही येणार्‍या संधीची वाट बघतीलही कदाचित पण ज्यांच्याकडे वाट बघण्याइतकी सहनशीलता नाही त्यांनी संधी निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा दोष शिवसेनेच्या नेतृत्वालाच जाणार आहे हे निश्चित ! सुरूवात तर झालीय कडोंमपा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच डोंबीवलीतील १०० च्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी राजीनामे सादर केले आहेत आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निष्ठावंतांना डावलून नेतृत्वाच्या पुढे-पुढे करणार्‍यांनाच तिकीटे देण्यात आल्याची जुनीच तक्रार पुन्हा डोके वर काढतेय. ज्यांना साहेब कडवट शिवसैनिक म्हणून अभिमानाने संबोधायचे तोच कडवा शिवसैनिक आता निराश होवू लागलाय, आपल्या निष्ठेची इथे कुणाला कदर राहीलेली नाही ही भावना जोराने वर येतेय. आता या समस्येवर साहेब काय उपाय करणार आहेत?

बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षाही बाळासाहेब ठाकरे या विचाराकडे आकर्षित झालेला माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आता काळजीत पडलाय. कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. मराठी, मराठी माणुस, हिंदुत्व असे कळीचे मुद्दे फक्त राजकीय हेतुने बरबटल्यासाराखे वाटताहेत. मला वाटतं आता खरोखर शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. जे काही होतय, चाललेय ती घराणेशाही नाही से खरोखर साहेबांना वाटत असेल तर माझ्यासारख्या प्रामाणिक शिवसैनिकाची शिवसेनेला रामराम करायची वेळ झालेली आहे असे वाटतेय.

असं जर झालं तर हे खरंच खुप चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाचा अंत जवळ आला आहे काय?

एक प्रामाणिक आणि व्यथित शिवसैनिक !

 

13 responses to “वाघाची डरकाळी, ५० डेसिबेल आणि घराणेशाही ……….

 1. विद्याधर

  ऑक्टोबर 18, 2010 at 2:57 pm

  मी लहानपणापासून बाबांच्या संघबैठकीमुळे भाजपावाला आहे. पण तरीसुद्धा बोलल्या शब्दावर ठाम राहणार्‍या बाळासाहेबांचा मी कायम पंखा राहिलो आहे. पण मनापासून वाटतं की बाळासाहेबांकडून म्हणा किंवा त्यांच्या भोवतीच्या दरबारी राजकारण्यांमुळे म्हणा…शिवसेनेच्या अंताची सुरूवात युती सरकारच्या कालावधीतच झाली.
  फार वाईट वाटतं!!
  त्यांना हयातीत शिवसेनेचं पतन बघायला मिळू नये एव्हढीच सदिच्छा!

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 18, 2010 at 3:22 pm

   हो ना म्हणून तर याचा जास्त त्रास होतोय. मी ही लहानपणापासुन संघवालाच आहे (भाजपावाला नव्हे 😉 )
   त्यामुळेच बाळासाहेबांची भुरळ पडली. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि केलेल्या कृतीची जबाबदारी स्विकारण्याची तयारी (आठवा बाबरी पतनानंतरचे बाळासाहेबांचे स्टेटमेंट) त्यामुळे बाळासाहेबांचा भक्तच बनलोय. पण त्यांचे हे वागणेच सेनेला आता घातक ठरतेय. आता अधिकार बडव्यांच्या हातात आहेत आणि बडवे आपला स्वभाव बदलणार नाहीत. मागे एकदा नाना पाटेकर म्हणाला होता कि बाळासाहेब अशाने एक वेळ अशी येइल की तुमच्या मागे कोणीच राहणार नाही. तशी वेळ आलीय की काय अशी भिती वाटतेय. 🙂

    
 2. महेंद्र

  ऑक्टोबर 18, 2010 at 4:11 pm

  शिवसेनेशी मानसिक बांधिलकी असलेले बरेच लोकं आहेत अजूनही. कदाचित म्हणूनच अजूनही टीकुन आहे शिवसेना.
  बाळासाहेबांची पुण्याई कुठपर्यंत टिकणार??
  आदित्यने असं काय मोठे काम केले आहे की त्याला नेता करताहेत??
  आदित्यने आधी काही तरी लोकांसाठी काम करावे, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्या, आणि मग नंतर त्यांचे निराकारण करण्यासाठी विद्यार्त्यांच्या जवळ जावे. नितिन गडकरी हे ज्वलंत उदाहरण आहे विद्यार्थी नेता ते भाजपाध्यक्ष प्रवास पहा त्याचा..

  राहूल गांधी अजूनही पंतप्रधान केल्या गेला नाही. मला वाटतं सोनियाजी थोड्या जास्त मॅच्युअर्ड पध्दतीने हाताळताहेत राहूलचे करीअर.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 18, 2010 at 7:44 pm

   शिवसेनेचा स्वतःचा असा मतदार उरलेला नाही. मराठी-हिंदुत्व-ओबीसी, या तिनही एकमेकाला छेद देणार्‍या गोष्टींवर एकाचवेळी पकड मिळवण्याच्या प्रयत्नात सगळेच हातून गेले आहे. ग्रामीण भागात, राष्ट्रवादीचा जन्म होण्याआधी असंतुष्ट कार्यकर्त्यांना शिवसेना ही जागा होती, आता तेही संपले. उमेदवार ठरवताना, ‘निवडून येउ शकणे’ हा सत्ताकारणाचा एकमेव निकष सोडून मातोश्रीच्या जवळचा कोण या मुद्द्यावर निर्णय होउ लागले, उदा.सोलापुरात शिवसेनेची लागलेली वाट. हाच प्रकार कमीअधिक प्रमाणात सगळीकडेच झाला आहे.

    
 3. अजय.

  ऑक्टोबर 18, 2010 at 7:04 pm

  मा. बाळासाहेबांची रोखठोक भाषणाची पद्धत बघुन मी मुंबईत येण्यापुर्वी पासुन त्यांचा फॅन झालो. मुंबईत आल्यावर पहिला अनुभव आला तो साहेबांना अटक झाल्याची बातमी १९९१-९२ साली आल्यावर काही सेकंदात बंद झालेली दुकाने बघुन त्यांच्या ताकदीचा अंदाज आला. त्यानंतर मराठी व हिंदुत्वावरची त्यांची भाषणॆ ऎकून तर संघ-भाजपवाला असुनही कायम मा. साहेबांचा हितचिंतक राहिलो पण धक्का बसला ते शिवसेना फुटायला सुरुवात झाल्यावर व मनसेची स्थापना झाल्यावर. मराठी माणसांना फुटीचा शाप असावा असे वाटायला लागले. तरिपण मा. साहेबांचा निर्णय योग्य असेल असे वाटत राहिले, पण काल शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्यचा प्रवेश झालेला बघुन राजकारणाचा विचार करणे बंदच कराव अस वाटतय.
  आपण कुठे कोणत्या प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचा विचार करतो का ?

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 18, 2010 at 7:45 pm

   बाळासाहेब अनेक सामान्य शिवसैनिकांसाठी आणि जनतेसाठी अक्षरश: लार्जर दॅन लाईफ झाले होते. पण एक्झॅक्टली याच कारणाने शिवसेना उतरणीस लागल्याचे बघणे हे वेदनादायक आहे. ‘तुमच्या हट्टाग्रहांमुळे एक वेळ अशी येईल बाळासाहेब, की तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा कुणीच तुम्हाला दिसणार नाही..’ असं नाना पटेकर एकदा जाहीरपणे बोलला होता, ते आठवल्याशिवाय राहत नाही.

    
 4. सिद्धार्थ

  ऑक्टोबर 18, 2010 at 7:07 pm

  खरं आहे. आदित्य ठाकरे युवानेता घोषित करणे आणि त्यांच बरोबर घराणे शाही नाही असे वक्तव्य करणे म्हणजे प्रचंड विरोधाभास हे आंडू पांडूला देखील कळले. अर्थात कुणा ही बापाला आपण चालू केलेला व्यवसाय, उद्योग धंदा वारसा हक्काने आपल्या मुला नातवंडांनी चालवावा असे वाटणे सहाजिक आहे पण पुढच्या पिढीत देखील धमक पाहिजे. राजकारणात तरी हा नियम लागू करू नये. ठाकरे घराणे गांधीघराण्याला शिव्या घालत त्यांच्या मागे कधी निघून गेले हे साहेबांना देखील कळले नाही.
  काल देखील साहेब येणार म्हणून बरेचसे शिव सैनिक आणि सामान्य माणसे मेळाव्याला गेले असतील. माझा शिवसेनेवर प्रेम्/‌विश्वास नसला तरी मनात बाळा साहेबानबद्दल आदर आहे. त्यांना शिवसेनेची उतरती कळा पाहावी लागते आहे ह्याचेच वाईट वाटते.

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 18, 2010 at 7:46 pm

   मुळातच आता कुठला नवीन आणि नेमका मुद्दाच उरलेला नाहीये शिवसेनेकडे. एक मराठीचा मुद्दा होता त्यातही आता वाटेकरी आलाय डोळा मारा कालचे भाषण म्हणजे निव्वळ सारवासारव वाटली.

    
 5. हेमंत आठल्ये

  ऑक्टोबर 19, 2010 at 12:38 सकाळी

  मला बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे दोन्हीही खूप आवडतात. भाजीपाला नाही आवडत. उद्धव ठाकरे देखील चांगले आहेत. पण आता हे जे शिवसेनेत चालल आहे, ते पाहून फारच बेकार वाटते. आता शिवसेना आहे पण मुख्य सगळे कार्पोरेट आहेत. आणि ही घराणेशाही नाहीतर काय आहे? उद्या जाऊन आदित्य त्याच्या ज्युनिअर आदित्य कार्याध्यक्ष होईल.. कुणाला आवडेल?

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 19, 2010 at 9:44 सकाळी

   उद्धव ठाकरे चांगले आहेत. त्यांच्या चांगुलपणाबाबत मुळीच शंका नाही. उलट ज्या पद्धतीने ते शिवसेनेची गुंडा इमेज बदलण्याचा प्रयत्न करताहेत ते नक्कीच प्रशंसनीय आहे. पण त्या नादात सगळ्या जुन्या निष्ठावंतांना डावलून आपल्या पुढे पुढे करणार्याना झुकते माप द्यायचे हे कितपत योग्य आहे.
   धन्यवाद.

    
 6. सुहास

  ऑक्टोबर 20, 2010 at 9:21 pm

  शिवसेनेचे दोन मेळावे कॉलेजला असताना अटेंड केले होते. बाळासाहेबांनची पॉवर काय हे त्याच काळी कळला होत, त्यांची रोखठोक भाषण, राजकीय चिमटे, टीका आणि जनतेच्या मनाचा ठाव घेणार बोलण आठवला की अंगावर काटा येतो. राज बरोबर त्यावेळी भाविसेसाठी खूप मोठ आंदोलन केल होत. त्याने जो आक्रमकपणा दाखवला त्यात बाळासाहेबांनची लकब दिसतेय उद्धवबाबद मी एवढा आशावादी नाही, पण बाळासाहेबांनी निर्णय घेतला आणि शिवसैनिकांनी ऐकला. ज्याना नाही पटला ते बाहेर पडले आणि प्रतीशिवसेना म्हणून मराठी माणसासमोर उभे ठाकलेत. पुढे काय होईल देवाला माहीत पण…आता जी फूट, राजकीय भांडण होत आहेत त्यात मराठी माणसाची पिळवणूक नको होऊ देत आणि शिवसेना पुन्हा अभेद्य राहू देत…
  आदित्य ठाकरे बद्दल काही वाटला नाही, एक छोट आंदोलन केल्यावर त्याची इमेज अशी काही ठेवत आहेत की मोठा बदल घडवला सिस्टममध्ये…असो घराणेशाही चालायचीच पण आपला मूळ मुद्दा सोडू नयेत हीच अपेक्षा…

   
  • विशाल कुलकर्णी

   ऑक्टोबर 21, 2010 at 10:05 सकाळी

   हो ना, म्हणुनच आणखी एक प्रश्न उभा राहतो मनात…
   साहेबांच्या म्हणण्यानुसार उद्धवना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजनी मांडला होता. आता राजनी शिवसेना का सोडली याचे कारण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. साधे शाखाधिकारी नेमण्याचा अधिकार सुद्धा राजना राहीला नव्हता. त्यांनी केलेल्या शिफ़ारशी, सुचना ठरवून, मुद्दामहुन टाळल्या जात होत्या, दुर्लक्षिल्या जात होत्या. मुळात बाळासाहेबांचीच उद्धवला कार्याध्यक्ष बनवण्याची इच्छा होती. पण राजची वाढती लोकप्रियता पाहून त्यांनी राजवरच हे ढकलले असावे. आपल्या विठ्ठलाचा मान राखायचा म्हणुन नाईलाजाने राजने हा प्रस्ताव मांडला असावा.
   आता प्रश्न असा उभा राहतो की राज आता शिवसेनाद्रोही ठरले आहेत. मग एका शिवसेनाद्रोही माणसाने मांडलेला प्रस्ताव पुढेही मान्य करण्यास शिवसैनिक बाध्य आहेत काय? इथे लोकशाही नव्हे तर शिवशाही चालते म्हणणारे, माझाच निर्णय अंतीम असतो हे ठणकावणारे साहेब राजपुढे एवढे अगतिक का झाले असावेत कि त्यांना न आवडलेला राजचा निर्णय त्यांनी मान्य केला? आता जर जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उद्धवना पाय उतार होण्यास सांगितले तर ते साहेबांना रुचेल काय? शिवसैनिकांचा तो निर्णय साहेबांना आणि उद्धवना मान्य होइल काय?

    
 7. Enterprise Mobility as a service

  ऑक्टोबर 25, 2010 at 4:12 pm

  Nice post,throughly enjoyed..

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: