माझं काही चुकतय का?

गेल्या शनिवारी एक छोटासा प्रसंग घडला माझ्या बाबतीत.

म्हणावं तर छोटासाच, म्हणावं तर खुप मोठा, पण गेले आठवडाभर बरंच काही फेस करावं लागलं मला यामुळे? काल आमचे एम.डी. परदेशातून परत आल्यावर या सगळ्यावर एकदाचा पडदा पडला.

झालं असं की मागच्या शनिवारी आमच्या कंपनीची एक छोटीशी पार्टी होती. मागच्या आठवड्यात कंपनीचा पिअर रिव्ह्यु होता. तीन चार दिवस तो गोंधळ चालल्यावर शनिवारी पिअर रिव्हुसाठी म्हणून आलेल्या आमच्या विदेशी डेलिगेट्ससाठी ही छोटीशी पार्टी आयोजीत करण्यात आली होती. पिअर रिव्ह्युची सर्वांना कल्पना असेलच बहुदा. या दरम्यान हे दोन डेलिगेटस (हे दोघेही आमच्या कंपनीच्या एका साऊथ आफ्रिकेतील सिस्टर कन्सर्नचे उच्चाधिकारी आहेत, एकजण ब्रिटीश आहे आणि एक जण डच) पिअर रिव्हुची बहुदा हिच पद्धत असते. आमच्या गृपच्या (फ़ुग्रो) जगभर कंपन्या आहेत. एका कंपनीचे उच्चाधिकारी दुसर्‍या ऑप्कोचा पिअर रिव्ह्यु घेतात. आमचे बॉसपण दुबईतील फुग्रो एम्.ई. चा पिअर रिव्ह्यु घ्यायला गेले होते.

तर सांगण्याचा मुद्दा असा की जोहान्सबर्गवरुन आलेले हे उच्चाधिकारी आमच्या कंपनीतील प्रत्येक कर्मचार्‍याशी वैयक्तिक रित्या भेटले, बोलले. प्रत्येकाची मते जाणुन घेण्यात आली. त्यानंतर कंपनीचे विक पॉईंटस, स्ट्राँग पॉईंटस यावर सांगोपांग चर्चा झाली. प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा, सुधारणा सुचवण्याचा हक्क दिला होता. यात कसं होतं की तुम्ही मांडलेली मते पुर्णपणे गुप्त राहतात, (तुमच्या बॉसपर्यंत पोहोचत नाहीत) त्यामुळे प्रत्येक जण मनापासुन आपापली मते मांडतात. असो. तर पिअर रिव्ह्यु झाल्यानंतर जी पार्टी झाली त्या पार्टीत एक घटना घडली.

या दोघा अधिकार्‍यांमध्ये जो ब्रिटीश होता तो तसाही जरासा फाटक्या तोंडाचाच वाटला मला. त्यात त्या रात्री पार्टीत पठ्ठ्या सॉलीड हवेत गेला होता. प्रत्येकावर काही ना काही कमेंट्स करत होता. आमच्या दोन तीन कर्मचार्‍यांवर अगदी टोचतील अशा कमेंट्स केल्या त्याने. माझा त्याला चुकुन धक्का लागला. (खरेतर दारुच्या नशेत तोच मला धडकला होता) तरी मी लगेच सॉरी म्हणण्याचं सौजन्य दाखवलं. असंही तो कंपनीचा सी.एफ्.ओ. आहे त्यामुळे मला ते भागच होतं. तर पठ्ठ्या जोरात ओरडलाच माझ्यावर…..

You stupid ! म्हणुन.

एकतर मर्कट त्यात मद्य प्याला अशी अवस्था होती त्याची, उगाच कशाला चिखलात दगड मारा म्हणुन मी गप्प बसलो. पण त्यानंतरही त्याची कुणाला ना कुणाला शिवीगाळ चालुच होती.

त्यातच पुन्हा एका वेटरला धडकला आणि त्याच्याच हातातली स्कॉच त्याच्याच सुटवर थोडी सांडली. तर पठ्ठ्याने फाडकन त्या वेटरच्या थोबाडीत मारली आणि जोरात ओरडला…

” Hey you Indian scoundral ! all you indians are same!”

आता मात्र माझं टाळकं सटकलं. मी मागुन जावून त्याच्या खांद्यावर टॅप केलं, तो माझ्याकडे वळला…

मी त्याच्या तोंडावर बोट रोखुन त्याला सांगितलं..

” Hold your tounge Mr. Doug ! now you are crossing your limits! You have no rights to use any bad words for my country or countrymen!”

तो डोळे विस्फारुन माझ्याकडे बघायला लागला. बहुदा माझ्यासारख्या एका यकश्चित सपोर्ट मॅनेजरकडुन त्याला अशा बोलण्याची अपेक्षा नसावी. पण तो काही बोलायच्या आतच आमच्या कंपनीचे एक वरीष्ठ मॅनेजर त्याला बाजुला घेवून गेले. दुसर्‍या एकाने मला बाजुला घेतले. त्यानंतर पार्टीत थांबण्याची इच्छा राहीली नव्हतीच. मी घरी निघून गेलो. तो ही बहुदा दुसर्‍या दिवशीच रात्री परत जाणार होता. त्यामुळे परत काही त्याची भेट झाली नाही. त्यानंतर सोमवारी त्याची मेल आली, सॉरी म्हणणारी !

पण गेले आठवडाभर माझ्या ऑफीसमधले लोक मला वेगवेगळे सल्ले देत होते. त्यांच्यामते मी इतके चिडायची काही गरज नव्हती. तो कंपनीचा एवढा मोठा अधिकारी आहे, त्याने जर वर तक्रार केली असती तर? असे बहुतेक सगळ्यांचाच सुर होता. त्यांच्यामते मी जे वागलो तो केवळ माझा मुर्खपणा होता. माझी नोकरी जाण्याचीही शक्यता होती, नशीब चांगले म्हणुन मी बचावलो असाच बहुतेकांचा सुर होता. त्यांच्या मते माफ़ी मागणे हा त्याचा मोठेपणा होता, खरेतर मी माफ़ी मागायला हवी होती.

यावर माझे उत्तर असे की त्याने मला शिव्या दिल्या, कंपनीच्या इतर बर्‍याच जणांना नडला इथपर्यंत ठिक होते. दारुच्या नशेत या गोष्टी एकवेळ क्षम्य ठरवता येतील. पण दारुच्या नशेतही एखाद्या व्यक्तीला माझ्या देशाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार मी मुळीच देणार नाही. तो अधिकार मी अगदी माझ्या आई-वडीलांनाही नाही देणार, मग हा तर एक दारुडा त्यात विदेशी, त्याला का मी कीमत देवु? आणि महत्वाचे म्हणजे माझी भावना त्या ब्रिटीश माणसालाही  समजली त्याने नंतर सॉरीची इमेल पाठवुन माझ्या त्या भावनेबद्दल माझं कौतुकही केलं. पण माझीच माणसं, माझेच देशबांधव मला चुक ठरवताहेत.

गेले आठवडाभर जवळपास १०० जणांनी मला त्याची माफी मागायची सुचना केली, जी मी फाट्यावर मारली. गंमत म्हणजे माझ्याच काही मित्र म्हणवणार्‍यांनी माझ्या या वागण्याची काल आमचे एम्.डी. आल्यानंतर त्यांच्याकडे तक्रार केली. आज अचानक दुपारी सायरन वाजवून कंपनीतल्या असेंब्ली पॉईंटवर सर्व कर्मचार्‍यांना जमा करण्यात आले. एम्.डीं. नी मला पुढे बोलावले. माझ्या तथाकथीत हितचिंतकांना बहुदा आनंद झाला असावा. पण त्यांचा आनंद टिकवणे बहुदा नियतीच्या आणि एम्.डीं.च्या मनात नसावे. सरांनी मला समोर बोलावले. झालेली घटना पुन्हा एकदा सर्व कर्मचार्‍यांसमोर सांगितली. (पार्टीला सगळ्यांना आमंत्रण नसतं) आणि त्यानंतर माझ्याकडे बघुन आमचे एम्.डी. एकच वाक्य बोलले.

“I am proud of you Vishal , I wish I had a son like you!”

सगळं भरुन पावलं. खंत फक्त एवढीच वाटते की माझ्याबरोबर पार्टीत असलेल्या १०० जणांपैकी (सगळेच्या सगळे भारतीय) एकालाही त्या ब्रिटीश अधिकार्‍याचा विरोध करावासा वाटला नाही, की तो चुकतोय असंही वाटलं नाही? आपण एवढे लाचार झालोय का?

माझं काही चुकतय का?

विशाल कुलकर्णी

41 thoughts on “माझं काही चुकतय का?”

  1. अतिशय योग्य केलंत तुम्ही!
    तुमचं नाही, बाकी लोकांचं काही चुकतंय… काही कसलं सगळंच चुकतंय त्यांचं!
    आणि तुम्ही हिंसक पद्धतीनं संताप व्यक्त नाही केलात, हे तुमच्या सुसंस्कृतपणाचंच लक्षण होतं! आणि तीच त्याच्यासाठी खरी चपराक होती!
    तुमच्या एम.डीं.चं ही कौतुक वाटलं मला!
    आणि ते तुम्हाला माफी मागायला सांगणारे तर धन्यच! केव्हढी लाचारी! माझा नुसता वाचून संताप होतोय.. तुम्ही आठवडाभर काय सहन केलं असेल, ह्याची कल्पनाही करवत नाही!
    बाकी त्या ब्रिटीशाने माफी मागितली हे बरं झालं! नाहीतर त्याला पुन्हा भारतात येताना तुमच्या समोर यायचीही लाज वाटली असती! 🙂
    अंत भला तो सब भला!
    मलाही तुमचा अभिमान वाटला!

    Like

  2. धन्यवाद विद्याधरजी,
    तो सगळा प्रकारच संतापजनक, त्याहीपेक्षा क्लेशकारक होता. जावु द्या.. तुम्ही म्हणालात तसं अंत भला तो अब भला 🙂

    Like

    1. त्यात कसला आलाय ग्रेटनेस भाऊ ! स्वाभाविक प्रतिक्रिया होती ती. वाईट एवढेच वाटते की माझ्याच माणसांनी मला चुक ठरवले, तेही मी १००% बरोबर असताना 😦
      असो, मन:पूर्वक आभार !

      Like

  3. मस्त विशालजी! तुम्ही जे केलंत ते योग्यच होतं. एकदा माझंपण असंच याच विषयावरुन भांडण झालं होतं, पण ते टॉकिजमध्ये. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर माझ्या पुढे बसलेला महाभाग उठला नाहीच, वरून त्याने अतिशय वाईट कमेंट केली. त्याला जरा “छान शब्दात” समज दिली होती मी!

    Like

  4. लाचारी … हुजरेगिरी करण्यात ज्यांना धन्य वाटते त्यांनी तुला त्यांची माफी मागायला सांगितली असेल.

    पण तु जे केलेस त्यांचा मला देखील अभिमान आहे.

    ( जर काही कारणामुळे सर्वांसमोर मारणे शक्य नसेल तर अश्या माणसाला कोपर्‍यात गाठुन तोंडावर चादर घालून लाता बुक्याचा चोप देणे हाच उपाय )

    Like

    1. ( जर काही कारणामुळे सर्वांसमोर मारणे शक्य नसेल तर अश्या माणसाला कोपर्‍यात गाठुन तोंडावर चादर घालून लाता बुक्याचा चोप देणे हाच उपाय )

      १००% सहमत राजे 🙂

      Like

    1. ऑफिसमधल्या प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटायला हवा..>>>

      अभिमानाची अपेक्षा नाहीये हेरंब, पण जे काही झाले त्याबद्दल निदान लोकांना राग तरी यायला हवा होता. पण एखादा सन्माननीय अपवाद सोडला तर सगळेच…… 😦

      Like

  5. Hi Vishal,
    Well done! I am a frequent visitor to the UK and I have noticed that , normally the British are well behaved and always correct in their inter action with others, but when they get drunk , theis superiority complex shows its ugly head .I admire your courage and staunch attitude in not succumbing to the pressure of worthy 100 Indians
    May God bless you
    Regrds
    JKBhagwat

    Like

  6. गेले आठवडाभर जवळपास १०० जणांनी मला त्याची माफी मागायची सुचना केली, जी मी फाट्यावर मारली.

    बरं केलंत.

    अभिमान आहे.

    Like

    1. आल्हाद, खरेतर इच्छा होत होती या लोकांना उलटे टांगून मारण्याची (त्या नालायकाबद्दल नाही बोलत आहे मी, मी माझ्या सहकारी लोकांबद्दल बोलतोय) पण म्हणतात ना…
      चिखलात दगड मारुन काय होणार… 😦
      असो आभार !

      Like

  7. खरं तर ज्या गोष्टीचा अभिमान बाळगायला हवा, त्याच गोष्टीची लाज बाळगली जाते. तुमचं काहीच चुकलं नाही विशाल. योग्य तेच केलंत. ज्याला स्वत:च्या देशाबद्दल आणि देशबांधवांबद्दल अभिमान नसेल, तो माणूस कसा बनणार?

    Like

    1. खरय कांचनताई !
      या एकाच ठिकाणी नाही तर खुपशा ठिकाणी मी हे अनुभवलय. आपलीच माणसं देशी आणि विदेशी माणसांना वेगवेगळी ट्रिटमेंट देताना दिसतात. यात त्या लोकांचा अहंगंड जेवढा मजबुत तेवढीच आपल्या लोकांचा(सन्माननीय अपवादांबद्दल क्षमस्व) न्युनगंड मजबुत असतो. या सगळ्यातून बाहेर पडायला हवय. जगज्जेत्या सिकंदरालाही परास्त करणारी विजिगिषु भारतीय प्रवृत्ती आपण विसरत तर चाललेलो नाही ना?

      असो, प्रतिक्रितेबद्दल धन्यवाद!

      Like

  8. Vishal,

    Bravo…….आपलीच माणसं देशी आणि विदेशी माणसांना वेगवेगळी ट्रिटमेंट देताना दिसतात हे अगदी बरोबर आहे…पण तुझ्या एकट्याने त्या पार्टीमध्ये त्या गोर्याला असा सुनवाव हे खरच बाकीच्यांना शरमेच नको का?? म्हणजे तुझ कौतुक आहेच पण आपल बाकिच्यांच काय?? ही मानसिकता आहे म्हणूनतर deshachi प्रगती खुंटते…

    Like

  9. asch ast. jewha aapan khi wegl karayla jato tewha pay khechnarech khup astat. ani tumhi 100% correct hota. but tumche boss kadun statement aal tya sathi tyanch hi kautuk watta. karan bryachda aapan boss mulech adchnit yeto pan tewha saglyansamor te 99% aaplach bali deun mokle hotat. ani aapan matr saglyanshi wait hoto kayamch. shiway boss namanirala.

    Like

Leave a reply to neeyati उत्तर रद्द करा.