हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…

अस्सल मिपाकर आणि क्रिकेटभक्त श्री. जेपी मॊर्गन यांच्याच अधिकारवाणीत क्रिकेटच्या बादशहांच्या अनेक पिढीतील सरदारांबद्दल (अर्थात त्यांच्या परवानगीने) त्यांनी मिपावर लिहीलेल्या लेखांची एकत्रित मोट बांधून इथे प्रकाशित करतोय. जेपी भौ परवानगीबद्दल मन:पूर्वक आभार.

विशाल कुलकर्णी

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…

मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या ‘टियर २’ सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला “टप्पा”, “ठुमरी”, “पुरिया धनश्री”, “तीव्र मध्यम” वगैरे शब्द ऐकून जे काही “कुछ कुछ होता है” फीलिंग येतं ते आम्हाला “शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ”, “हुक”, “स्मॅश”, “बॅकहँड क्रॉसकोर्ट”, “स्लॅमडंक” वगैरे ऐकून येतं !

अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू? कित्येकांना “बघणं” आमच्या नशीबात नव्हतं पण आजही क्रीडाक्षेत्रात असे कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही आमच्या नातवंडांना सांगू ‘अरे आमचा सौरव गांगुली सात-सात फील्डर असताना कव्हर्समधून फोर मारायचा’…’अरे आमच्या अक्रम-वकार पुढे तुमचे आजचे बोलर्स बच्चे आहेत बच्चे… ‘ अरे तो बेकर बघशील तर ६ फूट ४ इंच उंच….. पण काय चित्त्यासारखा डाईव्ह मारायचा कोर्टवर’ ! आणि आमची नातवंडं डोळे मोठ्ठे करून (मनातून हसत) आम्हाला विचारतील “आजोबा खरंच???”

तुम्हाला अश्याच काही “कलाकृतींची” आठवण (आणि अजाणत्यांसाठी ओळख) करून द्यायची आहे !

पहिला मान अर्थातच आमच्या साहेबांचा ! किती आणि काय बोलावं साहेबांबद्दल? मिसरूड फुटायच्या वयात साहेब भल्या भल्या गोलंदाजांना ‘फोडत’ होते. उणीपुरी २ दशकं झाली साहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर… पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनंदेखील जगातला कोणताही संघ त्यांना “सॉर्ट आऊट” करू शकला नाही. साहेबांनी काळानुरूप आणि संघाच्या गरजेनुसार स्वतःला असं काही बदललं की घडी घडी रूपं बदलणारा नेताजी पालकरच जणू. म्हणूनच घणाघाती हल्ला चढवून प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीची शकलं उडवणारे साहेबच कधी कधी आपले फटके म्यान करून बचावाचा असा अभेद्य किल्ला उभारतात !

त्यांचीच ही एक कलाकृती.

साहेबांचा ‘स्टान्स’च असा की वाटावं आपण डोळे मिटून आण्णांचा खर्जातला षडज ऐकतोय. अतोनात स्थिरता…. बोलरवर रोखलेली नजर…. दोन्ही पायांचा ‘बॅलन्स’ असा की वादळ आलं तरी माणूस हलणार नाही – “रॉक सॉलिड”…… गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली – पण आवेश मात्र तो अजिबात नाही …. ब्रेट ली समोरून धावत येतोय… फलंदाजांचा कर्दनकाळ…. वेगाचा बादशहा… ‘हा – ये’ अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल…..अंपायरच्या जवळून झेप घेऊन ताशी १५० कि मी वेगाने ली चेंडू फेकतो…. “शॉर्ट ऑफ गुडलेग्थ” – ऑफस्टंपच्या किंचित बाहेर टप्पा….पुन्हा टप्प्यानंतर स्लिप्सच्या दिशेनी जाणारा ऑटस्विंगर…. त्यात पर्थच्या खेळपट्टीची ती जास्त उसळी…. अनप्लेयेबल – खेळायला केवळ अशक्य !

पण त्या निमिषार्धात साहेबांचा उजवा पाय किंचित मागे सरकतो…. डावा पाय ऑफस्टंपच्या बाहेर येतो…… गरुडासारखी धारदार नजर चेंडूच्या दिशा आणि टप्प्याचा अचूक अंदाज घेते… पूर्ण संतुलन राखत साहेब चेंडूच्या रेषेत येतात….. बॅट किंचित वर उचलली जाते….. आणि पापणी लवण्याच्या तलवारीच्या पात्यासारखी खाली येते…. डोकं बरोब्बर चेंडूच्या वर येतं…. आणि …. आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात…. आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य मध्ये आपण आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा म्हटल्याप्रमाणे खेळांमध्ये असे अनेक महान कलाकार होऊन गेले आणि आहेत की ज्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. आमच्यासाठी खेळांचा राजा म्हणजे क्रिकेट ! बालपणच जिथे चेंडूची एक बाजू घासून वकारसारख्या ‘रिव्हर्स स्विंग’ची आराधना करण्यात गेलं (ते आयुष्यात जमलं नाही हा भाग अलाहिदा) आणि संजय मांजरेकरचं टेक्नीक ३ नंबरला कॉपी करण्यात (ह्यात हेल्मेट मध्ये त्याच्यासारखी पट्टी घालण्याचा पण समावेश आहे) गेलं, तिथे अन्य कुठल्या खेळाच्या प्रेमात पडायला खूप वेळ लागला !

आण्णांच्या यमनसारखा आमच्या साहेबांच्या स्ट्रेटड्राईव्हबद्दल बोलल्यानंतर आता अन्य काही कलाकारांच्या खासियतींबद्दल बोलुया ! अर्थात हे कलाकार मी पाहिलेलेच आहेत आणि ह्याआधी देखील जे अनेक महान कलाकार होऊन गेले त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला नक्कीच आवडेल ! तर देवाचं नाव घेऊन सुरुवात करू.. स$$$$$चिन.. स$$$$$$$चिन !

तर महाराजा आमच्या क्रिकेटच्या साम्राज्याचे अनेक रथी-महारथी आहेत ! पहिला आत्ताच्या काळातल्या अजिंक्य संघाचा झुंजार कर्णधार रिकी पाँटिंग – आणि त्याचा केवळ हेवा करावा असा हुक !

पाँटिंगचा पदन्यास एखाद्या बॅले नर्तकीसारखा (आणि हरभजनला खेळताना कोकणच्या बाल्यासारखा !). वेगवान गोलंदाजानी चेंडू शॉर्ट आपटला की गडी पुल / हुक मारायला सरसावलाच ! किंचित खाली वाकून हा माणूस झकासपैकी आपला उजवा पाय तोडा मागे अन अ‍ॅक्रॉस करून रोवतो. आणि गोलंदाजाच्याच वेगाचा पुरेपूर उपयोग करत चेंडू मिडविकेट / स्क्वेअरलेगला भिरकावून देतो ! बॅलन्स असा की आइस स्केटिंग करणार्‍या पोरींनी धडा घ्यावा !

नंतरचा आमचा “नजाफगढचा नवाब”. ह्याच्या खेळाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे “आम्हा काय त्याचे”. नाजुकपणा, संयम, शांतता वगैरे गोष्टी ह्याच्या वाटेला फारश्या जात नाहीत ! मागच्या बाकावर बसणार्‍या, एका इयत्तेत ३ वर्ष मुकाम केलेल्या विद्यार्थ्याच्या चेहेर्‍यावर मास्तर “छांदोग्योपनिषद” शिकवत असताना जे भाव असतील, साधार॑ण ते भाव चेहेर्‍यावर. चेंडू हा सीमेबाहेर पाठवण्यासाठीच टाकण्यात येतो अशी त्याची प्रगाढ श्रद्धा ! त्याच्या स्क्वेअरकटचं खूप कौतुक होतं. पण मला विचाराल तर त्याची सर्वोत्तम कलाकृती म्हणजे “षटकार” ! मग तो कुठल्याही फटक्यानी आणि कुठेही मारलेला का असेना. “नो हाफ मेझर्स” !

वरच्या फोटोत आणि पन्हाळ्यावरच्या बाजीप्रभूंच्या पुतळ्यात मला खूप साम्य वाटतं ! आवेष तर बघा ! चेंडूची काय बिशाद सीमेच्या आत पडायची !

अहो नंतरचा आमचा कलाकार तर वेगवान गोलंदाजांचा शिरोमणी. हा धावत आला की फलंदाजांच्या उरात धडकी भरायची ! “खेलमें एकही गुंडा होता है और इस मॅच का गुंडा मैं हूं” हाच अ‍ॅटिट्यूड ! त्याच्या “इनकटर” फलंदाजाला भोसकायचा. इम्रान, अक्रमच्या तालमीतला हा खंदा वीर. वकारचा यॉर्कर हा त्याच्या देशाच्या “होम मेड” शस्त्रांइतकाच घातक ! रिव्हर्स होताना ह्याचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर सुरुवात करून लेगस्टंपच्या बुंध्यावर आदळायचा. “सुलतान ऑफ स्विंग” ही उपाधी ह्याच्याइतकी कोणालाच लागू झाली नाही (माझ्या पाहाण्यात).

सुलतान ऑफ स्विंग नंतर अर्थातच “शेख ऑफ ट्वीक”. सर्वकाळचा वादातीत सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर – शेन वॉर्न. किती वेळा असं घडलं असेल की लेगस्पिन म्हणून फलंदाज त्याला कट करायला गेला आणि वेषांतर केलेल्या हारून अल रशीदइतक्या बेमालूमपणे तो चेंडू बाहेर जाण्याऐवजी सरळच घुसला ! जादूगाराने अचानक टोपीतून ससा काढावा तसा वॉर्नचा फ्लिपर अचानक आणि अनपेक्षित यायचा आणि अजून एक वि़केट घेऊन जायचा !

आता हेच बघा ना.. अश्या यॉर्करवर यष्ट्या उधळल्या गेल्यावर फलंदाजाला “धरणीमाते मला पोटात घे” वाटणार नाही तर काय?

बघा बरं – लांडग्यांसारखे शिकार टिपायला वखवखलेले “क्लोझ इन” क्षेत्ररक्षक… फलंदाजाच्या दिशेनी पाठमोरा धावत अपील करणारा वॉर्न आणि “आयला गंडलो परत” असा भाव असलेला आणि अंपायरच्या केवळ इशार्‍याची वाट पहाणारा फलंदाज.. हे दृश्य आपण कितीतरी वेळा पाहिलं आहे !

आणि ह्या लेखातला शेवटचा कलाकार म्हणजे आमचा “दादा”. राहुल द्रविड त्याच्याबद्दल म्हणाला होता “When playing on the off-side first there is God and then there is Sourav Ganguly”…. आणि त्यावर इयान चॅपल म्हणाला… “And God was a right-hander”. आजोबांनी आपल्या नातवाच्या केसांमधून हात फिरवावा तश्या मायेने दादा ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूला कुरवाळायचा… काहीतरी जादू घडायची आणि ७-७ क्षेत्ररक्षकांमधून तो चेंडू सुसाट वेगाने सीमेबाहेर जायचा !

बघा – असा कव्हर ड्राईव्ह क्रिकेटच्या कुठल्याही पुस्तकात बघायला मिळणार नाही. “कुठे तंगडं हालवायचं… त्यापेक्षा उभ्याउभ्याच खेळू”. काय बॅलन्स आणि ‘हेड ओव्हर द बॉल’ घेऊन बसलात राव … जा रे कोणीतरी त्या बाउंड्रीपलिकडचा बॉल घेऊन या !

आमच्या मनाच्या शोकेस मधले हे पहिले काही शोपीसेस. अजून कितीतरी आहेत…………

************************************************************

नुकतीच सच्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्ष पूर्ण झाली. नाय हो.. त्याचं कौतुक…त्याची आकडेवारी, महानता, नम्रपणा वगैरे गोष्टींबद्दल आपण बोलणारच नाहिये ! इथे आपल्याला काम आहे त्याच्या फटक्यांशी ! मैदानाबाहेरचा सचिन, फील्डिंग करतानाचा तेंडल्या आणि बॅटिंग करताना पूर्ण भरात असलेला सच्या ही तिन्ही मोठी अजब रूपं आहेत हो. पहिली दोन विलोभनीय आणि बॅटिंग करताना बोलरसाठी “विलो” भयनीय ! ‘टॉप गियर’ मधला तेंडल्या हा एकत्र तोफा डागणार्‍या ७३ रणगाड्यांपेक्षा संहारक असतो. कट्स, पुल, ड्राईव्ह, लेटकट्स, ग्लान्स, फ्लिक… प्रत्येक चेंडूसाठी किमान २ फटके भात्यात असणं हे परग्रहावरून आल्याचं लक्षण आहे. सच्याची अजून एक खूबी म्हणजे “इंप्रोव्हायझेशन”…. पॅडल स्वीप मारायला गेला.. बॉल थोडा ऑफस्टंपच्या बाहेर पडला.. तर रिव्हर्सच काय करेल… पुल करायला गेला आणि वाटलं की बॉल तितका शॉर्ट नाहीये तर कमरेपासूनच फ्लिक काय करेल.. सगळंच अनाकलनीय !

आता हाच फटका बघा ना…. ह्याचे सगळे कॉपीराईट्स साहेबांकडे आहेत. अर्थात नसते तरी फरक पडला नसता म्हणा – कारण ह्या ग्रहावर असा शॉट अजून कोणी मारूच शकत नाही.

बॉल पायांत असूदे वा शॉर्ट… मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो… अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या “रेंज”मध्ये मन मानेल तिथे मारला जातो. बरं फटक्याचं टायमिंगही असं की शेवटपर्यंत बॉलमागे धावणार्‍या फील्डरला आशा वाटत राहावी. पण शर्यतीत जिंकतो शेवटी चेंडूच.

आमच्या अझ्झूभाईंचा फ्लिक पण असाच. लेझीम खेळतांना जसा हाताला हलका झटका देतात तसा भाईजान झटका द्यायचे आणि नजरेचं पारणं फिटायच ! कलकत्त्यात क्लूसनरची शिकवणी घेतलेली आठवतीये? फिक्सिंगचं शेण खाल्लं नसते तर अझ्झूभाई आमच्या गळ्यातले ताईत होते ! (फोटो जालावर मिळाला नाही). असो !

सच्याचीच क्रिकेटला अजून एक देणगी म्हणजे “अपर कट”. स्लिप्स आणि डीप थर्डमॅन असताना गोलंदाजाचाच वेग वापरून चक्क षटकार मारायचा हा कट फक्त सच्याच शिजवू जाणे ! अहो समोरून येणारा चेंडू रेषेत येऊन टाईम करण ही सुद्धा तुमच्या क्रिकेटच्या कर्तबगारीची कसोटी असते. तिथे हे साहेब शरीरापासून लांब जाणारा चेंडू केवळ खत्तरनाक टायमिंग साधत प्रेक्षकांत पाठवतात !

सच्याची क्रिकेटला देणगी - अप्पर कट

अपर कट काय किंवा पॅडल स्वीप काय.. खेळावा तो आमच्या साहेबांनीच. गोलंदाजाच्या आग ओकणार्‍या वेगावर साहेब अपर कटने असं काही पाणी ओततात की ज्याचं नाव ते !

आता पुढच्या कलाकाराचा फटका बघण्याआधी एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती तशी नाजूक आहे. ६ बाद १३७. .आणि जिंकण्यासाठी ५७ चेंडूंत ७९ धावा हव्या आहेत. एक ऑफस्पिनर चांगला मारा करतो आहे. तेव्हा काय होतं? अचानक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्याला मिडविकेट क्षेत्रात पाठोपाठ ३ चौकार मारतो… धावगती आटोक्यात येते आणि ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून सामना जिंकते ! ९० च्या दशकातली ही कथा. बर्‍याच वेळा घडलेली. पण प्रत्येकवेळी ते चौकार मारणारा एकच – स्टीव्हन रॉजर वॉ !

"काऊ कॉर्नर" ला असा चौकार / षटकार - स्टिव्ह स्पेशल

फिरकी गोलंदाज.. त्यातही ऑफस्पिनर जर डोईजड होऊ लागला तर थोरले वॉ हा फटका हमखास मारायचे. अगदी तणावाच्या परिस्थितीत, थंड डोक्याने जागा हेरून “काऊ कॉर्नर” ला क्षेत्ररक्षकांमधल्या गॅप मधून असा चौकार / षटकार मारणे… थोरल्यांच्या डोक्यातच एक रेफ्रिजरेटर होता ! Shrewd हा शब्द कदाचित ह्याच्याचसाठी बनवला गेला असावा ! We play to win matches, not to win friends ही मानसिकता नसानसांत भिनलेला… आर्मीमध्यी जायचा तो चुकून क्रिकेट खे़ळायला आला की काय असं वाटायला लावणारा – पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेली “बॅगी ग्रीन” शेवटपर्यंत अभिमानाने वापरणारा, खिशात लाल रुमाल ठेवणारा, कधीही हार न मानणारा, पराकोटीच्या प्रेशरमध्येदेखील थंडपणे विचार करणारा चिवट आणि झुंजार संघाचा चिवट आणि झुंजार कर्णधार – स्टीव वॉ !

आणि मग हे त्यांचे बंधू… खरंतर जुळे… पण काही मिनिटं उशीर झाल्यामुळे ‘ज्युनियर’ ! ह्यांची वेगळीच तर्‍हा… म्हणजे जणू काही कॉलेजमध्ये ऑर्केस्ट्राच्या निवडीसाठी गेले.. आणि कोणीतरी व्हायोलिनच्या बो ऐवजी हातात बॅट देऊन बॅटिंगला पाठवला…. हा मनुष्य बॅटदेखील “बो” सारखीच वापरायचा. आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना “शॉट” म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! “अहिंसा परमो धर्मः” म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा… थोपटायचा.. क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस.. फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार… प्रत्येक फटका एक पेंटिंग असायचं – आणि खाली त्या कलाकाराची सही – मार्क एड्वर्ड वॉ !

पण मला जास्त भावतं ते ह्या धाकट्याचं झेल घेणं !

पहिल्या / दुसर्‍या स्लिपमध्ये गडी असा उभा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय ! पण चेंडू त्याच्या रडारवर दिसला रे दिसला की ह्या निवांत “पोलर बेअर” चं रूपांतर चपळ चित्त्यात व्हायचं ! He is undoubtedly the greatest natural catcher that I’ve ever seen – or that I’ve ever had the displeasure to be caught out by – असं गूच त्याच्याबद्दल म्हणाला ते उगाच नाही. अर्थात त्याच्या फलंदाजीतला नाजूकपणा त्याच्या झेल घेण्यातदेखील होता. अतिशय हलक्या हातांनी हा चेडू असा झेलायचा जसा प्रेयसीनी टाकलेलं गुलाबाचं फूल !

ह्यानंतर मार्क वॉचाच कुंभमेळ्यात बिछडलेला भाऊ ! त्यामुळे ह्याला ऑस्ट्रेलियाबद्दल विशेष जिव्हाळा…. २४ सामन्यांत ६ शतकं आणि १० अर्धशतकांच्या सहाय्यानी त्यानी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२०४ धावा केल्या आहेत. कलकत्त्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत अविस्मरणीय खेळी खेळल्यावर खुनशी ऑझीजनी त्याचं बारसं केल – व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ! लेग ला ५ क्षेत्ररक्षक लावून वॉर्न लेगस्टंपच्या बाहेर मारा करत होता. आणि हा बहाद्दर त्याला बाहेर येऊन Inside out खेळत कव्हर्स मधून सीमापार धाडत होता.. आणि एकदा नाही.. अनेक वेळा ! ह्या लक्ष्मणचे ड्राईव्हस सुद्धा असेच प्रेक्षणीय. टायमिंगची दैवी देणगी असल्यामुळे त्याचे ड्राईव्हस बघणे हे नयनरम्य सुख असतं. केवळ अप्रतीम !

लक्ष्मण काय किंवा मार्क वॉ काय – दोघांच्या हातातली बॅट म्हणजे त्यांचा कुंचला होता… क्रिकेटचं मैदान हा त्यांचा कॅनव्हास आणि त्यांची प्रत्येक खेळी एक सुंदर चित्रकृती !

आता “व्हाईट लाईटनिंग” अर्थात अ‍ॅलन डोनाल्ड !

त्याच्या गोलंदाजीपेक्षा मला नेहेमीच आवडायची ती त्याची मैदानावरची देहबोली. मला तर ह्याला बघून नेहेमी बोरिस बेकरची आठवण व्हायची. सामन्याची परिस्थिती कशीही असो – डोनाल्ड नेहेमीच विजेत्याच्या आवेशात. जणू “सामन्याचा निकाल काहीही लागो, विजेता मीच आहे” असा सगळा मामला.

तांत्रिकदृष्ट्या अतिशय सोपी आणि ‘करेक्ट’ धाव आणि गोलंदाजीची पद्धत. झेप घेताना डाव्या खांद्यावरून फलंदाजावर रोखलेली भेदक नजर. “हाय आर्म” आणि सरळ हाताची दिशा आणि अपार कष्टाने कमावलेल्या तगड्या शरीराच्या साहाय्याने निर्माण होणारा तुफान वेग! ह्या अ‍ॅलन डोनाल्डने भल्या भल्यांची भंबेरी उडवली होती. किंग्समीड डर्बनच्या एकदिवसीय सामन्यात सचिन आणि द्रविडशी झालेलं त्याचं द्वंद्व आठवा. आधी सचिननी त्याला मिडविकेटवरून षटकार मारला आणि मग द्रविडनी हल्ला चढवला. तेव्हाच्या डोनाल्डचं वर्णन ‘चवताळलेला’ ह्याच एका शब्दात करता येईल.

९८ साली ट्रेंटब्रिज कसोटीत इंग्लंडला जिंकायला २४७ धावा करायच्या होत्या. १ बाद ५० वगैरे परिस्थितीत नासिर हुसेन आणि माईक आथरटन निवांतपणे लक्ष्याचा पाठलाग करत होते. जिंकण्यासाठी इरेला पेटलेला डोनाल्ड गोलंदाजीसाठी आला आणि सुरू झालं कसोटी क्रिकेटमधील एक अभूतपूर्व द्वंद्व. चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणारा डोनाल्ड आणि त्याला तितक्याच धैर्याने तोंड देणारा आथरटन ! आथरटनच्या बॅटची कड घेऊन गेलेला कॅच बाऊचरनी सोडला तेव्हा डोनाल्ड अक्षरश: धुमसत होता. नंतर बॅटच्या कडेवर उठलेल्या बॉलच्या शिक्क्याभोवती गोल करून आथरटननं तिथे डोनाल्डची सही घेतेली. तेव्हा मला बॉल धूसर दिसत होता असं आथरटनच कबूल करतो. इंग्लंड सामना जिंकलं आणि नंतर ड्रेसिंग रूम मधे आथरटन आणि डोनाल्ड एकत्र बीअर पीत गप्पा मारतानाचं चित्र टीव्हीवर दिसलं ! कसोटी क्रिकेट अंगावर काटा आणतं ते अश्या खेळाडूंमुळेच !

कसोटी क्रिकटचा विषय निघाला आणि आमच्या “ग्रेट वॉल” चा उल्लेख झाला नाही असं होईल का? आपल्या पहिल्याच कसोटीत आणि ते ही लॉर्डस वर पदार्पणात शतक करण्याचा त्याची संधी केवळ ५ धावांनी हुकली. आणि तेव्हापासून बिचार्‍याल नेहेमीच पाच धावा कमीच पडत आल्या आहेत. आपल्या खूप जास्ती टेलेंटेड सहकार्‍यांमध्ये त्याच्या अतुलनीय कामगिरीच्या मानानी द्रविड नेहेमीच झाकोळला गेलाय. एकदिवसीय सामन्यांत ३०० पेक्षा जास्ती धावा झालेल्या दोन्हीही भागीदार्‍यांमध्ये द्रविडचा मोठा वाटा आहे. परदेशात – विशेषतः कसोटीमध्ये द्रविड म्हणजे संघाची लंगोटी असतो. तो गेला की अब्रू गेली ! परदेशातल्या भारताच्या कसोटी विजयांत त्याचा नेहेमीच सिंहाचा वाटा असतो. शिवाय स्लिपमधल्या झेलांचा बोनस आहेच. तरीही हा सर्वार्थानी भारतीय क्रिकेटचा “अनसंग हीरो” आहे.

आमच्या राहुल्याचा हा डिफेन्स बघा ! उसळलेला चेंडू त्याच्या वर जाऊन हलक्या हाताने आपल्याच पायाशी दाबणारा तो राहुल द्रविडच. राहुल “द वॉल” द्रविड काय उगाचच म्हणतात?? कोणत्याही प्रकारच्या पिच वर कोणत्याही गोलंदाजांपुढे, कोणत्याही परिस्थितीत – बिनचुक तंत्र, भक्कम बचाव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तासनतास अभेद्य तटबंदी उभारून खिंड लढवणारा राहुल शरद द्रविड ! भारताच्या कसोटी संघाचा “रॉक ऑफ जिब्राल्टर” !

ह्यानंतरच्या माणसानं क्रिकेट खेळण्याची पद्धतच बदलली. गदेसारखी आपली बॅट परजत आपल्या कातळात कोरलेल्या सोट्यासारख्या हातांनी तो चेंडू मारत नाही तर फोडतो ! जवळपास चाळीसाव्या वर्षीदेखील घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि चपळ रीफ्लेक्सेसमुळे सनथ जयसुर्या आज देखील क्रिकेटमध्ये दबदबा ठेऊन आहे.

जयसुर्याच्या अफलातून फ्लिक इतकाच त्याचा प्रचंड ताकदीनी मारलेला स्क्वेअर कट अतिशय प्रेक्षणीय ! डावाच्या सुरुवातीला बॉस कोण आहे ते दाखवणारा त्याचा फटका ! शॉर्ट आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडला की कचकचीत कट सगळेच चांगले फलंदाज मारतात. पण म्हणून पॉईंटवरून सिक्स?? ती केवळ जयसूर्याच मारू जाणे !

हे म्हणजे शोकेस मधले अजून काही हिरे ! क्रिकेटनं आम्हाला दिलेले… आमची आयुष्य समृद्ध केलेले… आम्हाला आनंदाचे.. जोषाचे…जल्लोषाचे आणि उद्विग्नतेचेही… पण अविस्मरणीय क्षण दिलेले. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे ते उगाच नाही. नैराश्य, भ्रष्टाचार, संताप, शोक, असहायता, फसवणूक, ढासळलेली नीतिमूल्य, गरीबीनी बरबटलेल्या आमच्या आयुष्यात आम्हाला उत्तम उदात्त आणि उन्नताचं दर्शन घडवणारा आमचा हा खेळांचा राजा…. आणि आपल्या कष्टांनी, कौशल्यानं आणि करिष्म्यानं आम्हाला हे आनंदाचे क्षण देणारे ही आमच्या खेळाचे राजे ! जोपर्यंत असे खेळाडू हा खेळ खेळत आहेत तोपर्यंत आम्हीही देहभान विसरून ह्या खेळाचा आनंद घेणार !

****************************************************************

जे.पी.मॊर्गन

2 thoughts on “हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…”

 1. एक नंबर,

  खरं सांगू मी तुमचा फॅन झालो.

  क्रिकेट सगळेच बघतात, (महा)चर्चा ही खूप करतात.
  पण इतके सुंदर निरीक्षण आणि मांडणी मी कधी कधी वाचली नाही. वरील सर्व खेळाडूंचा मी चाहता पण असे काही त्यांचा बद्दल लिहिल की बस्स

  एकच शब्द——————–एक नंबर

  Like

 2. नागेशजी आभार ! पण या श्रेयाचे धनी आहेत जेपी मॊर्गन. मी तर फ़क्त त्यांच्या परवानगीने त्यांचा लेख थोडेफ़ार बदल करुन माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलाय. तेवढाच आपला खारीचा वाटा !

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s