RSS

बिलंदर : अंतीम

10 जून

रावराणे साहेब तसेच बाहेर पडून ८०१ कडे पळाले. दार जोरात ढकलून त्यांनी आत प्रवेश केला. समोर दोन तरुण उभे होते. त्यातल्या एकाकडे बघून त्यांना शॉकच बसला……..

“तू…….? हे सारं तू केलंस? मला विश्वास बसत नव्हता. याने जर सारे पुरावे दिले नसते तर मी विश्वास ठेवुच शकलो नसतो.”

बोलता बोलता त्यांनी दुसर्‍या तरुणाकडे हात केला. तो शांतपणे त्या दोघांकडे पाहात होता. त्याच्या डोळ्यात मात्र काही वेगळेच भाव होते. क्षणभर रावराणेंना त्याच्या डोळ्यात अश्रु तरळल्याचा भास झाला…….

बिलंदर :  भाग १ ते ४

आता पुढे…

*************************************************************************************************************

शिर्‍या विमनस्कपणे बसून होता. कुठल्याही क्षणी ढसा ढसा रडायला लागेल अशी त्याची अवस्था होती. रावराणे साहेब एकदा त्याच्याकडे तर एकदा त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या तरुणाकडे पाहात होते. आणि तो तरूण ….

तो अतिशय निर्ढावलेल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे पाहात उभा होता.

“नाही, तू तो असुच शकत नाहीस? कसं शक्य आहे? तुझ्यावर एवढा विश्वास टाकला मी, प्रत्येक गोष्टीत तुला सामील घेतले, तु कसा काय मला दगा देवू शकतोस?”

शिर्‍या कळवळून उदगारला. त्याच्या चेहर्‍यावरची अगतिकता पाहून रावराणेसारखा कठोर मनाचा माणूसदेखील हळहळला. साहजिकच आहे म्हणा, ज्या व्यक्तीवर आपण स्वतःपेक्षाही जास्त विश्वास टाकला त्यानेच विश्वासघात केला की होणारे दु:ख, ती वेदना खुप त्रासदायक असते. त्यांना मनापासून शिर्‍याबद्दल सहानुभुती वाटली तर त्या तरुणाबद्दल मनस्वी संताप दाटून आला. त्यांनी त्याच क्षणी मनात ठरवले की या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहीजे.

“का केलेस तू असे? का दगा दिलास शिर्‍यासारख्या जवळच्या मित्राला? ज्याने तुझ्यावर पुर्ण विश्वास टाकला त्या शिर्‍यालाच तू खुनासारख्या, तेही एक सोडून चार – चार खुनांच्या भयंकर गुन्ह्यात अडकवलेस? का?”

रावराणे साहेबांनी संतापाने त्याला विचारले.

“आधी मी शिर्‍याच्या प्रश्नांची उत्तरे देतो, साहेब; नंतर तुमच्याकडे वळेन. चालेल?”

त्याने शिर्‍याकडे पाहात अगदी कुत्सितपणे विचारले आणि तो शिर्‍याकडे वळला.

“मि. बिलंदर… खुप घमेंड होती ना तुम्हाला आपल्या बुद्धीमत्तेची. पण तूम्ही मला कधी ओळखूच शकला नाहीत. यु आर परफेक्टली राईट. ज्या सत्याला तू ओळखतोस ना शिर्‍या, तो मी नाहीच. पण जो तू आज पाहतो आहेस ना तोच खरा मी आहे. खुप पुर्वीपासून, अगदी लहानपणापासुन तुमच्या घरावर खुन्नस होती माझी. अकरा वर्षाचा असताना जेव्हा माझ्या बाबांनी मला पहिल्यांदा त्यांची कर्मकहाणी सांगितली तेव्हाच ठरवले होते की चंद्रकांत भोसले नामक माणसाला नेस्तनाबूत करायचे, पुरते उध्वस्त करायचे. त्यामुळेच लहानपणापासून मी तुझ्या अवतीभोवती घुटमळत राहीलो. मुद्दाम तुझ्याच कॉलेजात प्रवेश घेतला. माझा मुळ स्वभाव सोडून मुद्दाम एखाद्या नेभळट, शामळू मुलाच्या अविर्भावात वावरलो. हेतु एकच होता तुझ्या जवळ राहून तुला उध्वस्त करणे, तू आयुष्यातून उठलास की आपोआपच तूझा तो मुर्ख, नालायक बाप उध्वस्त होणार होता.”

तसा शिर्‍या चवताळून त्याच्या अंगावर धावून गेला. रावराणेंनी कसेबसे त्याला आवरले.

“अरे माझ्या बापाने काय घोडे मारलेय तुझे. आणि तुझा संबंधच काय आमच्या घराशी. उलट माझ्या बापाने तर तुला जवळ केला, उलट तू माझा मित्र आहेस म्हणल्यावर तुझा शिक्षणाचा पुढचा खर्चसुद्धा केला. अरे साल्या, माझ्यापेक्षा जास्त जीव लावला माझ्या बापाने तुला. त्याच्या दृष्टीने शिर्‍या वाया गेलेलं पोर होतं. पण तू म्हणजे त्याचा जिव की प्राण होता. त्याचा चांगला मुलगा होतास तू. पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम केलं त्याने तुझ्यावर. आणि खरे सांगायचे तर मला त्याबद्दल कधीच खंत वाटली नाही माझ्या बापाच्या इस्टेटीबद्दल मला कधीच प्रेम नव्हते आणि तशीही त्याने ती दानच करुन टाकली होती.”

शिर्‍या कळवळून उदगारला. तसा तो वस्सकन ओरडला.

“हं, करायचाय काय तो नुसता कोरडा उमाळा. स्वतःही भिकेला लागला तुझा बाप आणि आम्हालाही देशोधडीला लावले. म्हणे दानशुर. अरे कुणी अधिकार दिला तुझ्या बापाला सगळी १७५ एकर जमीन त्या धर्मादाय संस्थेला दान द्यायचा?”

“ए..ए..एक मिनीट, तुझा काय संबंध आमच्या जमिनीशी? आणि आमची जमीन माझ्या बापाने कुठल्यातरी संस्थेला दान केली त्यात तुझे कसले आलेय नुकसान?”

तसा तो क्षणभर शांत झाला.

“हं.. तुझ्या बापाने तुला काहीच सांगितलेलं दिसत नाहीय. कसा सांगणार म्हणा, त्याने कधी तुझ्यावर विश्वासच ठेवला नाही. माझ्या लहानपणापासुन मी आणि माझे बाबा तुम्हा दोघांच्याही नकळत तेच काम करत होतो ना, तुमच्या मध्ये अंतर निर्माण करण्याचे. तुला पत्याचा जुगार शिकवणारा तो गोविंद.. ते माझे बाबाच होते शिर्‍या. तुला रात्री गुपचुप तमाशाच्या फडावर नेवून ती सवय लावणारी माणसंदेखील माझ्या बाबांचीच होती. तुला तुझ्या बापापासुन तोडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होतो आम्ही.

का…? कारण काय? तर शिर्‍या.. फॉर युवर इनफॉर्मेशन माझे खरे नाव माहीत आहे तुला? माझ्या बाबांचे खरे नाव होते अविनाश विठ्ठल भोसले. हो..भोसले. तुझ्या आजोबाच्या दुसर्‍या बायकोचा मुलगा, तुझ्या बापाचा सावत्र भाऊ! नंतर तुम्हाला बरबाद करायचे ठरवल्यावर आम्ही आपले आडनाव बदलून घेतले. आता माझ्या बाबांना तरूणपणी काही वाईट सवयी होत्या खर्‍या, पण कसा का असेना तुझ्या त्या इमानदार आजोबाचा सख्खा मुलगाच होते ना माझे बाबाही. काय तर माझ्या बाबांनी गावातल्या तुक्या महाराच्या बायकोला पळवून नेवून तिला उपभोगली म्हणून तुझ्या आज्याने माझ्या बाबांना आपल्या ईस्टेटीतून थेट बेदखल करावे? अरे असले शौक श्रीमंताची पोरं नाही करणार तर काय तुझ्या बापासारखी नेभळट, सो कॉलड पापभिरू माणसे करणार? त्यासाठी सुद्धा गट्स लागतात रे. जे तुझ्या बापाजवळ कधीच नव्हते. आणि तुझा आज्जा तर त्यापेक्षाही ह….. निघाला. त्याने माझ्या बापाला सरळ इस्टेटीतून बेदखल केले. वर सगळी इस्टेट तुझ्या बापाच्या नावावर केली. आणि तुझा तो दिडशहाणा बाप, त्याला बाबांनी इमानदारीत हात जोडून विनंती केली होती की अर्धी जमीन माझ्या नावावर कर तर साला त्याने सगळीच्या सगळी जमीन एका धर्मादाय संस्थेलाच दान करून टाकली. तेव्हाच माझ्या बाबांनी ठरवलं होतं की तुम्हाला सुखाने जगू द्यायचे नाही म्हणून. माझं सगळं बालपण तुझा आणि तुझ्या बापाचा द्वेष करण्यातच गेलय. क्षण ना क्षण तुला बरबाद करण्याच्या योजना आखण्यात घालवलाय मी. इतकी वर्षे, इतकी वर्षे वाट पाहीलीय मी. आज त्याचं फळ मिळालंय मला. तुझा बाप मेला तेव्हा त्याला आग द्यायला सुद्धा तू जवळ नव्हतास. आता तू या चार खुनांच्या आरोपात फासावर जाशील, किमान जन्मठेप तरी चुकत नाहीच तुझी. आज माझा सुड पुर्ण झाला. आज मी अभिमानाने सांगु शकतो की मी अविनाश भोसले उर्फ अविनाश देशमुखांचा एकुलता एक मुलगा श्रीराम भोसले उर्फ सतीष देशमुख आहे.”

“अच्छा…, म्हणजे तू..तू अविकाकाचा मुलगा आहेस तर. अरे मुर्खा, इतका सुडाने पेटल्यासारखा झाला होतास, थोडा अजुन खोलवर जावून तपास केला असतास तर तुझ्या लक्षात आलं असतं की माझ्या बापाने त्याच्या सख्ख्या मुलाकरता, या शिर्‍याकरता जरी काही ठेवलं नसलं तरी अविकाकाच्या मुलाच्या, श्रीरामच्या .. श्रीरामच खरं नाव आहे ना तुझं, अरे तुझ्या नावावर आजही ५० एकर जमीन आहे रे. माझ्या आज्याने आपली सगळीच्या सगळी १७५ एकर जमीन माझ्या बापाच्या नावावर केली होती. त्यावर तुझ्या वडीलांचा काहीही हक्क नव्हता कारण ती जमीन आज्याची वडिलोपार्जीत जमीन नव्हती, तर ती त्याने स्वतःच्या मेहनतीवर उभी केलेली होती. स्वकमाईने उभ्या केलेल्या इस्टेटीवर वारसाहक्क लावता येत नाही राजा. तरीसुद्धा माझ्या बापाने त्यातली ५० एकर जमीन आपल्या सावत्र भावाच्या पोराच्या नावाने म्हणजे तुझ्या नावाने केलेली होती. या जमीनीमुळे धाकटा भाऊ दुरावला म्हणून माझ्या बापाने त्या जमिनीचा एक तुकडाही आपल्या जवळ ठेवला नाही, अगदी आपल्या स्वतःच्या मुलासाठीही काही ठेवले नाही. सगळी जमीन दान करून टाकली, पण ज्या सावत्र भावामुळे हे सगळे झाले त्याच्या मुलाच्या म्हणजे तुझ्या नावावर मात्र त्याने त्यातले ५० एकर आधीच केलेले होते.”

शिर्‍या अतिशय विषण्ण स्वरात बोलला.

“अबे हाड, हवीय कुणाला तुझ्या बापाची भिक! आमचा वाटा ५०% होता तो वेळीच दिला असता तर आज ही वेळच कशाला आली असती? हात जोडून समोर उभ्या असलेल्या धाकट्या भावाला घराबाहेर काढताना कुठे गेलं होतं तुझ्या बापाचं भावावरचं प्रेम?”

“हात जोडून? हात जोडून नाही, तुझा बाप कोयता घेवून उभा होता सत्या. माझ्या बापाचा आयुष्यभरासाठी अधु झालेला हात त्याची साक्ष होता, एवढेच नाही तर त्या कोयत्याची एक खुण मी आजही माझ्या पोटावर वागवतोय.”

शिर्‍याने आपला शर्ट काढला, पोटावर थेट छातीपासून ते नाभीपर्यंत उभा व्रण होता.

“४२ टाके पडले होते मला तेव्हा. नशिब बलवत्तर होते म्हणून वाचलो नाहीतर मृत्युच ठरलेला होता. तरीसुद्धा माझ्या बापाने ५० एकर जमीन त्याच्या पोराच्या नावावर केली म्हणुन तर माझे न माझ्या बापाचे वाकडे होते. त्याने सगळीच्या सगळी जमीन जरी दान केली असती तरी माझी काही हरकत नव्हती, पण तुझ्या बापासारख्या नालायक माणसाच्या हाती ती पडू नये एवढीच माझी इच्छा होती. पण माझा बाप ऐकला नाही, त्याने माझ्याशी बोलणे टाकले पण जमीन तुझ्या नावावर केली होती. आज त्याला पटले असेल तिकडे स्वर्गात कीं सापाच्या पिलाला कितीही दुध पाजेल तरी कधी ना कधी तो जातीवरच जाणार, दंश करणारच. अरे फासावर जायला घाबरत नाही मी. सगळे आयुष्य वाघासारखा जगलोय आणि वाघासारखा मरेन. राहता राहीला माझ्या बापाच्या अंतीम क्रियेचा विषय तर माझा बाप कधी मी आणि माझा शिर्‍या असलं संकुचीत आयुष्य जगला नव्हता. हे विश्वची माझे घर म्हणणारा आणि मानणारा माणुस होता माझा बाप. हा शिर्‍या नसेल हजर त्याच्या अंत्यविधीला पण त्याने दिलेल्या दानावर, मदतीवर जगणारी त्याची किमान पाचशे ते सहाशे अनाथ मुले होती त्याव्हे अंतीम विधी करायला. सुखाने स्वर्गात गेला असेल तो. माझ्याबद्दल बोलशील तर असेही ही तुझी ही सगळी संघटना उध्वस्त करुन पुण्यच जमा केलय मी. मरणाला नाही घाबरत मी, पण जाताना तुलाही संपवून जाईन.”

शिर्‍या रागारागत सत्याच्या अंगावर धावून गेला.

तसे इतक्या वेळ बघ्याची भुमिका घेवून दोघांचे बोलणे ऐकत असलेले रावराणे मध्ये पडले.

“शिरीष, प्लीज असा हातघाईवर येवू नकोस. अजुन बर्‍याच काही गोष्टी बाहेर यायच्या आहेत. सतीषने अजुन माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. सतीष, मला सांग या टॅलेंट हंटच्या सोनेरी टोळीशी तुझा कसा काय संबंध आला. माझ्या माहितीप्रमाणे तू तिथे साधा नौकर होतास. मग एकदम पार्टनर कसा काय झालास?”

सतीषने एकवार दोघांकडेही पाहीले. पुढे जावून रुमचा दरवाजा व्यवस्थित लॉक करून घेतला. झटक्यात त्याच्या हातात एक रिवॉल्व्हर आले ते त्याने रावराणे साहेबांवर रोखले.

“ओक्के, आत्ता तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही. पण आधी माझा प्लान सांगतो काय आहे ते. इथे या ठिकाणी मी तुम्हाला गोळी घालून खलास करणार आहे. नंतर शिर्‍याला बेशुद्ध करेन आणि गन त्याच्या हातात देवून इथुन बाहेर पडेन. बाहेर पडताना कांगावा करेन की या रुममध्ये एक खुन झाला आहे म्हणून. खरेतर मी इथे फक्त शिर्‍यालाच बोलावले होते, पण तुम्हीही पोचलात त्या अर्थी तुमच्यात आणि शिर्‍यामध्ये काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. पण तुम्ही एकटेच आला आहात या अर्थी या बद्दल इतर कुणालाही कल्पना नसावी. अर्थात हा एक जुगार आहे, पण मी तो खेळणार आहे. कारण एकदा तुमचा मृत्यु झाला की माझ्याविरुद्ध कुठलाच , छोटासाही पुरावा शिल्लक राहत नाही, कारण माझ्याबद्दल पुर्ण माहिती असणारी एकमेव व्यक्ती होती कामिनी…… तिचा या शिर्‍यानेच खुन केलाय. त्यामुळे माझ्याविरुद्ध, मीच या सोनेरी टोळीचा कर्ता धर्ता होतो हे सांगणारा एकही पुरावा शिल्लक राहीलेला नाही. याचे डिटेल्स शिर्‍याव्यतिरिक्त फक्त तुम्हालाच माहीत असल्याने ते तुमच्याबरोबरच संपतील आणि तुमच्या मृत्युनंतर मी पुन्हा माझा जुनाच धंदा सुरू करायला मोकळा. कारण शिर्‍याने कितीही कांगावा केला तरी पाच-पाच खुन करणार्‍या माणसांवर, त्यातूनही एका पोलीस अधिकार्‍याचा खुन ठेवणार्‍या माणसावर कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. शिर्‍या, फॉर योवर काइंड इनफॉर्मेशन, तू केलेल्या प्रत्येक खुनाचे पुरावे आहेत माझ्याकडे फोटोंच्या स्वरुपात जे पोलीसांना घटनास्थळी सापडतीलच. हे बघ…”

असे म्हणून सत्याने खिश्यातुन एक लिफाफा काढून शिर्‍याकडे टाकला. त्यात शिर्‍याचे प्रत्येक वेळचे फोटो होते, इरफानची मान मोडताना, त्याच्यावर पिस्तुल रोखताना, कामिनीला पळवून नेताना, तिला त्या कंटेनरमध्ये नेवुन टाकताना, उलटा लटकलेल्या मोमीनसमोर उभा राहुन बोलताना, त्याच्या प्रेताला गटारीत टाकताना.

“फक्त रोहीतच्या संदर्भातील कुठलेहीही फोटो नाहीत त्यात, पण चार खुनाची शिक्षाही पुरेशी आहे मला वाटतं. या फोटोंच्या निगेटिव्ज अगदी सुरक्षित ठिकाणी आहेत. यदाकदाचित माझे काही बरेवाईट झालेच तर त्या मिडियापर्यंत पोचवण्याची व्यवस्था मी केलेली आहे. ” सत्या खुनशीपणे उदगारला.

तसा शिर्‍या परत उसळला पण रावराणेसाहेब शांत होते.

“शिरीश त्याला बोलू दे आधी. मरणाला मी घाबरत नाही.”

“ग्रेट, देन लेट मी प्रोसीड. बाय द वे कामिनीचं नाव ऐकल्यावर चमकला असाल ना दोघेही. पण ती खरोखरच माझी प्रेयसी होती तिने कधीच मला दगा दिला नव्हता. शेवटपर्यंत माझ्याशी प्रामाणिक होती बिचारी. तिला कळलेच नाही की मी तिला फक्त वापरून घेतोय म्हणुन. हं… प्रेमात पडलेल्या बायका नाहीतरी मुर्खच असतात, हकनाक मेली बिचारी, पण शेवटपर्यंत शिर्‍याला काहीही सांगितले नाही तीने. असो… बॅक टु द बिगिनिंग…

रावराणे, मुळात ही कंपनीच मी चालू केली होती. पण मला कायम अज्ञात राहायचे होते, म्हणुन रोहीत नावाची आज्ञाधारक कठपुतळी मी कंपनीच्या एम.डी.च्या जागेवर बसवली होती. तोपर्यंत सगळे ठिक होते. पण कधीतरी कामिनी माझ्या आयुष्यात आली आणि तिच्यामुळे मोमीनचा प्रवेश झाला. सुरूवातीला मला मोमीनही माझ्या फायद्याचा माणुस वाटला होता, तसा तो होताही. त्याच्या दहशतीचा खुप उपयोग झाला मला माझा धंदा वाढवायला. पण मोमीन आणि रोहीतमध्ये फरक होता. रोहीत म्हणजे माझ्या बोटांवर नाचणारा बाहुला होता तर मोमीन कमालीचा महत्वाकांक्षी. मुंबईचा टॉपमोस्ट डॉन बनण्याचे स्वप्न होते त्याचे. त्यासाठी लागणारा पैसा…

माझी टॅलेंट हंट कंपनी हा खुप चांगला दिखावा होता, काळा पैसा पांढरा करण्यासाठी. मी अज्ञात असल्याने कंपनी रोहीतच्या नावावर होती, मोमीनने हळु हळु रोहीतला फितवला. बहुदा त्याला ५०% ची ऑफर देवून. हळु हळु सारी कंपनी त्याने स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरूवात केली. मला माझा र्‍हास डोळ्यासमोर दिसत होता. पण मी काही करू शकत नव्हतो. कारण मोमीनची ताकद अमर्याद होती आणि कंपनी रोहीतच्या नावावर. अर्थात पैसा सगळा माझ्या अकाऊंट्समध्येच जमा होत होता. पण तो कमावण्याचं साधन हातातून निसटत चाललं होतं. मोमीनला विरोध करणं माझ्या ताकदीबाहेरचं होतं. पण इतक्या मेहनतीने उभी केलेली सगळी दौलत, हे एंपायर मी इतक्या सहजा सहजी त्यांच्या घशात जावू देणार नव्हतो. मग मी कामिनीला हळु हळु माझ्या कह्यात घेतलं. तो रोहीत ही असाच मुर्ख त्याला एकट्यालाच माहीत होतं माझे खरे रुप. पण ते त्यानं मोमीनपासुनही बहुदा लपवून ठेवलं होतं. कदाचीत इमर्जन्सी सिचुएशनमध्ये आपल्याकडे एखादातरी हुकमाचा पत्ता असावा म्हणुन त्याने ते गुपितच ठेवलं होतं. पण तरीही मोमीनला काहीतरी संशय आला असावा. त्यात पुन्हा माझं रावराणेंना भेटणं चालु होतं. त्यांना मी फुटकळ माहिती पुरवत होतो, तीही मोमीनबद्दलची. अर्थात मी पुढच्या भविष्यासाठी स्ट्राँग अ‍ॅलिबी तयार करत होतो, कधी वेळ आलीच आणि पकडला गेलोच तर रावराणेच माझ्या पाठीशी उभे राहणार होते.

पण मध्येच मोमीनच्या मनातला संशय वाढला आणि त्याने मला संपवण्याचा घाट घातला. तो मुर्ख ती गोष्ट कामिनीजवळ बोलून गेला, त्याला काय माहीत की कामिनी माझ्या प्रेमात पागल झाली होती. तिने मला ही गोष्ट सांगितली आणि मी माझा तोतया पुढे केला. त्यांनी ज्याला मारला तो मी नव्हे तर माझा तोतया होता. इरफानने ज्याला मारलं तो मी नव्हतोच, तर माझ्यासारखाच दिसणारा दुसराच तरूण होता. मुका होता बिचारा, त्याला बोलताच येत नव्हतं, आणि हे लोक समजत राहीले की मी अतिशय सहनशील आणि आदर्शवादी वगैरे आहे. त्याच्या प्लास्टिक सर्जरीवर बराच पैसा खर्च केला होता मी. त्याला पैशाचं आमिश दाखवून आत ओढला होता. त्याला काय माहीत मी त्याचा गळासारखा वापर करतोय म्हणुन. या लोकांनी एकदाचा त्याला म्हणजे त्यांच्या कंपनीत काम करणार्‍या सतीश देशमुखला ताब्यात घेतला. मी भुमिगत झालो, पण मला माझी कंपनी मोमीनच्या तावडीतून सोडवायची होती. मोमीनशी टक्कर घ्यायची ताकद तर माझ्यात नव्हती. अशा वेळी मोमीनशी टक्कर घेवु शकेल असे एक नाव माझ्या डोळ्यासमोर आले आणि विचार पक्का झाला. मोमीनला टक्कर देवू शकेल, संपवू शकेल असा एकटा शिर्‍याच माझ्या डोळ्यासमोर होता. आणि या लोकांनी माझा खुन केलाय हे कळल्यावर तर शिर्‍या पेटून उठेल याची खात्रीच होती मला. आणि याद्वारे एका दगडात दोन पक्षी मारले जाणार होते… माझा लहानपणापासुनचा सुडही पुर्ण होणार होता आणि माझी कंपनीही परत माझ्या ताब्यात येणार होती. शिर्‍याचा भडक स्वभाव लक्षात घेता माझा मृत्यु झालाय हे लक्षात येताच तो कसलाही विचार न करता त्या लोकांचे खुन पाडत सुटणार होता. या दरम्यान मी शिर्‍याच्या पाठीवर राहून त्याच्याविरुद्ध पुरावे जमा करत राहणार होतो जे मी केले. माझ्या कल्पनेप्रमाणेच झाले. माझ्या मृत्युची बातमी कळताच शिर्‍या प्रचंड भडकला आणि त्याने पद्धतशीरपणे एकेकाला संपवायला सुरुवात केली. एंड ऑफ द डे मी शिर्‍याला इथे बोलावले, इथे गुपचुप त्याच्यावर पाठून वार करुन त्याला बेशुद्ध करायचे आणि सर्व पुरावे आसपास सोडून देवून पोलीसांना कल्पना द्यायची असा माझा प्लान होता. पण शिर्‍याबरोबर रावराणेंनाही इथे पाहून मला काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. मला माझ्या प्लानमध्ये थोडासा बदल करावा लागतोय. मी आत्तापर्यंत शेकडो भारतीय तरुणी, लहान मुले मी गल्फ, युरोप आणि इतर देशांतून बेकायदेशीरपणे विकली आहेत, तुमचं मुर्ख पोलीसखातं माझ्यापर्यंत पोहोचूही शकलेलं नाहीय, तेव्हा यापुढेही तेच करत राहीन. पण रावराणे साहेब तुम्ही चुकीच्या वेळी इथे आलात, आता तुम्हाला बरंच काही माहीत झालय… तेव्हा यु मस्ट डाय! तुम्हाला मरायलाच हवं. तुमच्या खुनाचाही आरोप या शिर्‍याच्या डोक्यावर टाकून शेवटची पाचर मारली की मी माझ्या सगळ्या इस्टेटीचा भोग घ्यायला मोकळा. कारण तुम्ही फक्त कंपनी सिल केलीय. माझे काँटॅक्ट्स अजुनही मोकळेच आहेत. मी दुसर्‍या राज्यात जावून वेगळ्या नावाने पुन्हा धंदा सुरू करेन. आणि माझा हा जिवलग मित्र (?) चार्-पाच खुनांच्या आरोपाखाली एकतर फासावर चढेल किंवा आयुष्यभरासाठी तुरुंगात तरी जाईल.

सो मिस्टर इन्स्पेक्टर गेट रेडी टू डाय ! आय एम सॉरी पण माझा नाईलाज आहे. मला जगायचे असेल तर तुम्हाला मरावेच लागेल. बाय द वे शिर्‍या, तुझ्या बापाने माझ्या नावाने पन्नास एकर ठेवली आहे हे ऐकुन आनंद झाला. माझा काळा पैसा पांढरा करण्यासाठी मला त्या जमिनीचा बर्‍यापैकी वापर करता येइल. परमेश्वर रावराणे साहेबांच्या आणि … आणि हो त्या मुर्ख कामिनीच्या आत्म्याला शांती देवो. गुड बाय शिर्‍या, तु स्वतःला अभिमानाने बिलंदर म्हणवून घेतोस ना, पण बघ किती सहजपणे मी तुझ्यावर मात केली, खरा बिलंदर मीच ठरलो की नाही. गुड बाय फ्रेंड्स्..गुड बाय!”

मोठमोठ्याने हसत सत्या रिवॉल्व्हरचा ट्रिगर दाबणार तेवढ्यात…

रुमच्या कोपर्‍यातील पडद्याआडुन एक गोळी सणसणत आली आणि तिने सत्याच्या हातातील रिवॉल्व्हरचा वेध घेतला, तोपर्यंत सत्याच्या रिवॉल्व्हरमधली गोळी उडाली होती, पण धक्क्यामुळे नेम चुकला आणि गोळी छताला टकरुन कुठेतरी पडली. त्याच्या हातातील रिवॉल्व्हर गळून पडले. सत्या या अनपेक्षित घटनांमुळे गडबडून गेला होता…

तो एकदा आपल्या जखमी हाताकडे तर एकदा हलणार्‍या पडद्याकडे पाहात होता, कुठे चुकलो हेच त्याच्या लक्षात येत नव्हते.

पडदा बाजुला झाला आणि हातातील रिवॉल्व्हर सावरीत गावडे बाहेर आले.

“योग्य वेळी एंट्री घेतली ना मी साहेब?” त्यांनी रावराणेंना विचारले. तसे रावराणे हसुन म्हणाले…

“एकदम परफेक्ट गावडे. मला भीती वाटत होती, मला धोका आहे बघुन तू वेळेच्या आधीच बाहेर येतोस की काय म्हणुन. पण तू योग्य वेळी योग्य हालचाल केलीस. ग्रेट. आवडलं आपल्याला.”

“तुमच्याच तालमीत तयार झालोय साहेब, पुर्ण तयारीतच होतो मी. त्याने जर आधीच हालचाल केली असतील तर सरळ कपाळातच गोळी घातली असती त्याला मी.”

गावडे हसुन उदगारले.

“थँक्स, माझा जिव वाचवल्याबद्दल.”

रावराणेंनी हसून गावडेंच्या खांद्यावर हलकेच थोपटले. आपले रिवॉल्व्हर बाहेर काढून ते सत्याकडे वळले….

“ओक्के, सत्या नाऊ, तुझ्या माहितीसाठी काही अपडेट्स माझ्याकडून, काल तू जेव्हा शिर्‍याला फोन करुन इथे बोलावलेस, तेव्हा लगेच शिर्‍याने मला फोन करुन माहीती दिली. आतापर्यंतच्या घटना लक्षात घेतल्या तर ८०३ मध्ये तु शिर्‍याला भेटण्याची शक्यता मला कमीच वाटत होती. तरी मी हॉटेलच्या बुकिंग डेस्कला फोन करुन ८०३ बद्दल चौकशी केली. आधी त्याने थोडे नखरे केले पण मी मुंबई क्राईम ब्रांचमधुन बोलतोय हे समजल्यावर तो सरळ आला. मला मिळालेल्या माहितीनुसार कुणीतरी एकाच व्यक्तीने त्या दिवसासाठी ८०३ आणि ८०१ अशा दोन्ही रुम बुक केल्या होत्या. पण अजुनही कोणीच तिथे फिरकले नव्हते. त्यावरून मी अंदाज बांधला की तू किंवा तुझी माणसे आठच्या दरम्यानच तिथे येणार. मी ती संधी उचलली नसती तर माझ्यासारखा मुर्ख मीच ठरलो असतो. मी दुपारीच ८०३ आणि ८०१ अशा दोन्ही रुममध्ये फिल्डिंग लावून ठेवली होती. ८०१ मध्ये गावडे तर ८०३ मध्ये कदम आमच्या माणसांसह तुझी वाट बघत होते. या क्षणी या रुममधल्या अलमारीतही माझी दोन माणसे आहेत. या रे बाहेर… केस संपलीय आता. ”

तसे अलमारीतून दोन पोलीस बाहेर पडले.

“असो, इथे आल्यापासुन जे जे काही घडलं, आतापर्यंत तू जे जे काही बोललास ते सर्व आम्ही व्हिडीओ कॅमेर्‍यावर रेकॉर्ड केलेले आहे. ते बघ टेबलावरच्या फुलदाणीत कॅमेरा लपवलेला आहे. तुला वाटते तेवढे मुंबई क्राईम ब्रांच मुर्ख आणि मागासलेले नाहीये मित्रा. आणि ही सर्व जबानी तू तुझ्या हातात रिवॉल्व्हर असताना दिलेली असल्यामुळे, ती पोलीसांनी जबरदस्तीने द्यायला लावली असा कांगावाही तू करू शकणार नाहीस. माफ कर मित्रा पण विजयाच्या धुंदीने तू थोडासा गाफील राहीलास आणि आम्ही त्याचा फायदा उचलला. आता तुझ्या विरुद्ध तुझीच साक्ष आहे माझ्याकडे, तुझ्यावरचे आरोप एवढे गहन, गंभीर आहेत की तुला किमान जन्मठेपतरी निश्चित होइल याची १००% खात्री आहे मला. तू मघाशी मला गुडबाय म्हणाला होतास ना, मी म्हणतो

“वेलकम टू सासुरवाडी माय डियर फ्रेंड … वेलकम !”

सत्याने निराश मनाने मान खाली टाकली, पण लगेचच कुठल्यातरी विचाराने त्याचा चेहरा उजळला.

“ठिक आहे रावराणे, तुम्ही जिंकलात, माझा एक प्लान उधळून लावलात तुम्ही. पण माझ्या सुडात मात्र मी यशस्वी झालोय. चार चार खुनाच्या आरोपातुन शिर्‍याला कसे वाचवणार तुम्ही. कारण तुम्ही तसा प्रयत्न केलात तरी माझा माणुस हे सारे फोटो मिडियाकडे पाठवेल ज्याचा तुम्हालाच त्रास होइल. नाही रावराणे… तुम्ही शिर्‍याला नाही वाचवु शकत. निदान शिर्‍यावर सुड उगवण्यात तरी मी यशस्वी झालोच आहे.”

सत्या शिर्‍याकडे पाहून खदा खदा हसायला लागला. इतक्या वेळ खाली मान घालुन बसलेल्या शिर्‍याने मान वर केली आणि एकदा रावराणेंकडे बघितले. तसे रावराणे हसायला लागले… आधी हळु हळु आणि मग जोर जोरात….

आता शिर्‍याही त्यांना सामील झाला……

रावराणे आता सत्याकडे वळले आणि त्याला म्हणाले…

“सत्या, दोन समविचारी माणसे एकत्र आली की असा फायदा होतो बघ. म्हणजे बघ त्यादिवशी मला प्रथम एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने मला सांगितलं की इरफानच्या मृत्युबद्दल तो मला माहिती देवू शकतो आणि मी त्याला भेटायचं ठरवलं. पहिल्यांदा जेव्हा मी त्या व्यक्तीला म्हणजे शिर्‍याला भेटलो तेव्हा……

************************************************************************************************

” नमस्कार साहेब, मी शिरीष भोसले.”

रावराणे समोरच्या तरुणाचं बारकाईने निरिक्षण करत होते. त्यांचा अनुभव होता की कुठलाही गुन्हेगार त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवूच शकत नसे. पण समोरचा तरूण निर्भीडपणे, ठामपणे त्यांच्या डोळ्यात बघून बोलत होता. त्याच्या डोळ्यात कसलीही भीती नव्हती, हा कुठेतरी एक कसलीतरी खंत असावी. कदाचीत तो तरूण नुकताच कुठल्यातरी वाईट प्रसंगातून गेला असावा. गेल्या कित्येक वर्षांच्या पोलीस सर्व्हीसचा अनुभव होता त्यांचा.

“नमस्कार, मी इन्स्पे. सतीष रावराणे. बोला काय माहिती आहे आपल्याला इरफानबद्दल?”

आपले नाव ऐकले आणि त्याच्या डोळ्यात एक कसलीतरी वेदना झळकल्याचा भास झाला रावराणेंना.

“साहेब, खुप काही सांगू शकेन मी पण आधी मला हे जाणून घ्यायचय की तुमची माझ्यावर विश्वास ठेवायची तयारी आहे का? महत्त्वाचे म्हणजे माझी कहाणी ऐकल्यावर आणखी काही काळ पेशन्स राखु शकाल काय?”

“ते तुझ्या माहितीवर अवलंबून आहे. राहता राहीला विश्वासाचा प्रश्न तर गेली दहा वर्षे पोलीस खात्यात काम करताना माणसे ओळखायला शिकलोय मी. त्यावरून वाटतेय की तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.”

“हं… माफ करा साहेब, पण तसे असेल तर एका व्यक्तीच्या बाबतीत तुमचा अंदाज चुकलाय. ते जावु द्या, मला सांगा..जर तुम्हाला कळालेय की एखाद्या व्यक्तीने एक खुन केलाय पण अजुनही तो तुमच्या उपयोगी पडू शकतो तर त्याच्यावर विश्वास ठेवू शकाल काय तुम्ही? त्याला हवी तेवढी मोकळीक देवू शकाल काय तुम्ही? असे रोखुन बघू नका, मी स्वतःबद्दलच बोलतोय. पण अजुन माझं काम अपुर्ण आहे. त्यामुळे आज तरी मी सरेंडर करणार नाहीये. तशीच जर वेळ आली तर तुमच्या हातून सुटण्याची व्यवस्था करून आलोय मी. असं समजा की हा एक जुगार आहे माझ्यासाठी, अर्थात जुगार मी लहानपणापासुनच खेळत आणि जिंकत आलोय. जर तुम्ही मदत करणार असाल तर तुमच्यासकट नाहीतर तुमच्या मदतीविनाच मी त्या नराधमांना त्यांच्या अंतापर्यंत पोचवेन.”

शिर्‍या खुप सावध आणि गंभीरपणे बोलत होता. तसे रावराणे थोडे रिलॅक्स झाले.

” शिरीष, मी एक पोलीस अधिकारी आहे. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रिद आहे आमचं. पण माझा कायद्याची आंधळी अंमलबजावणी करण्यावर विश्वास नाहीये. कधी कधी खर्‍या गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आम्हालाही कायदा वाकवावा लागतो. आणि तो तसा आम्ही आमच्या सोयीनुसार वाकवतोही. एनकाऊंटर्स हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे जर तुझ्याकडची इनफॉर्मेशन जेनुइन असेल तर मी तुला मदत नक्कीच करेन. आणि पेशन्स बद्दल बोलशील तर ते माझ्याकडे खुप आहेत. राहता राहीला भाग तुला ताब्यात घेण्याचा तर मला ते जरूरी वाटत नाहीये.”

“रावराणे साहेब, तुम्हाला माझ्याबद्दल अजुन काहीच माहिती नाहीये म्हणून असे म्हणताय तूम्ही. माझी कारकिर्द जर तुम्हाला कळाली तर मला लगेच आत टाकण्याची तयारी कराल तुम्ही.” शिर्‍या हसून बोलला.

“हे बघ शिरीष, तुझ्या भुतकाळात तु काय काय उपद्व्याप केले आहेस त्याबद्दल मला काहीच घेणे देणे नाही. राहता राहीला इरफानचा प्रश्न तर तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो इरफान अजुन जिवंत आहे. पोलीसांनी इरफानची बॉडी ताब्यात घेतली तेव्हा तो मेलेला नव्हता, अजुन जिवंत होता. कारण तू त्याची मान मोडताना तो लगेच मरणार नाही, तर तडफडुन तडफडून मरेल याची काळजी घेतली होती. सुदैवाने नेमकी त्या वेळीच आमची गस्तीची टिम तिथे पोचली आणि इरफान जिवंत अवस्थेत आमच्या ताब्यात सापडला. पण त्यावेळी त्याच्या खुन्याला बेसावध ठेवण्यासाठी म्हणुन आम्ही तो मेला असल्याची बातमी बाहेर पसरून दिली. जी आज तुझ्या पथ्यावर पडतेय, काय बरोबर ना…..!”

तसा शिर्‍याला आश्चर्याचा धक्काच बसला.

“सांगताय काय रावराणे साहेब. धिस इज अ ग्रेट न्युज फॉर मी. असे असेल ना रावराणे साहेब आणि जर तुम्ही मदत करणार असाल तर ही केस सुटल्यात जमा आहे. फक्त खरा गुन्हेगार अजुन गायब आहे, त्याचे नाव, पुराव्यासकट माझ्याकडे आहे पण त्याला शोधण्यासाठी, त्याला बाहेर खेचण्यासाठी आपल्याला थोडा वेळ अजुन थांबावे लागेल.”

रावराणे साहेबांचे विचारचक्र सुरू झाले….

” शिरीष…., माझी तयारी आहे थांबायची. पण याचा अर्थ…. म्हणजे कामिनी…..?”

“अगदी बरोबर, रावराणे साहेब, तीच गुरुकिल्ली आहे या प्रकरणाची आणि ती सद्ध्या माझ्या ताब्यात आहे. भेटणार तिला?”

रावराणेंचा चेहरा उजळला.

******************************************************************************************

रावराणे साहेब बोलत होते, त्यांच्या प्रत्येक वाक्याबरोबर सत्याचा आत्मविश्वास ढासळत चालला होता. त्याच्या चेहर्‍यावरचे हास्य हळु हळु गायब होवू लागले होते. ढासळत्या बुरूजाला शेवटची कुदळ शिर्‍याने मारली.

” बाय द वे सत्या, तुझ्या माहिती साठी म्हणुन सांगतो… इरफानच नाही तर कामिनी, मोमीन पठाण आणि रोहीत हे तिघेही अजुन जिवंत आहेत. कामिनीला तुझी हकीकत कळल्यावर ती आनंदाने तुझ्या नरडीचा घोट घ्यायला तयार होइल. काय रावराणे साहेब?”

रावराणेंनी हसुनच मान डोलावली.

“सत्या तुला वाटते तेवढी कामिनी तुझ्या प्रेमात पागल वगैरे कधीच नव्हती. तुझ्याकडे असणार्‍या पैशाकडे आणि महत्त्वाचे म्हणजे मोमीनबरोबरच्या अनिश्चित आयुष्याला कंटाळुन ती तुझी साथ देत होती. मी तिला भुकेलेल्या उंदराकडून कुरतडून मारण्याची भीती दाखवताच एखाद्या पोपटासारखी ती बोलायला लागली. तिला बिचारीला कुठे माहीत होतं की त्या संदुकीत उंदीर – बिंदीर काही नव्हते तर केवळ एक टेप रेकॉर्डर होता. त्या नुसत्या आवाजानेच ती घाबरली. मी कुठल्यातरी एका रटाळ हिंदी चित्रपटातील साऊंडट्रॅक वापरून ती टेप तयार केली होती. प्रत्यक्षात एवढे उंदीर गोळा करणं, त्यांना एका जागेवरून दुसरीकडे हलवणं शक्य तरी आहे का? पण कामिनी त्या भयानक मृत्युच्या भीतीने घाबरली आणि पोपटासारखी बोलायला लागली….. एकदा मला हवी ती माहिती मिळाल्यानंतर उगीचच तिचा जिव घ्यायला मी काही कुणी विकृत खुनी नव्हतो तुझ्यासारखा.

त्यानंतर तुला पडद्याबाहेर खेचणे हा तर हेतु होताच, पण तुझा हा किळसवाणा, देशविघातक, समाजाला घातक असणारा धंदा उध्वस्त करणे हा मुळ हेतु होता. नेमके त्याचवेळी वाळुंजकरची एंट्री झाली आणि त्याच्या माध्यमातून मी रावराणेसाहेबांच्या संपर्कात आलो. सुदैवाने त्यांनी माझ्यावर पुर्ण विश्वास ठेवला. त्यांच्याकडून जेव्हा इरफान अजुन जिवंत आहे हे कळले तेव्हा मी त्यांची कामिनीशी भेट घडवून आणली. कामिनीने दिलेल्या माहितीवरून आम्ही म्हणजे मी तुझ्या “अविश्री मॅन्शन” ला गुपचुप भेट दिली. तिथल्या तुझ्या बाथरुमच्या आरशामागे लपवलेल्या तिजोरीत बरंच काही सापडलं मला. त्या पुराव्यांच्या साह्याने तुला किमान दोन वेळा फाशी आणि चार वेळेला जन्मठेपेची शिक्षा सहज ठोठावता येइल. काय रावराणे साहेब? ”

आता मात्र सत्या पुरता ढासळला. शिर्‍या पुढे बोलतच होता.

” इथुन पुढे मात्र आम्ही दोघांनी मिळून ही योजना आखली. मोमीनचे लोक मला मुंबईभर शोधत असताना एकदा मी गुपचुप त्याच्या अड्ड्याला भेट दिली होती. त्यावेळी अपघातानेच मला त्या बेसमेंटचा पत्ता लागला होता. जेव्हा मोमीनला उचलायचे ठरले तेव्हा आम्ही त्या बेसमेंटचा वापर करण्याचे ठरवले. त्यापेक्षा योग्य जाग असुच शकत नव्हती त्याला लपवण्यासाठी. कारण ती जागा तुलादेखील माहीत नव्हती. पण माझ्या मागे राहून बहुदा तू तिथेही पोहोचलास. अर्थात तिथे मात्र मला खजिनाच सापडला. पण त्यात सर्व मोमीनची सुत्रे होती, तुझ्याबद्दल काहीच नव्हते. बहुदा त्यामुळेच तू तिथेही आपले अस्तित्व उघड केले नाहीस. तुझ्या वाटेतला एका काटा आपोआपच दुर होत होता आणि मला अडकवण्यासाठी एक चांगला पुरावा तुला मिळणार होता. असो.. तु आसपास असणार याची खात्री होती. म्हणुन तुझी दिशाभूल करण्यासाठी मी मोमीनची सो कॉलड डेड बॉडी तिथुन बाहेर काढून एका गटारीत टाकून दिली. त्याचवेळेस बहुदा तू माझे फोटो काढले असावेस. तुझ्या माहितीकरता म्हणून सांगतो ज्या मेनहोलमध्ये मी मोमीनची डेडबॉडी , खरे तर तो फक्त बेशुद्ध होता तेव्हा…टाकून दिली त्या गटारात रावराणेसाहेबांची माणसे आधीच हजर होती, त्यांनी खालच्याखालून मोमीनला एका गुप्त जागी हलवले. नंतर रोहीतला ताब्यात घेणे तर फारच सोपे होते.”

आता रावराणे साहेब पुढे सरसावले.

“त्यापुढचे काम माझे होते. आमच्या प्लाननुसार मी त्या चौघांच्याही मृत्युची बातमी वर्तमानपत्रातून जाहीर केली कारण आता तूला बाहेर खेचायची वेळ आली होती. तुझ्याविरोधात सगळे पुरावे आमच्याकडे होते. फक्त तु हातात सापडणेच काय ते बाकी राहीले होते. तिथून पुढची कहाणी तर तुला माहीतच आहे. अर्थात या सगळ्या कामात आम्हाला अवधुतची खुप मदत झाली. कारण शिर्‍यावर तुझी बारीक नजर होती. त्यामुळे शिर्‍याचे मला वारंवार भेटणे आमच्या योजनेला घातक ठरले असते. तू सावध होण्याचीही भीती होतीच. म्हणुन मग आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहण्यासाठी अवधुतचा वापर केला. त्यानेही ती कामगिरी आनंदाने आणि हुशारीने पार पाडली. आणि तू आयताच आमच्या जाळ्यात आमंत्रण दिल्यासारखा स्वतःहून चालत आलास. यु आर फिनीष्ड माय फ्रेंड, गावडे बेड्या घाला साहेबांना.”

“एक मिनीट रावराणे साहेब….” शिर्‍या मध्येच पुढे आला… तसे रावराणेसाहेबांच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उभे राहीले.

“एक सांग सत्या, या पुर्ण कालावधीत एकदा तरी तूला असे वाटले होते का रे, की नाही.. मी चुकतोय, शिर्‍या माझा खुप चांगला मित्र आहे, एकदा तरी आपण करतोय ते चुकीचे आहे असे वाटले होते का तुला? अगदी एक क्षणभर जरी तुला तसे वाटले असेल ना तरी एक मित्र म्हणून तुला माफ करून टाकेन मी. कारण आजही सत्या माझ्यासाठी तोच जिवलग मित्र आहे, ज्याच्यावर मी जिवापाड विश्वास टाकला अगदी माझ्या बापापेक्षाही जास्त.!”

शिर्‍या अगदी मनापासून कळवळून बोलत होता.

सत्या मान खाली घालून उभा राहीला. गावडेंनी त्याच्या हातात बेड्या टाकल्या आणि ते त्याला घेवून गेले. सत्या रुमच्या बाहेर पडला आणि इतका वेळ धीराने बोलणारा शिर्‍या ढासळला… त्याला रडू आवरणे मुश्किल झाले. रावराणे साहेब हळुवारपणे त्याच्या पाठीवर थोपटत राहीले. एकदम त्यांना काहीतरी आठवले, ते शिर्‍याच्या पुढे येवून उभे राहीले.

“शिर्‍या इकडे बघ. वर बघ माझ्याकडे. शिर्‍या, तू खरेच बिलंदर आहेस. बाप आहेस बाप. ज्या पद्धतीने तू या केसचा निकाल लावलास ना ते बघून एकच इच्छा होतेय मनात….

रावराणेसाहेबांनी खाडकन पाय जुळवले आणि शिर्‍याला एक खणखणीत सॅल्युट ठोकला.

तसा शिर्‍या हसला.

“शिर्‍या बघ , तुझी इच्छा असेल तर तुला डिपार्टमेंट मध्ये प्रवेश मिळवून द्यायची जबाबदारी माझी. तेवढी पोहोच आहे माझी. आम्हाला तुझ्यासारख्या बिलंदर आणि कलंदर लोकांची खुप गरज आहे. आणि हो एका सतीषने तुला दगा दिला पण हा दुसरा सतीष तुला कधीच दगा देणार नाही याची खात्री मी हा इन्स्पे. सतीष रावराणे तुला देतोय.”

तसा शिर्‍या उठुन उभा राहीला…

“धन्यवाद रावराणे साहेब, तुमची मदत नसती तर मी हे सर्व करुच शकलो नसतो. पण खरे सांगु मी एक उन्मुक्त, स्वच्छंदी प्राणी आहे. आज या फुलावर तर उद्या त्या हा माझा स्वभाव आहे. तुमच्या कायद्याची बंधने मला झेपणार नाहीत. आणि…

शिर्‍याच्या आवाजात त्याचा नेहमीचा खोडकरपणा डोकावयाला लागला.

“आणि मी मुंबईत पैसे कमवायला आलो आहे, तुमच्या बरोबर राहून ते जमणार नाही. तसे मोमीनच्या अड्ड्यावर बरेच काही मिळालेय मला, ज्यात त्याची तिजोरीही होती, जी मी तुमच्यापासुनदेखील लपवलीय. बरीच मोठी आहे ती! बाय द वे काल रोडस्टरची एक झोंडा पाहीलीय मी इंटरनेटवर. पुढच्यावेळी भेटू आपण त्यावेळी माझ्या गाडीतून एक चक्कर मारुन आणेन तुम्हाला. सद्ध्यातरी मुंबईत अनेक मोमीन माझी वाट बघताहेत.”

शिर्‍याने उजव्या हाताची पहिली दोन बोटे कपाळाला टेकवत रावराणेंना एक सलाम ठोकला आणि मिस्किलपणे हसत पाठ वळवून चालायला लागायला. तसे रावराणे साहेब स्वतःशीच हसले. हसता हसता उदगारले….

“बिलंदर आहेस खरा! मुंबईतील तमाम गुन्हेगारांनो….. सावध ! तुमचा बाप येतोय !”

समाप्त

विशाल कुलकर्णी

 

30 responses to “बिलंदर : अंतीम

 1. मकरंद

  जून 10, 2010 at 9:33 pm

  खुप छान जमली आहे कथा

   
 2. harshad

  जून 10, 2010 at 11:50 pm

  Khtarnaak!!!! jabardast.. vaad ch nahi

   
 3. Sudeep Mirza

  जून 11, 2010 at 9:39 सकाळी

  Excellent….

   
 4. Balaji

  जून 12, 2010 at 7:17 सकाळी

  Khupach chaan story aahe.. shevatichi post ekdum turn ghenari hoti

   
 5. ANU

  जुलै 22, 2010 at 3:47 pm

  KHUPCH CHHAN STORY AAHE. I REALLY LIKE IT. KEEP IT UP.

   
 6. bhagyashree

  जुलै 29, 2010 at 2:54 pm

  Tumchya blog la pahilyandach bhet dili ani jam avadla blog!!! Bilandar tar aflatunch ahe:-))
  Mala hollywood cinema pahyalasarkhe vatle…Khupach surekh!!! ashach navin kathechi vat pahat ahot amhi

   
 7. Mrunal

  डिसेंबर 11, 2010 at 3:20 pm

  Excellent! vadh nahi. he vachun mla suhas sirvalkarcya Firoj Iranichi far atvan ali.

   
  • विशाल कुलकर्णी

   डिसेंबर 23, 2010 at 12:03 pm

   धन्यवाद मृणाल, हे पात्र लिहीताना माझ्याही डोळ्यासमोर फ़िरोझच होता. सुशिचं ते सगळ्यात आवडते पात्र आहे माझे.

    
 8. Priya

  नोव्हेंबर 10, 2011 at 4:22 pm

  vishal tuz vachan tagad asal pahije…tyat rahasyakatha mhanje atishay awaghad…ani bhasha shiali hi wachanaryala khilwun thevanari………apratim gosht 🙂

   
 9. Tushar Shripal

  डिसेंबर 13, 2011 at 11:17 सकाळी

  कथा फार आवडली अप्रतिम लेखन आणि मांडणी. तुम्हाला एक विनंती आहे, कि अशीच एखादी कथा हवी जिच्या मध्ये तिलिस्म चा प्रकार हवा जसे पाताळ लोकातील काही संदर्भ, समुद्रितळातील खजिना वगैरे आशा आहे तुमिही आमची इच्छा पुर्ण कराल. Once Again thanks for the TREAT…..

   
 10. मोनिष चौबळ

  एप्रिल 15, 2012 at 12:02 pm

  झक्कास लिहीता तुम्ही विशालराव! फार मजा आली तुमच्या कथा वाचताना! ताकद आहे तुमच्या लेखणीत चांगल्या कथा देण्याच. असाच लिहीत राहा! शुभेच्छा!

   
 11. pravin rane

  सप्टेंबर 29, 2012 at 11:26 pm

  1ch number..vishal dada

   
 12. Rohini Bhosale

  जुलै 1, 2013 at 2:03 pm

  jabardast.. 🙂

   
 13. Yogesh Rahigude

  जुलै 22, 2013 at 3:27 pm

  apratim, ati sundar, ashach bharpur tumachya rahasya katha mala vachayla awadtil. hi katha prasarit kelyabaddal tumhala dhanyavad.

   
 14. Vaibhav Joshi

  जानेवारी 3, 2014 at 10:37 pm

  आता पुन्हा ब्लोग वर येवून या आधीची कथा वाचेन . कमीत कमी १० वेळा older पोस्ट वर क्लिक करून मागे मागे जावे लागेल , त्यामुळे जरा निवांत वेळ असल्यावरच इथे येईन . पण कथा सुरेख होती . त्या वर्तुळ कथेचे काय ते बघा कि . सर्वोत्कृष्ठ कथा आहे ती

   
 15. neeyati

  ऑक्टोबर 8, 2014 at 4:52 pm

  nice

   
 16. Vijay Suware

  मे 11, 2015 at 5:48 pm

  chan katha lihili ahes Vishal…vachtana maja aali…vartul kathecha pudhacha bhag lavkrch tak..ajun vat pahayla lau nkos pls…

   
 17. आशिष

  एप्रिल 5, 2017 at 7:29 सकाळी

  विशाल ही कथा तुम्ही स्वत: लिहीली आहे? कारण ही कथा इतर कुठेतरी वाचल्या सारखी वाटते

   
  • अस्सल सोलापुरी

   एप्रिल 5, 2017 at 11:39 सकाळी

   Yes, it’s my own copyright ! You might have read it on maayboli.com or misalpav.com. I have all my writeups duly copyrighted. Kindly provide the link of the place where you have read this in somebody elses name other than me. In that case I will have to take action against that person.

    

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: