RSS

बिलंदर

11 मार्च

पहाटे साधारण साडेसहा-पावणेसातच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याण स्टेशनावर थांबली. उतरणार्‍या प्रवाशांची घाई सुरू झाली, तशी तिथे दरवाजातच पोटाशी पाय घेवून झोपलेल्या शिर्‍याला जाग आली. जाग आल्याक्षणी आधी त्याने पोटाशी घेतलेली पत्र्याची ट्रंक आणि गळ्यात अडकवलेली शबनम तपासली. दोन्ही वस्तु जागच्या जागी आहेत हे बघितल्यावर शांतपणे एक सुस्कारा सोडत उतरणार्‍यांपैकी एकाला त्याने विचारलं..

“कोणतं स्टेशन आहे हो भाऊ? कल्याण आलं का?”

“कल्याण स्टेशन कल्याणलाच येतं!” उत्तर देणारा बहुदा पुण्याचा असावा.

आलेलं स्टेशन कल्याण आहे हे कळालं तसा शिर्‍या धडपडत उठला. गळ्यातली शबनम सांभाळत एका हाताने त्याने आपली ट्रंक उचलली आणि फलाटावर उतरला.

काळा डगला समोर दिसला तशी शिर्‍या त्याला चुकवून फलाटावरच्या एका ‘खानपान’ गृहाकडे वळला. आत शिरल्या शिरल्या शिर्‍याने सगळ्या टेबलांकडे एक नजर टाकली. एका कोपर्‍यातल्या टेबलापाशी एकटाच बसलेला एक म्हातारा त्याला दिसला, त्याच्याकडे पाहीले आणि शिर्‍याच्या चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आले.

“नमस्कार दादासाहेब, इकडे कुठे?”

शिर्‍याने लांबूनच हात दाखवत त्याला हाक मारली आणि प्रसन्न चेहर्‍याने लगबगीनेच त्याच्याकडे निघाला. टेबलापाशी पोचल्या पोचल्या काखेतली शबनम त्याने टेबलावर ठेवली, हातातली ट्रंक तिथेच बाजुला ठेवली आणि खाली वाकून म्हातार्‍याच्या पायावर डोके ठेवले. म्हातारा बावचळल्यासारखा त्याच्याकडे बघत होता.

आता आजुबाजुचे लोकही काहीशा कौतूकानेच त्याच्याकडे पाहायला लागले होते. चार चौघात अगदी वाकुन, पायावर डोके ठेवून नमस्कार हा प्रकार तसा सदैव घाईत असलेल्या, पंजाबी स्टाईलने नुसते कंबरेत वाकून “पैरी पौना” करणार्‍या बहुतांशी मुंबईकरांसाठी नवीनच होता.

“ओळखलं का नाही दादासाहेब ? अहो, मी शिर्‍या, राजाभाऊंचा धाकटा लेक. बाबा खुप सांगतात तुमच्याबद्दल. त्यांना विलक्षण आदर आहे तुमच्याबद्दल. अगदी त्यांच्या दिवसाची सुरूवात देवाबरोबर तुमच्या फोटोला नमस्कार करूनच होते.”

शिर्‍याच्या चेहर्‍यावरून दादासाहेबांबद्दलचा आदर अगदी भरून वाहात होता. दादासाहेब काहीही न कळल्यामुळे आपला राजाभाऊ नावाचा कोण स्नेही आहे हे आठवण्याचा प्रयत्न करत होते.

“ए भाऊ, बघतो काय फडका मार. एक स्पेशल चहा आणि उपमा घेवून ये. दादासाहेब, तुम्ही काय घेणार. ये भावड्या, यांच्यासाठी पण एक उपमा आण रे.” शिर्‍याने दादासाहेबांसमोर बसता बसता वेटरकडे आपली ऑर्डर नोंदवली.

“नाही, नाही मला फक्त चहा चालेल.” दादा बोलते झाले.

“असं म्हणता, बरं ठिक आहे, ए भाऊ… दादांसाठी फक्त चहा आण.”

चहा आणि उपमावर ताव मारता मारता शिर्‍या बोलत राहीला. ज्या व्यक्तीला फक्त फोटोत पाहीलय त्याला प्रत्यक्ष भेटल्यावर होणारा आनंद त्याच्या शब्दा शब्दातुन व्यक्त होत होता. दादासाहेबही आता खुलायला लागले होते. खाणे आणि चहा संपल्यावर शिर्‍याने बिल मागवले.

“छब्बीस रुपये…., वेटरने बिल आणून ठेवले.

“बस फक्त सव्वीस रुपये? स्वस्त आहे यार तुमची मुंबई.”

आश्चर्य व्यक्त करीत शिर्‍याने विजारीच्या चोरखिशातून एक प्लास्टिकची छोटीशी पिशवी बाहेर काढली. ती उघडून त्यात घड्या करून ठेवलेली एक पाचशेची नोट बाहेर काढली. आणि हसतमुखाने वेटरच्या हातात दिली.

“ओ साब, सुबे सुबे पाचसो का चेंज नै होता है गल्लेमें, छुट्टा दे दो, होर लोग का खोटी मत करो.”
वेटर आपल्या वळणावर आला तसे शिर्‍या वैतागला.

“साला इतना बडा हॉटेल चलाता है और ५०० का छुट्टा नही करके बोलता है”

काय तुमची ही मुंबई अशा नजरेने त्याने सहजच दादासाहेबांकडे पाहीले. आता त्यांनाही राहवले नाही.

“अरे राहू दे रे, सव्वीस रुपये तर बिल झालय, मी देतो ना. त्यात काय एवढं?”

शिर्‍याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

“नाय, नाय दादा, अहो मी चहा पाजलाय तुम्हाला, तुम्ही का म्हणून बिल देणार? ए भावड्या, बघ रे असतील गल्ल्यात सुट्टे.” त्याने नोट जबरदस्ती वेटरच्या हातात कोंबली.

“अरे राजा, काही होत नाही त्याने”, दादासाहेबांनी खिशातून पैसे काढले आणि वेटरला दिले. त्यावर उदारपणे शिर्‍याने खिशातून एक रुपया काढून टिप ठेवली. पाचशेची नोट परत घेतली. दोघेही “खानपान गृहाच्या” बाहेर पडले.

“आपण बाहेर कुठेतरी सुट्टे करुन घेवू ५०० रुपये आणि तुमचे पैसे देवून टाकतो.” शिर्‍या खंतावलेल्या आवाजाने बोलला.

“राहू दे रे. सव्वीस रुपयांचं ते काय? राजाभाऊ कसे आहेत? त्यांना माझा नमस्कार सांग. आणि हो इथे, मुंबईत कुठे उतरणार आहेस? ये की एक दिवस घरी?” दादासाहेबांनी उदारपणे आमंत्रण दिले तसा शिर्‍या उदगारला.

“इथेच टिळक चौकात लेलेंच्या वाड्यात एक मित्र राहतो तिथे उतरणार आहे.” सत्याच्या तोंडुन एकदा टिळकचौकातल्या सु (?) प्रसिद्ध लेल्यांच्या वाड्याबद्दल ऐकले होते ते कामी आले.

“अरे मग ये ना, आपलं घर सुभेदारवाड्यापाशीच आहे. अनंत कुलकर्णी कुठे राहतात म्हणुन विचारलं की समोरचा पानवालासुद्धा सांगेल.”

“येइन दादा, जरुर येइन.”

त्याक्षणीच शिर्‍याने मनात ठरवून टाकले होते की चुकूनही टिळकचौकाकडे फिरकायचे नाही. उगाच पुन्हा मोह व्हायचा.

आणि खरे सांगायचे तर त्या गोड म्हातार्‍याला पुन्हा एकदा उल्लू बनवायचे त्याच्या खरोखरच जिवावर आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गारगोटी’तून नशिब कमावण्यासाठी मुंबईत आलेला शिर्‍या चांगला बी.एस्.सी. होता. सहा फुट उंची, मुळचा गोरा पान पण गावच्या मातीमुळे थोडासा रापलेला रंग, देखणा चेहरा आणि तालमीच्या लाल मातीत कसलेलं शरीर … असा हा शिरीष भोसले कल्याणच्या खडकपाड्यात कुठेतरी राहणार्‍या एका मित्राच्या भरवशावर मुंबईला पैसे कमावण्यासाठी म्हणून आला होता. चांगले-वाईट, सत्य-असत्य, धर्म्-अधर्म असल्या खुळचट समजूतींपासुन खुप दूर होता. तरीही मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सद सद विवेकबुद्धी जागी होती. मनोमन म्हातार्‍या आजोंबांना नमस्कार करून आणि त्यांची माफी मागून शिर्‍याने स्टेशनच्या बाहेर पाऊल टाकले. गाडी जावून तासभर होवून गेला होता, त्यामुळे काळे डगलेवालेही थोडे ढिले पडले होते. त्याचा फायदा घेवून बिनधास्तपणे शिर्‍या बाहेर पडला.

“मुंबई नगरी बडा बाका…. ! मावले, लेकराला पदरात घे.”

एक क्षणभरच त्याच्या नजरेवर सौम्य भाव आले. दुसर्‍याच क्षणी जग विकायला निघालेल्या चार्ल्स शोभराजचा बिलंदरपणा त्याच्या देखण्या चेहर्‍यावर विलसायला लागला.

*****************************************************************
“थांबा जरा, उघडतोय दार! ” आतुन आवाज आला तसा शिर्‍या थोडा मागे सरकला.

आतुन कडी काढल्याचा आवाज झाला. दारात सत्या नव्हता, दुसराच कुणीतरी एक काळासावळा मुलगा दारात उभा होता.

“अं… सतीश…..

शिर्‍याने काही बोलायचे आधीच त्याने विचारले….

“तुम्ही शिरीष ना, शिरीष भोसले.”

“शिर्‍याचा वासलेला आ तसाच राहीला…!” तसा तो समोरचा तरूण हळुच हसला.

“असे चमत्कारिकपणे काय बघताय माझ्याकडे . तुमचा फोटो बघितला होता सत्याकडे. दिवसातून एकदा का होइना तुमची आठवण निघायचीच. अर्थात तो तुम्हा दोघांचा बारावी झाल्यावर काढलेला फोटो आहे असे सतीशने सांगितले होते. त्यात तुम्ही बर्‍यापैकी बारीक दिसत होता.”

“मग बरोबर…. आज समोर एकदम हा वळु कोण उभा राहीला असेच वाटले असेल तुम्हाला.” शिर्‍या मोठ्याने हसुन म्हणाला.

“नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला.” त्या तरुणाने सावरुन घ्यायचा प्रयत्न केला. पण तोवर शिर्‍याचा पुढचा यॉर्कर आला होता.

“का तुमच्या मुंबईत वळूला मोर म्हणतात का? का अजुन काही….?”

तसा तो तरूणही हसायला लागला.

“या आत या, मी अवधूत, अवधूत कामत. सतीषचा रुम पार्टनर. सतीष नेहमी सांगत असतो तुमच्याबद्दल.”

“कमाल आहे, मग एकदा ओळख झाल्यावर पुन्हा अहो-जाहो करणार्‍याचे मी दात पाडतो… मैत्रीखात्यात, हे नाय सांगितले तुला सत्याने.”

अवधूत क्षणभर त्याच्याकडे बघतच राहीला…..आणि मग त्याने जोरजोरात हसायला सुरूवात केली.

“तुझ्या तर, तू बी आमच्याच कॅटेगरीतला आहेस तर…!”

तशी शिर्‍याने त्याच्या पाठीवर जोरात थाप मारली…. “आत्ता कस्सं?”

शिर्‍याने त्याच्या पाठीत थाप मारली तशी अवधूत धडपडलाच.

“च्यायला पैलवानकी करतो का बे तू?” आणि शिर्‍या खदखदून हसायला लागला.

” असो, कुठायत धर्मराज?”

“धर्मराज?”…. अवधूत विचारात पडला.

“सत्या बे…; भाऊ, आम्ही शाळेत असताना सत्याच्या बापाला यम म्हणायचो. तसाच रंग आणि सारखा त्याच्या म्हशींसोबत असायचा ना… म्हणून. आणि यमाचा पोरगा म्हणून सत्या धर्मराज!”

“च्यायला कुठल्याकुठे जातो बे तू…!”

“कुठेपण! आता हेच बघ ना, दोन्-तीन महिन्यापुर्वी सत्याचे पत्र आले होते. ये मुंबईला. रुम आहेच आपली. इथे नोकरी मिळून जाईल सहज. गेल्या महिन्यात आमचा बाप गेला फुकटातलं बाल्कनीचं तिकीट मिळवून ! त्याच्याशिवाय आपल्याला एक सत्या सोडला तर दुसरं कोणी नाही. उचलली धोकटी आणि गाठली मुंबई !”

डोळ्यात येवु पाहणारं पाणी निग्रहाने परतवुन लावत शिर्‍या बळेबळेच हसला तसा अवधुतही गंभीर झाला.

“सोड बे आता इथे आलोय पैसा कमावायला ! मुंबईकर्स सावध आय एम इन युअर सिटी ! बाय द वे सत्या गेला काय ऑफीसला? त्याचा मोबाईलही लागत नाहीये साला सकाळपासुन. त्याच्या ऑफीसचा नंबर आहे काय तुझ्याकडे. त्याला निदान कळवून टाकतो की शिरीष भोसले दस्तुरखुद्द डेरेदाखल झालेले आहेत. काय…?”

अवधुत त्याच्या तोंडाकडे पाहातच राहीला.

*******************************************************************************

“औध्या, तेवढा सत्याचा ऑफीसचा नंबर देतोहेस ना? फोन करुन कळावतो बाबा त्याला. नाहीतर पुन्हा फुलं पड्त्याल आमच्यावर.”

नुकताच स्नान करुन बाथरुममधुन बाहेस पडलेला शिर्‍या डोके पुसत पुसत अवधुतला म्हणाला.

“तु चहा तरी घे मित्रा आधी.” चहाचा कप समोर करत अवधुत म्हणाला.

“अहाहा… क्या बात है! असा आंघोळ केल्या केल्या चहाचा कप समोर यायला खरेच भाग्य लागतय बघ. औध्या, तुझी बायको जाम नशिबवान असेल बघ.”

“ए साल्या…, बायकोला पण चहा करुन पाजावा लागणार असेल तर आपण लग्नच करणार नाही मग. लग्नानंतर सुद्धा सगळे आपणच करायचे असेल तर मग लग्न कशाला पाहीजे?”

“येडा आहेस औध्या ! अरे महिन्यातुन एक दिवस उठल्या उठल्या बायकोला गरम गरम चहा करुन पाज, पुढचा महिनाभर रोज सकाळी न मागता चहाबरोबर नाष्टापण मिळतो की नाही बघ. आणि त्या चहाबरोबर जर “आज तु कसली छान दिसते आहेस राणी” हे एक वाक्य जर व्यवस्थीतपणे उच्चारलेस तर मग अजुनही काय काय मिळत राहील. बायकोला आणखी काय हवं असतं यार? आपल्या नवर्‍याचे आपल्याकडे लक्ष आहे, त्याला आपली काळजी आहे. एवढी गोष्ट त्यांना खुप सुख मिळवून देते. पुरुषच साले कर्मदरिद्री असताता, कितीही मिळालं तरी आपलं समाधानच होत नाही.”

चहा ढोसता- ढोसता शिर्‍याने तत्त्वज्ञान पाजळले.

“जसा काही तुला भरपुर अनुभव आहे, बायकोचा!” अवधुतने टोमणा मारला.

“बायकोचा नाही बायकांचा म्हण ! भरपुर आहे….., फक्त आपल्या नाही तर दुसर्‍यांच्या ! अर्थात प्रत्येक वेळी वरील वाक्यातील शेवटचा शब्द फक्त समोरची व्यक्ती पाहून बदलत राहायचा. राणी च्या ऐवजी काकु, वैनी, ताई, मावशी……! हाय काय आन नाही काय.”

शिर्‍याने हसुन अवधुतला डोळा मारला तसा अवधुत हसायला लागला.

“एनी वेज, शिर्‍या तुला सत्याला भेटता नाही येणार सद्ध्या, किमान सहा महिने तरी!”

अवधुतने बाँब टाकला तसा शिर्‍या चमकला.

“काय? म्हणजे? मी नाय समजलो?”

“शिर्‍या अरे झालं असं की गेल्या आठवड्यात अचानक सत्याला बाहेर जावं लागलं. तुला तर माहीती असेलच त्याची कंपनी फॅशन वर्ल्ड मध्ये आहे. ते वेगवेगळ्या जाहीरात कंपन्यांना मॉडेल्स पुरवतात. गेल्या आठवड्यात अचानक सत्याला आउट ऑफ इंडीया जावं लागलं. जगभरात त्यांच्या कंपनीने काही टॅलेंट हंट शोज आयोजीत केले आहेत, नवीन मॉडेल्स मिळवण्यासाठी. सत्या तिथे इव्हेंट मॅनेजर म्हणुन आहे, त्यामुळे त्याला पण बाहेर जावे लागले. आता त्याला परत यायला किमान ३-४ महिने तरी जातील असे म्हणाला होता, कदाचीत सहा महिनेही लागु शकतील…….!”

” आयला म्हंजे प्रॉब्लेमच झाला की रे. त्याच्या भरवशावर तर मी इथे आलो होतो. पण ठिक आहे, कुछ तो रास्ता निकालेंगे हम ! बाकी सत्याच्या माघारी मी इथे या खोलीत राहीलो तर तुझी काही हरकत तर नाही ना?”

“बस्स का राव? आता तु माझा अपमान करतो आहेस शिर्‍या. आता तु फक्त सत्याचाच नाही तर माझाही मित्र आहेस. मुळात म्हणजे तु खरोखर सत्याचा मित्र आहेस हे मला माहीत आहे. तेव्हा तुला नकार देण्याचा तसाही मला अधिकार नाही कारण ही जागाच मुळी सत्याच्या मालकीची आहे.”

अवधुत थोडा दुखावला गेला, ते पाहुन शिर्‍याला एकदम शरमल्यासारखे झाले.

“सॉरी यार, मला तसे म्हणायचे नव्हते. आणि एक मित्र या नात्याने इथल्या प्रत्येक गोष्टीवर तुझा इक्वल अधिकार आहे. ठिक आहे, नशिबाने मुंबईत आल्या आल्या दणके द्यायला सुरूवात केलीय तर. पण मी त्याचे दणके खात खातच लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे ती फिकीर नाही. पण आश्चर्य याचे वाटतेय की सत्याने मला कळवले कसे नाही?”

शिर्‍या थोडा विचारात पडला होता.

“अरे सगळेच फार घाई घाईत झाले. त्याला पुरेसा वेळही मिळाला नाही. पासपोर्टदेखील तत्कालमध्ये अर्ज करुन घ्यावा लागला म्हणे. एक दिवशी संध्याकाळी ऑफीसमधुन त्याचा फोन आला की आतल्या कपाटात माझी बॅग भरुन ठेवलेली असेल, ती ऑफीसचा एक माणुस येइल त्याच्याबरोबर पाठवून दे. तो स्वतः घरीदेखील आला नाही. तशी सत्याची एक बॅग कायम भरुन तय्यारच असायची कारण त्याचे कामच मुळी फिरतीचे होते. त्यामुळे त्याच्या ऑफीसचा माणुस आला आणि बॅग घेवुन गेला. त्यानंतर एकदा एअरपोर्टवरुनच सत्याचा फोन आला होता..निघालोय म्हणुन! तो शेवटचाच फोन. त्यानंतर त्याचा फोनही नाही, अगदी पोहोचल्याचाही फोन केला नाही. लंडनला उतरल्यावर करतो म्हणाला होता पण बहुतेक विसरला. अर्थात हे त्याचे नेहेमीचेच आहे म्हणुन मी ही निर्धास्त राहीलोय. येइल त्याचा फोन जरा रिकामा झाला की. देशाबाहेर गेल्यानेच बहुदा मोबाईलही उचलत नसावा.”

अवधुतने उत्तर दिले तसा शिर्‍या निर्धास्त झाला.

“चल मला बाहेर पडायचेच आहे ऑफीससाठी, जाता जाता मेसमध्ये तुझी सोय करुन टाकतो. तुला मेसही दाखवुन ठेवता येइल.”

“चल्..निघुया ! कोण चालवतो रे ही मेस? घरगुती आहे की….? आणि मंथली चार्जेस काय आहेत?”

कपडे घालता घालता शिर्‍याने विचारले.

“अरे अग्निहोत्री म्हणुन आहेत. नागपुरचे आहेत…. गेली दहा-पंधरा वर्षे इथेच आहेत. भला माणुस आहे. थोडा किरकिरा आहे फक्त.”

अवधुत आणि शिर्‍या दोघेही मेसमध्ये पोहोचले तेव्हा सकाळचे १०.३० वाजुन गेले होते.

“औध्या, मर्दा…तुझं ऑफीस टायमिंग काय आहे? कुठे आहे ऑफीस तुझं?”

“अरे माझं ऑफीस ठाण्याला आहे. मी एक मामुली कुरीअर बॉय आहे यार. आज तसाही थोडा उशीर झाला होता आणि त्यात तु आलास म्हणुन थोडा उशीरा जाईन, कळवलेय तसे ऑफीसात. नाहीतर ७-७.३० वाजता निघावे लागते मला.”

“वॉव…. बाईक मस्त आहे रे!”

मेसच्या दारात उभ्या असलेल्या एका बाईककडे पाहात शिर्‍या म्हणाला.

“त्यात मस्त काय दिसलं तुला? गेली दिड दोन वर्षे तशीच गंज खात पडुन आहे ती. तात्यांचीच आहे, मेसचे मालक रे!”

“आपण करु रे तिला तंदुरुस्त, आधी हातात तर येवु देत. तात्या…, म्हणतात काय तुझ्या मेस मालकाला! नोटेड….!”

शिर्‍याने बाईककडे बघत मनाशी कसलीतरी नोंद केली आणि दोघेही आत शिरले.

“नमस्कार तात्या!”

काउंटरवर बसलेल्या एका म्हातार्‍याकडे बघत अवधुतने हात जोडले. त्या म्हातार्‍याला बघीतले आणि शिर्‍यातला बिलंदर पुन्हा जागा झाला.

“तात्या, हा शिरीष भोसले… सतीष देशपांडेचा मित्र आता आमच्याच ब्लॉकवर राहणार आहे……

“नमस्कार करुन राह्यलो तात्यासाहेब ! ”

अवधुतचे बोलणे अर्ध्यावरच तोडत शिर्‍याने तिथेच तात्याला वाकुन नमस्कार केला. तात्या आणि अवधुत दोघेही डोळे फाडुन शिर्‍याकडे बघताहेत……

“वा मस्त वाटलं बघा तात्या तुमाले भेटून. आसं आपल्या गावाकडचं कुनी भेटले ना मग कसं जिवात जिव आल्यासारखं वाटुन रायते ना बाप्पा. मले तं वाटाले लागलं व्हतं कि हडे आपल्या जेवणाचं काय होणार देवच जाणे बाप्पा. माज्या मायला तर भल्ली चिंता वाटुन रायली होती राव. आता तीले कळवुन टाकतो की आपल्याकडल्या सारकंच जेवण इथं पण मिळुन रायलं म्हणुन. भल्ली खुश होवुन जाईल बघा.”

अवधुत डोळे वासुन शिर्‍याकडे बघतोय, कुणाच्याही नकळत फक्त त्यालाच दिसेल अशा पद्धतीने शिर्‍याने एक डोळा बारीक केला.

“अरे वा, एकदम बहार आली ना भौ. तुमी पण नागपुरचेच काय?” तात्या खुश…!

“तसा मी वर्ध्याचा बाप्पा! पण शिकायले नागपुरात होतो ना राव. आन नागपुर काय नं वर्धा काय? या कमर्‍यातुन दुसर्‍या कमर्‍यात गेल्यासारखंच नाही का?”

शिर्‍याने उत्तर दिले.

“सह्ही बोल्ला ना भौ तुम्ही. दिल खुश झाला बघा तुम्हाले भेटुन.” तात्याला घरचा माणुस भेटल्याचा आनंद झाला.

“ते जावु द्या ना तात्या, किती रोकडा भराले लागते सुरवातीले तुमच्या मेससाठी…? तेवढा आकडा सांगुन टाका ना बाप्पा.”

शिर्‍याने खिशाला हात घातला…..

“अरे राहु दे रे पोरा, महिना संपला की मग देवुन टाक. आता तुझं नाव नोंदवून घेतो मी.”

“व्वा ह्ये तं भल्लं भारी काम झालं ना बाप्पा. ठिक आहे तात्यासाहेब, मग जेवायला बाराच्या नंतर आलो तर चालेल ना?, आज काय घरीच असेन. उद्यापासुन नोकरीच्या मागं लागाले लागतं ना. आजचा दिवस आराम करीन म्हणतो.”

“चालेल, चालेल… एक – दिड वाजेपर्यंत कधीपण ये ना भौ.”

“बरं नमस्कार….! येतो”

शिर्‍या अवधुतबरोबर मेसच्या बाहेर पडला…. आणि काहीतरी आठवल्यासारखे करुन परत आत शिरला.

“तात्यासाहेब, ती बाहेर उभी असलेली यामा तुमचीच काय?”

“अरे खराब झालीय ती. मेकॅनिक जादा पैसे मागतोय. म्हणुन वर्षभर पडुनच आहे.”

“आस्सं…, बघु जरा माझं नोकरीचं मार्गी लागु देत. मग बघतो तिच्याकडे. झाली स्वस्तात दुरुस्त तर तुमचे काम होवून जाईल. कस्सं?”

शिर्‍याने गळ टाकला आणि मासा गळाला अडकला.

“अरे काढुनच टाकायचीय ती. पण खराब असल्याने किंमत खुप कमी येतेय म्हणुन ठेवलीय.”

“आता खराब झालेली दिसुन तर रायली मलेपण. पण बघू. बघू लागली नोकरी चांगली लवकर तर मीच घेवुन टाकेन अशीच.”

“तसं असेल तर घेवुन जा ना बाप्पा आत्ताच. तशी पण पडुनच आहे ती. जेव्हा जमेल तेव्हा पैसे देशील. आता तु आमच्या सतीशरावांचा दोस्त , त्यात कामतसाहेबांबरोबरच राहतोयस म्हणल्यावर काहीच हरकत नाही. जमेल तसे दे पैसे. नंतर निवांत बसुन ठरवू योग्य ती किंमत तिची.”

भंगारात जाण्याच्या लायकीच्या गाडीला येत असलेलं गिर्‍हाईक सोडायला तात्या काही मुर्ख नव्हते. अवधुतचं नाव घेवुन त्यांनी आपला गॅरेंटर पण तयार केला होताच. त्यांच्या दृष्टीने त्यांना एक मुर्ख सापडला होता. त्या भल्या माणसाला कुठे माहीत होतं की आपली गाठ एका महाचालू माणसाशी पडलीय.

“शिर्‍या, तुझा विचार काय आहे? साल्या गाडी घेवुन तु होशील फुर्रर्र…. आणि हा तात्या माझ्या खनपटीला बसेल.”

“डोंट वरी…य्यार. हम है ना, फिकर नॉट. दुपारीच घेवुन जातो गाडी.”

“अरे त्या खटार्‍याचं काय करणार आहेस.”

तसा सत्या आत्मविश्वासाने हसला.

“अरे भली भली बिघडलेली माणसं वळणावर आणतो मी, ये गाडी किस झाड की पत्ती है. तुला माहिती नाही But shirya is the world famous two wheeler mechanic in gargoti.”

“world famous in gargoti? शिर्‍या तु खरेच ग्रेट आहेस. त्या तात्याला कसला भारी गुंडाळलास रे. वर्ध्याचा म्हणे. धन्य आहात प्रभु.”

अवधुतने हसत हसत कोपरापासुन हात जोडले.

“चल मी निघतो आता. संध्याकाळी भेटूच.”

अवधुत स्टेशनकडे वळला आणि शिर्‍या कल्याणची खबरबात घ्यायला निघाला.

*******************************************************************************

“काय शिरीशभौ, मग आज कुठे दौरा?”

बाथरुममधून बाहेर पडलेल्या अवधूतने टॉवेलने डोके पुसत पुसत विचारले.

“आज वरळीला चाललोय बघ, साधना नायट्रोकेम मध्ये जागा आहेत म्हणून कळालेय. तुला सांगतो औध्या, आता जाम कंटाळा आलाय यार या इंटरव्ह्युजचा. आपण आपलं टाय बीय बांधून, इस्त्रीचे कपडे घालून जायचं. त्या लोकांनी चार प्रश्न विचारायचे आणि शेवटी नेहमीचाच राग आळवायचा. आमचा निर्णय झाला की लवकरच तुम्हाला कळवू! भें….. साले, हे पालूपद आलं की समजायचं… तुमची कन्नी कटली म्हणून. हा आपला शेवटचाच इंटरव्ह्यु बरं का. यानंतर नाही. च्यामारी बुटं झिझायला लागली माझी.”

पायातल्या बुटावर फडका मारता मारता शिर्‍या वैतागलेल्या आवाजात म्हणाला.

“मग काय करणार आहेस बाबा?”

“बघू… काहीतरी धंदा करेन. भाजी विकेन स्टेशनवर… काहीपण करेन… पण हे मात्र बास आता.”

“आणि त्यासाठी भांडवल कुठून आणणार?”

“बघु रे …! त्याने पोट दिलेय ना? तो करेल काहीतरी व्यवस्था? अशीही दुनियेत मुर्खांची काही कमी नाही. दुनिया झुकती है प्यारे..झुकानेवाला चाहीये. अगदीच नाही जमलं काही तर शेवटी रतन खत्री झिंदाबाद.”

“म्हणजे मटका? तुझं काही सांगता येत नाही बघ शिर्‍या, काहीही करशील. तुला योग्य वाटेल ते कर. फक्त कायदेशीरपणे कर. आजचा इंटरव्ह्यु किती वाजता आहे.”

“दुपारी चार वाजता बोलावलेय. बघु जेवण झाल्यावर पडेन बाहेर.”

“काय रे शिर्‍या, एक विचारू?”

“बोल ना मर्दा.”

“तु दिसतोस असा एखाद्या पैलवानासारखा पण नेहमी फक्त डोकेच वापरताना दिसतोस. तुझ्या ताकदीचा कधी वापर केलाहेस का रे?”

“लै वेळा…. आधी बापाबरोबर शेतात राबताना कधी कधी बैलाला कंटाळा आला की बापाला माझी आठवण यायची. नंतर कॉलेजात असताना एकदा केला होता. पण त्यानंतर आमच्या या येड्या सत्याने शपथ घातली की पुन्हा कुणावर हात उचलणार नाहीस म्हणुन. साला तेव्हा पहिल्यांदाच भेटला होता मला, पण पहिल्याच भेटीत एवढा पटला की माझ्यासारख्या माणसाला त्याला नाही म्हणण्याची डेअरिंगच झाली नाही.”

“असं नक्की काय झालं होतं रे शिर्‍या.” अवधूतने उत्सुकतेने विचारले तसा शिर्‍या रंगात आला.

“नुकताच कोल्हापूरात कॉलेजला प्रवेश घेतला होता. तिथल्याच हॉस्टेलवर राहायला. साधारण आठवड्यानंतर एकदा असाच रात्री १२.३० च्या दरम्यान कुठलातरी हिंदी पिक्चर बघून परत आलो होतो….

“असं रात्री उशीरापर्यंत बाहेर राहणं अलाऊड असतं?”

शिर्‍याने एकदा अवधूतला आपादमस्तक न्याहाळलं…

“बाळा तुम्हाला नसतं अलाऊड पण आम्हाला असतं. समजलं…?” तसा औध्या गोरामोरा झाला.

“तर काय सांगत होतो, रात्री उशीरा परत आलो हॉस्टेलवर. तर आपल्या रुमच्या बाहेरच्या बाजुला एकजण व्हरांड्यातच पथारी टाकून वाचत बसला होता. हातात चक्क फिजिक्सचं पुस्तक. कॉलेज सुरू होवून आठवडा झाला नाही तोवर अभ्यास करणारा हा प्राणी पाहून अंमळ गंमत वाटली मर्दा. पण हा रात्री असा रुमच्या बाहेर का बसलाय? माझी उत्सुकता चाळवली आणि त्याला विचारलं, तर उत्तर आलं.”

“माझी रुम सिनिअर्सना हवीय झोपण्याकरता, म्हणुन त्यांनी मला बाहेर झोपायला सांगितलेय.”

“मी त्याच्याकडे पाहातच बसलो…., अबे पण तु पण पैसे भरलेत ना हॉस्टेलचे?”

“ते चार-पाच जण आहेत मित्रा, पुन्हा इथले सिनिअर्स…! त्यांच्याशी वाकडे कोण घेणार?”

आपलं टाळकं सटकलं…..

“कुठली रुम रे तुझी? दाखव मला…

“जावू दे ना मित्रा ! मी सतीश देशमुख… तुझं नाव काय? कुठला आहेस?”

“ते सगळं नंतर सांगेन. मित्र म्हणतोस ना मला, मग चल. च्यामायला भडव्यांच्या…….”

तो नको नको म्हणत असताना त्याला बरोबर घेवून त्याच्या रुममध्ये शिरलो. एकेकाला असा काय चोपलाय म्हणुन सांगतो… एकेक हाड ना हाड खिळखिळं करून टाकलं. वर हाग्या दम भरला… पुन्हा जर आपल्या दोस्तांच्या वाटेला जाल तर गाठ आपल्याशी आहे.”

“मग पुढे काय झालं? त्या लोकांनी तक्रार केली असेल ना.”

“ते कसली तक्रार करतात रे. असा हाणला होता एकेकाला. पण त्यानंतर या येड्याने काय करावं. तशा रात्री रिक्षा आणुन , कुठुन आणली कोण जाणे पण आणली आणि त्या लोकांना दवाखान्यात पोचवलं. परत आल्या आल्या आमच्यावर बाँब टाकला.”

“माफ कर मित्रा, पण आपलं नाय जमायचं. मला हा असला हिंसाचार अजिबात पसंत नाही. आपल्याबरोबर मैत्री करायची असेल तर हे नाही चालणार.”

“तुला खरं सांगतो औध्या, तोपर्यंत कधी बापाचं पण ऐकलं नव्हतं…पण या माणसाने काय जादू केली कुणास ठाऊक… पहिल्याच भेटीत त्याला सांगून टाकलं चल दोस्ता यापुढे तु सांगेस्तोवर कुणावर हात उचलणार नाही. तेव्हापासुन जी सत्याची आणि माझी दोस्ती जमली ती थेट आत्तापर्यंत कायम आहे. सत्यासारखी दोस्त शोधून सापडणार नाही राव. तुला सांगतो तोपर्यंत आपलं रेकॉर्ड होतं… कधीच पास क्लास सोडला नव्हता आपण. साला या सत्याच्या नादाला लागलो आणि घाण केली….

“बी.एस.सी. ला चक्क डिस्टिंक्शन घेतलं…….!”

औध्या मनापासून हासला. हासत हासतच त्याने शिर्‍याला कोपरापासुन हात जोडले, पायात बुट चढवले आणि दाराबाहेर पडला.

दुपारी साधारण एक्-दिडच्या सुमारास अवधूतचा मोबाईल वाजला.

“औध्या, मी शिर्‍या बोलतोय. मला सत्याच्या ऑफीसचा पत्ता हवाय, लगेच.. आत्ताच्या आत्ता. तुझ्याकडे आहे? निदान फोन नंबर तरी दे. मी काढेन पत्ता शोधून. इट्स वेरी अर्जेंट!”

तसा अवधूत चमकला.

“का रे? तुला अचानक सत्याच्या ऑफीसचा पत्ता कशाला……

“तुला पत्ता दे म्हटले ना. उगाच फालतू प्रश्न विचारून डोके फिरवू नको. संध्याकाळी भेटल्यावर सांगेन सगळे. आता आधी पत्ता दे.”

शिर्‍या सॉलीड भडकलेला होता.

अवधूत चमकलाच. शिर्‍याचे हे रुप त्याला नवीन होते. हा माणुस त्याच्या उभ्या आयुष्यात कुणावर चिडला असेल यावर विश्वास ठेवणेच कठीण होते. आणि तोच शिर्‍या आज चक्क अवधूतवर डाफरत होता. अवधूतने त्याला सत्याच्या ऑफीसचा पत्ता दिला.

“संध्याकाळी लवकर ये रे रुमवर.”

“हं….!”

अवधूतला आता मात्र काळजी वाटायला लागली होती. शिर्‍याचे नक्कीच काहीतरी बिनसले होते. अन्यथा शिर्‍यासारखा थंड डोक्याचा माणुस एवढा चिडतो ….. याचा अर्थ काय?

संध्याकाळी अवधुत रुमवर पोहोचला तेव्हा रुमला कुलूप होते.

हळु हळु रात्र व्हायला लागली. शिर्‍याचा अजुन पत्ता नव्हता, तशी अवधूतची चिंता वाढायला लागली. एरवी उशीर होणार असला की शिर्‍या आठवणीने फोन करायचा. पण आज फोनही नाही.

साडे दहा – अकराच्या दरम्यान कधीतरी शिर्‍या घरी परत आला. त्याच्याकडे बघितले आणि अवधुतच्या शरीरावर काटाच आला. शिर्‍याचा शर्ट रक्ताने माखलेला होता. चेहर्‍यावर बँडेज होते. पँट गुडघ्यावर फाटलेली….

अवधूत घाबरून पुढे झाला.

“शिर्‍या, अरे अपघात वगैरे झाला की काय तुला? कुठे पडलास का? इंटरव्ह्यु कसा झाला?”

शिर्‍याने मान वर करून अवधूतकडे पाहीले. ती नजर…. शिर्‍याची ती नजर नेहमीची मिस्कील नजर अजिबात नव्हती. त्यात एक कमालीचा थंडपणा होता. शिर्‍याने काहीही न बोलता खिशात हात घातला आणि एक मुडपलेले पाकीट बाहेर काढले. अवधुतच्या हातात दिले.

अवधूतने पाकीट उघडलं, आत काही कागदपत्रे आणि काही क्रेडिट कार्डस आणि एक डेबिटकार्ड होते……डेबीट कार्डवर छापलेले नाव वाचले आणि अवधूत हादरला….

सतीश देशमुख !

अवधुतने लगेच सारी क्रेडीटकार्डे देखील पाहीली … त्यावरही नाव होते…. सतीश देशमुख !

अवधूतने सारी कागदपत्रे काढली…. ते म्रुत्युपत्र होते…. सतीश देशमुख अर्थात सत्याचे. त्या द्वारे सत्याने आपली सारी स्थावर्-जंगम मालमत्ता शिर्‍याच्या नावाने केलेली होती. अवधूत डोळे फाडून फाडून ती कागदपत्रे पाहायला लागला.

“या सत्याने एवढ्या लवकर आपले म्रुत्युपत्र का बनवून ठेवलेय? आणि हे सगळे तुला कुठे मिळाले?”

तसा इतका वेळ शांत असलेला शिर्‍या ढासळला. इतका वेळ जमा करुन ठेवलेला त्याचा धीर संपला आणि शिर्‍या एखाद्या लहान मुलासारखा अवधूतच्या गळ्यात पडुन रडायला लागला. अवधूतला काहीच कळेना.

“औध्या……… माझा दोस्त गेला रे. मारला त्या भडव्यांनी त्याला.”

अवधूतला हा जबरद्स्त शॉक होता. तो मटकन खालीच बसला.

“शिर्‍या…..

“त्यातल्या एकाला तर आजच संपवलाय मी. या माझ्या हातांनी त्याची मान मोडलीय मी. त्यातल्या एकाला पण सोडणार नाहीय मी. एकेकाला रक्त ओकायला नाही लावले तर नावाचा शिर्‍या नाही. पण त्याच्या आधी ज्या कामासाठी माझ्या दोस्ताचा जीव गेला ते काम पुर्ण करणार आहे मी.”

शिर्‍याच्या एकेका शब्दात अंगार भरलेला होता जणु.

“शिर्‍या तु काय बोलतोयस मला काहीही कळत नाही. अरे सत्या तर परदेशात गेलाय ना….?”

अवधूतचा स्वर रडवेला झालेला होता. गेल्या तीन वर्षात सत्याशी खुप घट्ट मैत्री जमली होती त्याची. त्याच्या प्रत्येक अडचणीच्या काळात सत्या सख्ख्या भावासारखा त्याच्या पाठीमागे उभा राहीला होता ठामपणे. तो जिवाभावाच मित्र आता या जगात नाही ही कल्पनाच त्याला मान्य होत नव्हती.

जरा वेळाने शिर्‍या शांत झाला आणि हळु हळू बोलायला लागला…..

“या सगळ्या गोष्टीला साधारण सहा महिन्यापुर्वी सुरूवात झाली. सत्याला इव्हेंट मॅनेजर म्हणुन प्रमोशन मिळाले आणि

सत्याला थोड्या वरच्या वर्तुळात प्रवेश मिळाला. आणि एका नव्या जगाचे धागे दोरे त्याच्यासमोर उकलायला सुरूवात झाली….!”

“पण शिर्‍या, या सर्व गोष्टी तुला कुठे आणि कशा कळाल्या?”

अवधुतने शिर्‍याला विचारले तसा शिर्‍या बसल्या जागेवरून उठला. कपाटात ठेवलेली एक हॅवरसॅक त्याने बाहेर काढली. त्या हॅवरसॅकमधुन त्याने एक डायरी बाहेर काढली.

“घे हे वाच आणि या अशा तीन डायर्‍या भरल्यात औध्या. त्याही अवघ्या सहा महिन्यात तीन डायर्‍या…..! आता हे विचार, मला या डायर्‍या कशा आणि कुठे मिळाल्या? नाही..तु विचार रे…..!”

“शिर्‍या, जरा शांत हो रे. असा चिडू नकोस यार.”

“शांत होवू.. अरे… अरे औध्या.. माझा मित्र मेलाय. त्याला त्या लोकांनी पुरला, का जाळला का……….

शिर्‍याचा आवाज दाटला, तोंडातून शब्द फुटेनात….. “किं त्याचे तुकडे करून गटारात……….., त्याचे मारेकरी उजळ माथ्याने फिरताहेत आणि मी षंढासारखा वाट पाहतोय संधीची. साला अजुन ते जिवंतपणे, राजरोस फिरताहेत आणि मी…..!”

“शिर्‍या शांत हो आधी…..”

“सॉरी यार औध्या…पण काय करु यार? मेरा सबकुछ था यार वो…. कधी बापालापण भिक नाय घातली मर्दा, पण सत्याने सांगितलं ते डोळे झाकुन ऐकलं. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकुन विश्वास टाकत आलो. सगळी व्यसनं, उलटे सुलटे धंदे सगळं सोडलं आणि हा नालायक मलाच सोडून गेला.”

शिर्‍या ढसा ढसा रडायला लागला, तसा अवधुतने त्याला खांद्यावर हळुवारपणे थोपटले.

“शांत हो शिर्‍या, आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. नक्की काय झालं होतं काही सांगशील का मला? ” हा अवधुत काही निराळाच होता.

शिर्‍याने चमकून एकदम त्याच्याकडॅ पाहीले, पहिल्यांदाच त्याच्या चेहर्‍यावर स्मित आले.

“आता मला सांग, तुला हे नक्की कसं काय कळालं ते.”

शिर्‍या गंभीर झाला.

“औध्या, काल सकाळी माझ्याशी बोलून तू बाहेर पडलास. मलाही इंटरव्ह्युसाठी दिड – दोन च्या दरम्यान निघावे लागणार होते. तसा वेळ होता हातात. म्हणुन थोडं “जाता येता” चाळत पडलो होतो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी उठून दार उघडले तर कुरिअर होतं.”

“सतिष देशमुख इथेच राहतात का? त्याचं एक कुरिअर परत आलय.”

“दोस्ता, सतिष तर नाहीये, तो काही कामानिमीत्त शहराच्या बाहेर गेलाय. खरेतर देशाबाहेर गेलाय. मी घेतो ना ते परत. दे इकडं.”

“नाही साहेब, तसं कुणालाही देता येणार नाही. कुरिअर देताना त्यांनी तशीच अट घातली होती. ज्याच्या नावे आहे त्याला किंवा जर परत आले तर फक्त त्यांच्याच हातात ते देण्यात यावे अशी त्यांची मुख्य अट होती. त्यासाठी त्यांनी स्पेशल पेमेंटदेखील केलेय. तेव्हा सॉरी. हे पार्सल मी फक्त त्यांच्याच हातात देवू शकतो.” कुरिअरवाला आपल्या भुमिकेवर ठाम होता.

“अं अं ठिक आहे दोस्ता, पण निदान ते कुणाला पाठवलं होतं ते तरी सांगशील की नाही. कदाचित मी काही मदत करू शकेन.”

“औध्या, ते पार्सल सतिषने कुणाला पाठवलं होतं माहितीय?”

औध्याच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह अजुनच मोठं झालं.

“त्या पार्सलवर नाव होतं…. श्री. शिरीष भोसले…. पत्ता माझा गारगोटीचा होता. साहजिकच मी माझी ओळख पटवून ते ताब्यात घेतलं. औध्या ते पार्सल म्हणजे एक छोटंसं पाकीट होतं..त्यात फक्त दोन वस्तू होत्या. एक चावी आणि एका स्टांपपेपरवर लिहीलेलं कल्याणमधल्याच एका बॅंकेच्या नावे , माझ्या नावाने असलेलं एक ऑथोरिटी लेटर आणि लॉकर नंबर. मी लगेच बॅंकेकडे गेलो. बँकेच्या लोकांना पटवणं थोडं कठीण गेलं. पण एक तर ते ऑथोरिटी लेटर आणि आपली बोलबच्चनगीरी वापरून मी त्यांना पटवले. त्या लॉकरमध्ये एक बॅग होती… ती…”

सत्याने त्या हॅवरसॅककडे बोट केलं.

*********************************************************************************

“अरे सुदेश, वो इरफान किधर है? आज आनेवाला था, अभी तक आया नही? उसको सुबहसे फोन लगा रहा हू… फोनपे भी आ नही रहा है! ”

“सर..त्याच्या घरी एक माणुस पाठवला होता सकाळी पण घरालाही कुलूप आहे. शेजारी पाजारी म्हणताहेत की काल तो घरी आलाच नाही. ”

“सुदेश, थोडा चेक करो. आजकल ये बंदा थोडा सस्पिशिअस लग ही रहा था मुझे ! लगता है उसको और कोई कस्टमर मिल गया है! देखो इस बार मै कोई रिस्क लेना नही चाहता! बडा लॉट है इस बार. १२ पिसेस है! कमसेकम १०-१२ खोके की बात है… मुझे कोई लफडा नही चाहीये इस बार! वो कल्याणवालेका पेमेंट कर दिया ना पुरा? बाद में कोइ लफडा नही चाहीये मुझे.”

“मै देखता हूं सर, आप फिकर मत करो. जायेगा कहा? रात को चला गया होगा किसी आर.एल.ए. में! मी माणसं पाठवतो त्याला शोधायला. और कल्याणवालेका पुरा पेमेंट सेटलमेंट कर दिया है, आप फिकर मत करो!”

“ओ.के. जैसे ही इरफान आ जाये, या उसका कुछ पता चले मुझे इनफॉर्म कर देना. आय एम लिव्हींग नाऊ. साडे सात बजे एक इंपॉर्टंट मिटींग है बिझिनेस के सिलसिलेंमें !”

“आप बेफिक्र रहो सर, मै इंतजाम कर लुंगा ! इरफान चा पत्ता लागला की तुम्हाला कळवतोच.”

**********************************************************************************

“अवधुत.. त्या हॅवरसॅकमध्ये काही डायर्‍या, एका एन्व्हलपमध्ये सत्याचं मृत्यूपत्र आणि बाकीची कागदपत्रं… क्रेडिट कार्डं वगैरे होती. मृत्युपत्र पाहून मी ही हादरलो. मग त्या डायर्‍या वाचायला सुरूवात केली. त्या डायर्‍या चाळताना एक गोष्ट लक्षात आली की सत्या खुप मोठ्या प्रकरणात नकळत गुंतला गेला होता.”

“म्हणजे मी समजलो नाही? सत्यासारखा माणुस कुठलीही चुकीची, बेकायदेशीर गोष्ट करणार नाही, याची खात्री आहे मला.”

“मलाही आहे. म्हणुनच या प्रकरणाच्या मुळाशी जायचा निर्णय घेतला. कारण डायरीतील काही गोष्टी खुप भयानक आहेत औध्या. तुला तर माहीतीच आहे, सत्याची कंपनी मॉडेल्स हंट, टॅलेंट हंटसारखी कामे करते. वेगवेगळ्या स्तरातून गुणी माणसं… मग त्यात मुलं, मुली सगळेच आले, निवडून त्यांच्या कला गुणांना राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर वाव मिळवून द्यायचा. यातून त्याची कंपनीही प्रचंड कमिशन कमवते.”

“बरोबर…! माहीत आहे मला. गेल्या महिन्यात मी सत्याला विचारलं पण होतं. माझी चुलत बहीण खुप छान गाते. गाण्याच्या परीक्षाही झाल्या आहेत तिच्या. तिच्यासाठी काही संधी मिळाली तर बघ म्हणालो होतो मी सत्याला. तर एवढा चिडला, म्हणला असल्या टॅलेंट हंट मधुन गुणवत्तेला वाव मिळत नसतो. तिला म्हणाव प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा… कधीना कधी नक्की संधी मिळेल. थोडा राग आला होता त्यावेळी सत्याचा, पण नंतर थोडा विचार केल्यावर त्याचे म्हणणे पटले मला.”

अवधुत.. अरे सत्याने तुला नकार दिला कारण त्याच्या कंपनीचा खरा व्यवसाय काही वेगळाच आहे. अशा शोज मधुन मुलं, मुली गोळा करायचे. ही माणसं गोळा करताना शक्यतो फारसे पाश नसलेली, किंवा अगदी गरीब घरातून आलेली मुलं, मुली गोळा करण्यात यायची. त्यातल्या काही जणांना खरोखर त्याचे गुण, कला जगासमोर पेश करण्याची संधी मिळायची. बाकीच्यांना इंटरनॅशनल शो साठी म्हणुन दुबई, मस्कत ई. ठिकाणी पाठवण्यात यायचं. प्रत्येक काम मनापासुन करण्याची घाणेरडी खोड असलेल्या सत्याने या सगळ्याचं एक स्टॅटिटिक्स काढण्यासाठी म्हणून थोडा खोलवर जावून अभ्यास केला, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की अशा ठिकाणी गेलेल्या व्यक्तीपैकी विशेषतः लहान मुले आणि तरुण मुलींपैकी ५० ते ६०% जण परत आलेलेच नाहीत.”

“काय? तुला नक्की काय म्हणायचय शिर्‍या?”

अवधुत जवळजवळ ओरडलाच.

“मला पक्कं माहीत नाही. पण सत्याने एक छान शब्द वापरलाय यासाठी…. फ्लेश मार्केटिंग !”

“फ्लेश मार्केटिंग?… ते काय असतं बाबा आणखी?” अवधुत गोंधळात पडला होता.

” नो आयडीया… पण बहुतेक वेश्या व्यवसायाला किंवा त्याच्याशी संबंधीत व्यवसायाला फ्लेश मार्केटिंग म्हटलं जातं.” शिर्‍याने अवधुतकडे रोखुन बघत उत्तर दिलं.

“म्हणजे तुला असं म्हणायचय की या अशा टॅलेंटहंटमधून गोळा केलेल्या तरुण मुली गल्फमध्ये वेश्याव्यवसाय किंवा तत्सम गोष्टींसाठी विकायचं काम सत्याची कंपनी करते? तसं असेल तर हे खुप भयंकर आहे. आपल्याला पोलीसांकडे जायला हवं शिर्‍या.”

“गप बे… पोलीसांकडे जाण्यासाठी पुरावा लागतो. आणि सत्याच्या या डायर्‍या पुरावा होवू शकत नाहीत. अ‍ॅंड फॉर युवर काईंड इन्फॉर्मेशन, पुरावा मिळाला तरीही मी पोलीसांकडे जाणार नाही. माझ्या सत्याच्या मारेकर्‍यांना मी माझ्या हाताने शिक्षा देणार आहे.”

“पण मग लहान मुलांचं काय होतं? त्यांचे आई-वडील पोलीसांकडे जात असतीलच ना? आणि त्यांना कुठे आणि कशासाठी विकले जाते?”

“औध्या, मुळात अशा कारणासाठी निवडली गेलेली मुले सरळ सरळ झोपडपट्ट्यांतुन उचलली , पळवली जातात. इतर कलाकारांबरोबर त्यांना बाहेर पाठवले जाते. पण ही मुले परत येत नाहीत. कुणी तक्रार केलीच तर कधी पैसे देवून, कधी धाक दपटशा करुन त्यांना गप्प बसवले जाते. आता या मुलांचा उपयोग काय म्हणशील तर गल्फ देशांतील अरबांच्या विकृत वासनांसाठी किंवा मग उंटांच्या शर्यतीसाठी.”

सत्याचा चेहरा तापलेल्या विस्तवासारखा भयंकर दिसत होता.

“हे खुपच भयानक आहे रे शिर्‍या. पण मग आता आपण काय करायचं?”

“मी माझ्यापरीने सुरूवात केलीय. काल मी सत्याच्या ऑफीसात गेलो होतो… नोकरी मागायला. माझा चेहरा आणि शरीर हे महत्त्वाचं साधन ठरू शकेल तिथे प्रवेष मिळवण्यासाठी. इंटरव्ह्यु देवून आलोय. तिथे मी माझी इमेज पैशासाठी काहीही करायला तयार असलेला एक तरुण अशी तयार करुन आलोय. विशेष म्हणजे इंटरव्ह्युच्या वेळी त्यांनी मला तुला लवकरच कळवू म्हणुन वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पण त्यानंतर दोनच तासांनी मला त्यांच्या एका माणसाने गाठले.”

“अच्छा, म्हणजे त्या लोकांनीच तुला मारहाण केली तर……..!” अवधुत सावरुन बसला.

“चल बे, लाल मातीतलं शरीर आहे हे. तो किस्सा वेगळाच झाला…..!”

शिर्‍या कालचा तो प्रसंग डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करु लागला….

**********************************************************************************

इंटरव्ह्युनंतर शिर्‍या बाहेर पडला तो थेट समुद्रावर पोचला. डोक्यात विचारांचं थैमान माजलेलं.

सत्याचं नक्की काय झालं असेल? सत्या या क्षणी कुठे असेल? काय करत असेल? हजार प्रश्न….. हजार शंका…..

“पैसा कमाने आये हो दोस्त?”

कुठुनतरी प्रश्न आला आणि शिर्‍याने एकदम मान वळवून बघितले.

“कोण बे तू?”

“अरे दोस्त बोल रहा हुं तो दोस्त ही रहुंगा ना!”

“हे बघ राजा, आपण कुणाशीही अशी लगेच दोस्ती करत नाही. कोण आहेस आणि काम काय आहे ते बोल? मग ठरवेन दोस्त आहेस की……”

शिर्‍याच्या आवाजात खुन्नस होती.

“दोस्त… वहीसे हूं…जहा अभी तुम इंटरव्ह्यु देके आ रहे हो….! वैसे नाम इरफान है मेरा………

आता मात्र शिर्‍या सावरून बसला.

“उस कंपनीसे क्या रिश्ता है तेरा?”

“दोस्त… वैसे तो कुछ भी नही, लेकीन बोले तो अपुन उनका छोटा मोटा सप्लायर कम केअर टेकर है! तु काम का बंदा लगा इस लिये तेरे को पिच्छा किया अपुन. बोले तो… वो कंपनीमें तो तेरा काम बननेवाला नै, तो अपनने सोचा क्युं ना अपने साथ जोड लु तेरे कु! क्या बोलता है…….! एक काम करते है… दारु पियेगा? हलक सुखा हो तो अपनेको कुछ नही सुझता है!”

संधी दार ठोठावत होती, ती सोडणार्‍यापैकी शिर्‍या नव्हता…

“पिलायेगा? आपल्याकडे काम नाय, काम नाय तर पैसा नाय? पैसा नाय तर जिंदगीत कायपण मजा नाय? तु दारु पिला. पण काम आपल्याला आपल्या लायकीचं वाटलं तरच करणार?”

“अरे चल यार, तु भी क्या याद करेगा , किस रईस से पाला पडा था? चल किसी वाईन शॉपसे पैले एक खंबा खरिदते है!”

“इसका मतलब हम किसी बार में नही बैठेंगे?” शिर्‍याने विचारले.

“बच्चा है रे तु, सच्ची बच्चा है…. तेरे को तराशना पडेंगा!ऐसी बाते बार में नही कही अकेलेमेंही की जाती है बच्चे”

एखाद्या लहान मुलाकडे बघुन हसावे तसा इरफान हसला. शिर्‍याने प्रचंड लाजल्यासारखा चेहरा केला. त्याचा या वेळचा अभिनय पाहून प्रत्यक्ष दिलीपकुमारही लाजला असता.

“सॉरी भाय, चुक झाली.”

“चलता है, चलता है…. तेरको मालुम क्या? तेरेको पैली बार उदर देखा तब्बीच मै समझ गया, तु काम का बंदा है, नजर तय्यार हो गयेली है भाई अपनी. वो क्या बोलते है… चोर की गली चोरकोईच मालुम…..”

मोठा जोक केल्यासारखा इरफान स्वतःशीच हसला. तसे शिर्‍यानेही त्याला साथ दिली. बाटली घेवून दोघे माहिमच्या किल्ल्यावर पोचले. तिथल्या मागच्या खडकात बसल्यावर इरफानने बाटली काढली. बरोबर एक बिस्लेरी आणि दाळ, कांदा, शेंगा असा चखणा होता. एकदा प्यायला सुरूवात झाली तसा शिर्‍या सावध झाला. त्याने आपला वेग कमी केला. आधीच बेसावध आणि दारुने अजुनच कामातुन गेलेला इरफान अजुनच बरळायला लागला.

“तुम ये काम कबसे कर रहे हो गुरू?” शिर्‍याने अदबीने विचारले तसा इरफानने विषय बदलला.

“वो छोडो यार, तुम इतना बोलो… पैसा कमानेका है?”

“बिल्कुल भाई, त्यासाठीच तर आलोय.”

“किस हद तक जा सकता है?” इर्फानचा थंड स्वरातला प्रश्न.

शिर्‍या सावध झाला. समोरचा माणुस नक्की सांगतो तोच आहे कि आणखी कोणी?

“देखो भाई, मेरा हद बतानेसे पहले मै तुम्हारे बारेमें जानना मंगताय. खात्री काय की तु सांगतोस ते खरेच आहे? तु पोलीसांचा माणुस नाहीस कशावरुन? मी काहीतरी बोललो आणि तुम्ही लोकांनी मलाच अडकवला तर काय? प्लीज गलत मत समझना……!”

तसा इरफान हसायला लागला.

“अपुन … हौर पुलीसका आदमी? मेरे भाय वेस्टर्न लाईनके किसी भी पुलीस स्टेशनमें जाके देख. नोटीस बोर्डपें अपुनका फोटो मिलेगा तेरेको. फिरभी तेरेको खात्री दिलाने के लिये एक रिसेंट किस्सा बताताय तेरेको……! जो अब्बी तक पुलीसकोबी मालुम नै…”

शिर्‍या लक्ष देवून ऐकायला लागला.

अब्बी कुछ दिन पैले कंपनीने नया लॉट बाहर भेजा. साला तेरेको पैले ये बताना पडेंगा की लॉट क्या होता है! तो सुन… ”

“भाई, एक बात बताओ लेकीन, हम लोग आज ही मिले है… तुम मेरेको जानता भी नही है… फिरभी इतना भरोसा? ये खतरनाक हो सकता है भाई!”

शिर्‍याने मध्येच चेतावणी दिली तसा इरफान हसायला लागला.

पिछले १० सालसे इस धंदे में हू बच्चे. आदमी पैचानना मेरेकु आता है! हौर अगर तू नाटक करेगा तो उसका बी इलाज है ना मेरे पास…..

“इरफानने डाव्या हाताने बाटली सरळ तोंडाला लावली आणि उजव्या हाताने कंबरेला मागच्या बाजुला पँटमध्ये खोचलेले पिस्तुल काढून शिर्‍याच्या समोर धरले.”

तसा शिर्‍या दचकुन मागे सरला…

“डर मत बच्चे सिर्फ दिखा रहा हूं!”

इरफान खदाखदा हसला. पोटात गेलेली दारु असर दाखवायला लागली होती. शिर्‍या नुसतेच पीत असल्याचे नाटक करत अजुनही पहिलाच पेग घेवुन बसला होता. इरफानने पिस्तुल परत पाठीमागे पँटमध्ये खोचले. पण यावेळेस दारुच्या नशेत पिस्तुल नीट खोचली न जाता गळून मागे पडले. पण इरफानच्या ते लक्षातच आले नाही. तो गटागटा दारु पीतच होता.

“हा भाई तुम कुछ बोल रहे थे…

“मै कुछ बोल रहा था… क्या बोल रहा था? वो साली बिपाशा क्या नाचती है ना…. बिडी जलाईले….इरफान उठुन ठुमके मारायला लागला.

“च्यायला याला चढली बहुतेक! अरे भाई, आप वो लॉट के बारे में….

“हा हा.. लॉट माने चमडी ! चमडी जानताय ना तू…. औरत जात….! तो ये कंपनी टेलेंट शो की आडमें लडकीया सप्लाय करती है… गल्फ कंट्रीज हौर युरोपमें. इस बार कंपनीने एक नये बंदे को इस धंदेमें डाल दिया. बोले तो बंदा पैलेसेइच कंपनीमें था, लिकीन ये कामके बारेमें नै जानता था! अच्छा बंदा था बेचारा….

शिर्‍याने कान टवकारले. मस्तकाच्या शिरा तडातडा उडायला लागल्या. बहुतेक त्याच्या इथे येण्याचा उद्देष्य सफल होण्याच्या मार्गावर होता…

“सतीश नाम था उसका…….

शिर्‍याने महत्प्र्यासाने स्वतःला आवरले. पण त्याच क्षणी इरफानचे नशीब फिक्स झाले होते. इरफान आपल्याच तंद्रीत बोलत होता.

“साले को भोत चरबी थी. बॉसने उसको अंदर लेके भोत बडा गलती किया. मालुम तेरेको… इस बंदेने तीन महिना गुपचुप तहकिकात करके सारी इन्फॉर्मेशन निकाल ली थी! कोई पुलीसवाला उसका साथ दे रैला था! लेकीन बॉसभी कच्ची गोलीया नै खेलेला है.. उसको पता चल गया तो उसने इस बंदे को फोरेन भेजने का प्लॅन बनाया! बंदा खुश्..बोले तो उसको इंटरनॅशनल लेवलका जानकारी निकालनेको मिलता ना! लेकीन बॉसने दिमाग चलाया…..

इस बंदेकी जगे दुसराच आदमी उसके नामपें बाहर चला गया! ये साला आठ दिन तक हमारे कब्जेमें था ! भोत टॉर्चर किया बॉसने उसको, अख्खी निकाला उसका, नाखुन उधेडा इतनाईच नै तो उसका पिसाब करनेका जगा भी जलाया! कैसा चिल्ला रहा था हXX! लेकीन जबानसे कुछ नै उगला. हमेरेको पक्का पता था की वो इन्फोर्मेशन अब्बी पुलीसके पास नै पोचा है… इसने कही तो छुपाके रख्खा है! लेकीन साला नै बोला….. हम लोग उसकी मेहबुबाको भी उठाके लाये….

“सतीशकी कोइ गर्लफ्रेंडभी थी !” शिर्‍याचा एकदम आश्चर्यचकीत स्वर…

नशीब इरफान दारुच्या नशेत होता म्हणून त्याच्या हे लक्षात आले नाही, नाहीतर लोचा झाला असता. तो तसाच टूनमध्ये बोलत होता.

“उसके सामने उसकी मेहबुबा को भी भोत तकलीफ दिया हम लोगो ने! सच बोलू तो तकलीप देनेका नाटक किया !” इरफान गालातल्या गालात हसायला लागला.

“नाटक?” शिर्‍याच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह….

“साला वो जिससे मोहोब्बत करता था, वो……. ” इरफानने इकडे तिकडे पाहीलं… शिर्‍याला हळुच जवळ येण्याची खुण केली…शिर्‍या जवळ आला तसा इरफान जोरात ओरडला….”साली वो बॉस की सेक्रेटरी कम रख्खेल है… कामिनी ! बॉसनेच उसको इस बंदेके पिच्छू लगा के रखा था! इसका भांडाबी उसनेच फोडा था! लेकीन साला फिरभी नै बोला… बोलता था ये मेरे देशकी बहु-बेटीयोंका सवाल है..उसपें मेरा प्यार कुर्बान होता है तो हो जाये…! अपनका दिमाग घुमा हौ अपनने अपने हातसे उसके बदनमें चार गोली उतार दी!”

शिर्‍या नखशिखांत ताठरला. रक्ताचा तप्त प्रवाह मस्तकापासुन पायापर्यंत सळसळत गेला. शिर्‍याचा तापलेला चेहरा बघून इरफान दचकला…

“अरे यार तेरेको क्या हो गया! ठिक तो है ना तू…!”

“अं.. सॉरी भाई, वो खुनका सुना ना तो डर गया थोडा. ” शिर्‍याने सावरून घेतले.

आता सत्या कुठल्या पोलीसांच्या संपर्कात होते ते ही शोधावे लागणार होते.

“भाई एक बात बताओ.. आप ये अपनी जान पें खेलके माल सप्लाय करतो हो! वो कहासे आता है….” शिर्‍याने दाणा टाकायला सुरूवात केली.

“बडे चालू हो दोस्त.. पैली मुलाकातमेंच मेरे पेट पें लात मारने की तय्यारी ! अरे ये बात अपनने अभी तक बॉस को नै बताया तेरे को बतायेगा क्या? पागल… बस इतना समझ ले इस धंदेमें हर बात के दल्ले होते है. उनके टचमें रैना पडताय! अपना भी एक नेटवर्क है! ये साले दल्ले अपनको लडकीया सप्लाय करते है! लेकीन ना उनको मालुम है ये माल किदरकु जाताय ना माल लेनेवालेकू मालूम ये माल किदरसे आताय! ये बात दोनोमेंसे किसी एक को भी मालुम हो गया तो समझ की इरफान खतम.. फिर अपनका जरुरत नै रहेगा इन लोगाको हौर ये लोग अपनको भी वो साले सतीशके पासमें पोचा देंगे! क्या समझा?”

“भोत रिक्स का काम है बॉस? तुमे तो बडे खतरनाक आदमी निकले.”

इरफान खाली बघून पीत होता, त्यामुळे शिर्‍या फिरत फिरत त्याच्या पाठीमागे जावून आला हे त्याला कळालेच नाही.

“भाई, एक बात बोलो, इत्ते सारे दलालोंके नाम, पते सब याद कैसे रखते हो. तुम तो काँपुटरके माफिक दिमाग रखते हो यार !” शिर्‍याने पुढचे जाळे टाकले आणि मासळी अलगद अडकली.

“नै रे… इतना सब थोडेही याद रख्खेगा ! वो सब एक डायरीमें लिखके रख्खेला है, डायरी अपने एक खास आदमी कें पास रैता है बोले तो एकदम सेफ!”

“और वो आदमी कौन है, किधर रहता है!” शिर्‍याचा स्वर बदलला होता.

“येडा समझा है के मेरेको…जो बात बॉसको नै बतायी वो तेरको बताउंगा? तु मेरे साथ मिल जा, कुछ काम करके दिखा फिर धीरे धीरे सब पता चल जायेगा पने आप. क्या बोलता है?”

“तुने बॉसको नही बताया, लेकीन बॉसने कभी ऐसे नही पुछा होगा, जरा सर उठाकर देख मेरी तरफ…!” शिर्‍याचा आवाज बर्फासारखा थंड होता.

इरफाननें चमकून वर बघीतले… शिर्‍या समोर त्याचेच पिस्तूल घेवुन उभा होता.

“चल बोल….!”

“देख भाई मजाक नही…. वो कट्टा है, गलतीसें घोडा दब गया तो अपन टपक जायेगा. हौ वैसेभी डायरी जिसके पास है वो पक्का शैतान है.. अपनके बगैर डायरी किसीको नै देगा!” पिस्तूल बघितल्यावर इरफानची नशा फुर्र्कन उडून गेली होती, तो चांगलाच टरकला होता.

“वो मै देख लुंगा उसको कैसा हँडल करना है…..लेकीन इस वक्त तुने ना भी बताया तो भी वो मै पता कर ही लुंगा एक दो दिनमें. लेकीन फिर मेरको ये घोडा दबाना पडेंगा. तू चाहता कें मैं ये घोडा ना दबावू तो बकना चालू कर!”

शिर्‍याने पिस्तुलचे लॉक उघडले आणि पिस्तूल इरफानवर ताणले…

तसा इरफान बोलक्या पोपटासारखा बोलायला लागला. सगळी माहिती त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि शिर्‍याने पिस्तूल त्याच्या हातात परत दिलं. इरफान क्षणभर चमकला आणि लगेच त्याने ते पिस्तूल शिर्‍यावर रोखलं…

“खट खट….. नुसताच आवाज्…इरफानने चमकुन पिस्तुलाकडे बघितलं…

“अबे येड्या, त्यातल्या गोळ्या काढून टाकल्यात मी. तुला संपवायला मला माझे दोन हात पुरेसे आहेत साल्या.”

तसा इरफान अजीजीच्या मुडमधे आला.

“देख भाई, तेरको जो इनफोर्मेशन चैये था, अपनने दे दिया, हां..?..दिया ना? अब अपनको जाने दे ना…! अपन किसको नै बोलेगा तेरे बारे में…!”

“आता मला येडा समजतो का? तु इथुन सुटला की आधी तुझ्या त्या मोमीनभाईला फोन करणार्, मणाजे मी तिथे डायरी घ्यायला पोचायच्या आधी तो माझ्या स्वागताला तय्यार असणार. हल बे… आणि असंही तुझं मरण मघाशीच निश्चित झालय जेव्हा तु मला सांगितलस की सत्याला तू स्वतःच्या हाताने मारलंस!” सत्याचे डोळे अंगार ओकत होते. आवाज थरथरायला लागला होता……

“हXXXX ! सत्या माझा दोस्त होता, जिवलग दोस्त ! माझा बाप, माझी आई एवढंच काय स्वतःपेक्षाही जास्त जीव लावला होता त्याने मला. तुम्ही माझा दोस्त मारलात. आज या समुद्रासमोर या उफाळलेल्या लाटांना साक्ष ठेवून शपथ घेतो एकेकाला हाल हाल करून मारीन, सोडणार नाही. तुमची सगळी सिंडिकेट उध्वस्त करून टाकेन.”

रागाच्या भरात शिर्‍या पुढे सरकला. आपला बलदंड हात त्याने भेदरलेल्या इरफानच्या गळ्यात टाकला…..

दुसर्‍याच क्षणी इरफानची मान अर्धवट लटकायला लागली. पण अजुन तो जिवंत होता. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच फुटेना.

“अहं इतक्या लवकर मरणार नाहीस तू.. अजुन दोन तीन तास तरी असाच तडफडत राहशील. त्या हिशोबानेच तुझी मान मोडलीये मी. माझ्या भावाला जसा मारलात ना हाल हाल करून, तुम्हा प्रत्येकाला तसाच हाल हाल करुन मारणार आहे मी.”

शिर्‍याने त्याला खांद्यावर उचलुन घेतलं आणि एका मोठ्या खडकाच्या आड ठेवून दिलं. सकाळ होइपर्यंत तिथं कोणी फिरकणार नव्हतं. तोपर्यंत इर्फान तडफडत तडफडत मृत्यूची मागणी करणार होता.

शिर्‍याने एकदा त्याच्याकडे तुच्छतेने पाहीलं आणि त्याच्या अंगावर पचकन थुंकून तो मोमीनभाईला शोधायला निघाला !

********************************************************************************************

ट्रिंग ट्रिंग्…..ट्रिंग ट्रिंग्…..ट्रिंग ट्रिंग…

रिंग वाजतच राहीली तसे रोहीत भारद्वाजने वैतागून फोन उचलला.

“हॅलो रोहीत हिअर!”

“नमस्कार इन्स्पेक्टर सतीश रावराणे बोलतोय.”

“बोलीये सर… किससे बात करनी है आपको?”

“रोहीत भारद्वाज तुम्हीच का?”

“बोल रहा हू… क्या चाहीये?”

“तुम…?”

“मतलब…?” रोहीत चमकलाच..

“मतलब आम्हाला माहिमच्या किल्ल्यामागच्या खडकात एक प्रेत सापडलय. त्याच्या खिशात रोहीत भारद्वाजचं कार्ड सापडलं म्हणुन फोन केलाय मी. तुम्हाला इथे चौकीवर यावे लागेल.”

“अरे साब, यहा लोग रो नोकरी मांगने आते है…, हजारो लोग आत्महत्या करते है! कहीसें मिला होगा उअसको मेरा कार्ड…. इसमें मेरा क्या वास्ता…..? आप जानते है आप किससे बात कर रहे है? मेरा वक्त बहुत किमती है !”

रोहीतचा आवाज चढला होता.

“ए भडव्या, तू देव जरी असलास ना, तरी सुद्धा जिथे न्यायाचा प्रश्न आहे तिथे मी देवाला सुद्धा बोलवीन चौकीत. इन्स्पे. सतीश रावराणे म्हणतात मला. मी जर तुझ्या ऑफीसमध्ये आलो तर चार चौघात तुझ्या स्टाफसमोर तुझी बेअब्रू होइल म्हणुन इथे बोलवतोय. साडेअकराच्या आत मला इथे पाहीजेस तू. समजला? आणि हो ही केस आत्महत्येची नाही, कुणीतरी एका बेवड्याला भरपूर पाजून एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे त्याची मान मोडली आहे. आणि ज्याची मान मोडलीय त्याचं नाव इरफान आहे…तोच बदनाम हिस्ट्री शीटर. मला वाटतं आता तुला प्रसंगाची गंभीरता कळली असेल!”

तिकडून फोन आदळला गेला.

रोहीतने लगेच दुसरा नंबर फिरवला…

“सुदेश, इरफान के साथ जहा जहा हमारे ताल्लुकात साबीत हो सकते है, वो सारे सबूत मिटा दो. इरफान मर चुका है! शायद कोइ हमारा दुश्मन पैदा हो चुका है! मै माहीम पोलीस चौकी जा रहा हू!”

**********************************************************************************************

“गावडे, हा इरफान …! जर मी चुकत नसेन तर त्या सतीश देशमुखने वर्णन केलेला इरफान हाच असावा. खरेतर माझ्याकडे कसलाच पुरावा नाहीये. अगदी त्या रोहीतला सांगितल्याप्रमाणे त्याचे कार्ड वगैरे काही इरफानजवळ मिळालेले नाहीये. मागे सतीशने हे कार्ड मला दिले होते, त्यानंतर सतीश लंडनला गेला आणि मग त्याच्याशी असलेला संपर्कच तुटला…..

सद्ध्यातरी मी हवेतच तीर मारलाय. बघूया काही हातात येते का ते?

सतीशचं काय झालं असावं? तो लंडनमध्येच आहे की…..? तो जिवंत असेल ना…?

इन्स्पे. रावराण्यांच्या डोक्यात शेकडो प्रश्न भिरभिरायला लागले होते.

“परमेश्वरा त्या सतीशला जप रे. चांगला पोरगा आहे तो. त्याला जर काही झालं तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल, कायदा कंबरेला बांधून एकेकाला जित्ता जाळीन भर बाजारात…..!”

क्रमशः

विशाल कुलकर्णी

 

5 responses to “बिलंदर

 1. Parshuram

  जून 4, 2013 at 6:21 pm

  jabardast

   
 2. Rohini Bhosale

  जून 29, 2013 at 5:50 pm

  Masst

   
 3. Rohini Bhosale

  जून 29, 2013 at 5:50 pm

  1 Number 🙂 🙂

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: