RSS

खेळ…(?)

21 सप्टेंबर
 
च्यामारी काय चाललेय काही कळतच नाही. कुणीपण उठतोय आणि मुंबई पोलीसांना आव्हान देतोय. आणि वर लहान पोरांसारखी कोडी घालतोय. वर म्हणे ” थोडं डोकं चालवा, कधीतरी मेंदुला ताण द्या ! “, इन्स्पेक्टर निंबाळकर भलतेच वैतागले होते.

या नव्या केसने त्यांना हैराण करुन सोडले होते. महात्मा गांधी मार्गावर असलेली जेफ़रसन बँक कुणा डोकेबाज गुन्हेगाराने भर दिवसा लुटली होती. विशेष म्हणजे व्हॉल्टमधल्या रोकड रकमेला त्याने हातही लावलेला नव्हता. फ़क्त १७० कोटी रुपयांचे हिरे तेवढे व्यवस्थितपणे लंपास केले होते. आणि इतक्या सराइतपणे, कुठलाही पुरावा मागे न सोडता हा दरोडा टाकण्यात आला होता की जगभरात नावाजलेले, स्कॊटलंड यार्डच्या खालोखाल नाव घेतले जाणारे मुंबई पोलीस खाते आज दरोड्याला आठ दिवस झाले तरी दरोडा पडलाय यापलिकडे केसवर काहीही प्रगती करु शकले नव्हते.
बहुतेक केस सी.बी.आय. कडे सोपवली जाण्याची लक्षणे दिसत होती…त्यामुळे तर निंबाळकर साहेब जास्तच चिडले होते.

थोड्या वेळापुर्वीच कमिशनर महंतांनी बोलावुन चांगलंच झापलं होतं त्यांना.

“प्रतापराव, काहीतरी करा, नाहीतर तुम्हाला गडचिरोली, यवतमाळ असे कुठेतरी आणि मला पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत यापुढची काही वर्षे काढावी लागतील…!”

“कोण असेल तो आणि कसा घातला असेल हा दरोडा ? महत्वाचे म्हणजे आजुबाजुच्या व्हॊल्ट्समध्ये करोडो रुपयांची रोकड रक्कम पडुन होती, तिला त्याने हात का नाही लावला?” इन्स्पे. निंबाळकरांनी दोन खारका स्वत:च्याच डोक्यात मारल्या. ही त्यांची नेहेमीचीच सवय होती. आनंद असो वा चिंता अतिरेक झाला की खारका मारणे सुरु व्हायचे.

जेफ़रसन बॆंक, शहरातला सर्वात सुरक्षीत असा हा व्हॉल्ट होता. व्हॉल्टची रचनाच थोडी विचित्र होती. आत शिरले की समोर दोन तीन केबिन्स आणि त्याच्या शेजारी एक लिफ़्ट, जी कायम लॉक असते. तीची चावी मॅनेजर रस्तोगीकडे असते. जेफ़रसन बॆंक ही नावालाच बॆंक होती. खरेतर तो एक सुरक्षित व्हॉल्टच होता. शहरातल्या धनदांडग्यांना त्यांची (सर्व मार्गाने कमावलेली) संपदा, मग त्यात जडजवाहीर , रोकड सगळेच आले, ठेवण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासाची एकच जागा होती…”जेफ़र्सन व्हॉल्ट”. ठराविक रक्कम भरुन इथे तुम्हाला एखादा किंवा अनेकही लॉकर भाड्याने घेता येतो. एक चावी तुमच्याकडे असते. ही चावी देखील नेहेमीप्रमाणे लोखंडी चावी नसुन , प्रत्येक लॉकरधारकाला एक इलेक्ट्रॊनीक गॅजेट दिले जाते. आजकाल वापरली जाणारी वास्को टोकन्स असतात ना तसे. लॉकरधारक आला की थेट मॆनेजर रस्तोगीच्या केबीनमध्ये जातो. तो आत गेला की रस्तोगी आधी त्याची वैधता तपासुन घेतात आणि खात्री पटली की के मग ग्राहकाला घेवुन लिफ़्ट मध्ये शिरतात. गंमत म्हणजे लिफ़्ट वर जातेय की खाली हेच मुळी कळत नाही. वर जातेय म्हणावे तर तर व्हॉल्टची इमारत एकमजलीच आहे. खाली जातेय म्हणावे तर लिफ़्टमध्ये तो फ़िल अजिबात येत नाही. पण लिफ़्ट थांबली आणि उघडुन बाहेर आले की आपण व्हॉल्टच्या मुख्य तिजोरीसमोर असतो. रस्तोगी त्यांच्याकडचा कोड वापरुन तिजोरी उघडतात, तुम्ही आत गेलात की तिजोरीचे दार पुन्हा लॉक केले जाते.

आत गेल्यानंतर आपल्या जवळच्या टोकनवरुन तात्पुरता अव्हेलेबल झालेला कोड नंबर ग्राहकाला त्याच्या लॉकरवर असलेल्या इलेक्ट्रॊनिक पॅनेलला फ़िड करावा लागतो. त्यानंतर तो पॆनेल त्याच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रॊनिक सुविधेच्या साहाय्याने पुढचा कोड पुरवतो आणि लॉकर उघडला जातो. इथे सुद्धा तुम्हाला फ़क्त पाच मिनीटे मिळतात. पाच मिनीटच्या वर जर काळ तुम्हाला लागला तर लॉकर आपोआप बंद होतो आणि बाहेर रस्तोगीच्या केबीन मध्ये अलार्म वाजतो, लॉकर पुन्हा उघडायचा झाल्यास या वेळी मात्र त्यासाठे रस्तोगींना त्यांच्या केबीन मध्ये असलेली यंत्रणा वापरावी लागते. त्याही पुढे जावुन एक लॉकर दिवसातुन फ़क्त दोन वेळाच एकुण दहाच मिनीटाकरीता उघडता येतो. आठवड्यातील शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता बँक बंद झाली की थेट सोमवारीच उघडते..मग मध्ये कितीही आणिबाणी आली तरी सोमवारची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि अशा या अभेद्य व्हॉल्टमधुन या शर्विलकाने समोर करोडोची दौलत पडलेली असताना फ़क्त १७० कोटीचे हिरेच लंपास करुन व्हॉल्ट्चे मालक आणि पोलीस दोघांनाही चांगलीच चपराक दिली होती.

सोमवारी सकाळी नौपाड्यातले प्रसिद्ध सुवर्णकार श्री. चिंतामणी पेठे नेहेमीप्रमाणे बँकेत आले. पेठ्यांचा हा नित्यक्रम होता. दर सोमवारी ते व्हॉल्टमध्ये येत आणि आपल्या लॉकरमधुन काही हिरे काढुन ते आपल्या पेढीवर घेवुन जात. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वत:चे दोन हत्यारी अंगरक्षक असत. जाताना जेफ़रसनचे दोन गार्ड त्याना दुकानापर्यंत संरक्षण देत. आज नेहेमीप्रमाणे रस्तोगींना अभिवादन करुन पेठे आपल्या लॊकरकडे वळले, त्यांनी लॉकर उघडला आणि …….

लॉकर पुर्णपणे रिकामा होता. फ़क्त त्याच्या जागी एक कागद होता. कागदावर चार ओळीत , प्रत्येक ओळीत पाच या प्रमाणे काही आकडे लिहीले होते. बस्स………!

त्यानंतर पेठ्यांना जाग आली ती हॊस्पीटलमध्येच.त्यांच्या घट्ट मिटलेल्या मुठीत तो कागद तसाच होता…..

३० , ४, २१ , ०० , ८५
३२ , ०७ , ८ , १९ , ३३
२४, ०९ , ६८ , ११ , ०४४
२१ , ५६ , ८३ , ०० , १२

पेठ्यांना जाग आली आणि समोर इन्स्पेक्टर प्रतापराव निंबाळकर उभे होते. पेठ्यांनी काही न बोलता तो कागद त्यांच्या हातात देला..

“साहेब, याने पुरता नागवला हो मला, मी संपलो, पुरता बरबाद झालो, १७० कोटीचे हिरे होते लॊकर्मध्ये! आता काहीही नाही. त्याला शोधा साहेब, नाहीतर मला आत्महत्याच करावी लागेल.”

इन्स्पेक्टर प्रतापराव निंबाळकर बराचवेळ त्या कागदाकडे पाहात उभे होते. थोड्या वेळापुर्वीच कमिशनर साहेबांकडुन ऐकलेली वरदवाणी आणि वेडावुन दाखवणारे या कागदावरचे आकडे……

“च्यायला, काय प्रकार आहे हा?
पण मी तुझ्यापर्यंत पोहोचेन मित्रा! तु कोणीही अस, कोठेही अस तुला गजाआड टाकल्याशिवाय मला चैन पडणार नाही !”

प्रतापरावांना एकदम आपल्या बायकोची आठवण झाली. दिडच महिन्यापुर्वी सातार्‍यातल्या त्यांच्या टोलेजंग वाड्यात सुन म्हणुन आलेली नाजुक सावित्री त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहीली. सरदार घाटपांड्यांची एकुलती एक कन्या आणि आता सरदार निंबाळकरांची लाडकी सुन. सरदारसाहेबांना वाटले होते की देशभक्तीच्या प्रखर भावनेने सगळे ऐश्वर्य बाजुला ठेवुन पोलीसात भरती झालेला आपला एकुलता एक लेक आता लग्न झाल्यानंतर तरी थोडा माणसात येइल……!

राज्यशास्त्र हा विषय घेवुन पदवीधर झालेले प्रतापराव थेट पोलीसदलात भरती झाले. आणि गुन्हेगार, त्याही पेक्षा गुन्हेगारीला आपला कट्टर शत्रु मानुन अपराधक्षेत्रावर तुटुन पडले. त्यापासुन त्यांना थोडे माणसात आणण्यासाठी म्हणुन सरदार निंबाळकरांनी त्यांचे लग्न करुन दिले जेणे करुन आतातरी मुलगा थोडे घरात, घरच्या व्यवसायात लक्ष घालेल.

पण नियतीला ते मान्य नव्हते बहुदा. लग्नानंतर आठवड्याभरातच ड्युटीवर हजर झालेल्या प्रतापरावांसमोर ही केस एक नवे आव्हान घेवुन उभी होती. आणि आजपर्यंत गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेल्या इन्स्पे. प्रतापराव निंबाळकरांनी हे आव्हान स्विकारले होते.

ट्रिंग ट्रिंग….ट्रिंग ट्रिंग….

टेलीफोनची घंटी वाजली आणि प्रतापराव पुन्हा वर्तमानात आले.

“नमस्कार, सदर बज़ार पोलीस चौकी, इन्स्पे. प्रतापराव निंबालकर बोलतोय….!”

“नमस्कार प्रतापराव साहेब, अजुन बोलताच आहात का तुम्ही…चोर सापडला की नाही. अहो एवढा मोठा क्लु दिलाय त्याने तुम्हाला आतापर्यंत थोडीतरी प्रगती व्हायला हवी होती.”

“हे बघा, तुम्ही कोण बोलताय, आणि तुम्हाला काय माहित चोराने काय क्लु ठेवलाय ते..,” निंबाळकर साहेब सावध झाले. कारण तिजोरीत सापडलेल्या कागदाबद्दल आत्तापर्यंत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

“मीच ठेवलेल्या गोष्टीची मला माहिती असणार नाही का साहेब…? चला तुम्हाला पुढचा क्लु देतो, बघु तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतो का ?

नीट ऐका….

“अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर अतिरेक्यांनी हल्ला केला, मागचे पुढचे शेजारीही त्यातच अडकले. पण त्यांनी हार मानली नाही. ते सगळे एकत्र आले आणि अतिरेक्यांना शोधण्याचा पहिला दुवा सापडला…”

कसं वाटलं हे नवं गणित…शोधा म्हणजे सापडेल. आणि हो फोन ट्रेस करायचा मुर्ख प्रयत्न करु नका…मी हे सिम कार्ड फ़ेकुन देतोय. असंही बनावट नावानेच घेतलंय. उद्या पुन्हा फोन करीन. मला खात्री आहे तो पर्यंत तुम्ही पहीली पायरी सर केलेली असेल. शुभ संध्या, उद्या बोलुच….”

“हे बघ, तु जो कुणी …………………..!, ” प्रतापराव फोनवरच ओरडले. उगाचच त्यांना आपलाच आवाज चिरकल्यासारखा वाटला. पण….

फोन कट झाला होता………..!

तुम्हाला काही येतंय लक्षात ?

टण…टण….टण….

“साहेब, बास की आता, माझ्याच डोक्यावर टेंगळं यायला लागलीत आता.”, सब इन्स्पेक्टर भोसले हसुन म्हणाले.

तसे निंबाळकर साहेब भानावर आले. मघाशी आलेल्या त्या अज्ञात दुरध्वनीने त्यांची झोप उडवली होती आणि खारकासत्र पुन्हा चालू झाले होते.

“आधीच त्या कागदावरच्या आकड्यांनी डोके खाल्ले होते आणि आता हे नवीन त्रांगडं., भोसले…ती टेप पुन्हा एकदा ऐकवा बरं, काय म्हणाला होता तो…..”, निंबाळकरांना बहुदा काहीतरी सापडलं होतं.

भोसलेंनी टेप सुरू केली. पुन्हा तो मिस्किल , थोडासा थट्टेखोर भासणारा स्वर उमटला……..

“अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर अतिरेक्यांनी हल्ला केला, मागचे पुढचे शेजारीही त्यातच अडकले. पण त्यांनी हार मानली नाही. ते सगळे एकत्र आले आणि अतिरेक्यांना शोधण्याचा पहिला दुवा सापडला…”

राजन , हे थोडंसं कन्फ़्युजिंग आहे खरं पण इथेच कुठेतरी दुवा लपलाय हे निश्चित….

सब इन्स्पेक्टर राजन भोसले नुकतेच प्रशिक्षण संपवुन फ़ौजदार म्हणुन रुजु झाले होते. एका सामान्य पण प्रामाणिक शाळा मास्तराचा हा मुलगा. आई वडीलांनी लहानपणापासुन केलेले सुसंस्कार आणि वडिलांकडुन मिळालेले प्रामाणिकपणा आणि कामावरची अतीव निष्ठा हिच त्याची एकमेव शिदोरी होती. आणि त्यामुळेच हा नवीन तडफ़दार आणि धाडसी पोरगा निंबाळकरांना आवडला होता.

“म्हणजे असं बघ, अमेरिकेवरचा हल्ला आणि मागचे पुढचे शेजारी….काय संबंध असावा यात….?” निंबाळकर विचारमग्न झाले.

एक काम कर राजन, कालचा तो कागद आण बरं इकडे…….ते आकडे पुन्हा एकदा बघु देत मला .

३०, ०४, २१, ००, ८५
३२, ०७, ८, १९, ३३
२४, ०९, ६८, ११, ०४४
२१, ५६, ८३, ००, १२

राजन, मला वाटतं या आकड्यांचा आणि वरील विधानाचा परस्परांशी काहीतरी संबंध निश्चित आहे. काय म्हणाला होता ..

“शोधा म्हणजे सापडेल…!”..शोध, राजन शोध….

भोसल्यांनी तो कागद पुन्हा निरखायला सुरुवात केली. निंबाळकर पुन्हा पुन्हा ती टेप ऐकत होते…

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्यांनी हल्ला केला…..

साहेब, मी पकडला त्याला, भोसले आनंदाने चित्कारले…..

“शाबास भोसले”, निंबाळकरांनी मनापासुन दाद दिली..हा त्यांचा स्वभावच होता, कुणालाही निरुत्साहीत करायचे नाही आणि राजनला निश्चितच काहीतरी सापडले असणार याची त्यांना खात्री होती.

“जरा सबुरीने, राजा, आपण त्याच्यापासुन अजुन खुप दुर आहोत.”

भोसले थोडेसे ओशाळले, “माफ़ करा साहेब..मी थोडा ओव्हर एक्साइट झालो.”

“काही हरकत नाही, मित्रा. माझंही होतं असं कधी कधी! बोल कुणाला पकडलंस तु….?”

सर, अमेरिकेच्या ट्वीन टावर्सवर हल्ला झाला तो दिवस होता…११ सप्टेंबर….अर्थात ११/९….जो ९/११ या नावाने जास्त विख्यात आहे. आता या कागदावरची तिसरी ओळ जर बघीतली तर..

२४, ०९, ६८, ११, ०४४

मागचे, पुढचे शेजारी म्हणजे २४, ६८ आणि ०४४….थोडीशी आलटापालट केली , तर ०४४ २४०९६८११ किंवा शेवटच्या आकड्यात अजुनही फ़ेरफ़ार होवु शकतात. ०४४ हा जर एस.टी.डी. कोड मानला….

“येस, राजा, ही एक नवी दिशा ठरु शकते…लेट्स ट्राय, मित्रा. ०४४ म्हणजे चेन्नईचा नंबर आसणार. चल आता मिशन टेलिफोन….

आणि दोघांनी, त्या आकड्यांपासुन वेगवेगळे नंबर तयार करुन फोनाफ़ोनीला सुरुवात केली.

अर्ध्या तासाच्या अथक मेहनतीनंतर ….

“नमस्कार निंबाळकर साहेब…शेवटी तुम्ही इथपर्यंत पोचलात तर…..!” यावेळेस मात्र आवाज “वेगळा होता.कोण बोलतोयस तु ! कालचा हरा……… कोणी दुसराच होता. “, निंबाळकर उखडलेच होते.

“अरे, अरे निंबाळकर साहेब, किती रागावताय..तुम्ही इथपर्यंत पोचलाहेत ते आम्ही दिलेल्या क्लुमुळेच ना ! मग हे असे शिव्या देणे…अहं , निंबाळकरसाहेब तुमच्यासारख्या सुसंस्कृत माणसाला हे शोभत नाही. ” समोरच्याचा टोन अजुनही मिस्किल आणि समंजस होता..

“असो, काल तुमच्याशी कोण बोललं हे महत्वाचे का नवीन क्लु महत्वाचा? तुम्ही पुढच्या १० मिनीटात ठरवा..मला वेळ नाहीये फ़ारसा..? मी फोन कट करतोय….दहा मिनीटानी मीच तुम्हाला फोन करेन.

‘साला, हुशार आहे, फ़क्त अडीच मिनीटे बोलला’, नकळत निंबाळकरांनी दाद दिली.

दहा मिनीटांनी पुन्हा त्याचा फोन आला…,”नमस्कार निंबाळकर साहेब, तुमच्यासाठी पुढचा क्लु….
निंबाळकरांनी भोसलेंना खुण केली..आता फ़ोन रेकॉर्ड होणार होता…

“ऐकताय ना प्रतापराव, आता पुन्हा कालचा आवाज होता….”

“तु..तुम्ही…निंबाळकर चिरकले……”

“नंतर, नंतर आधी माझा क्लु तर ऐका, एक माणुस मरण पावला. मेल्यानंतर तो यमपुरीच्या दरवाज्यापाशी जावुन उभा राहिला. पाहतो तर तिथे दोन दरवाजे होते. प्रत्येक दरवाजापाशी एक रखवालदार होता. हा विचारात पडला किं आता कुठल्या दाराने आत शिरु ? तेवढ्यात आकाशवाणी झाली. या दोन्ही दरवाजांपैकी एक स्वर्गाचा आणि एक नरकाचा आहे. कुठला स्वर्गाचा आणि कुठला नरकाचा हे त्या रखवालदारांना पक्के माहित आहे. तुम्हाला स्वर्गाचा दरवाजा हवा आहे. फ़क्त इथे एक गोम आहे..या दोघांपैकी एकजण कायम खरे बोलतो तर दुसरा अट्टल खोटारडा आहे. आता कोण खरा आहे आणि कोण खोटारडा…देवच जाणे. तुम्ही त्या दोघांपैकी फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता.माइंड यु, फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही या पैकी कुणाला , काय प्रश्न विचाराल कि जेणेकरुन तुम्हाला योग्य उत्तर मिळेल…!

हे प्रतापराजा, तु जर माझ्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाहीस तर तुझ्या मस्तकाची शंभर शकले होवुन तुझ्या पायाशी लोळु लागतील..हा..हा..हा….! आता मी जावुन झाडावर लटकतो”….उद्या पुन्हा फ़ोन करीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर जर मला मिळाले..तर पुढचा क्लु देइन. आय एम शुअर, तुम्ही याचे उत्तर शोधालच…!”

भेटु उद्या फोन वर……!”

निंबाळकर साहेब वेड्यासारखे फोनकडे बघत राहिले…

फोन कधीच डेड झाला होता.

निंबाळकर साहेब कितीतरी वेळ त्या डेड झालेल्या फोनकडे बघत उभे होते.
“आणखी एक कोडं ! मला पुन्हा लहान झाल्यासारखे वाटतेय सर, ” भोसले उदगारले.
“मलापण तसेच वाटतेय, भोसले….फ़क्त ही कोडी लहान मुलांना सोडवता येण्यासारखी नाहीत…असं त्याला वाटतंय म्हणुन तो आपल्याला वेठीला धरतोय.” निंबाळकर साहेब स्वत:शीच हसले.

“पण मी त्याला माझ्यावर मात करु देणार नाही…”

“सर, पण हे नवीन कोडं म्हणजे….मी तर जाम गोंधळलो आहे….!” भोसलेच्या चेहयावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं.

“काय म्हणाला होता, पुन्हा एकदा ऐकव बरं……….”

भोसलेंनी टेप सुरु केली…

“नंतर, नंतर आधी माझा क्लु तर ऐका, एक माणुस मरण पावला. मेल्यानंतर तो यमपुरीच्या दरवाज्यापाशी जावुन उभा राहिला. पाहतो तर तिथे दोन दरवाजे होते. प्रत्येक दरवाजापाशी एक रखवालदार होता. हा विचारात पडला किं आता कुठल्या दाराने आत शिरु ? तेवढ्यात आकाशवाणी झाली. या दोन्ही दरवाजांपैकी एक स्वर्गाचा आणि एक नरकाचा आहे. तुला स्वर्गाचा दरवाजा हवा आहे. कुठला स्वर्गाचा आणि कुठला नरकाचा हे त्या रखवालदारांना पक्के माहित आहे. फ़क्त इथे एक गोम आहे..या दोघांपैकी एकजण कायम खरे बोलतो तर दुसरा अट्टल खोटारडा आहे. आता कोण खरा आहे आणि कोण खोटारडा…देवच जाणे. तुम्ही त्या दोघांपैकी फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता.माइंड यु, फ़क्त एकालाच आणि फ़क्त एकच प्रश्न विचारु शकता. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही या पैकी कुणाला , काय प्रश्न विचाराल कि जेणेकरुन तुम्हाला योग्य उत्तर मिळेल…!”

निंबाळकर साहेब बराच वेळ हातातल्या पेपरवेटशी चाळा करत होते. अचानक त्यांचा चेहरा आनंदाने फ़ुलला आणि टण्ण……!

” राजन, आता येवु दे त्याचा फ़ोन, मी तयार आहे…त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला..!”

“म्हणजे साहेब, तुम्हाला सापडला तो प्रश्न ?”, भोसलेचा चेहरा एकदम उजळला.

“असं बघ, राजन..हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे बघ प्रश्न तर एकच विचारायची परवानगी आहे. पण उत्तर देणारे दोन आहेत, पुन्हा त्यापैकी फ़क्त एक जण कोणीतरी खरं बोलणारा आहे. तो कोण हे ही आपल्याला माहीत नाही. “

“म्हणजे आपल्याला प्रश्न असा निवडावा लागणार आहे कि दोघांपैकी कोणालाही विचारला तर त्याचे आपल्याला हवे असलेले उत्तरच यायला हवे. किंवा त्याच्यापैकी कोणीही दिलेले उत्तर योग्य आहे कि अयोग्य हे ठरवण्यासाठी आपल्याला एखादी कसोटी ठरवुन द्यावी लागेल.”

“राजन, नीट ऐक उत्तर….त्यापैकी कुठल्याही एका रखवालदाराकडे जावुन त्याला प्रश्न करायचा की “मी जर त्या दुसर्‍या रखवालदाराला विचारले की स्वर्गाचे दार कोणते आहे, तर तो दुसरा रखवालदार याचे काय उत्तर देइल.”

आणि या प्रश्नाला पहिला रखवालदार , म्हणजे ज्याला आपण हा प्रश्न विचारणार आहोत तो, जे काय उत्तर देइल त्याची योग्यता ठरवण्यासाठी जी कसोटी आपण ठरवणार आहोत ती म्हणजे या प्रश्नाला पहिला रखवालदार जे उत्तर देइल त्याच्या अगदी उलट पर्याय हे आपले सही उत्तर असेल.”

निंबाळकरांनी विजयी मुद्रेने भोसलेकडे पाहिले. राजन भंजाळल्यासारखा त्यांच्याकडे पाहात होता. “साहेब, तुम्ही जे काही सांगितलंत ते माझ्या डोक्यावरुन गेलंय ! जरा समजावुन सांगाल काय ? माझा लहानसा मेंदु खुप थकलाय हो…..!”

“असं बघ, दोघापैकी कुणालाही हा प्रश्न विचारलास तर ते आपापल्या स्वभावाप्रमाणे खरे उत्तर देणार. पण ज्याला तु विचारणार आहेस तो जर खरे बोलणारा असेल तर तो अगदी खरेपणाने दुसरा काय उत्तर देइल ते सांगेल…पण दुसरा खोटारडाच असल्याने ते उत्तर अर्थातच चुकीचे असेल म्हणजे त्याने सांगीतलेल्या दरवाज्याचा विरुद्ध दरवाजा स्वर्गाचा असेल. तसेच जर खोटारड्याला हा प्रश्न विचारला तर तो त्याच्या स्वभावाप्रमाणे खोटेच उत्तर देणार..म्हणजे खरे बोलणारा राखणदार जे उत्तर देइल त्याच्या अगदी विरुद्ध..तेव्हा तो जे सांगेल त्याच्या अगदी विरुद्ध उत्तर हे आपले खरेखुरे उत्तर असेल.”

राजनच्या चेहर्‍यावर अजुनही प्रश्नचिन्ह होते. पण निंबाळकर आपल्याच तंद्रीत बोलत होते…

“पण खरं सांगु राजन, हा माणुस का कोण जाणे पण मला ओळखीचा वाटतोय. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची ढब…..आणि मी जर चुकत नसेन ना राजन, तर तो फ़क्त वेळ काढतोय. तो कशाची तरी वाट पाहतोय. पण कशाची ? असो…त्याचा फ़ोन येइलच तेव्हा कळेल.”

“व्वा ! निंबाळकरसाहेब..अगदी बरोबर ओळाखलंत उत्तर..अर्थात हे अगदीच सोप्पं होतं म्हणा. असो , तुमच्या मनात असलेल्या मुळ प्रश्नाचे उत्तर देखील याच कोड्याशी निगडीत आहे…..”,

त्या अनामिकाचा आवाज थोडा थकल्यासारखा वाटत होता. जणु तो वर्षानुवर्षे आजारी असावा.

“साहेब, थोडी घाई करा..माझ्याकडे वेळ फ़ार कमी आहे. एकदा की मी इथुन सटकलो की मग तुम्हाला क्लु नाही देवु शकणार. आता शेवटचाच क्लु. नाही, आता कोडी संपली…आता थोडं गंभीर होवु या. गंमत खुप झाली. आता त्या दोन रखवालदारांपैकी एकाला गाठा…तुम्ही योग्य व्यक्तीला गाठले की मला कळेलच, मग मी पुढचा दुवा देइन….!”

निंबाळकर पुन्हा विचारात पडले..आता हे दोन रखवालदार कुठे शोधायचे ?

“सर, आपण पुन्हा एकदा जर बॆंकेला भेट दिली तर.”

रस्तोगी आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

” अजिबात नाही इन्स्पेक्टर साहेब, आमचे सर्व गार्ड अतिषय विश्वासु आणि पारखुन घेतलेले आहेत. तरीही तुम्ही त्यांना भेटु शकता, पण त्यातुन काही सापडेल असे मला तरी वाटत नाही.कारण ते फ़क्त व्हॉल्टच्या बाहेरची सुरक्षा पाहतात, त्यांच्या पैकी कुणालाच आत जाणे किंवा आतली काही माहिती असणे शक्य नाही .” बँक मॅनेजर रस्तोगींनी अगदी ठामपणे ग्वाही दिली.

भोसले आणि निंबाळकरांनी सर्व गार्डसची अगदी कडक उलटतपासणी केली पण त्यातुन काहीही निष्पन्न झाले नाही…

“असं, कसं होइल, आत्तापर्यंत त्याने एकही क्लु चुकीचा किंवा खोटा दिलेला नाही, मग याच वेळेस तो खोटं का बोलतोय ?”, निंबाळकर विचारात पडले.

“साहेब, त्याने रखवालदाराने असा शब्द वापरला होता. आपण तो शब्दश: घेतोय. रखवालदार म्हणजे राखण करणारा. इथे फ़क्त सिक्युरिटी गार्ड असा अर्थ न घेता थोडा वेगळा विचार केला तर. म्हणजे असं बघा…व्हॉल्टच्या तिजोरीचे दरवाजे उघडण्यासाठी एक कोड ग्राहकाकडे असतो तर त्याचा दुसरा भाग…म्हणजे तिजोरी उघडण्यासाठी ग्राहकाच्या कोड बरोबर मॅनेजर रस्तोगीला देखील काही कोड वापरावे लागतात. एका अर्थाने तो देखील या तिजोरीचा रखवालदारच झाला.”,
…आता भोसलेंचेही डोके काम करायला लागले होते.

“येस, राजन …उचल त्याला…मला वाटतं आता हे पाउल उचलावंच लागेल. आत्तापर्यंत आपण सॉफ़्टली तपास करत होतो. आता वेळ थोडा आहे…आता त्याला उचलच तु, पुढची जबाबदारी मी घेतो…!” निंबाळकर साहेब झटकन उठले.

“तुम्ही कधी ना कधी माझ्यापर्यंत पोचणार हे मला माहित होतं निंबाळकर साहेब. सगळं काही त्याने ठरवुन दिल्यासारखंच घडतंय.”..रस्तोगी प्रसन्नपणे हसले.

हा मात्र निंबाळकरांना फ़ार मोठा धक्का होता. सगळे काही त्याने ठरवुन दिल्याप्रमाणे म्हणजे….

“अहं, साहेब मला जेवढं माहीत आहे तेवढंच किंवा माझा सहभाग जेवढा आहे तेवढंच मी सांगेन…!”

“रस्तोगी तुम्ही गुन्ह्याची कबुली देताय, यासाठी तुम्हाला अटक होवु शकते हे लक्षात ठेवा.” निंबाळकर आता चेष्टेच्या मुडमध्ये अजिबात नव्हते.

“निंबाळकर साहेब, त्याने मला शब्द दिलाय की हे प्रकरण कोर्टापर्यंत जाणारच नाही म्हणुन. आणि गेलंच तर जे होइल ते माझे वकील पाहतीलच…!”, रस्तोगी अगदी निर्धास्त होते.

“तो कोण आहे, रस्तोगी…?”

“ते मात्र मला माहीत नाही, एवढं नक्की के तो कुणी हिस्ट्री शिटर नाही. ऐकायची इच्छा असेल तर मला माहित असलेली माहिती देतो, नाहीतर तुम्हाला हवे ते करायला तुम्ही मोकळे आहात. आणि हा जबाब रेकॊर्ड करुन घेणार असाल तर मी माझा वकील आल्यावरच बोलीन.ठरवा काय ते !”

भोसले रागा रागाने रस्तोगीच्या अंगावर धावुनच गेले ,” साला ब्लॅकमेल करतो !”

“राजन, कुल डाउन ! सद्ध्या पत्ते त्यांच्या हातात आहेत, बोलु दे त्यांना..!” निंबाळकरांनी संयम कायम ठेवलेला होता.

“ठिक आहे साहेब, मी तुम्हाला थोडीशी बँकेची अंतर्गत रचना सांगतो. बँकेला एकच मजला आहे.. अगदी बेसमेंटही नाही. इमारतीच्या मधल्या भागातच स्ट्राँगरुम आहे. तिच्या चारही बाजुनी एक पोकळ पण मजबुत अशी भिंत आहे. लिफ़्ट सुरु केली की आधी थोडीशी मागे जाते, साधारणत: अडीच मिटर.आणी या भिंतीत शिरते…मग या पोकळ भिंतीतुन एक पुर्ण वळसा तिजोरीला घालुन मग तिजोरीसमोर येवुन उभी राह्ते . पुर्णपणे साऊंडप्रुफ़ असल्याने आतल्या व्यक्तीला तो वर चाललाय की खाली की मागे की पुढे काहीच कळत नाही. एका जागी थांबल्यावर लिफ़्ट जागच्या जागी १८० अंशात वळते या वेळी आपोआपच तीचे तोंड तिजोरीच्या समोर आलेले असते, त्यामुळे दार उघडताच समोर तिजोरी दिसते.”

” मला थोडेसे पाणी मिळेल का साहेब ?, म्हातारा झालोय ना आता, लवकर कोरड पडते घशाला…..”

“हवालदार, यांना पाणी आणुन द्या !”

रस्तोगी पुढे बोलु लागले…

“साहेब, प्रत्येक अभेद्य किल्ल्याला आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी एक गुप्त मार्ग असतो. दुर्दैवाने या किल्ल्यालाही आहे. बँकेच्या लॅटरीनमध्ये एका शेजारी एक असे तीन आरसे लावलेले आहेत. त्यातला मधला आरसा ३६० अंशामध्ये फ़िरतो. तेथुन थेट तिजोरीच्या आत जाण्याचा गुप्त दरवाजा आहे. तो फ़क्त मला आणि व्हॉल्टच्या मालकांना माहीत आहे. हा दरवाजा फक्त आणीबाणीच्या वेळीच वापरण्यासाठी आहे. आजपर्यंत एकदाही तो उघडाण्याची गरज पडलेली नाही. तो उघडण्याची कळ तिथेच आहे . ती जाणुन घेण्यासाठी, त्याने माझ्या नातीला काही काळाकरीता गायब केले होते…त्याच्या बदल्यात मी त्याला फ़क्त त्या कळीची माहिती आणि पेठेंच्या तिजोरीचा पुढचा कोड पुरवायचा होता. आधीचा कोड त्याने कोठुन मिळवला ते मात्र तोच सांगु शकेल ! “

“राजन, त्यांना जावु दे..आत्ताच आपण त्यांच्यावर कुठलही आरोप ठेवणार नाही आहोत..!”

आभार मानुन रस्तोगी बाहेर पडले.

“साहेब, तुम्ही त्याला जावु का दिलेत. त्याचा जबाब आपल्याकडे रेकॉर्ड आहे. आपण त्याला अडकवु शकतो.”

“नाही राजन, त्याला जावु दे, पण त्याच्यावर नजर ठेव. ‘तो’ कदाचित रस्तोगीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.”

“हे सगळं फ़ार कठीण होत चाललंय, राजन…!”

निंबाळकर आता मात्र हताश होवु लागले होते.

“तुझ्या लक्षात येतंय का आपण कठपुतळीसारखे त्याच्या तालावर नाचतोय. आणि गंमत म्हणजे त्याला पुर्ण विश्वास आहे की हि केस कोर्टात उभी राहणार नाही…नाही राजन, केवळ हिर्‍यांची चोरी एवढाच त्याचा हेतु नाहीये. हे वाटते तेवढे सोपे नाहीये राजा…कुठेतरी पाणी मुरतंय!”

ट्रिघ..ट्रिंग…..ट्रिंग ..ट्रिंग….निंबाळकर फ़ोनकडे धावले.

“राजन फ़ोन टॆप कर त्याचाच असेल.”

“प्रतापराव , आम्ही हंबीरराव बोलतोय,” फोन निंबाळकरांच्या पिताजींचा होता. ” आयला, आता सरदारसाहेबांचं लेक्चर ऐकावं लागणार…..!”

“प्रतापराव, तुमचं एक पत्र आलंय इकडे…कुणा जुन्या मित्राचं आहे बहुतेक.एका कोपर्‍यात ‘ फ़क्त कॅसानोव्हासाठी’ असं लिहलय इथे.”

“कॅसानोव्हा ….वेडा मुक्या, भारतात परतला की काय ? च्यायला कुठली वेळ साधलीस रे..मी इथे अडकलोय आणि…!”

“पाकिटावर, अर्जंट असं लिहलय, प्रतापराव. आम्ही गोविंदाला पाकिट घेवुन मूंबईला रवाना केलंय अर्ध्या तासापुर्वीच, तो पोचला की कळवा आम्हाला. आणि तुमचं हे प्रकरण संपलं की सुनबाईला घेवुन या सातारला. आम्ही वाट पाहतोय.”
फ़ोन ठेवला गेला आणि निंबाळकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.

त्यांना मुक्या आठवला, लहान सहान गोष्टीवरुन वाद घालणारा..हुशार , मिस्किल….त्यांच्या भोवती कायम घोंघावणार्‍या कन्यका बघुन त्यांना कॅसानोव्हा म्हणुन चिडवणारा…बापाच्या अमर्याद श्रीमंतीला कंटाळलेला, नेहेमी काहीतरी थ्रिल हवं असणारा…आणि सारखा कसली – कसली कोडी घाल…….!”

“पण हे कसं शक्य आहे? नाही असुही शकेल..! पण मुक्या हे कशाला करेल? पण करणारच नाही कशावरुन? नाहीतरी भलते सलते अंगावर येणारे खेळ खेळायची त्याची सवयच आहे…”

निंबाळकर साहेब स्वत:शीच बडबडत होते.

“आयला आमच्या साहेबाला वेड लागलं बहुतेक”, भोसले चांगलेच वैतागले.

थोड्या वेळाने गोविंदा आला. निंबाळकर साहेबांनी त्याच्या हातातल्या पाकिटावर झडपच घातली. आतल्या पत्रावर फ़क्त एकच ओळ होती….

“आप्पा, लगोलग टाटा कॅन्सर मेमोरिअल हॉस्पिटलला ये..चौथा मजला. रुम नं. ४३३.
तुझाच मुक्या.”

“मुक्या, आणि टाटाला……” निंबाळकर हादरले…

“राजन, गाडी काढ, मला वाटतं आपण या केसच्या अंतापाशी पोहोचलो आहोत. आता जर उशीर केला तर तो पुन्हा एकदा जिंकेल आणि मग आयुष्यभर मला चिडवत राहील.”

“दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा निंबाळकर आणि मुक्याचा कॉमन मित्र विक्रम त्यांची वाटच पाहात होता. नेहेमीप्रमाणेच उशीर केलास आप्पा, मुक्या पुन्हा एकदा जिंकलाय. पण आता तो तुला चिडवायच्या पार पलिकडे निघुन चाललाय रे”, विक्रमला रडु आवरत नव्हते.

“विक्या, हा काय प्रकार आहे? मला जरा सांगशील का….?”

“आप्पा, मुक्याला रक्ताचा कॅन्सर झाला आहे. शेवटचे काही क्षण बाकी आहेत. सहा महिन्यापुर्वी अमेरिकेतुन आल्यावर मला भेटला तेव्हा तसा चालत फ़िरत होता. माझ्याकडे आला तेव्हा पहिल्यांदा तुझी चौकशी केली. तु पोलीसात भरती झाला आहेस हे कळाल्यावर म्हणाला. चल जायच्या आधी आप्पाला आणखी एकदा पराभवाचा धक्का देवुन जाइन. त्यामुळेच त्याने तुझ्याशी संपर्क साधला नाही. आता डॊक्टरांनी जेव्हा अल्टिमेटम दिला तेव्हा तुला भेटायला बोलवलं त्याने. जा आप्पा, भेट त्याला , नाहीतर ………., खुप उशीर होइल रे…!

‘मुक्याकडे पाहवत नव्हते, नाका तोंडात नळ्या घातलेल्या, हाडांचा सापळा झालेला. निंबाळकरांना विश्वासच बसेना. समोर बेडवर पहुडलेला माणुस आपला तोच हसतमुख, देखणा मित्र मुकेश कोठाडियाच आहे..?

“मुक्या काय करुन घेतलंस रे हे? आणि आधी का नाही कळवलंस………”.निंबाळकर साहेबांचे डोळे पाणावले होते.

“मुक्याने कष्टाने मान वळवली. त्याच्या डोळ्यात मात्र तोच मिष्किल खोडकरपणा अजुनही होता. आप्पा, ये रे..पण उशीर केलास माठा, थोडी लवकर सोडवली असतीस केस तर आपली भेट आधीच नसती का झाली. पण साल्या तु माठ्या तो माठ्याच राहिलास. सगळं मलाच उलगडुन सांगावं लागलं…..त्याला हसताना देखील खुप कष्ट होत होते.”

“बरं बाबा, मान्य तु जिंकलास…!” निंबाळकरांना त्याची अवस्था पाहुन भरुन आलं होतं. पण लगेचच त्यांच्यातला पोलीस अधिकारी जागा झाला.

“मुक्या सगळं कळलं..फ़क्त काही प्रश्न…. या अवस्थेत तु हे सगळं कसं काय घडवुन आणलंस ?… गुप्त दरवाजाबद्दलची माहीती कुठुन मिळवलीस, आणि रस्तोगीच्या नातीला गायब केलंच होतंस तर मुळात गुप्त दरवाजाची गरजच का पडली ?
पेठेंचा कोड तुला कसा मिळाला. आता ते हिरे कुठे आहेत…सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे सगळं कशासाठी ? कसलं समाधान मिळवलंस यातुन?”

“अरे, हळु यार शेवटच्या प्रवासाला निघालोय आता मी. एक एक प्रश्न विचार ना. ….
तुला आठवतं आप्पा, मी नेहेमी म्हणायचो तुला , या बसुन खाण्याचा कंटाळा आलाय आता. विक्या चेष्टेत म्हणाला चला कुठेतरी दरोडा घालु. तर तु म्हणालास ..विचारही करु नका…मी पोलीसात भरती होणार आहे…गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. तेव्हाच ठरवलं होतं की एकदा का होइना तुला धक्का द्यायचा. आणि जेव्हा कळालं की आपलं तिकीट कटलंय म्हणुन, तेव्हा ठरवलं की आता वेळ घालवण्यात अर्थ नाही. असो.. आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे…

“मी हे कसं घडवुन आणलं..तर मी फ़क्त प्लान आखला. अंमलात आणणारे हात वेगळे होते. नाही, त्यांचा विचारही करु नकोस. ते कधीच भारताबाहेर पोहोचलेत..त्यानंतरच मी तुला इकडे बोलावुन घेतलं.

गुप्त दरवाजा, इथे पण तु कमी पडलास आप्पा, थोडी खोलात जावुन माहीती काढली असतीस तर कळालं असतं तुला की जेफ़रसन बँकेच्या आराखड्यापासुन बांधकामापर्यंत सारं कंत्राट कोठाडिया ग्रुप कडेच होतं. पण तु माझी कोडी सोडवण्यातच अडकुन पडला होतास. काही म्हण आप्पा, पण तुला भलतीकडेच गुंतवुन ठेवायची माझी आयडीया मस्तच होती की नाही. आणि रस्तोगीची नात माझ्याकडे असताना गुप्त दरवाजाची गरज काय..तर मला रस्तोगी अंकलना कुठेही अडकवायचं नव्हतं. खरं सांगायचं तर रस्तोगी अंकलच्या नातीला मी पळवलंच नव्ह्तं..कारण मी काय काय करणार आहे हे त्यांना पहिल्यापासुन माहीत होतं, कोठाडिया ग्लास वर्क्स मध्ये १० वर्षे इमाने इतबारे नौकरी केलीय त्यांनी. मला माहीत होतं तुला कितीही दम दिला तरी तु त्यांचा जबाब रेकॉर्ड करणार, म्हणुन मीच त्यांना तसं सांगायला सांगितलं होतं….

एवढे बोलुनच मुक्याला धाप लागली होती. डोक्टर रागवायला लागले. तसं मुक्यानेच त्यांना अडवलं…,
” देसाइकाका..आता शेवटचे काही क्षण राहिलेत, मित्राच्या शंका मिटवतो आणि मग तुम्ही म्हणाल ते ऐकतो…”

हा तर आप्पा मी कुठे होतो..
हा तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले, आता तिसरा प्रश्न…
पेठ्यांच्या पासकोड बद्दल…! किती रे बावचळला आहेस आप्पा तु.. अरे श्री. चिंतामणी पेठ्यांचे एकुलते एक सुपुत्र श्री. त्रिविक्रम पेठे गेले सहा महिने सतत माझ्या बरोबर आहेत. पेठेकाकांचा कोड मिळणं काय अवघड होतं ?”

“आत्ता या घडीला त्यांचे हिरे त्याच बँकेत दुसया एका लॊकरमध्ये आहेत…!”

“हे करुन मी काय साधलं तर ते तुला चांगलंच माहीत आहे आप्पा….असो , केस कोर्टात उभी करायची का नाही तो तुझा आणि पेठेकाकांचा प्रश्न आहे. मला वाटतं अजुनही काकांनी एफ. आय. आर. नोंदवलेला नाही. जरी केस उभी राहीलीच तरी एकच विनंती, कृपया दुसर्‍या कुणालाही यात गुंतवु नकोस रे. त्यांनी जे काही केली ते माझ्यावरच्या प्रेमापोटीच केलेय. चल येतो रे, खुप थकलोय. ..”

“डॉक्टरकाका, माझं डोकं आप्पाच्या मांडीवर ठेवता येइल. खुप त्रास दिलाय त्याला. हा शेवटचाच..”

सतत बोलुन आलेल्या अतिव थकव्याने दमुन मुक्याने आपले डोळे मिटुन घेतले…..

निंबाळकर कंठ दाटल्या अवस्थेत म्हणाले..

“मुक्या हा असला जिवघेणा खेळ कशाला खेळलास रे…!”

मध्येच निंबाळकरांना जाणवलं की त्यांच्या हातातला मुक्याचा हात गळुन पडलेला आहे. विक्रमने शांतपणे मुक्याचे हसरे डोळे मिटले..,

” आप्पा, मुक्या पुन्हा एकदा जिंकला रे…आत्ता काही तु त्याला पकडु शकणार नाहीस…..!”

निंबाळकर साहेबांना मुक्याला भेटल्यापासुन पहिल्यांदाच रडु कोसळले….त्यांचा हा खेळिया पुन्हा एकदा त्यांना हरवुन फ़ार पुढे निघुन गेला होता.

सब. इन्स्पे. राजन भोसले मात्र मुक्याच्या दुसर्‍या हातात अडकलेल्या कागदाकडे सुन्नपणे पाहात होते…हा अफ़ाट खेळीया जाता जाता आपली शेवटची खेळी खेळुन गेला होता…

कागदावर लिहीले होते…..

ωon reckol

विशाल.

 

4 responses to “खेळ…(?)

 1. देवेंद्र चुरी

  सप्टेंबर 23, 2009 at 10:51 सकाळी

  मस्तच …

   
 2. विशाल कुलकर्णी

  डिसेंबर 14, 2010 at 3:29 pm

  धन्यु देवेन 🙂

   
 3. Vaibhav Joshi

  जानेवारी 5, 2014 at 4:42 pm

  good

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: