RSS

चकवा………(?)

09 सप्टेंबर

घटना तशी वीस पंचवीस वर्षापुर्वीची आहे. ऐन तिशीत असेन मी तेव्हा फारतर ………

हे बघ सुन्या, आता बास झालं हा? एक एक पेग म्हणता म्हणता पाउण बाटली रिचवलीय आपण दोघांनी. साल्या गाडी चालवायचीय तुला? तु प्रॉमीस केलयस येताना गाडी तु चालवणार म्हणुन!”

मी थोडा चिडलोच होतो. खरेतर या चिडण्यात काहीच अर्थ नव्हता. कारण सुन्याबरोबर मी ही होतोच की.
खरेतर आम्ही दोघांनीही ठरवले होते की बस फक्त “वन फॉर द रोड” घ्यायचा आणि निघायचे. पण एकदा बसलो की मग पुढे काय होइल ते कधी सांगता येते का?

अरे हो, मुख्य ते राहीलंच…. मी माणिक, माणिक बारटक्के. पुण्याला टिळक चौकात माझं छोटंसं ऑफीस आहे. मी मोठ मोठ्या हॉस्पिटल्सना एक्स. रे. मशिन्स सप्लाय करतो आणि त्यांच्या सर्व्हिसींग आणि रिपेअरींगचीही कामे करतो. डीलरशिप आहे माझ्याकडे. कोल्हापुरला डॉ. थोरातांकडे एक मशिन दिलं होतं. त्याला काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणुन कोल्हापूरला आलो होतो. पुणे कोल्हापूर तसा फारसा मोठा प्रवास नाही. त्यामुळे कोल्हापूरला यायचं झालं की मी माझी गाडी घेवूनच निघतो. माझ्याकडे एक खुप जुनी ओपेल आहे. पण व्यवस्थित निगा राखल्याने अजुन तरी साथ देतेय. तशी माझ्याकडे एक मारुतीही आहे पण माझा या गाडीवर थोडा जास्तच जीव आहे. तर या वेळी सकाळी जावुन संध्याकाळी लगेच परत फिरायचे होते, मग सुन्याला विचारले येतोस का म्हणुन? तो तयार झाला आणि पहाटे पहाटे आम्ही पुणं सोडलं.

सुन्या…. सुनंदन सुखात्मे… माझा अगदी कॉलेजपासुनचा मित्र. अतिशय वल्ली माणुस. डिप्लोमा इंजिनीअरिंगला असताना रुममेट म्हणुन माझ्या राशीला आला होता. आमच्या कॉलेजचं नाव होतं सातारा एजुकेशन सोसायटीज पॉलिटेक्निक. पण ते विख्यात होतं ‘एस.ई.एस. पॉलिटेक्निक’ या नावाने. अगदी कॉलेजचा बोर्डदेखील ‘एस.ई.एस. पॉलिटेक्निक’ असाच होता.

कॉलेजच्या पहिल्याच दिवशी कँटीनमध्ये एका नवीन आलेल्या बाळुने एका बर्‍यापैकी प्रौढ वाटणार्‍या सदगृहस्थांना प्रामाणिकपणे विचारलं ….

“सर…..एस. ई. एस. चा लाँगफॉर्म काय हो ?

तेवढेच गंभीरपणे उत्तर आले…..

‘सेक्स एजुकेशन सोसायटीज पॉलिटेक्निक”

माझ्या तोंडातला चहा फुर्रर्र करून समोरच्याला न्हाऊ घालता झाला. त्याने माझ्यावर ओरडण्याआधी मागे वळुन पाहीले.

“आयला, सुन्या आहे काय? मग हे साहजिकच आहे.”

त्याने अगदी मोठ्या मनाने मला माफ करून टाकले. मी जागेवरून ऊठलो आणि त्या सदगृहस्थांपाशी जावून उभा राहीलो.

“इथे सोशल इंजिनीअरींग म्हणुन काही स्ट्रीम आहे का हो?”

त्यांनी एकदा माझ्याकडे पाहीले, उठुन उभे राहीले आणि पुढच्याच क्षणी मला करकचुन मिठी मारली.

“आपला इंपेडन्स मॅच होतोय राव! जमेगा, ये सालमें खुब रंग जमेगा!”

तर अशी माझी आणि सुन्याची पहिली ओळख झाली. नागपुरच्या एका उद्योगपतीचे हे उंडगे चिरंजीव. बापाचा पैसा आपल्याला उडवण्यासाठीच आहे यावर प्रचंड श्रद्धा असलेले. पण मनाने लाख माणुस. सच्चा दोस्त. अनेक प्रसंग आले, गेले आमची दोस्ती पक्की होत गेली. नाय नाय, सगळं नाय सांगत बसणार आता. पण सुन्याची ओळख करुन देणं आवश्यक होतं. कॉलेजनंतर काही वर्षं नोकरी केली मी. मध्ये तीन चार वर्षे सुन्याशी संपर्कच नव्हता. त्यानंतर अचानक कोल्हापुरात भेटला. त्याच्या श्रीमंत वडीलांनी त्याला एक फॅक्टरी टाकुन दिली होती पुण्यात. काहीतरी कामानिमित्त कोल्हापूरला आला होता तो. मग पुन्हा भेटींचा सिलसिला चालु झाला. त्यानंतर सुन्याच्याच प्रयत्नाने मीही कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नशिबाने फार लवकर स्थिरावलो या व्यवसायात. पुण्यातच असल्याने आता सुन्याशी असलेली घसट खुप वाढली होती. अर्थात सुन्या आहेच तसा लाघवी. तर यावेळी कोल्हापूरला जायच्यावेळी मी सुन्याला बरोबर घेतले होते. सुन्या बरोबर असले की वेळ कसा जातो ते कळतच नाही. नेहेमीप्रमाणे चार – साडेचार पर्यंत काम आटोपले. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेरुनच आईचे दर्शन घेतले. दरवाज्याबाहेरुन का ? तर सुन्याचे म्हणणे पडले …..

“माणक्या, जनाची नाय मनाची तरी ठेव ना भौ. आता आपण मंदीरात जाणार आणि बाहेर पडलाव की प्यायला बसणार. त्यापेक्षा बाहेरुनच हात जोडू.”

याला त्याची श्रद्धा म्हणायचे की प्यायला बसायची घाई हे इतक्या वर्षांच्या मैत्रीनंतरही मला अजुनही कळलेले नाही. पण आहे हे असं आहे. आम्ही गाडी गावाबाहेर काढली आणि रोडवरचा एक धाबा पकडुन बसलो होतो. प्यायला बसलं की आपोआपच जुनी सगळी भुतं बाहेर यायला लागतात आणि माणुस वाहावतो. तसंच काहीसं झालं आणि वन फॉर द रोड घ्यायला म्हणुन बसलेलो, पण सुन्या आता पाउण बाटली संपली तरी उठायला तयार नव्हता.

“बास का माणकु, विसरला का बे जुने दिवस? एक बाटली अख्खी रिचवून १२० च्या स्पीडने बाईक चालवायचो आपण, आठवतय?”

सुन्या नेहेमीप्रमाणेच बेफिकीर होता. खरे तर त्याचा कोटा अफलातुनच होता. दारू चढते हा प्रकारच त्याला माहीत नव्हता.

“सुन्या, बास म्हणजे बास.. आता मी जेवण मागवतोय, जेवू आणि निघू. साल्या सहा वाजता बसलेलो आता दहा वाजलेत रात्रीचे. पुण्यात बहुदा मध्यरात्रीच पोहोचणार आपण.”

शेवटी एकदाचे जेवण आटपले आणि आम्ही निघालो. बाहेर चांगलाच अंधार पडला होता.

“सायेब, जरा जपुन जा. आवसेची रात हाय आन तुम्ही लै पिलासा. ”

ढाबेवाल्याने मनापासुन सल्ला दिला. तेव्हा माझ्या लक्षात आले की अरे आज अमावस्या आहे. नाही म्हंटलं तरी थोडा गंभीर झालो मी. तसा मी देव मानणारा माणुस आहे. आता देव मानतो म्हटले की इतरही श्रद्धा-अंधश्रद्धा आल्याच. आणि कितीही आव आणला तरी भिती वाटायची ती वाटतेच. म्हणजे भुत बीत असल्या गोष्टीवर विश्वास नाही माझा. पण हे भुतांना कुठे माहीत आहे. आणि तशात बरोबर हे भुत… त्यात दारु प्यालेलं. जाम टरकली राव. सुन्या आपला तंद्रीतच होता. त्याच तंद्रीत त्याने गाडी काढली आणि आम्ही सुसाट निघालो. गाडी चालवायला बसला की सुन्या बेफामच बनतो. मग दारू प्यालाय वगैरेसारख्या गोष्टी त्याच्यावर परिणाम करु शकत नाहीत. किंबहुना दारु प्याल्यानंतर तो जास्त सराइतपणे गाडी चालवतो असा माझा अनुभव आहे.

गार वारा सुटला होता बाहेर. रस्त्याच्या कडेची झाडे भरारा मागे जात होती. मी बाहेर बघायचे शक्यतो टाळतच होतो. एक तर सगळा काळा कुट्ट अंधार… आणि त्या अंधारात ती मागं जाणारी झाडं असली भितीदायक दिसत होती. तसा मी भित्रा नाही हो पण असल्या वातावरणात उगाचच नाही नाही ते विचार मनात येत राहतात.

“माणक्या, असाच एकदा रात्रीचा सज्जनगडावरुन कोल्हापुरला परत निघालो होतो.”
सुन्याने शांततेचा भंग केला. काहीतरी बोलायला हवेच होते, अशी मुकेपणाने वाट संपणे फार कठीण होते.

“अच्छा, मग? आणि तु पुढे बघुन गाडी चालव बे. सारखा माझ्याकडे वळुन कशाला बघतोस. तुझ्या शेजारीच बसलोय मी, मागे नाही.” माझं आपलं लक्ष सगळं त्याच्या ड्रायव्हिंगवर.

“सावकाश चालव जरा, शर्यत जिंकायची नाहीय काही आपल्याला!” मी ओरडलो.

“ऐक ना बे, तर त्या रात्री, अमावस्येचीच असावी बहुदा, मी आणि माझे मेव्हणे सज्जनगडावरुन कोल्हापुरला परत येत होतो.”

“तु सज्जनगडाला कशाला गेलतास रे?” माझ्या शंकेखोर स्वभावाने उचल खाल्लीच.

“अबे भावजींना दर्शन घ्यायचं होतं. तुला तं माहीती ना ताईला कोल्हापुरला दिलीय ते. त्यांना भेटायला म्हणुन आलो होतो. भावजी म्हणाले दर्शन घेवुन येवू. मी दुपारच्याला उंडगताना कुठल्यातरी हॉटेलात ऐकलं होतं की सज्जनगडाच्या रोडवर घाट सुरु व्हायच्या सुमारास एक नवीन हॉटेल झालय. तिथे रानडुकराचं मटन झक्कास मिळतं म्हणुन. मला त्याची चव घ्यायची होती म्हणुन गेलो होतो आणि आता तु डिस्टर्ब करु नको मध्ये मध्ये!”

“तर येताना अशीच रात्र झाली होती. आम्ही गड उतरलो आणि कोल्हापुरच्या वाटेला लागलो. गड उतरला की मध्येच एक गाव लागतं.”

“आता रस्ता म्हणलं की गाव येणारच ना बे?” मी पचकलोच. सुन्याने डोळे वटारुन माझ्याक्डे पाहीलं. मी हसुन कान पकडले.

“तर ते गाव सोडलं की पाच सहा किमीवर एक मोठा पिंपळ आहे. त्या पिंपळापाशी गाडी थांबवली आणि मनाला आणि शरीराला आलेली लघु शंका आटपुन घेतली. आम्चं भावजी उतरलंच नाहीत गाडीतुन. त्यांना भिती बाहेरच्याची.”

“तिथुन जी सुसाट गाडी सोडली बघ माणकु… तासभर गाडी चालवत होतो. तासाभराने परत शंका आली. तेव्हा पाच सहाच बीअर चढवल्या होत्या रे. म्हणुन एका जागी परत गाडी थांबवली आणि शंका समाधान करायला बाहेर पडलो तर समोर पुन्हा तोच पिंपळ!”

“च्यामारी, हा काय प्रकार आहे? तरी तशीच वेळ निभावुन नेली आणि गाडी परत रोडवर काढली आणि सुसाट निघालो. अर्ध्या पाऊण तासानंतर पुन्हा तो पिंपळ रस्त्याच्या कडेला फांद्या पसरुन उभा!”

“मग रे, पुढे काय झालं? ” मी सावरुन बसलो. साली आत्ता कुठं जरा डुलकी लागायला लागली होती.

“आता मात्र टरकलो रे, काय पण सुचंना. भावजी म्हंणाले…. सुनंदन अरे हा चकवा आहे. आता थोडा वेळ इथेच थांबु. सकाळी जावु. मग काय रात्र तिथेच काढावी लागली. विचार कर माणक्या, काळीकुट्ट रात्र, रस्त्यावर एक वाहन नाही. वारा सुसाट वाहतोय. त्या झाडांच्या भयानक सावल्या भेडसावताहेत. काय हालत झाली असेल. सकाळीच निघु शकलो बघ तिथुन. नंतर पुढच्या गावात कळालं कि यापुर्वीही बर्‍याच जणांना हा अनुभव आलाय तिथे!”

मी खिशातुन रुमाल काढला आणि घाम पुसुन घेतला. आम्ही बहुतेक पेठनाका मागं टाकला होता.

“सुन्या, तु गपचुप गाडी चालव बे, उगीच घाबरवु न……….!”

कर्र कच्चच कर्र कच्च कर्र कर्र…….

सुन्याने कच्चदिशी ब्रेक मारला गाडीला… मी जवळपास आदळलोच डॅशबोर्डवर…!

“अबे हळू…हळू! मारतो का साल्या!” मी किंचाळलो.

“माणक्या, पुढं बघ बे……………” सुन्याचा आवाज भेदरलेला………
…………..
…………
………
………….
……………..
…………………
……………………
………………………….
…………………………………

समोर एक ट्रक उलटी होवुन पडली होती रस्त्यातच. ते बघुन आम्ही दोघेही खाली उतरलो.
बहुदा नुकताच अ‍ॅक्सिडेंट झाला असावा. कारण आजुबाजुला अजुन पोलीस पोहोचले नव्हते. एकदोन बघे फक्त दिसत होते. सगळ्या रस्त्यावर काचा पसरल्या होत्या. एक कार ट्रकखाली आली होती. ट्रक ड्रायव्हर बराच जखमी झाला होता. कार मध्ये मात्र फक्त एकच जण असावा. ऑन दी स्पॉट गेला होता बिचारा. बघ्यांकडुन कळालं की पोलीसांना फोन केला आहे. ते येताहेत.

सुन्या म्हणाला, ” माणक्या, थोडावेळ वाट बघु आले पोलीस लवकर तर बरे. नाहीतर या ड्रायव्हरला हॉस्पीटलमध्ये पोचवुन मग पुढे बघु काय करायचं ते!”

पण तेवढ्यात पोलीस व्हॅन आलीच. सुदैवाने तिथुन लवकरच सुटका झाली, पंचनाम्यात वगैरे अडकलो नाही. आम्ही पुढे निघालो जरा पुढे आल्यावर सहजच माझे मागच्या सीटवर लक्ष गेले आणि मी ओरडलोच…

“सुन्या, गाडी थांबव बे ……..!”
…….
………
………..
सुन्याने करकचुन ब्रेक मारला आणि गाडी थांबवली.

“आता काय झालं माणक्या? गाडी कशाला थांबवायला लावलीस आता?”

“अरे मागच्या सीटवर बघ ……
……

सुन्याने मागे वळून बघितलं.

“कुठं काय आहे बे? काय पण दिसत नाही?

“अरे तेच तर म्हणतोय मी, काहीच दिसत नाहीय तिथे …..

“तु भंजाळला का बे माणक्या मघाचा अ‍ॅक्सिडेंट बघुन, काहीच नाही तर ओरडतोस कशाला?”

“अबे माझी टुल बॅग दिसत नाहीये. मागच्या सीटवर ठेवलेली. वीस एक हजाराची इक्विपमेंटस होती रे त्यात.”

“तुझ्या तर………. केवढा घाबरलो मी ! म्हणलं याला काय दिसलं मागच्या सीटवर. बरं तु नक्की ठेवली होतीस टुलबॅग मागच्या सीटवर.”

“खरंतर तसं नक्की आठवत नाही रे, धाब्यामध्ये जेवायला गेलो तेव्हा खांद्यावर तशीच होती. मग ती पुन्हा गाडीत घेवुन आलो की नाही? काहीच आठवत नाही. मला तर आणल्यासारखी वाटतेय. आता काय करायचे रे. ती सगळी इक्विपमेण्ट खुप महत्वाची आहेत रे माझ्या धंद्यात.”

“काय करणार, आता परत जायचं…. आधी अ‍ॅक्सिडेंटच्या ठिकाणी पाहु, नाहीतर थेट त्या धाब्यापर्यंत परत जायचं.”

“परत एवढ्या लांब…….” धाब्यापासुन जवळजळ दिड तासाचा प्रवास झाला होता. आता परत मागे जायचे जिवावर आले होते.

“तो धाबा नक्की कुठे होता आठवतेय का तुला सुन्या?”

“नक्की, नाय आठवत बघ…. पण धाबा सोडल्यावर पाच एक मिनीटांनी रस्त्याच्या कडेला एक प्रचंड झाड लागले होते बघ, बहुतेक पिंपळ असावा ……………………………….

“पिंपळ…?” मी कसाबसा आवंढा गिळला. “चल जावुया परत!”

दहा मिनीटात आम्ही अ‍ॅक्सिडेंटची जागा मागे टाकली. तिथे नाहीतरी काही मिळण्यासारखं नव्हतंच. पेठनाका मागे टाकला आणि पुढे (कि मागे?) सुसाट निघालो. तासाभरातच तो वड कि पिंपळ दृष्टीपथात आला.

“हे आलच बघ माणक्या… आता इथुन दहा पंधरा मिनीटाच्या अंतरावर तो धाबा आहे.”

सुन्या खुश होवुन ओरडला.

दहा मिनीट गेले, पंधरा गेले… अर्धा तास गेला आम्ही पुढे जातोय. गाडी वेगात चाललीये. पण धाब्याचा काही पत्ता नाही. म्हणता म्हणता आम्ही तासभर गाडी हाकत होतो. धाबा गायब.

“सुन्या, तो पिंपळ तर दिसला… पण धाबा कुठय! तरी तुला मी म्हटलं होतं तेव्हाच …अशा सुनसान रस्त्यावरच्या धाब्यावर नको बसायला!”

धाबाच काय आजुबाजुला दुर दुर कसलीच वस्ती दिसत नव्हती. ना बंदा ना बंदे की जात.

“सुन्या, एवढ्या वेळात आपण कोल्हापुरला लागायला हवे होतो. तो पिंपळ…. आपल्यापण चकवा तर नाय लागला की धाबाच विरघळला हवेत” आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो.

तशी सुन्याने करकचुन ब्रेक मारला आणि गाडी थांबवली.

“माणक्या, मला पण तसच वाटायला लागलय. अरे तो पिंपळ सोडुन किती वेळ झाला. दहा मिनीटावर असलेलं हॉटेल, लिटरली गायब झालय. एकतर हा चकवा आहे किंवा ते हॉटेल……….!”

“सुन्या, गाडी फिरव… टुल बॅग गेली खड्ड्यात, गपचुप पळायचं बघ पुण्याकडे. चकवा नसेल तर तास दिड तासात पेठनाका लागेल. तिथुन पुढे पुणे. आता नाही थांबायचं.”

सुन्याने गाडी वळवली आणि सुसाटत परत निघालो. तासाभरातच पेठनाका लागला. तसं मी सुन्याकडे बघितलं, तो माझ्याकडेच बघत होता.

“माणक्या हा चकवा नव्हता बे. मग आपण दारु प्यालो ते हॉटेल…… आपण नक्की कुठे बसलो होतो?”

मला दरदरून घाम फुटला. मी एकदा सुन्याकडे बघितलं आणि गाडीतुन खाली उतरलो.

“मी पण थोडं शंका समाधान करुन येतो बे!”

तिथेच बसस्टॉपपासुन थोडा दुर, प्रकाशातच पण रस्त्याच्या कडेला जावुन उभा राहीलो……. मोकळा होण्यासाठी !

“ओ बारटक्के साहेब…….

च्यामारी इथे मला ओळखणारा कोण निघाला बाबा. मी मागे वळुन बघितलं. स्टॉपवर एक बस येवुन थांबली होती. बसमधुन उतरलेला एक माणुस माझ्याकडे हात करुन हाका मारत होता. मी थोडा पुढे जावून बघितले. तो सतिष होता.. सतिश भुवड. डॉ. थोरातांचा लॅब असिस्टंट.

“अरे सतीश, इतक्या रात्री तु इकडे कुठे?”

“अहो मी पेठचाच ना! रात्री दहा वाजता घरुन निरोप आला, आई आजारी आहे म्हणुन! मग काय मिळेल ती गाडी पकडुन निघालो. आणि साहेब, दुपारी तुम्ही तुमची टुलबॅग तिथं लॅबमध्येच विसरलात की!”

“काय म्हणालास ती बॅग तिथं लॅब मध्येच आहे? अरे आणि आम्ही इथं……….!

मी सुन्याकडे बघितलं , तो माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा बघत होता.

“अरे पण सतीश तु इकडुन कुठून आलास? कोल्हापूरतर त्या रोडवर येतं ना?”

मी तिकडे बोट दाखवलं. फाट्यावरुन दोन रोड फुटले होते. एक आम्ही आत्ता आलो तो आणि दुसरा सतीशची एस्टी आली होती तो.

“छ्या, कोल्हापूर हे इकडे आलं. तिथुन तर आलो मी. ही काय मार्ग दाखवणारी पाटी पण आहे ना इथे!”

आता सुन्यावर डोळे वटारायची पाळी माझी होती. “आता काय?” मी विचारलं.

“आता काय, दोन वाजलेत जावु कोल्हापूरला परत. रात्री राहू ताईकडे. सकाळी दवाखान्यातून तुझी बॅग घेवुन परत पुणे. पण तो पिंपळ बे…….?”

“गप बे, तो पिंपळ आहे, कल्पवृक्ष नाही जगात एकुलता एक असायला!”

सतीशचा निरोप घेवून आम्ही पुन्हा कोल्हापूरच्या वाटेला लागलो. थोड्याच वेळानंतर पुन्हा तो पिंपळ दिसला आणि त्यानंतर दहाच मिनीटात ते हॉटेल….! तसा सुन्या खुसखुसायला लागला.

“माणक्या चल बे चकवा-चकवा खेळायचं का?”

डोक्यावरचं ओझं उतरलं होतं. आता मीही खदखदुन खिदळायला लागलो.

समाप्त.

विशाल .

 

8 responses to “चकवा………(?)

 1. देवेंद्र चुरी

  सप्टेंबर 11, 2009 at 12:41 pm

  🙂

   
 2. Nitin Joglekar

  मार्च 23, 2010 at 4:44 pm

  chakava lai bhari

   
  • Kulkarni Vishal

   मार्च 23, 2010 at 5:00 pm

   नमस्कार नितीनभाऊ,

   धन्यवाद.

   विशाल

    
 3. pravin rane

  ऑक्टोबर 1, 2012 at 11:06 pm

  hahahaha…khup chan vatal vachun..

   
 4. Vaibhav Joshi

  जानेवारी 5, 2014 at 4:52 pm

  झकास जमलीये कथा

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: