RSS

माझे सांगीतिक आयुष्य! भाग १

13 ऑगस्ट
 

 

संगीत हा असा एक विषय आहे की ज्यातलं मला फारसं काही कळत नाही. पण ऐकायला मात्र आवडते. तसे गायला देखिल आवडते आणि म्हणून गाणं शिकायचा देखिल प्रयत्न केला होता; पण श्रोत्यांच्या सुदैवाने मी ते शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. आता मागे वळून बघतो तेव्हा बर्‍याच गमती जमती आठवतात.
आता तुम्ही विचाराल गाण्यातलं तुमचे घराणे कुठले? बरोबर! कोणत्याही गायकाला विचारला जाणारा हा पहिला प्रश्न असतो. तसा मी जात्याच हुशार? म्हणून मी त्याचे उत्तर तयार ठेवलेले आहे. तर त्या घराण्याचे नाव आहे… नावात काय आहे म्हणा! सांगतो, जरा दम धरा. काय आहे की ह्या घराण्यात यच्चयावत जगप्रसिद्ध गायक-गायिका होऊन गेले आहेत, आजही होत आहेत आणि भविष्यात देखिल होतील ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मला कळायला लागले तेव्हापासूनच मी गाणे शिकायला आणि गायला सुरुवात केली. अहो माझ्या गुरुजनांची नावे ऐकलीत तर तुम्ही थक्क होऊन जाल. अगदी जुन्या काळातल्या खांसाहेब-पंडितजीपासून ते आजपर्यंतच्या सर्व लहानथोर गायकांकडून मी गाण्याचे धडे घेतले. त्यातल्या किती जणांना गाण्याची साथ केली त्याची गणती नाही. तरी देखिल माझे गाणे अजून परिपूर्ण नाही असे मला राहून राहून वाटते म्हणून मी आजही रियाज करत असतो. आता तुमच्या लक्षात आले असेल माझ्या सांगीतिक घराण्याचे नाव. काय,आले ना लक्षात? बरोब्बर! तेच ते! अगदी बरोबर! चला आता तुम्ही ओळखले आहेच तर मीच सांगतो. ते आहे ‘न्हाणी घराणे!!!’ काय बार फुसका ठरला म्हणता? अहो ठरणारच! मुळात मला गाणंच येत नाही तिथे घराणे कुठून असणार? पण जरा उगीच आपली गंमत केली.

साधारणपणे थोडीशी अक्कल आल्यापासूनच मी गाणं ह्या विषयाकडे आपोआप ओढला गेलो. आम्हाला ४थीला एक गुरुजी होते. खूप रंगात येऊन शिकवायचे. कवितांना चाली लावून त्या गाऊन दाखवत आणि त्यांच्या बरोबर आम्ही मुले देखिल म्हणत असू. मला वाटते की जाणतेपणी घडलेला तो पहिला सांगीतिक संस्कार असावा. ह्या काळातच बिनाका-माला हा रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणारा हिंदी चित्रपटगीतांचा कार्यकम आम्हा मुलांचा खूप आवडता होता. त्यात त्यावेळी प्रसिद्ध असलेली गाणी माझी तोंडपाठ असत, अगदी आरंभसंगीतापासून. उदा. १)मेरा नाम राजू घराना अनाम २) तेरी प्यारी प्यारी सुरतको ३) चौदवीका चांद हो या आफताब हो.. वगैरे वगैरे. ही गाणी गाऊन भाव खायचा(म्हणजे मला तेव्हा तो मिळायचा) हा माझा स्थायीभाव होऊन बसला होता. कुठेही जा,कोणी पाहुणे आले किंवा कोणाकडे पाहुणा म्हणून गेलो की फर्माइशी सुरू व्हायच्या. मग मी सुरू करायचो ते लोकांनी पुरे म्हणेपर्यंत माझी गाणी संपत नसत. शाळेत देखिल ह्या गाण्यांच्या फर्माइशी असायच्या. ह्याच्याच जोडीने समरगिते देखील मी म्हणत असे. १९६२ सालच्या चिनी आक्रमणानंतर तर देशात समरगितांचा पूरच आला होता. उदा.१)उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू २) खबरदार,खबरदार,खबरदार, लाल चिन्यांनो खबरदार ३)माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू.. वगैरे गाणी अगदी जोषात म्हणत असे. त्यामुळे भाव जरा अजून वाढला होता. शाळेतल्या शिक्षकांनी माझ्या आईवडीलांना ह्या मुलाला गाणे शिकायला पाठवा म्हणून कितीतरी वेळा सांगितले पण ते त्यांनी विशेष मनावर घेतले नाही(भारतीय संगीत रसिक एका महान गायकाला मुकले? ).

एक दिवस मी शाळेतून घरी येत होतो आणि एका हॉटेलातल्या रेडिओतून येणारे स्वर्गीय सूर माझ्या कानावर पडले आणि नकळतच माझी पावले थबकली. जेमेतेम तीन मिनिटांच्या त्या गाण्याने म्हणण्यापेक्षा त्या सूरांनी माझ्या आयुष्यात क्रांती घडवली. त्या सूरांची जादूच अशी होती की मी आजपर्यंत जे काही गात होतो ते मला एकदम रटाळ वाटायला लागले. उठता बसता ते सूर मला छळू लागले. त्या सूरांच्या मालकाचे नावही मला ठाऊक नव्हते की त्याने नेमके काय गायले ते देखिल मला माहीत नव्हते; पण मी त्या सूरांच्या आठवणींनी वेडा झालो होतो. पुन्हा ते स्वर्गीय गाणे कधी ऐकायला मिळेल? अशा तर्‍हेच्या अस्वस्थ मनःस्थितीत जवळजवळ पंधरा दिवस गेले. लोकांच्या फर्माइशी मी पुर्‍या करत होतो; पण आता त्यात तो जोष नव्हता,ती चमक नव्हती. आणि अचानक तेच गाणे मला पुन्हा एकदा ऐकायला मिळाले. मी जीवाचा कान करून ऐकले. गाणे संपले आणि निवेदकाने सांगितले,”अभी आपने सुना उस्ताद अब्दुल करीम खां की गाई हुई भैरवी ठुमरी. बोल थे जमुनाके तीर!”

मी धन्य झालो. मी आनंदातिशयाने धावत धावत घरी गेलो आणि माझ्या वडिलांना म्हणालो,”भाऊ!(आम्ही वडिलांना ‘भाऊ’ म्हणायचो) आत्ता मी एक जबरदस्त गाणे ऐकले. मला खूपच आवडले. तुम्हाला देखिल ते आवडेल. सांगू? कोण गात होते? ‘उस्ताद अब्दुल करीम खां’ असे काहीसे नाव होते आणि त्यांनी भैरवी ठुमरी गायली होती.. जमुनाके तीर. ”
“काय सांगतोस? तुला गाणे आवडले? आ आ ऊ ऊचे गाणे तुला आवडले? मला तर खरे वाटत नाही. ”
“भाऊ! खरे सांगतोय. मला खरेच ते गाणे आणि त्या खांसाहेबांचा आवाज आणि गाण्याची पद्धत खूप आवडली. असे गाणे मला गाता आले तर किती बहार येईल? ”
“अरे बाबा ते गाणं शिकायला गुरूकडे शागीर्दी करायला लागते. असे सहजासहजी येणारे गाणे नाही ते. तू खरंच नशीबवान आहेस. एव्हढ्या लहान वयात तुला असे गाणे ऐकायला मिळाले. आमच्या लहानपणी अशा लोकांचे गाणे राजेमहाराजांपुरतेच असायचे. आता रेडियो आणि ग्रामोफोनमुळे आपल्या सारख्या सामान्यांपर्यंत हे स्वर्गीय गाणे पोचले आहे. ठीक आहे आता जमेल तेव्हा मी तुला शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना घेऊन जात जाईन! त्यातून जे शिकता येईल ते शीक; पण आपल्यासारख्यांनी प्रथम शालेय शिक्षण पूर्ण करायला हवं आणि मगच गाणं, हे नेहमी लक्षात ठेव. ”

त्या दिवसापासून वडील मला शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना नेऊ लागले आणि हळूहळू मी सुगम संगीतापासून दूर जायला लागलो

प्रेषक प्रमोद देव ( सोम, 05/18/2009 – 11:30) .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: