RSS

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! श्रीनिवास खळे

13 ऑगस्ट
 

श्रीनिवास खळे! एक प्रसन्न आणि शांत व्यक्तिमत्व! त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या संगीतात आपल्याला दिसतं!
जन्म १०जून १९२५. मुळचे बडोद्याचे. तिथल्याच सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसुदन जोशी ह्यांच्याकडे गाण्याचे पहिले धडे गिरवले. त्यानंतर तिथेच आतांहुसेनखाँ,निस्सारहुसेनखाँ आणि फैयाजहुसेनखाँ सारख्या दिग्गजांकडूनही तालीम मिळाली. पुढे काही वर्षे त्यांनी बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून नोकरी केली.
त्यानंतर काही घरगुती अडचणीमुळे खळेसाहेब मुंबईत आले पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता(दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली.ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरुप बाहेर काढले.

‘गोरी गोरी पान’च्या ध्वनीमुद्रणप्रसंगी खळे साहेब,आशा भोसले आणि वाद्यवृंद

१९५२ साली त्यांची पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. त्याच्या एका बाजुला होते गोरी गोरी पान,फुलासारखी छान आणि दुसर्‍या बाजुला होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख . ह्या दोन्ही रचना ग.दि माडगुळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या.पण ऐन वेळी हा चित्रपट मुळ निर्मात्याऐवजी दुसर्‍याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही.पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्ही कडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्‍या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दात वाचा.

१मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीतं लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत..जे गायलंय शाहीर साबळे ह्यांनी आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधलीय. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला,शाहीरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीताला देखिल आहे हे निश्चित. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय,महाराष्ट्र जय,जय जय राष्ट्र महान, हे देखिल खूपच गाजले.

खळे साहेबांनी फारच मोजक्या चित्रपटांना संगीत दिलंय..त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे कैक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावलेत.
यंदा कर्तव्य आहे,बोलकी बाहुली,जिव्हाळा,पोरकी,सोबती,पळसाला पाने तीन अशा काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय. ह्या चित्रपटांतील गाजलेली गाणी म्हणजे…बोलकी बाहुलीतली १)सांग मला रे सांग मला,आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला,२)देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला, जिव्हाळातले १)लळा जिव्हाळा शब्दच खोटे,२)प्रिया तुज काय दिसे स्वप्नात आणि ३)या चिमण्यांनो परत फिरा रे ४)चंदाराणी का गं दिसतेस थकल्यावाणी ही गाणी कोण विसरू शकेल?

खळे साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिलेलं असलं तरी भावगीत-भक्तिगीत हे प्रकार भरपूर हाताळलेत.
खळेसाहेबांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जवळ जवळ ८०हून जास्त गायक गायिकांनी गाणी गायलेली आहेत.पंडित भीमसेनजी,बाबुजी,वसंतराव,लतादीदी,आशाताई,सुमनताई,माणिक वर्मा,सुलोचना चव्हाण वगैरे सारख्या दिग्गजांपासून ते हृदयनाथ,उषा मंगेशकर, अरूण दाते,सुधा मल्होत्रा,सुरेश वाडकर,देवकी पंडीत,कविता कृष्णमुर्ती,शंकर महादेवन पर्यंत कैक नामवंतांनी खळे साहेबांची गाणी गायलेली आहेत.ह्या गायक-गायिकांनी गायलेल्या गीतांचा नुसता उल्लेख करायचा म्हटला तरी पानेच्या पाने भरतील.
लतादीदींनी गायलेले १)भेटी लागी जीवा २)वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे सारखे तुकारामाचे अभंग असोत अथवा १)नीज माझ्या नंदलाला २)श्रावणात घननीळा बरसला सारखी पाडगावकरांची भावगीते असोत; भीमसेनांनी गायलेले १)सावळे सुंदर रूप मनोहर २)राजस सुकुमार मदनाचा पुतळा सारखे अभंग असोत अथवा बाबूजींनी गायलेले लळा जिव्हाळा शब्दच खोटे असो; वसंतरावांनी गायलेले १)बगळ्यांची माळफुले २)राहिले ओठातल्या ओठात वेडे असो;आशाताईंनी गायलेली १)कंठातच रुतल्या ताना २)टप्‌ टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर वाजतंय असोत; अशी शेकडोंनी गाणी आपण सहज आठवू शकतो.
सहज आठवणारी आणखी काही गाणी आणि गायक-गायिका
१)हृदयनाथ मंगेशकर…….. १)वेगवेगळी फुले उमलली २) लाजून हासणे अन्‌
२)अरुण दाते/सुधा मल्होत्रा…. १) शुक्रतारा मंद वारा २)हात तुझा हातातून धुंद ही हवा
३) सुरेश वाडकर………. १)धरिला वृथा छंद २)जेव्हा तुझ्या बटांना
४)सुमन कल्याणपूर……… १)उतरली सांज ही धरेवरी २)बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
अशा तर्‍हेची एकाहून एक श्रवणीय कितीही गाणी आठवली तरी ती कमीच.

१९६८ सालापासून खळे साहेबांनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरु केली. त्यानंतर त्यांनी संत तुकारामाचे अभंग लतादीदींकडून गाऊन घेतले. पंडित भीमसेनांकडून अभंगवाणी गाऊन घेतली. राम-श्याम गुणगान नावाने काही भक्तिगीतांची तबकडी काढली… त्यात लतादीदी आणि पंडित भीमसेनजी ह्यांच्याकडून गाऊन घेतले.सुरेश वाडकर,कविता कृष्णमुर्ती,वीणा सहस्रबुद्धे,उल्हास कशाळकर अशा अजून कितीतरी कलाकारांकडून त्यांनी गाऊन घेतलेल्या गाण्यांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.


राम-श्याम गुणगानच्या वेळी पंडित भीमसेन आणि लतादीदींना चाल गाऊन दाखवताना खळेसाहेब.
खळे साहेबांनी दिलेल्या चाली वरवर जरी सोप्या वाटल्या तरी त्या गाताना विशेष श्रम घ्यावे लगतात.स्वर आणि लय सांभाळताना भल्याभल्यांना कठीण जातं. त्याबद्दल बाबुजी म्हणतात की खळे साहेबांच्या काही गाण्यातल्या जागा आपल्याला कधीच जमणार नाहीत.बाबुजींसारख्या सिद्धहस्त गायक-संगीतकाराने असे म्हटल्यावर अजून कोणते वेगळे शिफारसपत्र हवे?

आयुष्यभर केलेल्या खडतर वाटचालीमुळे आणि वेळोवेळी आलेल्या आजारपणांमुळे आज वयाच्या ८३व्या वर्षी खळे साहेब शरीराने खूपच थकलेत. हात थरथर कापतात म्हणून लिहिता येत नाही अशी परिस्थिती आहे;पण पेटी समोर येताच सगळी थरथर थांबते आणि आपले आजारपण विसरून खळे साहेब संगीताच्या विश्वात रंगून जातात.आजही त्यांची संगीतसाधना अव्याहतपणे सुरु आहे.अशा ह्या महान संगीतसाधकाला आपण दीर्घायुरोग्य चिंतुया!

प्रेषक प्रमोद देव ( मंगळ, 06/24/2008 – 22:15) .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: