RSS

मराठी सुगम संगीतातील नररत्ने! दत्ता डावजेकर!

13 ऑगस्ट
 

वैधानिक इशारा: ह्या अशा संकलीत लेखामुळे कुणाच्या प्रतिभासाधनेत व्यत्यय येणार असेल तर कृपया त्यांनी पुढे वाचण्याची तसदी घेऊ नये.


दत्ता डावजेकर! संगीतातले डाव जे सहज करतात.. ते डावजेकर ! सिनेमा क्षेत्रात ते डीडी ह्या नावाने ओळखले जातात. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून सर्वात प्रथम गानकोकिळा लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी देणारा संगीतकार! हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागुं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ . डीडींनी त्यानंतर आशा मंगेशकर(भोसले), उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली.

डीडींचे वडील बाबुराव, तमाशात आणि उर्दु नाटकात तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्‍या डीडींनी तबला तर शिकून घेतलाच पण पेटी वादनही आत्मसात करून घेतले. इथनं मग सुरु झाली त्यांची संगीत यात्रा. तबला-पेटी वादना बरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डीडींना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तर हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे डीडींना मासिक २०रूपये पगार मिळत असे.

त्यानंतर डीडींनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डीडींचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें ज्यात लता दीदींनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे डीडींच्या संगीत दिग्दर्शनात झाले हा एक मणिकांचन योग समजला जातो.

त्यानंतर आपकी अदालत हा वसंत जोगळेकरांचा चित्रपट आणि कैदी गोवलकोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथचा हिंदी-इंग्लीश चित्रपट केला. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.

दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. राजा परांजपे, गजानन जागिरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादि निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादि चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले.

डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थॅंक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम गीतकारही होते. त्यांनी रचलेली आणि गाजलेली काही गीते अशी आहेत.
१)आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी- गायिका : लता मंगेशकर
२)कुणि बाई, गुणगुणले। गीत माझिया ह्रुदयी ठसले॥ -गायिका: आशा भोसले
३)गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना। गेला कुठे माझा राजा, राजा येईना॥ – गायिका: लता मंगेशकर
४)थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी । बोलणे ना बोलणे रे, ते तुझ्या हाती ॥ – गायिका: आशा भोसले
५)तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला ! गायिका: लता मंगेशकर

भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले.
डीडींची अजून काही गाजलेली गाणी अशी आहेत.
१)ऊठ शंकरा सोड समाधी-चित्रपट: पडछाया-गायिका : रेखा डावजेकर
२) अंगणी गुलमोहर फुलला- गायिका : माणिक वर्मा
३)आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही- चित्रपट: वैशाख वणवा- गायिका: सुमन कल्याणपूर
४)गोमू माहेरला जाते हो नाखवाचित्रपट: वैशाख वणवा. गायक: पं.जितेंद्र अभिषेकी
५)गंगा आली रे अंगणी- चित्रपट:संथ वाहते कृष्णामाई
६)या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती- चित्रपट पाठलाग- गायिका: आशा भोसले
७)तुझे नि माझे इवले गोकुळ – चित्रपट: सुखाची सावली. गायक-गायिका: लता आणि हृदयनाथ मंगेशकर
८)संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट: संथ वाहते कृष्णामाई- गायक: सुधीर फडके
९)रामा रघुनंदना,रामा रघुनंदना – चित्रपट: सुखाची सावली – गायिका: आशा भोसले
१०)बाई माझी करंगळी मोडली- चित्रपट: पडछाया- गायिका:आशा भोसले
डीडींची अजून कितीतरी श्रवणीय गाणी आहेत की ज्यांचा नुसता उल्लेख करायला गेलो तर पूर्ण पान भरून जाईल.
चित्रपटांच्या बरोबरीनेच डीडींनी बर्‍याच अनुबोधपटांचेही(डॉक्युमेंटरीज) संगीत,पार्श्वसंगीतही तयार केलेले आहे.

१९९२ साली डीडींनी शेवटचा चित्रपट केला. त्यानंतर ते जवळजवळ विजनवासातच गेले
वार्धक्याने डीडींच्या स्मरणशक्तीवर बराच परिणाम केलेला होता त्यामुळे शेवटच्या काळात मात्र डीडींचा चित्रपट सृष्टीशी म्हणावा तितका संबंध राहिला नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षी डीडींचे १९ सप्टेंबर २००७ रोजी त्यांच्या राहत्या घरी तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

आज डीडी आपल्यात त्यांच्या अजरामर चालींच्या स्वरुपात जीवंत आहेत.

प्रेषक प्रमोद देव ( शुक्र, 07/11/2008 – 22:36) .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: