RSS

आज़ जाने की जि़द ना करो…

13 ऑगस्ट

राम राम मंडळी,

आज़ जा़ने की जि़द ना करो.. हे गाणं आपल्याला इथे ऐकता येईल आणि इथेही ऐकता येईल!

फ़रिदा खा़नुमने गायलेलं एक अतिशय सुरेख गाणं! बर्‍याच दिवसापासून या गाण्यावर दोन शब्द लिहायचा बेत होता, आज जरा सवड मिळाली.

फ़रिदा खा़नुम

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

आज़ जा़ने की जि़द ना करो.. !

क्या बात है, एक अतिशय शांत स्वभावाचं, परंतु तेवढंच उत्कट गाणं! भावनेचा, स्वरांचा ओलावाही तेवढाच उत्कट! यमन रागाचं हे एक वेगळंच रूप!

मंडळी, आजपर्यंत हा यमन किती वेगवेगळ्या रुपाने आपल्या समोर यावा? मला तर अनेकदा प्रश्न पडतो की या रागाचं नक्की पोटेन्शियल तरी किती आहे?! ‘जिया ले गयो जी मोरा सावरीया’, ‘जा रे बदरा बैरी जा’ मधला अवखळ यमन, ‘समाधी साधन’ मधला सात्विक यमन, ‘जेथे सागरा धरणी मिळते’ मधला जीव ओवाळून टाकायला लावणारा यमन, ‘दैवजात दु:खे भरता’ मधला ईश्वरी अस्तित्वाची साक्ष पटवणारा यमन, अभिजात संगीतातल्या निरनिराळ्या बंदिशींमधून प्रशांत महासागराप्रमाणे पसरलेला अफाट आणि अमर्याद यमन, आणि ‘रंजिश ही सही’ किंवा ‘आज़ जा़ने की जि़द ना करो’ सारख्या गाण्यांतून अत्यंत उत्कट प्रेमभावना व्यक्त करणारा यमन! किती, रुपं तरी किती आहेत या यमनची?! गाणं कुठल्याही अर्थाने असो, यमन प्रत्येक गाण्याच्या शब्दांना त्याच्या अलौकिक सुरावटीचे चार चांद लावल्यावाचून रहात नाही!

आज़ जा़ने की जि़द ना करो,
यू ही पेहेलू मै बैठे रहो..

‘यू ही पेहेलू मे बैठे रहो..’ मध्ये काय सुंदर शुद्ध मध्यम ठेवलाय! क्या बात है..! ‘पेहेलू’ या शब्दात ही खास शुद्ध मध्यमाची जागा आहे बरं का मंडळी! ‘कानडाउ विठ्ठलू..’ आठवून पाहा, आपल्याला हाच शुद्ध मध्यम दिसेल! अहो शेवटी समुद्र हा सगळा एकच असतो हो, फक्त त्याची नांव वेगवेगळी असतात! Smile

‘बैठे रहो’ हे शब्द किती सुंदररित्या ऑफबिट टाकले आहेत!

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे
ऐसी बाते किया ना करो!
आज़ जा़ने की जि़द ना करो,

हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे..!!

ओहोहो! खल्लास…

‘हाये’ मधला पंचम पाहा मंडळी! साला, त्या यमनापुढे आणि फ़रिदा खा़नुमपुढे जा़न कुर्बान कराविशी वाटते! हा ‘हाये’ हा शब्द कसला सुरेख म्हटला आहे या बाईने! छ्या, ऐकूनच बेचैन व्हायला होतं! माझ्या मते इथे या गाण्याची इंटेन्सिटी आणि डेप्थ समजते!

‘हम तो लुट जाएंगे..’ मधल्या ‘हम’ वरची जागा पहा!

‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ मधील ‘जाएंगे’ या शब्दाचा गंधारावर काय सुरेख न्यास आहे पहा! गंधारावर किती खानदानी अदबशीरपणे ‘मर जाएंगे’, ‘लुट जाएंगे’ हे शब्द येतात! मंडळी, हा खास यमनातला गंधार बरं का! अगदी सुरेल तंबोर्‍यातून ऐकू येणारा, गळ्यातला गंधार म्हणतात ना, तो गंधार! आता काय सांगू तुम्हाला? अहो या एका गंधारात सगळा यमन दिसतो हो! यमनाचं यमनपण आणि गाण्याचं गाणंपण सिद्ध करणारा गंधार!

‘हाये मर जाएंगे, हम तो लुट जाएंगे’ ची सुरावट काळीज घायळ करते! क्या केहेने.. साला आपली तर या सुरावटीवर जान निछावर!

‘ऐसी बाते किया ना करो..’!

वा वा! ‘किया’ या शब्दावरची जागा पाहा. ‘करो’ हा शब्द कसा ठेवलाय पाहा फंरिदाबाईने! सुंदर..!

खरंच कमाल आहे या फ़रिदा खानुमची. या बाईच्या गाण्यात किती जिवंतपणा आहे, किती आर्जव आहे! खूपच सुरेल आवाज आहे या बयेचा. स्वच्छ परंतु तेवढाच जवारीदार आवाज! आमच्या हिंदुस्थानी रागसंगीतात आवाज नुसताच छान आणि सुरेख असून चालत नाही तर तो तेवढाच जवारीदारही असावा लागतो. फंरिदाबाईचा आवाज असाच अगदी जवारीदार आहे. तंबोरादेखील असाच जवारीदार असला पाहिजे तरच तो सुरेल बोलतो आणि हीच तर आपल्या रागसंगीताची खासियत आहे मंडळी! सुरेलतेबरोबरच, बाईच उर्दूचे उच्चार देखील किती स्वच्छ आहेत! क्या बात है…!

असो, तर मंडळी असं हे दिल खलास करणारं गाणं! बरेच दिवस यावर लिहीन लिहीन म्हणत होतो, अखेर आज टाईम गावला! एखादं गाणं जमून जातं म्हणतात ना, तसं हे गाणं जमलं आहे. अनेक वाद्यांचा ताफा नाही, की कुठलं मोठं ऑर्केस्ट्रेशन नाही! उतम शब्द, साधी पेटी-तबल्याची साथसंगत, यमनसारखा राग आणि फ़रिदाबाईची गायकी, एवढ्यावरच हे गाणं उभं आहे! मी जेव्हा ‘फ़रिदाबाईची गायकी’ हे शब्द वापरतो तेव्हा मला नेमकं काय म्हणायचं आहे हे कदाचित हिंदुस्थानी रागसंगीतात जाणणारी मंडळी अधिक चांगल्या रितीने समजू शकतील! बाईने दिपचंदी सारख्या ऑड तालाचं वजन काय छान सांभाळलंय! हार्मिनियमचं कॉर्डिंगही खासच आहे. तबलजीनेही अगदी समजून अत्यंत समर्पक आणि सुरेल ठेका धरला आहे! जियो…!

साला, या गाण्याचा माहोलच एकंदरीत फार सुरेख आहे!

आसुसलेली संध्याकाळ आहे, ग्लासात सोनेरी, मावळतीच्या रंगाच्या सोनेरी छटांच्या रंगाशी नातं सांगणारी आमच्या सिंगल माल्ट फ्यॅमिलीतली ग्लेनफिडिच आहे, छानपैकी गाद्या-गिर्द्या-लोड-तक्क्यांची बिछायत पसरली आहे, मजमुहा अत्तराचा मादक सुवास अंगावर येतो आहे, सगळा माहोल रंगेल करतो आहे, तंबोरा जुळतो आहे, सारंगी त्याच्याशी मिळतंजुळतं घ्यायच्या प्रयत्नात आहे, तबल्याच्या सुरांची आस तंबोर्‍याच्या स्वराशी एकरूप होऊ पाहते आहे आणि काळजावर अक्षरश: कट्यार चालवणारी अशी एखादी ललना मादक आणि बेभान स्वरात,

‘आज़ जाने की जि़द ना करो..’ असं म्हणते आहे!

क्या बात है…!

–तात्या अभ्यंकर.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: