RSS

अजि म्या परब्रह्म पाहीले!

13 ऑगस्ट

दरवाज्यावरील पाटी वाचून घंटी वाजवली. दरवाजा उघडायला थोडा वेळ लागला. अर्धवट दरवाजा उघडून त्या व्यक्तीने विचारले कोण हवंय आपल्याला?
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इथेच राहतात काय?..माझा सवाल!
होय! तशी पाटी इथे दिसतेय ना?…त्यांनी थोडेसे चिडून विचारले.
काय आहे,की हल्ली दारावरची पाटी आणि आत राहणारी माणसे एकच असतील असा काही भरवसा राहीलेला नाहीये. म्हणून विचारले. कृपया रागावू नका.मला भाईकाकांना भेटायचंय. मी पाऽऽर मुंबईहून इतक्या लांब आलोय त्यांना भेटायला…मी.
आपण कोण? आपले काय काम आहे? हल्ली भाईला बरं नसतं तेव्हा त्याला उगाच त्रास द्यायला कशाला आलात?..सुनीताबाई बोलल्या.
ह्या सुनीताबाई आहेत हे इतक्या वेळात माझ्या लक्षात आलेच होते. तेव्हा मी जास्त घोळ न घालता म्हटले..काकी,अहो मला ओळखले नाही काय तुम्ही? अहो मी मोद! इतक्यात विसरलात?
खरे तर मला त्यांनी ओळखावे असा मी कुणीच नव्हतो आणि ह्याआधी कधी त्यांना भेटलेलो देखिल नव्हतो. पण जरा जवळीक दाखवावी म्हणून हा गुगली टाकला.
त्याही जराशा गोंधळल्या. आठवायचा प्रयत्न करत होत्या इतक्यात…ते, समस्त महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे खुद्द भाईकाका भिंतींचा आधार घेत घेत तिथे आले.
ह्याची देही ह्याची डोळा माझे परब्रह्म मला पाहायला मिळत होते म्हणून मी देखिल हरखून गेलो.

कोण गं सुनीता?कुणाशी इतका वेळ बोलते आहेस?
अहो,हे…..
सुनीताबाई पुढचं काही बोलण्याच्या आधीच मी चटकन पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले..भाईकाका,अहो मी मोद. ओळखले नाही काय मला?…मी स्वत: कुणी शेक्सपीयर वगैरे असल्याच्या आविर्भावात म्हणालो.
भाईकाकांनी मला नीट न्याहाळले आणि म्हटले…हं! नाव ऐकल्यासारखे वाटतेय.अरे हो! मोदबुवा नाही काय तुम्ही! ओहोहो! या या! अलभ्य लाभ!
आणि सुनीताबाईंकडे वळून डोळे मिचकावीत म्हणाले…अगं तू ओळखत नाहीस ह्या महाभागाला?
सुनीताबाईंचा अजूनही प्रश्नार्थक चेहरा पाहून भाईकाका त्यांना म्हणाले…अगं, हेच ते मोदबुवा!स्वरभास्कराची आणि आधुनिक तानसेन सैगलसाहेबांची भेट घालून देणारे ‘महान(?)व्यक्तीमत्व’ आठवतंय काय?
आता मात्र सुनीताबाईंच्या चेहर्‍यावरचा अनोळखीपणाचा भाव जाऊन त्याजागी किंचित स्मित उमटले.
या,या! म्हणत त्यांनी मला घरात घेतले.

मी इथे विचारात पडलो होतो की भाईकाकांना कसे कळले त्या भेटीबद्दल? मी तर कधीच त्यांना त्याबद्दल बोललेलो नव्हतो. मग त्यांनाच विचारलेलं बरं म्हणून मी धीर करून विचारले…भाईकाका,भीमसेन अण्णा आणि सैगलसाहेबांच्या भेटीबद्दल तुम्हाला कसे कळले हो? ती भेट तर अगदीच खाजगी स्वरुपाची होती.
अरे वा! अशा गोष्टी कधी लपून राहतात काय? पण एक सांगतो,मी तुझ्यावर रागावलोय…भाईकाका.
का बरं? माझ्याकडून असा कोणता प्रमाद घडला?…गोंधळून जाऊन मी जरा गटणेच्या भाषेत प्रश्न केला.
अरे बाबा, त्या भेटीच्या वेळी मला का नाही बोलावलेस? मीही त्या दोघांना पेटीवर साथ करून तेवढेच माझे हात साफ करून घेतले असते. ती संधी तू मला नाकारलीस. म्हणून मी तुझ्यावर रागावलोय….भाईकाका लटक्या रागाने म्हणाले.
भाईकाका,एक डाव माफ करा ना! पुढच्या वेळी नाही विसरणार. नक्की बोलावीन तुम्हाला आणि वसंतरावांनाही बोलवीन. तेही मस्तपैकी तबला बडवतील आणि ..
माझे बोलणे अर्धवट तोडत भाका म्हणाले…अरे,नाही रे. गंमत केली तुझी. आता ह्या हातात अजिबात ताकद नाही राहीली. गेले कैक महिने ह्या हाताला साधा पेनचा स्पर्शही नाही झालाय तर पेटी कसली वाजवतोय?
भाईकाका,एक सांगु?..मी
अरे बोल मोदबुवा! तुला हवे ते बोल.त्यात परवानगी कशाला मागतोस?
भाईकाका, तुम्ही हरितात्या आणि अंतु बर्वा ही पात्रं काय जीवंत उभी केलेत.त्यांची एकेकाची तत्वज्ञानं ऐकली ना की कसे भरून येते. पण भाईकाका,अहो तुम्ही अजून एक करा ना. ह्या दोन्ही पात्रांना एकमेकांशी संवाद साधताना ऐकायला आम्हाला आवडेल…मी.
ते कसे? त्याने काय होईल?…भाका
म्हणजे बघा आता,तुमचा तो अंतु बर्वा म्हणतो ना की, “आला नेहरू,आणि त्याने इथे येऊन काय केले? तर, भाषण! अरे भाषणं कसली करतोस? त्याऐवजी तांदूळ दे! आणि रत्नांग्रीस त्यास काय दाखविले तर,टिळकांचा जन्म झाला ती खोली. दाखवली कुठली तरी बाज आणि दिले ठोकून की टिळकांनी इथे पहिले ट्यांहा केले. अरे पुरावा काय? टिळकांच्या आयशीचे बाळंतपण करणारी सुईण होती काय तिथे?”……म्हणजे अंतु पुरावा मागतो की नाही?
हो. बरोबर. मग? …भाका
आता त्या उलट तुमचे हरितात्या. पुराव्याने शाबित करतात ते सगळ्या गोष्टी. मग मला सांगा आता की ह्या दोघांना एकमेकांना तुम्ही समोरासमोर आणलेत तर काय बहार येईल? त्यांचा सवाल-जबाब अगदी ऐकण्यासारखा होईल…मी
मिस्कीलपणे हसत आणि चश्म्यातुन माझ्यावर आपले बोलके डोळे रोखत भाईकाका म्हणाले…खरंच की!मोदबुवा,तुझ्या बोलण्यात पाईंट आहे बरं का! माझ्या कसे हे लक्षात नाही आले?
मग,भाईकाका, कधी घेताय मनावर? कधी लिहाल?..मी लगेच, ती संधी हातातुन सुटू नये म्हणून म्हटले.
अरे,नाही रे! आता हातात ताकत नाही उरली.
भाईकाका,असे म्हणू नका हो. तुम्ही नुसते सांगत जा. मी लिहीतो. तुम्ही व्हा व्यास आणि मी होतो गणपती.चालेल?
चालेल? अरे धावेल! आता किती जमेल ते माहीत नाही पण प्रयत्न करून बघू या…भाईकाकांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच स्मित झळकू लागले.
जरासा विचार करून भाईकाका सांगु लागले….हं,लिही….
काय हो हरितात्या……
इतक्यात दारावरची घंटी वाजली.भाईकाका मला म्हणाले,मोदबुवा जरा बघा बघू. कोण आलंय तडमडायला ह्या भलत्या वेळी?
मी धडपडत जाऊन आधी दार उघडले. दारात कुणी तरी विक्रेता उभा होता. त्याला वाटेला लावले. चला,आपण आपलं ते भाईकाका काय सांगताहेत ते लिहून घेऊ या असा विचार केला आणि वळलो.पाहतो तो काय?….

अरेच्चा! भाईकाका कुठे गेले? आणि हे काय? मी माझ्याच घरात कसा? छ्या! म्हणजे? इतका वेळ मी स्वप्न तर बघत नव्हतो? काहीच उलगडा होईना. इतका वेळ जे काही घडले ते खरे नव्हते?माझा तर माझ्यावरच विश्वासच बसेना.जे काही घडले ते साक्षात डोळ्यासमोर अजूनही दिसत होते तरी ते खरे नव्हते? कसं शक्य आहे?

हळूहळू एकेक गोष्ट आठवायला लागली. मी आपला नेहमीप्रमाणे भाईकाकांच्या आवाजातली ध्वनीफीत लावून पलंगावर पडून मस्तपैकी ऐकत होतो आणि बघता बघता केव्हा झोपलो ते कळलेच नाही.काय मस्त स्वप्न होते ते..त्यातनं बाहेर पडूच नये असे वाटतंय.पण त्या दुष्ट लोकांना पाहवले नाही आणि त्यांनी मला त्या दुनियेतून जबरदस्तीने बाहेर काढले.पण तिथे भाईकाका माझी वाट पाहत असतील. मला गेलंच पाहीजे.चला पुन्हा झोपू या.
ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽ! ढुर्रर्रऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!

प्रेषक प्रमोद देव ( रवी, 09/28/2008 – 23:32) .

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: