RSS

“स्वाईन फ्ल्यु !”

12 ऑगस्ट

स्वाइन फ्लू’चा उद्रेक वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. या विषाणूजन्य आजाराबाबत केव्हा शंका घ्यावी, तो होऊ नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी, या संदर्भात नागरिकांचे शंकानिरसन होणे आवश्‍यक आहे. जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्या संकेतस्थळावरून व संबंधित तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शंकानिरसन करण्याचा हा प्रयत्न….

स्वाइन-फ्लूबद्दल वृत्तपत्रात काही माहिती आली आहे, पण नागरिकांना पडणाऱ्या काही प्रश्‍नांबाबत नेमकी माहिती सोप्या भाषेत पुढे आलेली नाही. म्हणून जागतिक संघटना, अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल यांच्या संकेत स्थळावरून (cdc.gov, who.int) व पुण्यातील काही संबंधित तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शंकानिरसन करण्याचा हा प्रयत्न.

हा आजार फ्लूसारखा आहे; मात्र काही जणांना तीव्र आजार होतो; पण बहुसंख्य रुग्ण आपोआप बरे होतात. स्वाइन फ्लूचे विषाणू मारणारे औषध घेतल्यावर तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप वाढते. सौम्य आजार असल्यास अमेरिकेत औषधही देत नाहीत! जगात गेल्या चार महिन्यांत १६,२,३८० रुग्णांपैकी ११५४ म्हणजे १ टक्‍क्‍यापेक्षा कमी रुग्ण दगावले. पुण्यात स्वाइन-फ्लूचे आतापर्यंत २०४ रुग्ण झाले आहेत. ही संख्या वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय अर्थात करायलाच हवेत. व लागण झालेल्यांवर लगेच उपचारही करायला हवे; पण धसका घेऊन, घबराटीने काहीच साध्य होणार नाही.

स्वाइन-फ्लूची शंका केव्हा घ्यावी?

स्वाइन-फ्लू खात्रीशीर ओळखण्यासाठी लॅबोरेटरीची मदत घ्यावी लागते. कारण साध्या फ्लूप्रमाणे यातही सर्दी-ताप-घसादुखी ही लक्षणे दिसतात. त्यामुळे घशातील स्त्रावाचा नमुना तपासून त्यात स्वाइन-फ्लूचे विषाणू सापडले तरच निश्‍चित निदान होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (N.I.V.) या पुण्यातील अग्रगण्य सरकारी संस्थेतच विषाणूची लागण झाली आहे का याचे खात्रीशीर निदान होते. त्यासाठीची अत्यंत प्रगत अशी “रिअल-टाइम पी.सी.आर.’ ही तपासणी पुण्यात इतरत्र होत नाही. तिला खर्चही खूप येतो. नुसत्या किटचा किमान खर्च दहा हजार रुपये आहे. प्रत्येक सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची अशी तपासणी करणे शक्‍य नाही व गरजही नाही म्हणून सर्दी-खोकला-ताप असलेल्यांपैकी गेल्या आठ दिवसांत परदेशातून आलेले किंवा स्वाइन-फ्लूच्या रुग्णाच्या संपर्कात आलेले अशांच्या घशातील स्त्रावाचे “सॅंपल’ नायडू रुग्णालयात घेऊन ते एनआयव्हीला पाठवले जात आहेत. मात्र या दोन्ही गोष्टी नसणाऱ्यांमध्येही स्वाइन-फ्लूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे स्वाइन-फ्लूची शंका यावी अशी जादा लक्षणे आढळली तर अशांचेही सॅंपल एनआयव्हीकडे पाठवायची गरज आहे. ही लक्षणे म्हणजे- सर्दी-खोकला तापासोबत उलट्या-जुलाबही होणे, तीन दिवसांपेक्षा जास्त सतत ताप असणे किंवा गंभीर लक्षणे म्हणजे श्‍वास घेण्यास त्रास होणे, गुंगी येणे वा वागण्यात अचानक बदल होणे, स्वाइन-फ्लूची शंका येते आहे का यासाठी तपशिलात प्रश्‍न विचारून छाननी करायची व “संशयित रुग्ण आहे असे वाटल्यास त्याचे सॅंपल एनआयव्हीला पाठवायचे, हे काम सरकारी नियंत्रणाखाली व्हायला हवे. कारण “एनआयव्ही’वर अकारण जादा ताण पडता कामा नये. म्हणून फक्त “नायडू’मध्येच व आता इतर १५ सरकारी केंद्रांमध्येच ही प्राथमिक छाननी केली जात आहे. सर्दी-खोकला-ताप झाला, की लगेच “सॅंपल’ तपासायला पाठवणे, असे करता येणार नाही.

लागण होऊ नये यासाठी काय करावे?

थिएटर, नाट्यगृह इ. बंदिस्त गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्‍यतो टाळावे. घराबाहेर जाऊन आल्यावर साबणाने हात धुवावेत कारण स्वाइन फ्लूचे विषाणू लागण झालेल्याच्या श्‍वासातून, खोकल्यातून, शिंकांमधून बाहेर पडून टेबल, खुर्ची, बस असा आसपासच्या ठिकाणी स्थिरावून ३ ते ८ तास जिवंत राहतात. ते आपल्या हाताला लागून आपल्याला लागण होऊ शकते. या कारणासाठी नाक, चेहरा याला हात लावायचे टाळावे. सगळ्यांनीच मास्क लावण्यात अर्थ नाही; मात्र स्वाइन-फ्लूचे रुग्ण, संशयित रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्‍टर इतर कर्मचारी यांनी मास्क लावणे आवश्‍यक आहे. संशयित रुग्ण किंवा स्वाइन-फ्लू झालेला रुग्ण याच्याजवळ (सहा फुटांच्या आत) जाऊ नये. गरोदरपण, म्हातारपण, पाचपेक्षा कमी व. एच.आय.व्ही. लागण, मधुमेह, दमा इ. पैकी असल्यास विशेष काळजी घ्यावी. मात्र स्वाइन-फ्ल्यूच्या रुग्णाशी “निकटचा’ संपर्क झाल्यावर आठ दिवसांत स्वाइन फ्लूची लक्षणे दिली नाहीत तर निश्‍चिंत व्हावे.

साथ आटोक्‍यात आणण्यासाठी….

“स्वाइन-फ्लू’ जगात अवतरून चारच महिने झाले आहेत. त्याविरोधी लस बनवायला काही महिने लागतील. शिवाय त्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे इतर प्रतिबंधात्मक उपायांवर भिस्त ठेवायला हवी. संशयित रुग्णांनी घराबाहेर पडू नये, योग्य मास्क लावावा. शिंकताना, खोकताना चौपदरी रुमाल नाका-तोंडापुढे धरावा. घरातील फारशी, टेबल इ. फिनेलच्या पाण्याने पुसावे. भरपूर पाणी प्यावे, नीट आहार घ्यावा. लॅब तपासणीतून खात्रीशीर निदान झाल्यास शासकीय यंत्रणेतून मिळणाऱ्या गोळ्यांच्या कोर्स पूर्ण करावा. सर्व लक्षणे गेल्यावर पुढे एक दिवस घरी थांबून मगच घराबाहेर पडावे. त्या आधी पडावे लागले तर अर्थातच तेव्हा मास्क घालावा. वेळेवर हे औषध घेतले की नक्की बरे वाटते. तसेच आपल्याकडून इतरांना लागण व्हायचे थांबते.

स्वाइन-फ्लूच्या रुग्णांशी संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, त्या वर्गातील मुलांना आठ दिवस सुटी देणे व ती शाळा फार लहान, दाटीची असेल तर पूर्ण शाळेला आठ दिवस सुटी देणे असे उपाय योजले जात आहेत. (वर्ग, शाळा “निर्जंतुक’ करण्याची गरज नाही.) त्या संदर्भात नागरिकांनी सहकार्य करावे. सुटी मिळालेल्या मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नये. कारण त्यापैकी कोणाला लागण झाली असली तर स्वाइन-फ्लूची लक्षणे दिसण्याआधीच एक दिवस त्याच्या श्‍वासातून शिंका-खोकल्यातून हे विषाणू पसरू लागतात. हा विषाणूजन्य आजार आहे. बहुसंख्य विषाणू कोणत्याही औषधाने मरत नाहीत, पर स्वाइन-फ्ल्यूचे विषाणू मारणारी औषधे उपलब्ध आहेत, हे विशेष आहे. मात्र जगात सध्या अशी दोनच औषधे आहेत. (oseltamivir ब्रॅंड नेम Tamiflu व Zananmivir) ती महाग तर आहेतच, पण गरज नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने वापरली तर हे विषाणू नंतर या औषधांना दाद देणार नाहीत. म्हणून लॅब-तपासणीतून खात्रीशीर निदान झालेल्यांनाच सरकारी यंत्रणेमार्फत गोळ्यांचा पाच दिवसांचा पूर्ण डोस दिला जात आहे. सुरतमधील प्लेगचा अनुभव आहे, की असे नियंत्रण ठेवले नाही तर फार मोठ्या प्रमाणावर औषधांचा अकारण वापर होतो. स्वाइन-फ्लूबाबत हे अजिबात परवडणारे नाही.

विशेषतः पावसाळ्यात सर्दी-खोकला-ताप अनेकांना होणारच. अशा वेळी आधी नेहमीचे उपचार करावेत. तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत ताप असेल, किंवा वर दिलेली स्वाइन-फ्लूची लक्षणे दिसली, तर आपल्या फॅमिली डॉक्‍टरच्या सल्ल्याने सरकारी केंद्रामध्ये जावे. जाताना नाकाकोंडाला मास्क लावावा. महापालिकेने सूचना देणारी पत्रके मोठ्या प्रमाणावर वाटली आहेत, इतर मार्गाने जनजागृती केली आहे; पण एकतर या पत्रकात सुधारणा होण्याची गरज आहे, दुसरे म्हणजे रेडिओ-टी.व्ही. (दूरदर्शन व खासगी वाहिन्या)वर दर बातमीपत्रानंतर सर्व नेमक्‍या सूचना लोकांना समजतील अशा पद्धतीने द्यायला हव्यात. खासगी डॉक्‍टरांनी कोणत्या परिस्थितीत काय करावे याचे निर्देश त्यांना न पाठवता सहा ऑगस्टला त्यांना नुसती धमकी देणारी जाहिरात वजा नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे! अशाने त्यांचे सहकार्य मिळणार नाही. प्राथमिक छाननी व सॅंपल तपासणीचे धोरण महापालिकेने लोकांना तसेच खासगी डॉक्‍टरांना समजावून न सांगितल्याने नायडू हॉस्पिटलमध्ये अकारण मोठ्या रांगा लागून नागरिकांचे हाल झाले.

सरकारी यंत्रणा, खासगी डॉक्‍टर व नागरिक यांच्यात सुसंवाद हवा. या सर्वांच्या सहकार्यातूनच या साथीला रोखण्याचे आव्हान पेलता येईल. गणपती व इतर उत्सवाच्या काळात मोठे आव्हान पेलावे लागणार आहे, हे लक्षात घ्यावे.

 
डॉ. अनंत फडके
 
संदर्भ : ई-सकाळ (दि. १० ऑगस्ट २००९, बुधवार)
 
स्वाइन फ्लूने हातपाय पसरले आहेत. शेकडो विद्यार्थी उपचारांसाठी रुग्णालयांत दाखल झाले. पुण्यात एक बळीही गेला. त्यामुळे निर्माण झाली घबराट. खरंतर घाबरण्यापेक्षा या रोगाची ओळख करून घेतली आणि त्यानुसार काळजी घेतली, तर आपण ही लाट निश्‍चितपणे परतवून लावू शकतो.

फेब्रुवारी-मार्चमध्ये मेक्‍सिकोत सुरू झालेला हा झंझावात जुलै महिन्यात भारताच्या उंबरठ्यावर पोचला व म्हणता म्हणता पुण्यात शेकड्यात रुग्ण सापडले व तेही शालेय विद्यार्थ्यांमध्ये. अभिनव शाळेपासून सुरू झालेलं हे वादळ हळूहळू इतर शाळांमध्ये जसजशा केसेस मिळू लागल्या तसे घबराटीचे वातावरण पसरले. हा विषाणू माइल्ड असल्यामुळे घाबरू नका. संख्याशास्त्रानुसार दर हजारी रुग्णामागे ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते व त्यातील ४ रुग्णांच्या जिवाला धोका असतो, हे व्यासपीठावरून सांगत होतो व पुणेकर जरा निर्धास्त होऊ लागले होते. एवढ्यात, रिदा शेखचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या तीव्र संक्रमणामुळे एआरडीएस झाला व कृत्रिम श्‍वसनाची व्यवस्था करूनही, प्रयत्नांची शर्थ करूनही कु. रिदाचा दुर्दैवी मृत्यू झाला व परत सर्व पुण्यात घबराट पसरली व ५ ते १० हजार रुग्ण व नातेवाईक नायडू रुग्णालयात पोचले व समरप्रसंग उद्‌भवला.

एच१, एन१चा विषाणू हा ह्यूमन (माणसांना बाधित करणारा), पक्ष्यांना व डुकरांना बाधित करणारा. या विषाणूंच्या ऍसार्टमेंटमधून तयार झालेला व १९१८ च्या विषाणूंची चौथी पिढी असून, ५-६ पॅनडेमिक झालेले आहेत. या विषाणूंचा Incubation Period ७-८ दिवस असतो म्हणजे विषाणू शरीरात शिरल्यापासून १ ते ८ दिवसांत त्याची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे खालीलप्रमाणे –

थंडी, ताप – १०० अंश फॅ.पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी व पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधीकधी पोटदुखी इ.,

रोगाचा प्रसार खालीलप्रमाणे होतो

शिंकल्या-खोकल्यानंतर जे हवेत तुषार उडतात ते हवेत धूलिकणावेष्टित राहतात. साधारणतः ८ तास त्यात विषाणू जिवंत राहतात. खुर्ची, टेबलटॉप, संगणकाचा की-बोर्ड व माउसवर; तसेच दरवाजाच्या मुठी, कठडे व टेलिफोनवरही राहतात. हातावर विषाणू आल्यावर नाक, डोळे, तोंड व इतर म्युकोझावर संपर्क आल्यास, विषाणूंचे संक्रमण होते व विषाणू शरीरात वाढू लागतो.

रुग्णाला वरील लक्षणांशिवाय दाखल कधी करावे? –

धाप लागणे, त्वचा, ओठ, बोटे निळी पडणे, शुद्ध हरपणे, अन्नपदार्थ व द्रवपदार्थाचे सेवन कमी होणे, ही गंभीर लक्षणे समजावीत. अशा रुग्णास (सरकारी) नायडू इस्पितळात दाखल करावे लागते.

तपासणी कोणाची करावी? –

१) एच१ एन१ बाधित रुग्णाशी ३ ते ६ फूट इतक्‍या अंतरावरून संबंध आल्यास.

२) परदेशातून नुकतेच परतलेले व वरील लक्षण असलेले.

३) ५ वर्षांपेक्षा कमी व ६५ वर्षांवरील फ्लूची लक्षण असलेले रुग्ण.

४) दमा, मधुमेह, इम्युनोइफिशिअन्सी (प्रतिकारकशक्ती कमी) असलेले रुग्ण.

५) फ्लूचा रोगी उपचारांना दाद देत नसल्यास.

आजतागायत जगभरात १ लाख ६५ जणांना याची लागण झालेली आहे. त्यामधील ११५० जणांवर मृत्यू ओढवलेला आहे; पण पुरेशी काळजी घेतल्यास या रोगाचा प्रादुर्भाव रोखू शकतो. काळजी घ्या, काळजी करू नका.

 
डॉ. दिलीप सारडा, डॉ. शरद अगरखेडकर

 
(संदर्भ : ई-सकाळ (दि. १२ ऑगस्ट २००९, बुधवार)
 
स्वाईन फ्ल्यु बद्दल विस्तृत माहिती इथे उपलब्ध आहे.
 
 
विशाल

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: