“हागणदारी मुक्त खेडे!”

काही दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. रायगड जिल्ह्यातल्या खेड्यांमधुन हागणदारी मुक्त खेडे ही योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावा गावातल्या अंगणवाडी शिक्षिकांना वेठीस धरण्यात आले. कल्पना अशी होती की गावातील अंगणवाडी सेविका पहाटे हागणदारीपाशी जावुन उभ्या राहतील आणि येणार्‍या स्त्री पुरुषांचे गुलाबाचे फ़ुल देवुन स्वागत करतील. नंतर त्या गावकर्‍यांचे फोटो काढुन वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातील.

एक काल्पनिक पण जिवंत प्रतिक्रिया…

सेविका: नमस्कार या अभिनव योजनेत तुमचे स्वागत, हे गुलाबाचे फ़ुल तुमच्या साठी…

गावकरी महिला: या, बया..बायकात बी असतंय का असलं, म्या न्हाय त्यातली, सांगुन ठिवते !

सेविका: ताई, गुलाबाचं फुल घ्यायला काय हरकत आहे? नंतर आम्ही तुमचा फोटोपण काढणार आहोत. तो उद्याच्या वर्तमानपत्रात छापुन येइल.

गावकरी महिला: आगावच हायेस की गं ! आमीबी बगिटलाय त्यो पिच्चर. अबिशेक बच्चन आन जान एब्रामचा. आन हे बरंय , पहिल्यासाटनं फ़ुल देताय मग फ़ोटुबी काडताय. आन त्यो पेपरात छापनार म्हनताय. म्हंजी हाय का काडीमोड आमचा. आदीच तं न्हवरा टपुन बसलाय, त्या गंगीसंगट पाट लावायला. मंग त्येंचा रस्ता मोकळा. वा गं वा ….लै शाणी हायेस कीं..!

सेविका: (स्वगत) आता हिला कसं समजावु ? बरं खरं कारण सांगावं तर चप्पल घेवुन मागे लागायची.

तुम्हाला म्हणुन सांगते, हे फ़क्त आपल्या तुपल्यात बरं. रोज सकाळी उठुन घरं झाडा, तुळशीची पुजा करा, सगळ्यांचा चहा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात म्हणुन सासुच्या नावे ओरडत होते (म्हणजे मनातल्या मनात हो) पण आता हे भलतंच विश्वदर्शन होतंय रोज सकाळी. आता काय करु….?

गावकरी महिला: ए बाई, मी जावु का आता, लई घाई झालीया. आन उशीर झाला तं पुन्हा न्हवरा पेटल. ती गंगी वाटच बगतीया आमी भांडायची !

सेविका: असं बघा बाई, समजा तुमी स्वयंपाक करायला बसला आहात.

गावकरी महिला: अगं माय माजे, हितं कोण स्वयंपाक करल. बरी हायेस ना ?

सेविका: तुम्ही मला पुर्ण बोलु द्या हो आधी, समजा तुम्ही स्वयंपाक करायला बसला आहात आणि कुठुन तरी घाणेरडे वास येवु लागले, कुठुन तरी घाण वार्‍यावर उडुन आली आणि तुमच्या अन्नात पडली. तर तुम्हाला काय वाटेल? हुश्श्….बोलुन टाकलं एकदाचं…!

गावकरी महिला: वाटायचय काय त्येच्यात, मस्नी म्हायीत हाये , पक्कं हे काम गंगीचंच आसणार बगा. लई चाबरी हाये ती.

सेविका: (स्वगत) अरे देवा, हिला गंगीशिवाय काही सुचतच नाही, काय करु ? कसं समजावु हिला…

तुम्हाला सांगते , काल असेच एक म्हातारबाबा आले, त्यांना गुलाब दिला तर म्हातारा लगेच केसावरनं हात फ़िरवायला लागला. फ़ोटो काढु म्हणलं तर..हे आत्ता आलो म्हणुन जो गायब झाला तो अर्ध्या तासाने नवे कपडे घालुन, नटुन थटुन आला..हातात टमरेल घेवुन. आणि म्हणतो “पोज देवु का पोज…! आणि हे कमी होतं म्हणुन पुढं विचारतो बाई, कानात फ़ाया लावलाय इत्तराचा, दिसल का वो फ़ोटुत?

नशीब अत्तराचा वास येइल का म्हणुन नाही विचारले.

गावकरी महिला: ए बाई, जातो ना म्या आता, आता न्हाय र्‍हावत, काय सोताशीच बोलतीया येड्यावाणी. मला कसंतरी व्हाया लागलंय आता. मला नगो तुजा फ़ोटु बिटु , म्या चालले !

सेविका : अहो, बाई…हे बघा, हा हागणदारी मुक्त खेडे या योजनेचा एक भाग आहे. तुम्हाला नाही का वाटत, तुमच्या गावात सगळीकडे शौचालये असावीत म्हणुन? रोज सकाळी एवढ्या लांब गावाबाहेर उठुन यायचं, केवढा हा त्रास असं नाही तुम्हाला वाटत.

गावकरी महिला: बाय माजे, यवडी येकच जागा हाये गं, जितं सासुचा पहारा नसतुया. दिवसातली धा – पंदरा मिन्टं मिळत्यात सुकाची तं तितं पण तुज्या पोटात दुकाय लागलं व्हय, डुचकी मेली !

सेविका: अहो, अहो बाई, असं नव्हतं म्हणायचं मला…आता कसं समजावु तुम्हाला ?

गावकरी महिला: हे बग, मस्नी काय , समजावत बसु नगो…तुज्या सायबाला जावुन समजाव. तेस्नी म्हणाव आदी घरा घरातुन संडासं त्या बांदुन आन मंग सांगा हागणदारीत नका जावु म्हुन. उटावरनं शेळ्या राकनं सोडा म्हणाव तेस्नी. गेलं मोटं लागुन. हागणदारी नसलेलं गाव म्हनं !

तुमास्नी काय जातंय गं सांगाया? हितं खायाची मारामार, एक दगडी कोळशाची शेगडी बांदुन घेयाची म्हनली तर पन्नास – पंचाहत्तर रुपडे मागत्याती. अन संडास बांदा म्हनं. आमच्या संडासासाठी मंजुर झाल्यालं पैकं सुद्धा तुजं सायेब लोक खावुन ढेकार देत्यात. त्या सरकारी फ़िरत्या संडासात जायाचं म्हनलं तर त्यो तितला कंत्राटदार लगंच दोन रुपे मागतो. आन हागणदार नको म्हनं. त्यवडी येकच जागा फ़ुकाट राहिलीय गं बाई.

सेविका: बाई, मी ..काय बोलु …काहीच..समजत नाहीये.

गावकरी महिला: तुजी आडचण कळतीय गं बाय माजे. आमालाबी नगो हाय का संडासं मिळाली बांदुन तर. आसल्या घाणीत नाक दाबुन यायाची हौस नाये गं बाई. पण नाविलाज हाये. सरकार नुसतंच सांगतं..सुदारणा फ़ायजे म्हुन..पन सुदारना फ़ायजे असं नुसतं म्हनुनशान सुदारना नसती होत बाये…!

गरिबाच्या पोटाला दोन घास मिळालं तर सुदारनेच्या गोश्टी सुचत्यात त्येस्नी. रिकाम्या पोटी न्हाय काय सुचत बाई. आता जाते. पोरं साळंत जायाची हायत. मालकबी कामावर जायाचा हाये, त्येस्नी भाकरतुकडा करुन द्येयाचा हाये बाई. सैपाक करुन दुपारच्याला सासुबायला डागदरकडं न्याचं हाय, जाती म्या.

विशाल कुलकर्णी

 

2 thoughts on ““हागणदारी मुक्त खेडे!””

  1. अगदी वास्तव चित्रण 🙂
    या अडाणी बाईला काय नावे ठेवणार??
    वाईला आमच्या घरी, सासरी आत्ता संडास बांधला आहे. सासरे हेड्मास्तर होते! आणि याच गोष्टीमुळे मी गावाला जाणेच बंद केले होते. पढेलिखे गंवार 🙂

    Like

यावर आपले मत नोंदवा