RSS

प्रगती ?

11 ऑगस्ट

ए sssssssssssssssss टकी, सळ्ळै sssssssssssssssssssssssss य्या !

नेहेमीप्रमाणे ललकारी ऐकु आली आणि मी बाहेर आलो.
” नमस्कार आज्जी, आज काय म्हणताय? काय काय आहे आज डोक्यावरच्या पाटीत? आणि काय काय चाललंय तुमच्या, पाटीखालच्या डोक्यात?”
सुरुवातीला, साधारणपणे दोन वर्षापुर्वी कुर्ल्याच्या पोलीस क्वार्टर्समधुन इकडे शिफ्ट झालो, तेव्हा आज्जी काय म्हणताहेत ते कळायचेच नाही. आणि आम्ही सगळी भाजी थेट मंडईतुन आणायचो.
“प्रत्येक पेंडीमागे किमान रुपया वाचतो”….इति सौभाग्यवती
(आता रिक्षाला दुप्पट पैसे जातात हे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यासाठीच असते)

पण आज्जींच्या टकी, सळ्ळै…ने वाढलेली उत्सुकता काही कमी होत नव्हती..
मग एका रविवारी सकाळी मी मुद्दाम, अगदी फ्रीज भाज्यांनी भरलेला असतानाही त्यांना हाक मारली…
ओ, आज्जीबाई……….
आधी त्यांनी ऐकलेच नाही बहुदा, म्हणुन पुन्हा हाक मारली…..
ओ भाजीवाल्या आज्जी, इकडे इकडे वर, पहिल्या मजल्यावर….बाल्कनीत,
त्या थांबल्या, तसा मी म्हणालो…
थांबा मी येतो खालीच…
मी पटकन खाली गेलो, त्यांची पाटी उतरवली डोक्यावरुन…..
काय करणार बाबा, मला रोजची “ए भाजीवाली…अशी हाक ऐकाची सव. येवडी मायेने मारलेली हाक न्हाय रं कळत. बोल काय पायजे, आन बायको कुटंय तुजी? भाजी घ्याया बाप्या माणसाला पाटीवतीय…?
नशिबाची हाय रं…… पोर !
म्हातारी बरीच फटकळ पण गोड होती हो…
आज्जी, पहिल्यांदा तुम्ही ते काय ओरडता ते सांगा….
आता भाजीवाली दुसरं काय वरडणार बाबा.. मटकी, वाल, पावटे, गवारी असलं कायबाय असतं बाबा…
वरडते मंग, मटकी उसळ्ळ…………………………
आयला……………………………………….. मटकी उसळ आणि टकी सळ्ळै….य्या…………!
पण माझी आणि आज्जीची मस्त दोस्ती झाली. मी ओ आज्जीबाईवरुन ए आज्जीवर आलो.

आता दर रविवारी आमच्या बिल्डिंगच्या खाली आली की आज्जीच हाक मारते….
” इशुनाथा, (तिला माझं विशाल हे नाव उच्चारायला अवघड वाटतं) ताजी ताजी कारली हायेत बग, तुज्यासाटनं ठिवलीत येगळी.’ माझ्या सगळ्या आवडी निवडी सुद्धा तिला चांगल्या माहित झाल्याहेत.

परवा, मात्र आज्जीनी धक्काच दिला.
” इशुनाथा, , काल मार्केटात मानसं म्हनत व्हती, तकडं लांब पर्देसात कुनीतरी हरिजन बाबा मोटा मंतरी जाला म्हनं ! आमचं दिस कंदी येणार…..?” ,
अँज युज्वल माझी थोडीशी उशीराच पेटली….पण पेटली तेव्हा मी फुटभर उडालो.

आज्जे, तुला गं काय फरक पडतोय त्याने, तो बराक ओबामा अमेरिकेचा अध्यक्ष झाला. तुला का एवढी उत्सुकता ?

न्हाय रं बाबा, तसं न्हाय ते, आता मी र्‍हाती तकडं साटण्याला, म्हारवड्यात . काल कुनीतरी म्हनलं आपल्या लोकांनी म्हनं चांदुबावर गाडी पाटीवली, तेस्नी ह्यो म्हारवडा कामुन लांब वाटतुया…?

या प्रश्नाला माझ्याकडे खरंच उत्तर नव्हते, मी उगाचच सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला…”काय आज्जी, तु पण घेवुन बसलीय, अगं आता असं कुठं काही राहिलंय का? आता दलित, हरीजन सुद्धा सवर्णांच्या खांद्याला खांदा लावुन काम करतात. आता तुझंच बघ ना, तु आता थेट आमच्या किचनपर्यंत येतेस. तुझ्या तरुणपणी कधी वाटलं होतं का असं होईल म्हणुन…..आपल्याकडे पण दिवस बदलले आहेत गं आता! आपले माजी राष्ट्रपती डॉ. अबुल कलाम सुद्धा अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाजातलेच होते ना?

न्हाय रं बाबा, त्यात सुदिक फरक हाये. जेच्याकडं पसा हाये तेंची व्हतीय की परगती. पन आमच्यासाटनं न्हाय रं बाबा काय बी? आमची आटवन फकस्त निवडनुकाच्या टायमाला व्हती त्यास्नी. आन तुज्या घरात येक येती म्या आतपत्तुर का तं तुजी बायल हाय गुनाची…नायतर तुज्या शेजारची देशपांडीण…..दारापासुन दोन फुट लांब बसवती मला. पैसं बी वरुन टाकती.

आता मला कळलं, आधी नेहेमी ,विशु – सायली करत सारख्या काही ना काही मागायला येणार्‍या देशपांडे काकु आमच्याकडे यायच्या, बोलायच्या अचानक बंद का झाल्या ते?

येती रं बाबा, भाजी संपवायची हाय समदी, न्हाय तर चुल पेटायची न्हाय रातच्याला?
तकडं त्यो बाबा कुणी मोटा मंतरी व्हवु द्या, न्हायतर हकडं लोकांस्नी चांदुबावर जावु द्या…मस्नी भाजी इकावीच लागणार. न्हाय तर खायाचं काय?

आज्जी गेली तिच्या कामाला, पण मनात असंख्य प्रश्न उभे करुन…

माझ्या कानात राहुन राहुन तिचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा आदळंत होतं…

“काल कुनीतरी म्हनलं आपल्या लोकांनी म्हनं चांदुबावर गाडी पाटीवली, तेस्नी ह्यो म्हारवडा कामुन लांब वाटतुया…?”

विशाल.

 

One response to “प्रगती ?

  1. mandar kulkarni

    फेब्रुवारी 25, 2011 at 4:43 pm

    Kharch aahe; we must have to finish this differences.

     

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: