RSS

“द्वार”

11 ऑगस्ट

“दादा, अरे हा विषय एवढा विचित्र आहे ना, की वाटते कोण विश्वास ठेवेल आमच्यावर? आणि त्यातुन पुन्हा नीलला काही त्रास, धोका निर्माण होणार नाही ना? ज्या कुणाशी या विषयावर बोलायचे तो कितपत विश्वासार्ह आहे, हे कळायला हवे ना !”

“आनंदा, हे बघ तूझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही हे मला माहितीय आणि पटतय देखील.
असो तो तूझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एकदा भेटायला काय हरकत आहे? फार फार तर असे करु, आपण तिघेही म्हणजे तू, मी आणि वहिनी एकदा आण्णांना भेटु या. छान गप्पा मारु या, हा विषय काढायलाच नको. त्यानंतर तूम्ही ठरवा या विषयावर आण्णांशी बोलायचे का नाही ते, काय? पटतय का? ”

“ठिक आहे दादा, तू म्हणतोच आहेस तर भेटू या आपण त्यांना, पण त्यांच्याशी या विषयावर बोलायचे का नाही ते मात्र मी त्यांना भेटल्यावरच ठरवेन. बाय द वे, त्यांचं नाव काय म्हणालास आणि काय करतात ते?”

“आनंदा , आण्णांचे नाव काय आहे ते मलाही माहीत नाही, पण बरेच जण त्यांना कल्याणस्वामी म्हणुन ओळखतात, पण मी त्यांना आण्णाच म्हणतो. ठिक आहे मग आज दुपारीच जावु आपण त्यांच्याकडे. ते काय करतात म्हणशील तर मला एवढेच माहित आहे किं ते रामदासी संप्रदायातील आहेत, त्यांचा सज्जनगडावरील समर्थ रामदासांच्या भक्तपरंपरेशी संबंध आहे. आपल्यासारखे अनेक अडले-नडले त्यांच्याकडे जातात आणि ते त्यांना कसलीही अपेक्षा न ठेवता जमेल तशी मदतही करतात. मी कधी खोलात गेलो नाही, तशी गरजही पडली नाही. शक्यतो दुपारी ४ ते संध्याकाळी १० पर्यंत ते मठातच असतात. मी त्याच्याशी बोलतो थोड्या वेळाने आणि वेळ घेवुन ठेवतो दुपारचा. ठिक ?
मग साडे तीनच्या दरम्यान मी तुम्हाला घ्यायला येइन. माझ्या गाडीनेच जावु आपण.”

“दादा तुम्ही दोघेच जा, इथे नील पाशी कोणीतरी हवे ना? मी थांबेन घरी.” पहिल्यांदाच नीला वहिनींनी संभाषणात भाग घेतला.

दादा निघून गेले. आनंदराव आणि नीलावहिनी शांतपणे एकमेकाकडे पाहात बसुन होते. एकदम वहिनींच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. तसे आनंदरावांनी पुढे होवुन त्यांना जवळ घेतले.

“अगं वेडे, रडतेस काय? इतकी वर्ष प्रत्येक गोष्टीला धीराने सामोरे गेलोच ना आपण ! आताही जावु.” आनंदराव वहिनींचे अश्रू पुसत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करु लागले.

“आपल्या नीलला काही होणार तर नाही ना हो?” नीला वहिनी मुसमुसत म्हणाल्या. रडता रडता गेल्या बावीस वर्षाचा काळ भराभरा त्यांच्या डोळ्यासमोरुन सरकुन गेला. त्यातही शेवटचे सहा महिने प्रकर्षाने……………!

आनंदराव रायबागकर, वय वर्षे ५४, तसे सद्ध्याच्या नव्याने निर्माण झालेल्या उच्च मध्यमवर्गीय श्रेणीत मोडणारे. एका नामांकित बॆंकेत ब्रांच मॆनेजर म्हणुन कार्यरत होते. निवृत्ती जवळ आलेली पण स्वत:च बँकेत असल्याने त्यांनी आपला पैसा व्यवस्थितपणे गुंतवला होता. त्यावर ते तिघे आरामात जगु शकत होते. हो, तिघे म्हणजे ते स्वत:, त्यांच्या पत्नी नीला आणि एकुलता एक मुलगा नील. नीला वहिनी त्यांच्यापेक्षा फारतर दोन वर्षांनी लहान असतील. प्रेमविवाह होता त्यांचा. सर्व सुखे हात जोडुन उभी होती दारात.

पण म्हणतात ना परमेश्वर एका हाताने देतो आणि दुसर्‍या हाताने काढून घेतो. आनंदरावांच्या सुखी कुटूंबालादेखील कुणाची तरी दृष्ट लागली होती. नील साधारण वर्षाचा असतानाच त्याला एकदा साधा थंडीताप आल्याचे निमीत्त झाले आणि त्यानंतर तो जो अंथरुणाला खिळला तो उठलाच नाही. त्यातूनही दुर्दैवाची परिसीमा म्हणजे त्याच्या सर्व शरीरातली चेतनाच गेली होती.

गंमत म्हणजे ह्रुदय चालू होतं, मेंदूही कार्यरत होता पण शरिराचा मात्र कुठलाही अवयव ………………..

नाही म्हणायला त्याचे सदैव भिरभिरणारे डोळे आणि फक्त कोपरापासुन हलणारा उजवा हात ….

हे दोनच अवयव काही प्रमाणात सजीव होते. आपण बोललेले त्याला नीट समजायचे पण बोलता येत नसल्याने त्याचे सर्व व्यवहार डोळे आणि त्याचा कोपर्‍यापर्यंत हलणारा हात यांच्याच साह्याने चालायचे. गेली बावीस वर्षे तो असाच अंथरुणाला खिळून होता. नीलावहिनींनी सगळं सोडुन स्वत:ला त्याच्या देखभालीत गुंतवुन घेतले होते. सुरुवातीला आता नील कधीच उठू शकणार नाही हे सत्य पचवणे खुप कठीण गेले दोघांनाही. पण हळु हळु सवय होवून गेली. तो आपल्या प्राक्तनाचाच एक भाग आहे असे समजुन त्यांनी ते कटूसत्य मनापासुन स्विकारले होते. येइल तो दिवस ढकलणे एवढेच काम.

पण नीलाताईंना अजूनही आशा होती की नील बरा होइल. शेवटी आशेवरच तर जगतो माणुस!

त्यामुळे रोज त्याला मॉलीश करणे, त्याची औषधे देणे, अगदी त्याला आंघोळ घालण्यापासुन त्याचे सर्व विधी उरकण्यापर्यंत सर्व काही त्या प्रेमाने, आस्थेने करायच्या. सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा नीलचा मेंदू सुस्थितीत होता. त्यामुळेच आईला होणारा त्रास त्याला कळायचा, ते त्याच्या डोळ्यात बरोबर वाचता यायचे नीलावहिनींना. अलिकडे एक नविनच भावना आढळुन आली होती त्यांना त्याच्या डोळ्यात. जेव्हा जेव्हा त्या त्याला आंघोळ घालायच्या, त्याचे कपडे बदलायच्या तेव्हा त्याच्या डोळ्यात उभी राहणारी असहायता, लज्जा त्यांना जाणवली होती. त्याला ते फार संकोचल्यासारखे होत असावे. पण त्यांचा नाईलाज होता……………. त्याचाही !

लहानपणी नीलावहिनी त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या परीच्या…चेटकिणीच्या, जादुगाराच्या, देवांच्या ….राक्षसांच्या ! खरेतर नीलावहिनींनी त्याला इतरही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करुन पाहीला होता. पण त्याला परीच्या …, जादुगारांच्या गोष्टी फार आवडायच्या. कदाचित आपण औषधांनी कधीच बरे होवु शकणार नाही हे त्याच्याही लक्षात आले होते, त्यामुळे कदाचित जादु या प्रकाराबद्दल त्याच्या मनात एक प्रकारचे अनामिक आकर्षण निर्माण झाले असावे.

अलिकडे, अलिकडे एक वेगळाच चाळा लागला होता त्याला. मागे कुणीतरी असेच भेटायला म्हणुन आले होते, त्यांचा छोटा मुलगा त्याचे एक छोटेसे भिंग नीलच्या बिछान्यापाशी आलेल्या खिडकीत विसरून गेला होता. ते नेमकं नीलला दिसलं आणि त्याने खुणा करून नीलावहिनींकडुन ते मागुन घेतलं. आणि मग खिडकीतुन पडणार्‍या कवडशांशी त्या भिंगाच्या साह्याने खेळण्याचा त्याला चाळाच लागला. खिडकीतुन येणारे प्रकाशाचे कवडसे आणि ते भिंग हा जणु काही त्याच्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला होता. कल्पना करा एक तरुण मुलगा , गेली २० पेक्षा जास्त वर्षे बिछान्याला खिळुन असलेला, ज्याला फ़क्त एकच हात तोही कोपरापर्यंतच हलवता येतो, त्याच्यासाठी कुठलीही छोटीशी गोष्टही खुप अनमोल होती. आनंदाची गोष्ट म्हणजे हे भिंग सापडल्यापासुन, हळुहळु नील त्याचा उजवा हात कोपरापासुन थोडा थोडा वर उचलु लागला होता. त्यामुळे कवडशांचा पाठलाग करणे काही काळ का होईना जमायला लागले होते त्याला. आजकाल त्याचे सदैव तेच चालु असायचे त्या भिंगाने येणारा सुर्यप्रकाश कुठेतरी परावर्तित करायचा आणि त्यातुन भिंतीवर, जमीनीवर निर्माण होणार्‍या आकृत्या न्याहाळत बसायचे.

एके दिवशी असेच आनंदराव आणि नीलावहीनी नीलच्या खोलीत गप्पा मारत बसले होते. नीलचे नेहेमीप्रमाणे त्याच्या भिंगाबरोबर सावल्यांचा खेळ खेळणे चालु होते. नीलावहिनी त्याच्या शेजारीच, त्याच्या उशाशी बसल्या होत्या. आनंदराव भिंतीपाशी असलेल्या आरामखुर्चीवर बसुन कुठलेतरी पुस्तक वाचत होते. नीलाताई मायेने नीलच्या केसातुन हात फ़िरवत होत्या. त्याच्या केसातुन हात फिरवता फिरवता आनंदरावांशी गप्पा मारणे चालु होते. एकदम ………

नीलावहिनींना काहीतरी विचित्र जाणिव झाली. म्हणजे त्या नीलच्या केसातुन हात फिरवत होत्या. एक क्षणभर हाताला काहीच लागले नाही तसे त्यांचे एकदम नीलकडे लक्ष गेले…….

नील गादीवर नव्हता !

“अहो ….. आपला नील !” नीलावहिनी घाबरुन ओरडतच उठल्या.

“अगं काय झालं, ओरडतेस कशाला?” आनंदरावांनी चिडुन विचारले, त्याच्या वाचनात व्यत्यय आला होता. एकतर आधीच नीलावहिनी मध्ये मध्ये बोलुन त्यांना डिस्टर्ब करत होत्या, त्यात हे ओरडणे….

“अहो, आपला नील….” बोलता बोलता नीलावहिनींचे पुन्हा गादीकडे लक्ष गेले.

नील तिथेच होता.

“अहो, क्षणभरासाठी आपला नील चक्क गायब झाला होता हो. मी माझ्या डोळ्यांनी पाहीलं.” नीलावहिनी रडवेल्या झाल्या.

“काहीतरी बोलु नकोस नीला, अगं तो कुठे जाणार आहे. तिथेच तर आहे ना तो. त्याला त्याचा हात सोडुन कुठलाही अवयव हलवता येत नाही, एवढ्या कमी वेळात तो कुठे आणि कसा जावुन येवु शकेल? हे बघ तुला झोप आलीय बहुदा, रात्रभर त्याच्या काळजीत जागत बसतेस आणि त्यामुळे मग दिवसा अशी डोळ्यांसमोर अंधारी येते. जा तु जावुन झोप जा थोडावेळ !” आनंदरावांनी पुन्हा पुस्तकात डोळे खुपसले.

“हो तसेच झाले असेल, काय गं बाई वेडी मी. उगाचच घाबरले! तुम्ही लक्ष द्यालना थोड्यावेळ नीलकडे. मी खरंच जावुन पडते थोडावेळ?

“जा तू, जावुन आराम कर, मग बरे वाटेल, मी आहे त्याच्यापाशी !” आनंदरावांनी पुस्तकातुन डोके न काढताच उत्तर दिले.

तशा नीलावहिनी उठून आपल्या बेडरुमकडे निघाल्या. दारातुन बाहेर पडताना जर त्यांनी मागे वळुन पाहिले असते तर त्यांना धक्काच बसला असता.

नील व्यवस्थित मान वळवुन त्यांच्याकडे बघत होता. तेवढ्यात कशासाठी तरी आनंदरावांनी डोके वर काढले पुस्तकातुन. पण ती चाहुल लागताच नील पुन्हा पहिल्या स्थितीत आला होता. आनंदरावांनी पुन्हा पुस्तकात डोके घातले.

“तो नक्की भासच होता? नीलची मान हलल्यासारखी वाटली थोडी! छे छे..कसे शक्य आहे ते! मला पण नीलासारखंच व्हायला लागलं बहुतेक.” स्वत:शीच हसत आनंदरावांनी मनातले विचार झटकुन टाकले.

दिवाणावर पडल्या पडल्या नीलावहिनींच्या मनात विचारांचे काहुर माजले होते,

“काय झालय आपल्याला ? आजकाल काहीही भास होतात. नाही, मला तंदुरुस्त राहायलाच हवं. नीलकडे कोन बघेल नाहीतर. आणि आपल्या नंतर ……………..?”

तो विचार नीलावहिनींना प्रचंड अस्वस्थ करुन गेला. “जावुदे, पुढचे पुढे … , संध्याकाळी नीलच्या पलंगावरचे बेडशीट बदलायला हवे. किती घाण झालय सकाळपासुन. ते मिकी माउसचं घालते आज. ते खुप आवडतं नीलला. खुश असतो तो ते बेडशीट घातलं की…..!

बेडशीटचा विचार आला आणि नीलावहिनी चमकल्या, ज्या क्षणात नील गायब झाल्याचा भास आपल्याला झाला. ते डोळ्यासमोर आलेल्या अंधारीमुळे, थकव्यामुळे झाले असे मानले तर मग त्या क्षणात काहीच दिसायला नको होते आपल्याला. पण बाकी सर्व दिसत होते……, खोली, आरामखुर्चीवर बसलेले नीलचे बाबा, नीलचा पलंग … अहं रिकामा पलंग ! “अहो….”, नीलावहिनी उठणारच होत्या परत. तेवढ्यात त्यांच्या मनात विचार आला की त्यांचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर आणि आपला नील तर इथेच आणि सुखरूप आहे ना! या विचाराने त्यांनी पुन्हा माघार घेतली आणि आराम करण्याचा प्रयत्न करु लागल्या.

त्यानंतर असेच काही दिवस गेले. एकदा मध्यरात्रीच त्यांना जाग आली. तहान लागली होती त्यांना. त्या अर्धवट झोपेतच उठल्या आणि स्वयंपाकघराकडे गेल्या. पाणी पिले आणि येताना सहज नीलच्या खोलीकडे नजर टाकली. तशाच अर्धवट झोपेत त्या पुन्हा बेडरुमकडे आल्या आणि पलंगावर आडव्या झाल्या. एकदम त्यांना काहीतरी आठवले आणि त्या ताडकन उठुन बसल्या. येताना त्यांनी नीलच्या खोलीकडे नजर टाकली तेव्हा नीलची चादर खाली जमीनीवर पडली होती, तेवढेच त्यांना आठवत होते.

नील पलंगावर होता …………….. ? आत्ता त्यांना लख्ख आठवले, नीलचा पलंग रिकामा होता.

त्या घाबरुन तशाच नीलच्या खोलीकडे धावल्या. जाता जाताच त्यांनी आनंदरावांना हाक मारली….. “अहो उठा, नील …..!”

तोपर्यंत त्या नीलच्या खोलीत पोहोचल्या होत्या. आणि जे काही पाहिलं तो त्यांना प्रचंड धक्काच होता.

पलंगावर नील व्यवस्थीत चादर वगैरे पांघरुन झोपलेला होता.

“काय झालं गं ओरडायला तुला ! आजकाल तुझे भास वाढलेत हा!” आनंदराव जाम वैतागले होते झोपमोड झाल्याने.

“अहो, उद्या डॉक्टर साठ्यांना बोलावुन घ्या बर पुन्हा एकदा. नीलला पुन्हा एकदा तपासुन घ्यायला हवे !” नीलावहिनी तोंडातल्या तोंडात बडबडल्या.

“बरं, बरं… बोलावतो, आता झोप तू! चल………..!”

ते दोघेही परत बेडरुमकडे गेले आणि नीलने चादरीतुन डोके बाहेर काढले. त्याच्या ओठांवर विचित्र, भितीदायक हा शब्द जास्त योग्य ठरेल …. असे हास्य होते !

“नाही आनंदराव, माफ करा पण तुमचा मुलगा कधीच बरा होवु शकणार नाही. मला फार वाईट वाटतेय तुमची निराशा करताना पण उगाचच खोटी आशा दाखवणे मला पसंत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे आपण सर्व टेस्ट करुन पाहील्या. त्याच्या शरीरातील पेशींची वाढच होत नाहीये, खरेतर हा प्रकारच विचित्र आहे आनंदराव. त्याच्या शरीरातील पेशी अक्षरश: मृतावस्थेत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबलेला आहे, तरीही तो व्यवस्थित श्वास घेतोय. दुसया शब्दात सांगायचे तर त्याचे जगणे हा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने एक चमत्कारच आहे.” डॉ. साठेंना स्वत:च्याच शब्दांवर विश्वास बसत नव्हता.”तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही त्याला इथे काही दिवसांकरीता अ‍ॅडमिट करा आपण काही टेस्ट करून बघु अजुन………”

“नाही, मला त्याला इथे अ‍ॅडमिट करायचे नाही आहे! तो घरीच बरा आहे. आम्ही दोघे नवरा बायको योग्य ती काळजी घेवु त्याची” नीलावहिनी जवळजवळ ओरडल्याच. नंतर राहुन राहुन त्यांनाच आपल्या त्या ओरडण्याचं आश्चर्य आणि लाज दोन्ही वाटत राहीली, “डॉक्टरांनी खरेतर काहीच चुकीची मागणी केली नव्हती मग आपण एवढ्या का चिडलो?”

दोघेही नीलला घेवुन घरी परतले. नीलला त्याच्या पलंगावर झोपवुन आनंदरावांनी पेपर हातात घेतला. आज सकाळपासुन नीलच्या चेकींगच्या गोंधळात पेपरच वाचणे झाले नव्हते. मुखपृष्ठावरच ठळक मथळा होता.

“शहरातील विमानगरामध्ये काल रात्री एका १८ वर्षीय तरुणीचे शव आढळुन आले. डॉक्टरांच्या निदानानुसार कुणीतरी तिच्या शरीरातले सर्व रक्त काढुन घेतलेले आहे. विशेष म्हणजे तिच्या शरीरावर कुठेही जखम नाही, अगदी खरचटल्याचेही निशाण मिळाले नाही.. पोलीस तपास चालु आहे……!”

“अहो, काल अमावस्या होती. माझ्यावर विश्वास ठेवा काल थोड्या वेळाकरता का होईना पण नील त्याच्या जागेवर नव्हता!” नीलीवहिनींचे डोळे पाण्याने डबडबले होते.

“तुझं आपलं काहीतरीच असतं! अगं हलता देखील येत नाही त्या लेकराला, तो कुठे जाणार आहे ?”

पण त्यानंतर शहरात येणार्‍या प्रत्येक अमावस्येला अशाच प्रकारे एक एक मृत्यु होवु लागले.विशेष म्हणजे हे सगळे मृत्यू एकाच प्रकारे होत होते. पोलीस चक्रावुन गेले होते. शरीरावर कसली जखम नाही, साधा ओरखडाही नाही, कुठेही टोचल्याचे निशाण नाही पण शरीरातील रक्त मात्र ……. एक थेंबही शिल्लक नसे. सर्व मृत्यू स्त्रीयांचेच होत होत आणि हे सारे मृत्यू अमावस्येच्या रात्रीच होत होते हे विशेष.

नीलवर नजर ठेवुन असणार्‍या नीलाताईंनी एकदोन वेळा पुन्हा तोच अनुभव घेतला, यावेळेस मात्र एकदा आनंदरावांनीही हे अनुभवले. मोजुन एक ते दिड मिनीटाकरता नील गायब होत असे. पण दिड मिनीटापेक्षा जास्त वेळ कधीच लागला नाही त्याला. तो गायब होवुन पुन्हा दिसायला लागल्यानंतर मात्र त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान दिसे. आता मात्र नीलावहिनींना भीती वाटु लागली होती. हा जातो कुठे? त्याच वेळात होणार्‍या त्या मृत्यूंशी त्याचा काही ……..कारण नेमका त्या मृत्युच्या रात्रीच एक दिड मिनीटाकरता का होईना पण नील गायब होत होता.

“छे, असं कसं शक्य आहे? अवघ्या दिड मिनीटात एखाद्याच्या शरीरातले सर्व रक्त शोषून घेणे कसे शक्य आहे? आणि नील असे घृणास्पद कृत्य का करेल? ” आनंदरावांनी हा विचार मनातून झटकुन टाकला. पण त्याचवेळी त्यांनी आपले एक जिवलग मित्र सुभाष देशपांडे यांच्याजवळ आपले मन मोकळे केले. त्यावेळी वर उल्लेखित चर्चा झाली होती. आणि शेवटी मनात नसतानाही नीलसाठी म्हणुन आणि सुभाषदादांच्या सल्ल्याचा मान ठेवायचा म्हणुन त्यांनी त्या तथाकथीत आण्णांची भेट घ्यायची ठरवले होते. पण त्याचवेळी त्यानी मनाशी ठाम निर्णय घेतला होता की काही झाले तरी, ते आण्णा कितीही चांगले वाटले तरी नीलची ही समस्या त्यांच्याशी बोलायची नाही. कारण त्यातुन थेट नीलवरच या मृत्यूचा वहिम घेतला जाण्याची शक्यता होती.

आनंदराव स्वत:शीच हसले, स्वत:च्या वेडेपणावर! नीलची एकंदरीत अवस्था बघितल्यावर आणि डॉ. साठ्यांसारख्या नामांकित डॉक्टरचे त्याच्याबद्दलचे निदान ऐकल्यावर कोण नीलवर असा काही आरोप करण्यास धजावले असते?

पण तरीही त्यांनी आपला निर्णय ठाम केला.

दुपारी साडेतीन वाजताच सुभाषदादा त्यांच्या १८५७ सालातील फियाटसह दारात हजर झाले. ती गाडी बघितल्यावर तशा अवस्थेतही आनंदरावांना हसु आले.

“दादा, आपण चार वाजेपर्यंत पोचु ना तुझ्या आण्णांकडे? नाही तशी काय घाई नाही, उद्याच्या दुपारपर्यंत पोहोचलो तरी काही हरकत नाही.”

“चल बस, तुला आण्णांशी भेट घालुन संध्याकाळी साडेसहा-सातच्या आत वनपिस घरी आणुन नाही सोडला तर गाडी विकून टाकीन मी!”

अशा पैजा या आधीही खुप वेळा लागल्या होत्या, पण अजुनतरी गाडी दादांकडेच होती.

आण्णांची मठी शहरापासुन थोडी एका बाजुलाच होती, तिथे पोचायला साधारण अर्धा पाउण तासतरी लागणार होता. गाडीत आनंदराव जवळजवळ गप्पच होते. नीलचा विचार काही केल्या मनातुन जात नव्हता. दादांनी दोन तीन वेळा त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मुड नाही हे लक्षात आल्यावर दादा मुकपणे गाडी चालवत राहीले. थोड्या वेळाने , कुठेतरी गाडी थांबली तसे आनंदरावांनी बाहेर बघितले. तेथे समोर तरी काहीच नव्हते, नुसती झाडेच दिसत होती. दादांनी गाडी थांबवली आणि आनंदरावांना सांगितले की तु पुढे जावुन हॉलमध्ये बस बिनधास्त मी गाडी पार्क करुन आलोच. तसे आनंदराव गाडीतुन खाली उतरले. समोरच एक छोटेसे बोगनवेलीच्या रोपट्यांचे कुंपण होते, तिथुनच एका ठिकाणी आत जायला जागा होती. आनंदराव खरे तर फाटक शोधत होते पण फाटकाच्या जागी त्यांना फक्त मोकळी जागा दिसली आत जाण्यासाठी.

“या काका, आत या ! ” आतुन आवाज आला तसे आनंदरावांनी आत पाउल टाकले. तिथे एक पस्तीशीचा तरुण फ़ुलांच्या ताटव्यात वाढलेले तण खुरप्याने काढत होता. त्याने प्रसन्नपणे हात जोडुन आनंदरावांना नमस्कार केला.

“अं, मी … म्हणजे आम्ही… म्हणजे मी आणि दादा..सुभाषदादा आम्ही आण्णांना भेटायला आलो होतो.” आनंदराव थोडेसे गडबडलेच होते.

तसा तो तरुण प्रसन्न हसला, ” अहो, काका …. तुम्ही आत तर या आधी ! बसा हॉलमध्ये निवांत, थोडेसे सरबत घ्या, आण्णा येतीलच इतक्यात.”

आनंदराव आत जाता जाता आजुबाजुचा परिसर निरखत होते. केवढे प्रसन्न होते तिथले वातावरण. छोटीशी बागच होती म्हणा नाती. वेगवेगळ्या फुलांची झाडे होती… चाफा, पळस, जाई-जुईच्या वेली, पारिजात, मोगरा, गुलाबाच्या वेगवेगळ्या जाती यांच्याबरोबरच काही फळझाडे ही होती.

आणि मधोमध ती सुरेख कुटी होती. क्षणभर आनंदरावांना वाटले आपण चुकून पुराणकाळातल्या एखाद्या ऋषी मुनींच्या आश्रमात तर नाही आलो ना? छोटीशीच पण सुरेख अशी ती कुटी होती, फारतर चार पाच छोट्या छोट्या खोल्या असाव्यात आत. त्यांनी हॉलमध्ये प्रवेश केला. खाली छान शेणाने सारवलेली जमीन होती, भिंतीवर सर्वत्र स्वच्छ पांढरा चुना लावण्यात आला होता. त्यावर भगव्या रंगात “जय जय रघुवीर समर्थ ” हा मंत्र लिहीण्यात आला होता. समोरच श्री समर्थ रामदासस्वामी तसेच प्रभु रामचंद्रांची तसवीर होती. विचारांच्या तंद्रीतच तिथेच अंथरलेल्या एका चटईवर आनंदराव टेकले. एकदम मनावरचा सगळा ताण नाहीसा झाल्यासारखे हलके हलके वाटत होते. आपली सगळी दु:खे, सगळे तणाव विसरल्यासारखे झाले त्यांना. आपोआपच एक उत्सुकता वाटायला लागली, कसे असतील हे आण्णा? कसे बोलतील आपल्याशी?…….. कुणीतरी त्यांना सरबत आणुन दिले. ते सरबत घेतले आणि त्यांना अचानक खुप मोकळे मोकळे, हलके हलके वाटायला लागले.

“कसलं सरबत आहे रे हे?” त्यांनी त्या सेवकाला विचारले.

“काय की दादा, आण्णांनीच शिकवलंय, कसलीतरी बुटी आणुन दिली होती त्यांनी. ती थोडी उगाळुन पाण्यात मिसळली आणि त्यात थोडी साखर घातली की झाले सरबत तय्यार. चांगलं झालय ना, दादा?

“अरे चांगलं म्हणजे काय, मस्तच झालय. आण्णांना विचारलं पाहीजे कुठली बुटी आहे ते?”

“ह्या…. मी देतो की तुम्हाला ती बुटी, माझ्याकडे पुष्कळ देवुन ठेवल्या आहेत आण्णांनी.”

तोपर्यंत दादा त्या मघाच्याच तरुणाच्या खांद्यावर हात ठेवुन जोरजोरात हसत आत आले. त्या तरुणाने बहुतेक काहीतरी विनोद सांगितला असावा, दोघेही अगदी खळखळुन हसत होते.

“नमस्कार काका, कसं वाटलं सरबत, आवडलं?” त्याने हसुन आनंदरावांना विचारले. आणि तिथेच समोरच्या भिंतीपाशी तो चक्क जमीनीवरच वज्रासनात बसला.

“छान, खुपच छान वाटलं. एकदम सगळे ताण विसरलो बघा क्षणभर !” आनंदराव अगदी मनापासुन बोलले.

“काळजी करु नका, आता इथे आलाच आहात ना, मग तुमचे सगळे ताण तणाव कायमचे नष्ट होवुन जातील.” केवढ्या आश्वासकपणे बोलत होता तो तरुण.

“आण्णा..कधी येणार आहेत? नाही म्हणजे मी येवुन पंधरा मिनीटे झाली आता म्हणुन ……! तशी काही घाई नाहीये….”

तसा तो तरुण खळखळुन हसला , थोडासा पुढे सरकला आणि आनंदरावांना म्हणाला,”माफ करा काका, तुम्हाला थोडं अंधारात ठेवलं. तुमची उत्सुकता, अधीरता समजु शकतो मी. पण बघाना या थोड्या वेळाच्या विश्रांतीमुळे तुम्ही किती ताजेतवाने आणि प्रसन्न वाटताय आता.”

“असो, मीच आण्णा, काही जण मला कल्याणस्वामीपण म्हणतात. पण तुमच्या सुभाषदादांसारखे जवळचे लोक मला आण्णाच म्हणतात. तुम्ही काहीही म्हटले तरी चालेल. किंवा तुम्हाला हि दोन्ही नावे जर ऑड वाटत असतील तर तुम्ही मला माझ्या मुळनावाने हाक मारा, चालेल?”

“माझं नाव आहे…………… सन्मित्र, सन्मित्र भार्गव ! तुम्ही मला नुसते सन्मित्र म्हणुन किंवा मित्र म्हणुन संबोधलेत तरी चालेल.

“त्यांच्या चेहर्‍यावरील पवित्र आणि सात्विक भावांमुळे एकप्रकारचे तेज आण्णांच्या चेहर्‍यावर आले होते, आनंदराव शांतपणे आश्वस्त मनाने आण्णांकडे पाहतच राहीले.

आनंदराव भारावल्यासारखे सन्मित्रकडे पाहातच राहीले. त्यांनी मनात केलेल्या सगळ्याच कल्पनांना तडा देणारी गोष्ट होती ही. त्यांना वाटले होते कल्याणस्वामी किंवा आण्णा म्हणजे कुणीतरी वयस्कर, अनुभवी व्यक्ती असेल. म्हणजे पांढरे शुभ्र केस, छातीवर रुळणारी रुबाबदार दाढी, चेहर्‍यावर जाणवणार्‍या सुरकुत्या, पायघोळ भगवी कफनी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा वगैरे……..
 
पण इथे समोर उभा होता जेमतेम पस्तीशीतला एक हसतमुख तरूण. स्वच्छ पांढराशुभ्र सदरा आणि तसाच पायजमा, गळ्यात फ़क्त एक काळा गोफ. पण त्याचे ते डोळे, त्यात भरलेला आत्मविश्वास, प्रेम ………….
का कुणास ठाउक, पण आनंदरावांना आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची इच्छा झाली. समोर बसलेल्या तरुणाच्या डोळ्यात पाहीले की आपोआपच एकप्रकारचा धीर आला होता त्यांना. का कोण जाणे पण त्यांना त्याच्यावर पुर्ण विश्वास टाकावासा वाटू लागला होता.
 
“असं का होतय? आपण काही वेगळेच ठरवले होते आणि काही वेगळेच घडतेय? त्या सरबतात तर काही ……..!” आनंदरावांच्या मनात भरभर अनेक विचार येवून गेले.
 
तसा सन्मित्र प्रसन्नपणे हसला.
 
“जय जय रघुवीर समर्थ ! काका, अहो त्या सरबतात काहीही नाही, साधं लिंबुपाणी आहे ते…. त्या मुळ्या बाहेरच्या बागेतल्या मोगर्‍याच्या आहेत. मी आमच्या तुकोबाला उगीचच ती जडीबुटी असल्याचे सांगुन ठेवले आहे. हे जो काही बदल तुम्हाला जाणवताहेत ना…तो इथल्या वातावरणाचा, समर्थांच्या कृपेचा प्रभाव आहे. कळत नकळत आजुबाजुच्या वातावरणाचा मानवी मनावर आणि माणसाच्या स्वभावाचा आजुबाजुच्या वातावरणावर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या सवयी, विचार, अनुभव, आपल्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, वासना यामधुन आपण कळत नकळत बर्‍या वाईट लहरी आसपासच्या वातावरणात प्रक्षेपीत करत असतो. आता असं बघा, तुमच्या घरात नील आजारी आहे …………
 
काका, अहो असे काय बघताय माझ्याकडे, माझ्यापाशी कुठलीही विद्या किंवा दैवी शक्ती नाहीये. पण श्री समर्थांच्या कृपेने थोडेफार फेस रिडिंग शिकलोय आणि थोडीफार सुभाषदादांनी दिलेली माहीती यावरुन बोलतोय मी हे. हं तर काय सांगत होतो मी ……
 
आनंदराव, एकटक त्याच्याकडे पाहात ऐकत होते आणि सन्मित्र बोलत होता.
 
तर नीलच्या आजारपणामुळे तुमच्या घरच्या वातावरणात एकप्रकारची उदासी, नैराश्याची भावना निर्माण झालीय. इतकी वर्षे हे सहन केल्यामुळे तुमच्या मनातही एकप्रकारचा कडवटपणा, जगाबद्दलचा अविश्वास निर्माण झालाय. त्यामुळे तुम्ही कदाचित काही वेगळा विचार केला असेल घरातुन निघताना. पण इथली परिस्थिती भिन्न आहे….
 
निसर्गाच्या, श्री समर्थांच्या सानिद्ध्यात आले की आपोआपच माणुस आपली दु:खे, वेदना विसरतो काही काळ. तुमचेही तसेच झालेय. अर्थात मी तुम्हाला आत्ताच कसलाही दिलासा देवु इच्छित नाही नीलच्या बाबतीत, ते मी नीलला भेटल्यावरच ठरवेन. पण सद्ध्या तुम्ही इतर सर्व विचार मनातुन काढुन टाका आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मन मोकळे करा. विश्वास ठेवा इथल्या भिंतींना कान नाहीत! आणि हा सन्मित्र एखाद्या टिपकागदासारखा आहे, एकदा शोषुन घेतलेली गोष्ट त्याच्यात सामावून जाते, ती परत कुठल्याही मार्गाने बाहेर येत नाही. तेव्हा नि:शंक मनाने बोला, काळजी करु नका. “चिंता करतो विश्वाची” म्हणणारे श्री समर्थ, समर्थ आहेत आपल्या चिंता वाहायला. तुमच्या सगळ्या काळज्या, सगळ्या चिंता रामरायाच्या चरणी वाहुन मोकळे व्हा. अहो, भक्ताच्या काजासाठी तो काय वाट्टेल ती दिव्ये करतो. कधी पाणक्या होतो, कधी युगानुयुगे वीटेवर वाट बघत उभा राहतो, फक्त त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि एक लक्षात ठेवा मी काय , तुम्ही काय आपण सगळेच निमित्तमात्र आहोत हो. कर्ता करविता तो श्रीराम आहे, तो करेल ना करायची ती काळजी. त्याच्यावर सर्व सोडुन रिकामे व्हा.
 
सन्मित्र उठुन आनंदरावांच्या पाठीमागे जावुन उभा राहीला आणि त्याने बोलता बोलता सहजपणे आनंदरावांच्या खांद्यावर हात ठेवला. आनंदरावांना संपुर्ण शरीरातुन एक कसलीतरी चेतना, एक लहर दौडत गेल्याचा भास झाला. जणु त्यांच्या डोक्यावरचे ओझेच कुणीतरी काढुन घेतले होते. आणि आनंदराव बोलायला लागले………
 
कितीतरी वेळ ते बोलत होते, अगदी नीलच्या जन्मापासुनच्या आठवणी….. त्याचे रांगणे, त्याचे बोबडे बोल, त्यानंतर त्याचा तो आजार आणि मग सुरु असलेली परवड इथपासुन ते नजिकच्या काळात घडलेल्या त्या चित्र विचित्र घटना, नीला वहिनींना , त्यांनाही झालेले आभास…………..!
 
“आण्णा , काय अर्थ असेल हो या सगळ्यांचा? नील कुठे जात असेल त्या एक दिड मिनीटात? त्याला काही त्रास तर नाही ना होणार? त्या मृत्युंशी त्याचा काही संबंध तर नसेल ना? मला तर काहीच समजत नाही हो. नीलाला धीर यावा म्हणुन तिच्यासमोर मी शांत असतो पण माझीही कोसळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हो.” आनंदरावांना रडु आवरले नाही तसे दादा पुढे सरकले. पण सन्मित्राने त्यांना अडवले…..
 
“अहं दादा, येवु द्या सगळे बाहेर, मनाचा निचरा करायला अश्रुंसारखे योग्य साधन नाही, रडु दे त्यांना मनसोक्त. एकदा मनातुन ही खंत , वेदना बाहेर पडली की त्यांना हलके हलके वाटेल.
 
आनंदराव मोकळेपणाने रडत होते, सन्मित्र हळुवारपणे त्याचा हात हातात घेवुन शांत बसला होता. थोड्या वेळाने आनंदराव शांत झाले.
 
“आनंदकाका, आता तुम्ही घरी जा, शांतपणे झोपा. काकुलाही सांगा काळजी करु नकोस म्हणावे. मी उद्या सकाळी येतोच आहे नीलला भेटायला, तेव्हा सविस्तर बोलुच. तुकोबा, कॉफी करा सगळ्यांसाठी.”
 
“आण्णा, साखरेची की बिनसाखरेची! ” तुकोबा बाहेर डोकावला.
 
“मला तर भरपुर साखर लागते, तु यांना विचार ! बाय द वे काका हा आमचा तुकोबा, खुप जवळचा आहे हा मला, हा होता म्हणुन आण्णा जिवंत आहे आज. ती कथा कधीतरी सांगेन तुम्हाला.” सन्मित्राने हसत हसत सांगितले तसा तुकोबा लाजला…
 
“तुमचं काहीतरीच असतं आण्णा, उगाचच लाजवता गरिबाला !” तो कॉफी करायला आत पळाला. आणि सन्मित्राने इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली.
 
खुप दिवसानंतर आनंदरावांना त्या दिवशी शांत झोप लागली. नाही म्हणायला नीलावहिनींनी भुणभुण लावली होती त्यांच्या मागे, काय झाले म्हणुन. पण जे झाले ते शब्दात सांगण्यासारखे नव्हते म्हणुन त्यांनी नीलावहिनींना फक्त एवढेच सांगितले की उद्या आण्णा घरी येताहेत, काळजी करु नकोस मला आता खात्री वाटायला लागलीय की सर्व काही ठिक होइल. वहिनींना मात्र झोप लागली नाही. रात्रभर डोक्यात नीलचे आणि आण्णांचे विचार. त्या आण्णांना काय काय लागतं, फराळ करतात की जेवणच करतील. चहा की कॉफी कि फक्त दुधच घेतात? कुठल्याही टिपिकल गृहिणीप्रमाणेच त्यांचे विचारचक्र सुरू झाले.
 
“काकू, मी आलोय गं! जेवुनच जाणार आहे. जर गरम गरम भाकरी आणि एखादी भाजी मिळाली तर बहार येइल!” सन्मित्रने आल्याआल्याच जाहीर करुन टाकले. प्रथम तर नीलावहिनींच्या डोळ्यात “हा कोण उपटसुंभ?” असेच भाव होते. पण आनंदरावांकडुन हेच आण्णा असे कळल्यावर त्यांच्याही भुवया उंचावल्या. हा एवढा तरुण मुलगा ……. ?
पण सन्मित्रच्या मनमोकळ्या वागण्या बोलण्याने त्या ही मोकळ्या झाल्या.
 
“काकू, मी आधी नीलला भेटतो, मग आपण जेवताना बोलुच, काय चालेल ना?”
 
“हो का नाही, चला मी तुम्हाला नीलची खोली …………………….
 
सन्मित्रने हाताच्या इशार्‍याने त्यांना थांबवले, “अहं, मी जाईन एकटाच, मला माहीत आहे त्याची खोली , काळजी करु नको!”
 
सन्मित्र बरोबर नीलच्या खोलीसमोर जावुन उभा राहीला. त्या दारात पोचल्या पोचल्या त्याला ती जाणीव झाली. सगळ्यात प्रथम माणिकरावांच्या त्या वाड्यातल्या हॉलमध्ये शिरताना झाली होती ती. पण आता फक्त धोक्याची घंटी होती, त्यात ती भीती नव्हती. त्याने एकदा मागे वळुन पाहीले आनंदराव आणि नीलावहिनी त्याच्याकडेच पाहत होते, त्यांच्या डोळ्यात काळजी, चिंता, भिती अशा मिश्र भावनांची वादळे स्पष्ट दिसत होती. त्यांच्याकडे बघुन सन्मित्र पुन्हा एकदा प्रसन्न , आश्वासक हसला आणि त्याने वर आकाशाकडे बोट दाखवले आणि हसुन नीलच्या खोलीत पाउल टाकले.
 
“जय जय रघुवीर समर्थ !
 
सहजपणे त्यांच्या ओठातुन रघुरायाचे नाम बाहेर पडले आणि त्याने नीलच्या खोलीत पाउल टाकले. त्या खोलीतली हवा, वातावरण एकदम ढवळल्यासारखे झाले. सन्मित्रला त्या खोलीतली उष्णता अचानक वाढल्याची जाणीव झाली. असे भासत होते की श्वास गुदमरतोय, जणु काही त्या खोलीतला ऑक्सीजनच संपला होता. त्याचे लक्ष नीलकडे गेले. नीलच्या डोळ्यात एक छदमी हास्य होते, जणु तो म्हणत होता की आत आला तर आहेस, आता आला आहेस तसाच बाहेर जा, गाठ माझ्याशी आहे. सन्मित्र त्याच्याकडे बघुन हसला , मागे वळला तसे नीलच्या चेहर्‍यावरचे हास्य गडद झाले. मागे वळलेल्या सन्मित्रने दार आतुन बंद केले आणि आतुन कडी लावुन घेतली, त्याला माहीत होते आनंदराव आणि नीलावहीनी काळजीत पडले असतील, पण दुसरा पर्यायच नव्हता. इथल्या युद्धाची झळ त्यांना लागु द्यायची नव्हती त्याला. दार लावुन घेवुन सन्मित्र मागे वळला तसा नील चमकला. हे त्याच्या कल्पनेच्या विरुद्ध घडत होते. त्याला वाटले होते हा क्षुद्र मानव घाबरुन निघुन जाईल पण तो तर परत आला होता. बरं या मानवात काही विशेष शक्तीही दिसत नव्हती, नाहीतर तिची जाणीव नीलला झाली असती. मग हा मानव कशाच्या जोरावर एवढा निर्धास्त होता.
 
“जय जय रघुवीर समर्थ ! तुला काय वाटलं तुलाच फक्त लपता, लपवता येतं. नीलच्या आई वडीलांच्या लक्षात नाही आलं तुझं अस्तित्व, पण माझ्यापासुन नाही दडता येणार तुला! आता सामना बरोबरीचा आहे लक्षात ठेव.” सन्मित्रने सुरुवातीलाच आक्रमक धोरण ठेवले होते.
 
त्याच्याशी बोलता बोलता नील तो शब्द उच्चारण्याची तयारी करत होता. आप्पाजींनी शिकवलेले ते शब्द म्हणजे त्याची अस्त्रेच होती जणु. पण आप्पाजींनी सांगितले होते की त्यांचा वापर फक्त आणिबाणीच्या प्रसंगीच करायचा. त्यामुळे सन्मित्र शक्यतो त्याचे उच्चारण करायचे टाळत होता. मुळात सद्ध्या लढाईची तयारी नव्हतीच त्याची, तो दुसर्‍याच कामासाठी आला होता. तोंडाने रामनामाचा जप चालुच होता. जय जय रघुवीर समर्थ या मंत्राचा घोष त्याने चालुच ठेवला होता. खोलीत इकडे तिकडे बघत तो त्याला हवी असलेली वस्तु शोधत होता. त्याच्या त्या वागण्यामुळे नील किंवा तो जो कुणी होता तो मात्र चांगलाच गोंधळात पडला होता. आज प्रथमच त्याची शक्ती कमी पडत होती. मुळात त्याला पहिला धक्का बसला होता तोच सन्मित्रच्या पहिल्या दर्शनाने. खरेतर गेल्या काही महिन्यातला त्याचा अनुभव फार वेगळा होता. हे मानवप्राणी फारच क्षुद्र होते त्याच्या सामर्थ्यापुढे. नुसत्या कटाक्षाने तो त्यांचे रक्त शोषुन घेवु शकत होता. तोच प्रयोग त्याने सन्मित्रवर पण करुन पाहिला पण सन्मित्र अविचल राहीला होता. उलट त्यालाच आपली शक्ती उणावल्यासारखी, दुर्बळ झाल्यासारखी भासायला लागली होती. पण गंमत म्हणजे हा नवीन माणुस त्याच्यावर उलट हल्लाही करत नव्हता, तो जणु काही फक्त काही तरी तिथे शोधायला आल्यासारख्या वाटत होता. नीलने (?) त्या नव्या मानवाचा मेंदु, मन वाचायचे खुप प्रयत्न केले. पण…..
 
अहो, आश्चर्यम , त्याच्या साम्राज्यात मनोवेगी म्हणुन ओळखला जाणारा तो, इथे मात्र त्या नवख्या सामान्य मानवाच्या मनापर्यंत पोहोचुही शकत नव्हता. जणु काही एखादी अदृष्य पोलादी भिंत उभी होती त्या दोघांच्या मध्ये. आपल्या या असहायतेचा त्याला संताप येवु लागला होता. एक क्षुद्र मानव त्याच्या अफाट सामर्थ्याला आव्हान देत होता. का तो क्षुद्र नव्हताच दिसत होता तसा? त्याचा संताप वाढत चालला होता.
 
“अहं, माझ्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करु नकोस मित्रा, मी इंद्रियबंधन केले आहे, ते तोडणे तुझ्यासारख्या सामान्य पिशाच्चाला शक्य नाही.”
 
त्या माणसाने, सन्मित्रने त्याला खिजवायचा प्रयत्न केला तसा तो अजुनच भडकला.अचानक त्या नव्या मानवाचे डोळे चमकले, तो जे शोधत होता ते त्याला दिसलं होतं बहुदा. तो माणुस त्या वस्तुकडे सरकला तसा नील (?) चमकला, त्याने वस्तु पटकन आपल्या ताब्यात घेतली. पण इथे पुन्हा त्याला त्याच्या इच्छाशक्तीने दगा दिला. कसे कोण जाणे पण त्यानेच ती वस्तु त्या माणसाच्या हातात देवुन टाकली. तसा तो माणुस, सन्मित्र मोकळेपणाने हसला. ती वस्तु त्याने आपल्या खिशात टाकली आणि परत दाराकडे निघाला. तसे नील प्रचंड संतापला. खोलीला हादरे बसायला लागले. उष्णता वाढायला लागली. तसा सन्मित्र चमकला , त्याचे लक्ष भिंतीकडे गेले त्या चारही भिंती एकमेकीकडे सरकत होत्या, बहुदा सन्मित्रला त्या भिंतीत दाबुन मारण्याची इच्छा होती त्याची. मृत्युची भिती मागे प्रतापनगरातच सोडली होती सन्मित्रने. पण इथे प्रश्न नीलच्या आयुष्याचा होता. शेवटी त्याने आप्पाजींनी शिकवलेली ती वर्णमाला डोळ्यासमोर आणली. त्यातला या परिस्थितीसाठी योग्य असा शब्द त्याने डोळ्यासमोर आणला. आप्पांनी अगदी दिवसदिवस बसुन ते शब्द घोकुन घेतले होते त्याच्याकडुन. ते शब्द म्हणजे सगळ्यात विनाशकारी शस्त्र होते त्याच्या भात्यातले.
 
तो शब्द उच्चारण्याआधी सन्मित्रने एकदा दिर्घ श्वास घेतला, मग श्वासांचे बंधन केले आणि तो शब्द उच्चारण्यापुर्वी एकदा मनोमन पुन्हा श्री राम प्रभुंचे नाव घेतले. तो शब्द योग्य तसाच उच्चारला जायला हवा होता, थोडीजरी चुक झाली असती तरी परिणाम अतिशय भयानक झाले असते. पुर्ण विचार करुन शेवटी त्याने तो शब्द उच्चारला………………..
 
तसा पलंगावर झोपलेला नील एकदम हवेत उडुन पुन्हा पलंगावर पडला. मात्र आता ती वावटळ थंडावली, नीलच्या चेहर्‍यावर प्रचंड आश्चर्य होते. पण तो पुर्ण जखडल्यासारखा झाला होता. त्याच्या शक्ती काही काळाकरीता का होईना निष्प्रभ ठरल्या होत्या. सन्मित्रने त्याच्याकडे एकदा पाहीले ….
 
“आत्तापुरता मी परत जातोय मित्रा, पण दोनच दिवसांनी अमावस्या आहे, त्या रात्री मी परत येइन….. तेव्हा मात्र जपुन. आणि हो, तुला माहीती आहे ना तुझ्या परतीच्या मार्गाचे तिकीट माझ्याकडे आहे. या दोन दिवसात जर नीलला काही त्रास झाला तर तु कधीही परत जावु शकणार नाहीस याची मी पुरेपूर काळजी घेइन, समजले?”
 
सन्मित्रचा आवाज नेहेमीप्रमाणेच अगदी शांत होता पण यावेळी मात्र त्याच्या आवाजाला एक विलक्षण जिवघेणी धार होती. आणि सन्मित्र नीलच्या खोलीतुन बाहेर पडला. सन्मित्र बाहेर पडताच पुन्हा खोलीत वादळ उभं राहीलं. पण सन्मित्रला आता काळजी नव्हती. त्याला खात्री होती जोपर्यंत ती वस्तु त्याच्याकडे आहे तोपर्यंत नील सुरक्षीत होता. तो खोलीच्या बाहेर पडला तसे आनंदराव आणि नीलावहीनी वाटच पाहात होते.
 
“काय झाले आण्णा? नील कसा आहे?” इति नीलावहिनी.
 
आनंदरावांनी त्यांना थांबवले, “अगं त्यांना दम तरी घेवु देत, दिसत नाही का आण्णा प्रचंड थकलेले आहेत. तुम्ही बसा आण्णा, नीला पाणी आण आण्णांसाठी.”
 
सन्मित्रने पाणी घेतले. ” काका, काकु नील ठिक आहे. पण ही सुरुवात आहे. मुळ लढाई परवा रात्री अमावस्येला होईल. पण काळजी करु नका, सुत्रे बर्‍यापैकी आपल्या हातात आहेत. मी थोडावेळ विश्रांती करतो, तुमचा स्वयंपाक झाला की सांगा, मला प्रचंड भुक लागली आहे. बाकी आपण जेवतानाच बोलू.”
 
बोलता बोलता सन्मित्र तिथेच खालीच चटईवर आडवा झाला आणि पडल्या पडल्या झोपला देखील. त्या दोघांनाही त्याच्या हुकमी झोपेचे आश्चर्य वाटले. पण वहीनी लगेच स्वयंपाकाला लागल्या.
 
एका तासाने सन्मित्र स्वतःहुनच जागा झाला. आता तो पुन्हा पहिल्यासारखा ताजातवाना वाटत होता. तोंड धुवून जेवायला बसला. जेवण सुरू करण्यापुर्वी त्याने हात जोडुन रामरायाचे, बजरंगबलीचे स्मरण केले आणि जेवायला सुरूवात केली. शांतपणे जेवुन झाल्यावर मगच त्याने वर पाहीले.
 
नीलावहिनींकडे पाहुन हात जोडले, “अन्नदाता सुखी भव !”
 
काका, काकु आता मी काय सांगतो ते नीट ऐका. इथे जे काही आहे..ते अतिशय वाईट आहे, महाशक्तिशाली आहे. आज त्याला माझ्या शक्तीचा अंदाज नसल्याने ते थोडेसे बेसावध होते म्हणुन ते मला फारसा त्रास नाही देवु शकले पण परवा रात्री अमावस्या आहे, त्या दिवशी त्याची ताकद प्रचंड असणार आहे. काळजी करु नका बजरंगबली आपल्या पाठीशी आहे, रामरायांची कृपा आहे आपल्यावर. तुम्हाला उत्सुकता असेल ना ते नक्की काय आहे? नील एक दिड मिनीटाकरीता कुठे जातो? त्या स्त्रीयांच्या मृत्युंशी नीलचा काही संबंध…….
 
आहे, नीलचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष संबंध आहे त्या घटनांशी. कारण ते जे काही आहे त्याने नीलच्या शरीराचा ताबा घेतलाय. त्याचा वापर ते आपली शक्ती एकवटण्यासाठी करतेय. आता ते इथे आले कसे….?
 
ते स्वतःहुन आलेले नाहीय? कळत नकळत त्याला नीलने आमंत्रण दिलेय. ते बरीच वर्षे तिथे अडकुन पडले होते. नीलने आपल्या खेळाच्या नादात त्याची त्या बंधनातुन मुक्तता केलीय. शेकडो वर्षापुर्वी एका अघोरी तांत्रिकाने सिद्धी मिळवण्यासाठी त्याची मुक्तता केली होती. त्याला बळी / नैवेद्य म्हणुन फक्त कुमारी स्त्रीयांचे रक्त लागते. पण त्यावेळी त्या कापालिकाची सिद्धी सिद्ध होण्यापुर्वीच कुणा शक्तिशाली पुण्यात्म्याने त्या शक्तीचे बंधन करुन तिला एका विलक्षण कैदेत अडकवुन टाकले. तुम्हाला माहीत असेल किंवा ऐकुन असाल या जगात सर्व गोष्टी त्रिमीती सुत्रात बांधलेल्या आहेत, मग हे जगच कसे अपवाद असेल त्याल. पण या जगाला एक चौथी मीतीही आहे जी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जनांच्या आकलन क्षमतेबाहेरची, कुवतीबाहेरची आहे. त्या पुण्यात्म्याने त्या अघोरी शक्तीला या चौथ्या मितीत कैद करुन टाकले होते. पण चुकुन नकळत नीलने त्या मीतीचे द्वार उघडायला त्या शक्तीला मदतच केली. आश्चर्य वाटतेय ना ! नील ?
 
त्यात अशक्य काहीच नाही. तो जगन्नियंता परमेश्वर कुणावरच अन्याय करत नाही, नीलसारख्या निरागस मुलावर कसा करेल. जेव्हा त्याने नीलची संवेदना, त्याची सर्व क्षमता हिरावुन घेतली त्याचवेळी त्याला सामान्य माणसाला अप्राप्य अशी एक महाशक्तीशाली देणगी दिली.
 
“इच्छाशक्ती”
 
जगातली सर्वात मोठी ताकद असते ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती. तिची परिणामकारकता नीलच्या बाबतीत प्रचंड वाढली. पण लहानपणापासुन नील त्या पर्‍यांच्या, जादुच्या कथा ऐकत आला होता, त्यामुळे त्याच्या मनावर त्याचाच प्रचंड पगडा किंवा आकर्षण होते. तो कायम त्या तिसर्‍या जगाचाच विचार करत असायचा. त्याचा पुर्णपणे विश्वास आहे की पर्‍या, जादुगार यांचे जग अस्तित्वात आहे. त्यामुळे तो बहुदा लहानपणापासुनच त्या जगाचे द्वार शोधत होता. तशातच त्याच्या हातात ही जादुई गोष्ट पडली.
 
सन्मित्रने खिशातुन ती वस्तु बाहेर काढली.
 
त्याच्या हातावर ते प्लास्टिकचे छोटेसे भिंग होते.
 
काका, तसं बघायला गेलं तर हे एक छोटंसं भिंग आहे. पण याच बिंगातुन निर्माण होणारी उष्णता आणि आपली प्रचंड इच्छाशक्ती यांच्या सहाय्याने नीलने काळाच्या बलाढ्य भिंतीला एक छोटेसे छिद्र… ज्याला फारतर आपण छोटेसे द्वार म्हणुया, पाडण्यात यश मिळवले. पण नीलचे सगळे प्रयत्न त्याला असणार्‍या तोकड्या माहितीतुन आणि त्याच्या मनोराज्यातुन निर्माण झालेले होते. त्यामुळे त्या पर्‍यांच्या जगाचे दार शोधण्याच्या नादात त्याने त्या वर्षानुवर्षे कोंडल्या गेलेल्या काळ्या शक्तीली मुक्तद्वार मिळवुन दिले. तिला थोडीशी फट मिळताच ती तिथुन निसटली आणि आपल्या जगात येवुन दाखल झाली. इथे आल्या आल्या आपली शक्ती वाढवण्यासाठी म्हणुन समोर दिसेल त्या शरीराचा तिने ताबा घेतल्या. शेकडो वर्षे बंधनात राहिल्याने तिच्या शक्ती दुर्बळ झाल्यात, त्यामुळे ती अजुनतरी फक्त अमावस्येलाच बाहेर पडु शकतेय. इतर वेळेला ती त्या दाराच्या पलिकडे असते कारण इथले वातावरण अजुनही तिच्यासाठी योग्य नाही, ती फक्त अमावस्येलाच बाहेर पडु शकते.
 
ती जेव्हा अमावस्येच्या रात्री नीलला घेवुन बाहेर पडते ….
 
आपला बळी मिळवण्यासाठी, ताजे रक्त मिळवण्यासाठी….
 
तेव्हा तुमच्या या घरापुरते कालचक्र गोठवुन ठेवते, त्यामुळे तुम्हाला नील फक्त एक्-दिड मिनीटेच गायब झालाय असे वाटते, पण प्रत्यक्षात तो एक- दिड तासासाठी गायब असतो. तेवढा वेळ त्या शक्तीला पुरेसा आहे योग्य ती शिकार शोधण्यासाठी. शिकारीचे रक्त शोषुन घेण्यासाठी तिला त्या व्यक्तीला स्पर्ष करायचीही आवश्यकता नसते, नुसत्या डोळ्यांच्या माध्यमातुन ती एखाद्याचे रक्त शोषुन घेवु शकते, माझ्यावरही तो प्रयत्न करुन बगितलाय तिने, पण श्री समर्थांच्या कृपेमुळे मी वाचलो. तर हे सगळे असे आहे.
 
काळजी करु नका, ती शक्ती आपल्या नीलला काहीही करणार नाही, कारण तीला परत त्या दुनियेतुन या दुनीयेत येण्यासाठी नील आणि हे भिंग दोहोंचीही नितांत आवश्यकता आहे. नील तीच्या ताब्यात आहे पण आता हे भिंग माझ्याकडे आहे. तेव्हा नील अगदी सुरक्षीत राहील याची खात्री बाळगा. मी परवा दिवशी संध्याकाळी परत येइन अगदी जय्यत तयारीनेशी. विश्वास ठेवा मी तुमच्या नीलला त्या शक्तीच्या तावडीतुन अगदी सहिसलामत बाहेर काढीन. मला काही तयारी करायचीय, काही वस्तु मिळवायच्या आहेत, थोडीफार साधने सिद्ध करावी लागतील. असो निश्चिंत राहा, परवा दिवशी संध्याकाळी आपण या सर्वाचा शेवट करणार आहोत, आपल्या नीलला त्याच्या तावडीतुन वाचवणार आहोत. येवु मी आता?
 
त्यांचे शब्द ओठापर्यंत यायच्या आतच सन्मित्र घराबाहेर पडला होता. आनंदराव आणि नीलावहिनी दोघांनीही त्याच्या पाठमोर्‍या आकृतीलाच हात जोडले.
…………………………………………………………………………………………………………………….
 
त्या दिवशी सन्मित्र पहाटे साडे तीन वाजताच उठला होता. स्नान-संध्या आणि नियमीत योग प्राणायामादी व्यायाम आटपुन त्याने ध्यान लावले. आप्पाजी गेल्यापासुन हा त्याचा नियमीत दिनक्रम होता. शरीरशुद्धी, बलसाधना आणि आत्मसाधना हे तीन मुलभुत प्रकार आप्पाजींनी शिकवले होते. आज तर त्याची खुपच आवश्यकता होती. दिवसभर सन्मित्र आपल्या खोलीतुन बाहेर पडलाच नाही. आप्पाजींनी शिकवलेल्या त्या वर्णमाला आणि प्रभु रामरायाचे नामस्मरण यातच तो व्यस्त होता. रात्री बरोबर दहा वाजता जेव्हा तो आनंदरावांच्या घरी पोहोचला तेव्हा दोघेही त्याची वाटच पाहत होते. चेहेर्‍यावर प्रचंड प्रश्न आणि मनातल्या शंका, नीलची काळजी याने त्या दोघांचेही चेहरे काळवंडुन गेले होते. सन्मित्रला पाहताच त्यांच्या चेहेर्‍यावर थोडे हासु उमलले.
 
सन्मित्रने आपल्या खांद्यावरच्या झोळीतुन एक रेशमी दोर्‍याचे बंडल काढले. घराची सर्व दारे, खिडक्या… जिथुन आत येण्याचा किंवा बाहेर जाण्याचा मर्ग होता तिथे तिथे त्याने तो काळ्या रंगाचा रेशमी दोरा बांधुन टाकला. नंतर झोळीतुन एक तांब्याचे प्रणवचिन्ह (ओंकार) काढुन त्याने ते घराच्या उंबर्‍यावर ठोकुन टाकले. आनंदराव आणि नीलावहीनी दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते.
 
“काका, आज पहाटे उठुन या काही गोष्टी सिद्ध करुन घेतल्या गुरुमहाराजांकडुन. इथे जे काही आहे, ते आपल्या हातुन निसटलेच तरी ते या घराबाहेर पडता कामा नये म्हणुन ही बंधने घातली आहेत. खरेतर ही सगळी बंधने, ही सुरक्षा प्रतिकात्मक आहे…आपले खरे शस्त्र आहे ते रामनाम, त्याच्यावरची आपली निष्ठा , विश्वास, श्रद्धा! “
 
आनंदराव थोडे गोंधळल्यासारखे झाले,” मी समजलो नाही आण्णा, नाही.. माफ करा! रामनामाचा महिमा मला मान्य आहे. पण त्या अघोरी शक्तीचा पाडाव करायचा असेल तर त्यासाठी इतर काही मंत्र तंत्र पण असतीलच ना. केवळ रामनामाच्या जोरावर त्या बलाढ्य शक्तीचा सामना कसे करणार आहोत आपण?”
 
तसा सन्मित्र हसला, त्यांच्या समोर येवुन बसला.
 
“काका, अहो “राम” हाच सगळ्यात मोठा मंत्र आहे. मुळात मंत्र म्हणजे काय? तर “मननेन जायते इति मंत्र:” ज्याच्या साह्याने तरुन जाता येते तो मंत्र. प्रकृतीच्या प्रथम स्पंदनातुन प्रणव(ओंकार) व द्वितीय स्पंदनातुन अष्टबीजांची निर्मीती झाली.
 
कामबीज, योगबीज, गुरुबीज, शक्तीबीज, रामबीज, तेजोबीज, शांतीबीज आणि रक्षाबीज ही शब्दब्रम्हाची आठ बीजे.
 
आता रामच का?
 
तर राम हा बीजमंत्र आहे. त्याच्या उपासनेने जीव आणि ब्रम्हाचे ऐक्य घडुन येते. आपण म्हणतो ना जीवाशिवाची भेट तसंच. राम हे रक्षाबीज म्हणजे तारकमंत्र आहे. राम म्हणजे काय? तर सर्वसाधारण साधकाला कळावे, आकलन व्हावे म्हणुन परब्रम्हाला दिलेले एक नाव. रामाचे आळंबन लावुन ’परब्रम्ह’ कळावे म्हणुन ब्रम्हाला लावलेली एक उपाधी. ब्रम्ह समजावे, उमजावे म्हणुन संतलोक रामाचा आश्रय घेवुन ब्रम्हाचे म्हणजे आत्म्याचे दर्शन घडवतात. शास्त्र आणि गुरू सांगतात की ब्रम्ह हे निराकार आहे, निर्गुण आहे. त्या निराकार स्वरुपाचे ज्ञान होण्यासाठी रामाचा म्हणजे सगुणाचा आधार आवश्यक. मानवाच्या हातुन रावणाचा वध होणार होता म्हणुन परमेशाने दाशरथी रामाचा अवतार धारण केला. रावणवधानंतर देवांनी खुष होवुन रामाचा जयजयकार केला आणि म्हणाले की हे रामा तु देव आहेस, देवाधिदेव आहेस. त्यावेळी राम म्हणतो …..
 
“आत्मानं मनुषं मन्ये रामं दशरथोत्यजय “
 
दशरथपुत्र या नात्याने राम मानवीय आहे तर विष्णुरुप असल्याने त्यात देवत्वही आहे. तो मर्यादा पुरूषोत्तम असल्याकारणे या देवांशी मानवाची , ईशत्वाची आराधना करावी ,त्यासाठी नाम घेणे आहे. त्याच्या नावात अघटीत घटनापटुत्व शक्ती आहे. रामाचे नाव हाच एक मंत्र आहे, तारकमंत्र आहे.
 
“गर्भ, जन्म, जरा, मरण , संसार महत्मयात संतास्यमिती ! तस्मादुच्यते तारकसिद्धी !! “
 
राम म्हणजे परब्रम्ह. गर्भ, जन्म, जरा (वार्धक्य), मृत्यु आणि भौतिकता यापासुन रामनाम मुक्ती देते. परब्रम्हापासुन निर्माण होणारा प्रणव मोक्ष देतो, त्याचेच हे “तत्वमसि” रुप आहे. म्हणजे परब्रम्ह तुच आहेस असा उपदेश हा मंत्र करतो, तुमच्यात सामर्थ्य निर्माण करतो म्हणुन रामनाम हा सर्वशक्तिमान असा मंत्र आहे. समजले, अजुन काही शंका असल्यास आत्ताच विचारुन घ्या. कारण ज्यावेळी आपण त्या शक्तीचा सामना करु तेव्हा मला तुमचीही मदत लागणार आहे, तेव्हा तुमचा मनोनिग्रह कमी पडता कामा नये. तेव्हा तुमचा रामावरचा, रामनामावरचा विश्वासच आपल्या उपयोगी पडणार आहे.”
 
सन्मित्रने बोलणे थांबवले आणि त्या दोघांच्या चेहेयाकडे पाहीले. त्यांचे समग्र शंकासमाधान झाल्याचे भाव आता त्या दोघांचाही डोळ्यात आणि चेहेर्‍यावर दिसत होते.
 
“क्षमा करा, आण्णा. अविश्वास नव्हता माझा पण एक शंका म्हणुन विचारले होते. आता आम्ही दोघेही पुर्णपणे तयार आहोत कुठल्याही परिस्थितीशी सामना करायला.” आनंदराव म्हणाले.
 
“काका, काकु तुम्हाला फारसे काही करायचे नाही आहे. बरोबर साडे अकरा वाजता आपण नीलच्या खोलीत जावु. मी एक रिंगण आखुन देइन तुम्हाला. तुम्ही त्यात थांबायचे आहे. लक्षात ठेवा, काहीही झाले तरी मी सांगितल्याशिवाय रिंगणाच्या बाहेर यायचे नाही. तो खुप आकर्षणे दाखवील, भीती दाखवील पण मोहाला बळी पडायचे नाही. ज्यावेळी मी खुण करीन त्यावेळी पटकन रिंगणाच्या बाहेर यायचे आणि नीलला उचलुन खोलीच्या बाहेर घेवुन जायचे, बस्स! जमेल ना?”
 
आनंदराव आणि नीलावहीनी दोघांनीही सुचक मान डोलावली. आपल्या मुलाला आणि विश्वाला वाचवण्यासाठी आता काहीही दिव्य करायची त्यांच्या मनाची पुर्ण तयारी झालेली होती.
 
साडेअकरा वाजता तिघेही नीलच्या खोलीत शिरले. ते भिंग त्याने परत नीलला देवुन टाकले .आपल्या झोळीतुन थोडेसे भस्म काढुन सन्मित्रने एक छोटेसे रिंगण आखले आणि त्या दोघांनाही त्या रिंगणात उभे केले. स्वत: मात्र रिंगणाच्या बाहेरच एका जागेवर पद्मासन लावुन येणाया प्रसंगाचे स्वागत करण्यास तो सिद्ध झाला.
 
“आण्णा, तुम्ही बाहेरच , असंरक्षित आहात.” नीलावहिनींना स्त्रीसुलभ काळजी वाटणे साहजिकच होते.
 
तसा सन्मित्र हसला, ” काकु, अगं शिकार करण्यासाठी सावजाला काहीतरी आमिष दाखवावे लागते. तु काळजी करु नको, माझा राम समर्थ आहे माझे रक्षण करायला. जय जय रघुवीर समर्थ! “
 
“जय जय रघुवीर समर्थ” त्या दोघांनीही रामनामाचा घोष केला.
 
बारा वाजले आणि हळुहळु खोलीतले वातावरण बदलायला सुरूवात झाली. हवेत एक विलक्षण दुर्गंधी पसरली. हळुहळु खोलीतला प्रकाश कमी होवु लागला, एक प्रकारचे कोंदट धुके खोलीत जमा व्हायला सुरूवात झाली. श्वास घ्यायला त्रास होवु लागला. नील पडल्या जागी चुळबुळ करायला लागला. तसे सन्मित्रने दोघांकडे पाहून स्मित केले.
 
“तो आलाय काका, सावध ! मी सांगितलेले लक्षात आहे ना नीट. मी खुण केली की ……!”
 
सन्मित्रने आपल्या झोळीतुन काही उदबत्त्या काढुन लावल्या, एक छोटीशी पणती काढली आणि प्रज्वलीत केली. तसे धुके कमी होवु लागले. त्या दुर्गंधीची परिणामकारकता कमी होवु लागली. तसा नील चमकला, त्याने वळुन सन्मित्रकडे पाहीले.
 
“हं, तु आलास तर? तुला काय वाटले, त्या दिवशीसारखा आज पण मी तुला परत जावु देइन. आज तुझी सुटका नाही.”
 
आनंदराव आणि नीलावहीनींनी पहिल्यांदाच तो आवाज ऐकला होता त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले.
 
“आणि या दोघांनाही आणलेस ते बरे केलेस, माझ्या मार्गातली सगळ्यात मोठी धोंड होती ही. आज सगळे एकदमच संपाल.”
 
त्या आवाजात एक प्रकारची तुच्छता, स्वत:च्या सामर्थ्याचा अहंकार, दर्प भरलेला होता. दुसर्‍याच क्षणी नील पलंगावरुन खाली उतरला आणि सन्मित्रसमोर येवुन उभा राहीला. तसे आनंदराव, नीलावहीनी चमकले. नील चालु शकतो …….
 
“तो नील नाहीये काका-काकु! तो ’तो’ आहे, फसु नका, रिंगणाच्या बाहेर येवु नका.” त्यांच्या कानात सन्मित्रचा आवाज घुमला तसे त्यांना आश्चर्य वाटले कारण सन्मित्र डोळे मिटुन शांत बसला होता, त्याचे ओठही हलत नव्हते.
 
“असे आश्चर्यचकित होवु नका, याला टेलीपथी म्हणतात. शास्त्र आहे हे.” पुन्हा तोच आवाज.
 
सन्मित्र लक्ष देत नाही म्हणल्यावर नीलने त्या दोघांकडे मोहरा वळवला. दुसर्‍याच क्षणी नील कोसळुन जमीनीवर पडला. जोरजोरात विव्हळायला लागला….
 
“आई, वाचव गं मला, खुप दुखतेय! त्या माणसाने काहीतरी जादु केलीय. तो सन्मित्र खोटारडा आहे. तोच खरेतर हे सगळे घडवुन आणतोय. बाबा, वाचवा मला! मी काही सुटत नाही आता त्याच्या तावडीतुन!”
 
तसे नीलावहीनी व्याकुल झाल्या आणि पुढे झेपावल्या. आईच ती, पोटच्या पोराच्या यातना पाहुन कळवळली नसती तर आई कसली. पण आनंदरावांनी त्यांना पकडले….
 
“नीला, तो आपला नील नाहीये, आपल्या नीलला बोलता येत नाही माहीत आहे ना तुला.”
 
तसा नील ताडदिशी उठुन उभा राहीला, “असे काय, तुझ्या या पोरालाच संपवतो आज, मग बघु तुझा तो संरक्षक किती वेळ गमजा करतो ते?”
 
“जा रे, आमचे संरक्षक प्रभु रामचंद्र आहेत. तुझ्यासारखे क्षुद्र जीव काय लढा देणार, परमेश्वरासोबत आणि एक लक्षात ठेव या वेळी मला माझा मुलगा गमवावा लागला तरी चालेल, पण तुला मुक्त करुन या सकल जगाला धोका होवु देणार नाही मी.” आनंदराव ठामपणे उदगारले आणि त्याक्षणी सन्मित्रने डोळे उघडले.
 
“याच, याच क्षणाची वाट पाहात होतो मी काका. बस्स रामप्रभुंचे नाव घ्या आणि सज्ज व्हा.” सन्मित्र आता उठुन उभा राहीला.
 
दोघे एकमेकासमोर उभे राहुन एकमेकाला आजमावीत होते. आता ते युद्ध फक्त सन्मित्र आणि ती अघोरी शक्ती यांच्यातले राहीले नव्हते. तो लढा होता सत आणि असत मधला. ती लढाई होती धर्म आणि अधर्माची! आनंदराव त्या दोघांकडे पाहातच राहीले. दोन प्रबळ शक्ती एकमेकासमोर अंतीम युद्धासाठी उभ्या ठाकल्या होत्या. नील तोंडातल्या काहीतरी पुटपुटत होता. हळु हळु नीलची आकृती अदृष्य होवु लागली. त्या जागी एक काळपट, धुक्याचा आकार निर्माण झाला. हवेत कमालीचा गारवा पसरला होता, श्वास घेणे जड होवु लागले होते. आनंदरावांचे लक्ष सन्मित्रकडे गेले आणि त्यांना धक्काच बसला.
 
सन्मित्रच्या जागी कुणीतरी पन्नास – पंचावनच्या घरातले गृहस्थ उभे होते. पांढरे शुभ्र धोतर, खांद्यावर पांघरलेले उपरणे , गळ्यात जानवे आणि चेहेरा …….
 
आनंदरावांचे डोळे दिपुन गेले, चेहेयाच्या ठिकाणी एक विलक्षण  तेजस्वी, दाहक असा तेजाचा अग्निगोलक दिसत होता. तो चेहेरा हळुवारपणे आनंदराव आणि नीलावहिनींकडे वळला. त्या सत्पुरुषाने आपले दोन्ही हात उंचावले जणु काही दोन्ही हात उंचावुन तो आशिर्वादच देत होता. खोलीत एक विलक्षण तेजस्वी असा शुभ्र प्रकाश पसरला आणि त्याच क्षणी खोलीत तो मंत्रघोष घुमला …
 
“जय जय रघुवीर समर्थ”
 
आणि नील खाली कोसळला आणि तेव्हांच आनंदरावांच्या कानात पुन्हा सन्मित्रचा आवाज आला…
 
“काका, आत्ताच !”
 
तसे आनंदराव नीलावहीनींना घेवुन रिंगणाच्या बाहेर धावले, त्यांनी नीलला उचलुन खांद्यावर टाकले. सर्वांगाला चटके बसत होते, श्वास थांबतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यांनी नीलला खांद्यावर टाकले आणि वहीनींसोबत खोलीच्या बाहेर पडले. मागे हलकल्लोळ माजला होता. सावज हातातुन निसटल्यामुळे तो प्रचंड भडकला होता, पिसाळल्यासारखा आपल्या सर्वशक्तीनिशी तो सन्मित्रवर तुटुन पडला असावा. पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करुन आनंदराव बाहेर पडले.
 
त्यानंतर थोडा वेळपर्यंत खोलीतुन वेगवेगळे आवाज येत होते. सन्मित्रच्या आवाजातील “जय जय रघुवीर समर्थ” जा घोष चालुच होता. आणि अचानक आनंदरावांना सन्मित्रच्या आवाजातला बदल जाणवला. आता त्या आवाजाला एक वेगळीच धार आली होती. आणि त्याने तो विवक्षित शब्द उच्चारला ……..
एक वेदनेचा हुंकार आणि मग एक आरोळी !
आणि मग सगळे आवाज लुप्त झाले, एक विलक्षण शांतता पसरली आसमंतात.
 
तसे आनंदराव अस्वस्थ झाले, त्यांचाने राहवले नाही. ते तसेच धाडस करुन पुन्हा खोलीत शिरले. खोली पुन्हा पुर्वपदावर आली होती पण सन्मित्र एका कोपर्‍यात अचेतन अवस्थेत पडला होता. आनंदरावांनी सन्मित्रला उचलले आणि ते खोलीच्या बाहेर पडले. सन्मित्रचा श्वास चालु होता, बहुदा त्या लढाईच्या थकव्याने अतिश्रमाने त्याला ग्लानी असावी. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्यांच्याकडे पाहुन प्रसन्न हसला.
 
“दु:स्वप्न संपलं काका! ते नष्ट झालय. आता काळजी करण्यासारखे काही राहीले नाही. अरे हो, तुम्ही ज्यांना पाहिलत ना मघाशी ते माझे गुरु, आप्पाजी! बगितलत ना या लेकरावर संकट आलं की त्याची माय कशी धावुन आली लगेच मदतीला. सुदैवाने त्यावेळी नील तिथेच होता, त्यामुळे त्यालाही तो दैवी स्पर्ष झालाय. कदाचित तुमचा नील पुर्णपणे बराही होईल यातुन. बोला “सियावर रामचंद्र की जय!”
 
त्याचवेळी नील चुळबुळायला लागला होता. त्याने डोळे उघडले आणि अगदी हळु आवाजात हाक मारली….
 
“आई, मी…मला ……..! ’ बोलता बोलताच तो हलकेच उठुन बसला. आणंदराव आणि नीलावहीनींच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहु लागले. त्यांचा नील पुन्हा माणसात आला होता. दोघेही एकदम सन्मित्रकडे वळले…
 
“आण्णा, तुमचे उपकार आम्ही…………………………………….”
 
सन्मित्र जागेवर होताच कुठे? आपले काम आटोपताच तो कधीच दार उघडुन घराबाहेर पडला होता. त्यांच्या कानावर फक्त त्याच्या खणखणीत आवाजातील श्लोक आला……
 
“समर्थाचिया सेवका वक्र पाहे
 असा सर्व भुमंडळी कोण आहे
 जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही
 नुपेक्षी कदा रामदासाभिमानी !!”
 
“जय जय रघुवीर समर्थ!”
 
समाप्त.
 
विशाल कुलकर्णी.   
 

25 responses to ““द्वार”

 1. bhagyashree

  जुलै 29, 2010 at 5:07 pm

  chaannn!! mat ahe katha…

   
 2. विशाल कुलकर्णी

  जुलै 29, 2010 at 5:11 pm

  धन्यवाद भाग्यश्री !

   
 3. BHUSHAN

  ऑक्टोबर 16, 2010 at 2:01 pm

  SUPERB……..I LIKE THIS VERY MUCH……..GREAT

   
 4. mandar kulkarni

  फेब्रुवारी 21, 2011 at 6:10 pm

  Very nice.I like your blog and you are having capacity and skill to narrate things….keep it up….Jai Jai Raghuveer Samarth!!!!!!!!

   
  • विशाल कुलकर्णी

   फेब्रुवारी 23, 2011 at 4:31 pm

   धन्यवाद मंदारजी 🙂
   तुमच्यासारख्या वाचकांचे प्रोत्साहन अजुन चांगले लिहायला प्रयुक्त करते. मन:पूर्वक आभार !!

    
  • विशाल कुलकर्णी

   फेब्रुवारी 23, 2011 at 5:44 pm

   जय जय रघुवीर समर्थ 🙂

    
 5. Sukhada

  मे 6, 2011 at 12:04 pm

  Vishal ,hi katha me aadhi pan kuthe tari vachli hoti,kharach utkanthavardhak aahe. Simply Superb,

   
  • विशाल कुलकर्णी

   मे 6, 2011 at 6:48 pm

   धन्यवाद सुखदा !
   मायबोली किंवा मिसळपाव कुठेतरी वाचली असेल तुम्ही. मनःपूर्वक आभार !

    
 6. Eknath Jadhav

  सप्टेंबर 15, 2011 at 5:38 pm

  jabardast

   
 7. Priya

  नोव्हेंबर 11, 2011 at 5:26 pm

  विशाल तुझा अभ्यास खरचं गाढा आहे…हे जे सगळ तू रामनामाबद्दल लिहील आहेस ते पटलं मला…आणि तू मला हि कथा वाच म्हणून suggest केलं होतंस but या कथेला मी नाही घाबरले कारण यात त्या शक्तीची हार झालीये…..”मला खात्री आहे” मध्ये ते भूत नुकतंच आलं होत so मी घाबरलेले 🙂 😉

   
  • विशाल कुलकर्णी

   नोव्हेंबर 14, 2011 at 12:11 pm

   धन्स प्रिया ! यापुढे कुठलीही भयकथा वाचताना विकुमांत्रिकाची आठवण काढत जा, म्हणजे भिती नाही वाटणार.

    
 8. राहुल बारी

  डिसेंबर 19, 2011 at 1:12 pm

  अप्रतिम….!!! मी आतापर्यंत ब-याच भुतकथा आणि रहस्यकथा वाचल्या आहेत…. पण हि कथा मला सर्वांत जास्त आवडली…!!!

   
 9. sandesh

  सप्टेंबर 11, 2012 at 2:42 pm

  ati uttam………khup chan likhan.

   
 10. pravin rane

  सप्टेंबर 28, 2012 at 8:56 pm

  khup chan story aahe vishal dada….mi navin aahe ya blogvar mhanun aata suruvat pasun vachatoy……

   
 11. Mangesh Bendal

  ऑक्टोबर 4, 2012 at 3:49 pm

  अप्रतिम….!!!अप्रतिम….!!!अप्रतिम….!!!अप्रतिम….!!!अप्रतिम….!!! हि कथा मला सर्वांत जास्त आवडली.

   
 12. Pradip Kulkarni

  डिसेंबर 26, 2012 at 5:23 pm

  good pan chakoritli watli mala katha, by the way wartul kadhi purn karnar?

   
 13. shradha

  मार्च 23, 2013 at 3:01 pm

  khupach chaan katha aahe vishal.
  jai jai raghuveer samrth

   
 14. Vaibhav Joshi

  जानेवारी 7, 2014 at 5:05 pm

  हि कथा मी पूर्वी म्हणजे अनेक वर्षांपूर्वी कुठल्यातरी पुस्तकात वाचल्यासारखे वाटतेय . नाव आठवणे शक्यच नाही .

   
 15. Shashi Kulkarni

  एप्रिल 14, 2014 at 1:06 pm

  Ekach No Story Ahe…….. Really Awesome……

   
 16. Vijay Suware

  मे 27, 2015 at 6:03 pm

  Khupach chan..mast..khup aanand hoto asha katha vachtana….

   

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
%d bloggers like this: