RSS

“कोप”

11 ऑगस्ट

दोन पोरास्नी म्हागं सोडुन गेली वो सायेब? आता पोरास्नी कसं सांगु? माजं तर समदं आविष्यच बरबाद झालं बगा !!
तो धाय मोकलुन रडत होता. आणि आम्ही सारे हतबुद्ध होवुन पाहात होतो.
तीचं शव तिथंच पडुन होतं आणि काल रात्रीपासुन हा सहावा माणुस होता तीला आपली बायको म्हणणारा ! मनोमन प्रचंड संताप येत होता. केवळ दागिन्यांसाठी माणुस या थराला जावु शकतो. काल रात्री आणखी एक ढासळलेले घर शोधताना एका महिलेचे शव सापडले होते. दागिन्यांनी बाई नखशिखांत सजलेली होती. आणि तिच्यावर हक्क सांगायला आत्तापर्यंत सहा जण आले होते.

नाही, ही कुठल्याही रहस्यकथेची किंवा खुनप्रकरणाची सुरुवात नाहीये. १९९३ साली किल्लारीला अनुभवलेलं विदारक कटु सत्य आहे हे .

३० सप्टेंबर १९९३, पहाटे ३ वाजुन ५५ मिनीटे आणि ४७ सेकंद. सगळे साखरझोपेत होते. नुकतेच बाप्पांचं थाटामाटात विसर्जन झालेलं. त्या मिरवणुकीची धुंदी मनावर होती आणि बरोबर पहाटे ३ वाजुन ५५ मिनीटे आणि ४७ सेकंदांनी पहिला हादरा बसला. मला आठवतं….मी दचकुन जागा झालो. कसलेतरी एखादा मोठा ट्रक धाडधाड करत जवळुन गेल्यावर येतो तसले आवाज येत होते. काही तरी असेल नेहेमीचंच म्हणुन दुर्लक्ष केलं आणि परत चादरीत गुरफ़टुन झोपी गेलो.

येणारी सकाळ मात्र भयानक वास्तव घेवुन आली होती. लातुरच्या परिसरात प्रचंड भुकंप झाला होता. ६.२ रिष्टर स्केल चा हा धक्का किती आयुष्यं उध्वस्त करुन गेला होता ते हळुहळु समोर यायला लागले. त्यावेळेस अभाविप आणि विवेकानंद केंद्राबरोबर स्वयंसेवक म्हणुन काम करायचो. लगेच काही बैठकी झाल्या, कुणी कुठल्या भागात जायचे ते ठरले. काही जणांनी सोलापुरातच राहुन मदतनिधी संकलन आणि इतर मदत मिळवायच्या कामात लक्ष घालायचे तर उरलेल्यांनी प्रत्यक्ष भुकंपग्रस्त क्षेत्राकडे रवाना व्हायचे असे ठरले. लगोलग अभाविपचे बरेच कार्यकर्ते संध्याकाळी सास्तुर, किल्लारी, चिंचोली, लोहारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले. किल्लारी आणि लोहारा इथे गेलेल्या टीममध्ये माझा समावेश होता. जसजसं जवळ पोहोचलो तसतसे त्या महाभयंकर विनाशाची खरीखुरी भयानक कल्पना यायला लागली. जिथे बघाल तिकडे ढासळलेल्या घरांचे ढिगारे, जमीनीला पडलेल्या प्रचंड भेगा, रक्तामासाचा खच, सगळ्या आसमंतात पसरलेली एक विलक्षण दुर्गंधी.

मृत्युची अनेक रुपे पाहिली होती. कोल्हापुर अलिबाग एस. टी. ला लोनावळ्याजवळ झालेल्या अपघातात त्या नवविवाहितेला, तिचा अर्धवट बाहेर आलेला मेंदु एका हाताने डोके घट्ट धरुन ठेवुन शिबिराच्या ठिकाणी आणताना मृत्युचे भयंकर स्वरुप अनुभवले होते. पण हे मात्र सगळ्या कल्पनांच्या पलिकडलं होतं. मृत्युबद्दलच्या सगळ्या कथा कहाण्यांना, संकल्पनांना खोटं ठरवणारा हा अनुभव होता. सगळ्यात वाईट आणि क्लेषकारक होतं ते चोहीकडुन कानावर येणारे आक्रोश. भुकंपाच्या भीतीवर मात केली होती आम्ही. पन त्या केविलवाण्या आक्रोशांना कसे तोंड देणार होतो.

क्षणभर वाटलं, इथुनच परत जावं. पण परत वाटलं, असा जर भ्याडासारखा परत गेलो तर आण्णांना कसं तोंड दाखवु, त्यांना काय वाटेल. आण्णा त्यादिवशी सकाळीच लातुरला पोलीस बंदोबस्तासाठी रवाना झाले होते. (नंतर आण्णांनी सांगितलं, आयुष्यात पहिल्यांदा पोलीस खात्यात असल्याची लाज वाटली. काही पोलीसांनीसुद्धा संधी साधुन काही प्रेतांच्या अंगावरचे दागीने पळवण्याचे प्रकार केले होते. एका कॉन्स्टेबलला तर आण्णांनीच कमरेच्या पट्ट्याने मारले होते त्यासाठी. तेव्हा त्यांच्यावर इन्क्वायरी देखील झाली होती, ऑन ड्युटी पोलीसावर हात उगारल्याबद्दल. त्यातुन निष्पन्न काही झाले नाही, पण तो कॉन्स्टेबल मात्र नंतर निलंबीत झाला). असो, तर ठामपणे निसर्गाच्या अवकृपेवर मात करायला आम्ही तयार झालो.

हळु हळु लक्षात आलं की आमच्यासारखे खुप जण आधीच मदतीसाठी पोहोचले होते. मन भरुन आलं, वाटलं, कोण म्हणतो आमच्यात एकी नाही म्हणुन. त्या क्षणी तिथे कोणी हिंदु नव्हता, ना कोणी मुसलमान ना कोणी ख्रिश्चन…तिथला प्रत्येक जण फक्त माणुस होता. आणि माणुस म्हणुन आपल्यासारख्या माणसांसाठी महाबलाढ्य अशा निसर्गाबरोबर लढायची जिद्द उरी बाळगुनच तिथे आला होता.

जिकडे नजर जाईल तिकडे भयाण विध्वंस पसरलेला. कुणाचा घरधनी हरवलेला, कुणाची लेकरं. कुणी आपल्या म्हातार्‍या वडीलांना शोधत होता, तर कुणी इतकी वर्ष साथ दिलेल्या बैलाच्या जोडीसाठी व्याकुळ झाला होता. सगळीकडे नुसता गोंधळ चालु होता. तीन दिवस काढले त्या परिसरात. खरंतर सुरुवात कुठुन करायची तेच कळत नव्हतं. आमच्याबरोबर आलेल्या मुली तर सुन्न होवुन गेल्या होत्या. तीन दिवस चिखल उपसावा तशी प्रेतं उपसुन काढत होतो. तोपर्यंत लष्करही मदतीला येवुन पोचलं होतं. विदेशातुनही डॉक्टर्सची पथके येवुन कामाला लागली होती.

अशीच प्रेते उपसताना वर उल्लेखलेलं महिलेचं शव हाताला लागलं. काय करावं काही सुचेना. शेवटी लष्कराने हस्तक्षेप केला तेव्हा उघडकीला आलेलं सत्य फारच भयानक, विदारक होतं. त्यांच्यापैकी एकाचाही तिच्याशी कसलाही संबंध नव्हता. पण त्या प्रत्येकाने आपलं कोणी ना कोणी या भुकंपात गमावलं होतं. संसार तर सगळ्यांचेच उघड्यावर आलेले. अन्य काही नाही, तिच्या अंगावरचे दागीने विकुन पुढचे काही दिवस घरातल्यांची पोटं तरी भरता येतील, हा क्षुल्लक (?) स्वार्थ फक्त होता. एकीकडे चीड येत होती तर एकीकडे किवही वाटत होती. स्वत:च्या असहायतेचा मनापासुन संतापही वाटत होता.

निसर्गाचा कोप एवढ्यावरच संपलेला नव्हता. झालं असं की मदत म्हणुन आलेली धान्याची पोती तिथेच छोटे छोटे तंबु ठोकुन त्यात ठेवली होती. आणि नेमकं पर्जन्यराजाने आक्रमण केलं आणि सगळीकडे चिखल झाला, सगळं धान्य भिजलं. ते सुरक्षीत ठिकाणी हलवताना आसमान आठवलं. सगळीकडेच अवकळा झालेली. निसर्गाचा कोप सगळीकडेच होता. सुरक्षीत जागा सापडणार तरी कुठे?
तशात ढिगारे उपसताना रोज नवीन प्रेतं सापडत होती. पण त्या पावसात ती प्रेतं दहन करण्यासाठी पुरेशी सुकी लाकडेसुद्धा मिळेनात. अक्षरश: एकेका चितेवर १०-१० प्रेते जाळायची वेळ आली. कित्येकवेळी तर तेही मिळायचं नाही. मग मोठाले खड्डे खांदुन कित्येक प्रेतं लष्कराच्या मदतीने तशीच पुरण्यात आली. एका रात्रीत किल्लारीचा समृद्ध परिसर होत्याचा नव्हता करुन टाकला होता भुकंपाने.

नंतर तिथुन लोहार्‍याला गेलो, मग काटेचिंचोली, रेबेचिंचोली, सास्तुर . पुढचे पंधरा दिवस अतिशय तणावाचे होते. नंतर तिथुन परत आल्यावरही जवळपास महिनाभर तो वास नाकातुन गेला नव्हता. हाताकडे लक्ष गेले की ती प्रेते आठवायची. लवकरच सगळी दु:खे बाजुला ठेवुन कॉलेजचा बुडालेला सिलॅबस पुर्ण करायच्या मागे लागलो.

त्यानंतर पुढच्या वर्षी दिवाळीत पुन्हा एकदा तिथे गेलो. घरात कुणी गेलं असेल तर वर्षभर कुठलाही सण साजरा केला जात नाही आपल्याकडे, घरात गोडधोड केलं जात नाही. अशावेळी संबंधिताचे नातेवाईक गोडधोड घेवुन त्याच्याकडे जातात आणि त्याचं सांत्वन करुन दु:ख वाटुन घेण्याचा प्रयत्न करतात. नेमकं हेच करण्याचं अभाविपने ठरवलं होतं. पाडव्याच्या आदल्या रात्री सोलापुरच्या शिवस्मारकमध्ये रात्रभर जागुन सोलापुरातल्या जागृत नागरिकांच्या मदतीने हजारो पुरणपोळ्या बनवण्यात आल्या. कुठुन कुठुन पुरणयंत्रे जमा केली आणि रात्रभर एकीकडे आम्ही पुरुषमंडळी पुरण वाटत होतो तर बायका पोळ्या लाटत होत्या. प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्या, बुंदीचे लाडु, एक साडी, धोतर जोडी किंवा शर्ट पीस पॆंटपीस आणि एक चादर असे वाटायचे ठरले होते.

केल्लारीच्या पुनर्वसन केंद्रात एक सत्तरीचा म्हातारा भेटला. त्याला सगळं सामान दिल्यावर ढसाढसा रडायलाच लागला, म्हणाला….

“पोरांनो, काय येळ आणलीय नशीबानं ! राजासारका राह्यलोय या किल्लारीत. अजुनबी माझ्या वाड्याबरोबर जमीनीत गाडली गेलेली माझी तिजोरी काढुन द्या. सगळं गाव मी एकटा उभा करतो पुन्हा, पयल्यासारकं !!!!

(मागे हा लेख मायबोलीवर लिहीला होता, जुनी पाने चाळताना सापडला, वाटलं हा अनुभव तुमच्याबरोबरही शेअर करावा, म्हणुन इथे टाकतोय.)

विशाल.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

 
<span>%d</span> bloggers like this: